चांदोरी गाव......

चांदोरी गाव…..ता.निफाड जि.नाशिक,महाराष्ट्र,भारत

      नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदावरी नदीतीरावर वसलेले चांदोरी हे गाव आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठिकाण आहे. चांदोरी गावचा इतिहास खूप जुना आहे. चांदोरी चिरेबंदी वाड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

चांदोरी गावाला पूर्वी चंद्रगिरी किंवा चंद्रावती या नावाने ओळखले जायचे. गोदावरी नदीचा आकार या गावाजवळून वाहताना आकाशातील चंद्रकोरी सारखा बनतो. नदीच्या याच चंद्रकोर आकारावरून पुढे या गावाला चांदोरी हे नाव पडले असावे, असे मानले जाते.

 चांदोरीला पेशवेकालीन इतिहास लाभलेला आहे. स्वराज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडून सन 1718 मध्ये महादेव भट हिंगणे यांना बहादूरकी आणि चांदोरी परिसरातील पाच गावांची जहागिरी मिळाली होती. 1762 च्या सुमारास सरदार भाऊसाहेब हिंगणे यांनी चांदोरीत 56 खोल्यांचा प्रशस्त वाडा बांधला, जो आजही इतिहासाची साक्ष देतो. चांदोरीत हिंगणे वाडा म्हणून तो आजही प्रसिद्ध आहे.ब्रिटिशांच्या काळातही नाशिक जिल्ह्यात सरदार हिंगणे यांची सरदारकी मंजूर करण्यात आली होती. 


       गोदावरी नदीच्या पात्रात अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिरे विशेषत: शिव मंदिरे दिसतात. तसेच गावातील 250 ते 300 वर्ष जुने असलेले खंडेराव महाराजांचे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नदीकाठावरील हे खंडोबारायांचे मंदिर प्रती जेजुरी म्हणून समजले जाते. आधी चांदोरी मग जेजुरी अशी या गावाची भक्तांमध्ये ख्याती आहे. 

       ऐतिहासिक काळापासून चांदोरी गावात काही प्रमुख घराण्यांचे वर्चस्व आणि सामाजिक योगदान राहिले आहे.

 हिंगणे कुटुंब चांदोरीचे जहागीरदार म्हणून ओळखले जात. पेशवेकाळात त्यांच्याकडे येथील महसूल आणि हजारो एकर जमिनीची मालकी होती. त्यांचा हिंगणे वाडा आजही गावचे मुख्य आकर्षण आहे. हिंगणे यांच्या वाड्यातील देवी ही कोल्हापूरच्या देवीचे अधिष्ठान मानले जाते. 

       गोदावरीच्या कुशीत बुडालेली मंदिरे हे चांदोरीचे वैशिष्ट्य मानले जाते.

पाण्यात राहूनदेखील ही हेमाडपंथी मंदिरे सुस्थितीत आहेत. ही मंदिरे अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे सांगितले जाते. शंकराची ती बारा मंदिरे आहेत. त्यामुळे त्यांना बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती मानतात. दुर्मिळ असे पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे.

       नदीपात्रात अनेक मूर्ती सापडतात. या मूर्तींचे संकलन करून जर गावात वस्तूसंग्रहालय उभारले, तर गावाचा ऐतिहासिक वारसा जपला जाऊ शकतो. दादासाहेब फाळके देखील चांदोरी गावात लोककलावंत माधवराव गायकवाड यांना भेटण्यासाठी येऊन गेल्याचे सांगतात. आजही तमाशा क्षेत्रात आदराने आणि गुरुस्थानी माधवराव गायकवाड यांचे नाव घेतले जाते.

    मटकरी कुटुंबाचा गावातील मटकरी वाडा आणि त्यातील तीनशे वर्षे जुने दक्षिणाभिमुख राममंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात ऑस्ट्रियन बनावटीच्या काचेच्या हंड्या आणि काचेवर रंगवलेली दशावताराची चित्र आहेत. या राम मंदिराजवळ 1852 मध्ये बांधलेले दत्त मंदिर आहे. या वाड्यामागे उजव्या सोंडेचे गणपतीचे मंदिरदेखील जागृत देवस्थान समजले जाते.

      हिंगमिरे आणि टर्ले (जगताप) कुटुंबाचे गावात हिंगमिरे वाडा आणि टर्ले वाडा प्रसिद्ध आहे. 

टर्ले ज्यांचे मूळ आडनाव जगताप होते, या घराण्याचा वाडा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा होता. मात्र सध्या टर्ले वाडा अस्तित्वात नाही. तो जमीनदोस्त झाला आहे.

        खंडेराव महाराज मंदिरात माघ पौर्णिमेला भरणारी यात्रा आणि बारा गाड्या ओढण्याचा मानाचा हक्क गडाख कुटुंबाकडे आहे, तर मंदिरातील रोजची पूजाविधी आणि व्यवस्था पाहण्याची जबाबदारी गुरव कुटुंबाकडे असते.  गावातील वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठल-रुक्मिणी आणि राईबाई यांच्या मंदिराची देखभाल भन्साळी कुटुंबाकडून केली जाते. 

चांदोरी गावातील तरले (टर्ले) जगताप कुटुंबाचा इतिहास रंजक आहे. 


चांदोरीच्या स्थानिक इतिहासानूसार या घराण्याविषयीची माहिती…. 

       टर्ले घराण्याचे मूळ आडनाव जगताप होते. या कुटुंबाला टर्ले हे नाव कसे पडले?

 यामागे एक जुनी आख्यायिका सांगितली जाते. जुन्या काळात जगताप कुटुंबात जन्माला येणारी मुले जास्त काळ जगत नसत. (कदाचित बालमृत्यूचे ) आपल्या कुटुंबाचा वंश पुढे चालू राहावा आणि मुले जगावी, यासाठी या कुटुंबाने इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथील भैरवनाथ देवतेला नवस केला होता. नवसामध्ये त्यांनी बकऱ्याचा बळी देण्याचे कबूल केले होते.

  या नवसानंतर त्यांची मुले जगू लागली. म्हणजेच ती मृत्यूच्या दाढेतून तरली ( वाचली/ जगली.) यात तरले शब्दाचाच पुढे अपभ्रंश होऊन या कुटुंबाला तरले असे नाव पडले असावे आणि तेच त्यांचे आडनाव म्हणून रूढ झाले. आजमितीस ते टर्ले म्हणून ओळखले जातात.

    खेड भैरव येथे नवस केल्यामुळे घराण्याचा वंश टिकला. या श्रद्धेपोटी टर्ले-जगताप घराण्याच्या सर्व पिढ्या आजही ही प्रथा पाळतात. 

   पिढ्यानपिढ्या खेड भैरव येथे जाऊन नवस फेडण्याची आणि दर्शन घेण्याची परंपरा या कुटुंबाने आजतागायत जपून ठेवली आहे.

    

 टर्ले हे घराणे गावातील एक प्रमुख आणि प्रतिष्ठित कुटुंब मानले जाई.

 थोडक्यात सांगायचे झाले तर जगताप ते टर्ले हा प्रवास एका श्रद्धेतून आणि वंश टिकवण्याच्या भावनेतून सुरू झाला जो आज या कुटुंबाची वेगळी ओळख बनला आहे.


खंडोबाराय, भैरवनाथ, सप्तशृंगी या देवतांच्या गावातून निघणाऱ्या रथयात्राही पाहण्यासारख्या असतात. गावातील प्रमुख जागृत भैरवनाथ महाराज मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गावात बोहोड्याची परंपरा आहे, मात्र ती कालांतराने बंद पडत आहे. प्रसिद्ध नारायण महाराजांची संजीवन समाधी नदीकिनारी आहे. चांदोरीत अनेक संत महात्मे येऊन गेल्याचे सांगितले जाते.

चांदोरी नावामागील एक वलय म्हणजे मल्हारराव होळकरांच्या चांदवड टांकसाळीमध्ये चांदीचा रुपया तयार होत असे. त्याला चांदोरी रुपया म्हटले जायचे. त्याचा चांदोरीशी थेट काही संबंध नसला तरी पराक्रम आणि कामगिरीने लखलखणाऱ्या चांदोरीची भुरळ अनेकांवर पडत हे मात्र नक्की. 




खेरवाडी (नारायणगाव…)

ऐतिहासिकदृष्ट्या खेरवाडी हे गाव गोदावरी काठच्या चांदोरी गावाची एक वाडी होती. हे गाव चांदोरीपासून जेमतेम तीन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. 1961 सालापर्यंत खेरवाडी चांदोरीचीच एक वाडी मानली जायची. मात्र 1961 नंतर या गावाला ‘खेरवाडी ग्रामपंचायत’ म्हणून स्वतंत्र दर्जा मिळाला. 

1981 च्या सुमारास झालेल्या एका मोठ्या ‘रेल्वे रोको’आंदोलनानंतर महसुली रेकॉर्डवर या गावाचे नाव बदलून नारायणगाव असे करण्यात आले. प्रशासकीय नाव नारायणगाव झाले असले, तरी मध्य रेल्वेवरील नाशिकरोड आणि मनमाड स्थानकादरम्यानचे या गावचे रेल्वेस्थानक आजही खेरवाडी या नावानेच ओळखले जाते. खेरवाडी रेल्वेस्टेशनचा मालधक्का संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पिंपळगाव बसवंत, सायखेडा, लासलगाव,चांदवड येथील बाजारांमधील हजारो टन कांदा खेरवाडी रेल्वेस्टेशन वरूनच देशाच्या इतर राज्यात रेल्वेने (किसान रेल्वे) पाठवला जातो. येथे पारंपारिक वाड्यांऐवजी आधुनिक कृषीक्रांती घडवणारी अनेक प्रतिष्ठित कुटुंबे आहेत.

खेरवाडीतील संगमनेरे हे एक अतिशय परिचित,प्रतिष्ठित आणि प्रमुख घराणे मानले जाते.

     महाराष्ट्रामध्ये मूळ गावावरून आडनाव पडण्याची मोठी जुनी परंपरा आहे. संगमनेरे या नावावरून हे स्पष्ट होते की, या घराण्याचे मूळ पूर्वज ऐतिहासिक काळात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरातील असावेत. तेथून काही कारणास्तव स्थलांतर करून ते सुपीक गोदाकाठच्या खेरवाडी (नारायणगाव) गावात येवून स्थायिक झाले असावेत.त्यामुळे स्थानिकांनी त्यांना संगमनेर भागातून आले, म्हणून संगमनेरे म्हणून ओळखायला सुरुवात केली आणि पुढे तेच त्यांचे अधिकृत आडनाव रूढ झाले असावे.

खेरवाडी हे गाव मूळतः चांदोरीचीच एक वाडी म्हणून विकसित झाले.



टिप्पण्या