प्र. २ रे युरोपिय वसाहतवाद
वसाहतवाद: अर्थ व स्वरूप-
वसाहतवादाचा अर्थ -
प्रश्न - वसाहतवाद म्हणजे काय?स्पष्ट करा.
प्रगत देशांनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपले राज्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेला ‘वसाहतवाद’ असे म्हणतात.
वसाहतवाद साम्राज्यवादाचा एक प्रकार आहे.
इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स या देशांनी अशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका या खंडातील देशांवर कब्जा करून तेथे आपल्या वसाहत स्थापन केल्या.
वसाहतीतील पक्का माल आपल्या देशात नेणे व पक्क्या मालासाठी वसाहतीचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणे, हे वसाहतवादाचे प्रमुख लक्षण आहे.
वसाहतवाद केवळ राजकीय व आर्थिक गुलामगिरी निर्माण करतो, असे नाही तर तो मानसिक गुलामगिरी देखील निर्माण करतो.
साम्राज्य विस्ताराचा वेग इतका होता की, इंग्लंडने एका शतकात एवढा साम्राज्यविस्तार केला की, त्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, असे म्हटले जाऊ लागले.
प्रश्न- इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता,असे म्हटले जात होते. (तुमचे मत नोंदवा)
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडचा व्यापार भरभराटीला आला होता.
व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने जगभर फिरत होते. जेथे जेथे हे व्यापारी गेले, तेथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या.
आरमारी सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते.
ब्रिटिशांचे साम्राज्य जगातील आशिया, आफ्रिका,अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चारही खंडांमध्ये विस्तारले होते.
म्हणून इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता, असे म्हटले जात होते.
वसाहतवादाचे स्वरूप - (टीपा लिहा.)
आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात.
वसाहतवाद साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे.
धाडशी कृत्ये करणे, कीर्ती संपादन करणे, अज्ञात भूमिचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता स्थापन करणे.
येथील सोन्याच्या, खनिजांच्या खाणीचा शोध घेणे, आपल्या धर्माचा प्रसार करणे, या बाबी वसाहतवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत.
वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्का माल वसाहतींमध्ये विक्री करणे, हक्काची बाजारपेठ म्हणून वसाहतीचा उपयोग करणे, हे वसाहतवादाचे लक्षण होते.
औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद वाढीस लागला.
भारत ही इंग्लंडची वसाहत होती. १५ व्या शतकात युरोपात व्यापारी क्रांती घडून आली.
युरोपीय दर्यावर्दिनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यावर पारंपारिक व्यापार पद्धतीमध्ये बदल घडून आला.
अशा विविध कारणाने लोक जगभर पोहोचले. यातूनच युरोपीय राष्ट्रांमध्ये एका नव्या स्पर्धेचा उदय झाला.
लोक जिथे गेले, तिथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या.
या वसाहतींमध्ये आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली.
युरोपीय लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे गेले, तेथे त्यांना राहण्यास अनुकूल हवामान होते.
मात्र आशिया खंडातील हवामानाशी जुळवून घेणे त्यांना अवघड गेले.
हवामान अनुकूल असो किंवा नसो युरोपीय लोकांनी स्थानिक लोकांना हुसकावून लावले, मानसिक खच्चीकरण केले.
व्यापारातून अतिरिक्त नफा,अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक, गुंतवणुकीसाठी वसाहत आणि वसाहतींशी व्यापार, त्यातून नफा अशी ही साखळी होती.
इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि जर्मनी हे देशही वसाहती स्थापन करण्यात आघाडीवर होते.
वसाहतवादाच्या उदयाची कारणे--
प्रश्न- वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. ५ गुण.
१८ व्या शतकामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वसाहतवाद उदयाला आला. ती कारणे पुढीलप्रमाणे-
अ. औद्योगिक क्रांती :
(प्रश्न -औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. सकारण स्पष्ट करा. ३ गुण.)
औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली.
देशांतर्गत बाजारपेठेत सर्व उत्पादन विकणे शक्य नव्हते. अतिरिक्त उत्पादन विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती.
यासाठी हक्काच्या व हुकमी बाजारपेठांची आवश्यकता होती.
उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली.
या सर्व कारणांमुळे १९ व्या शतकात युरोपीय राष्ट्रे हक्काची बाजारपेठ मिळवण्याचे प्रयत्न करू लागले.
अशाप्रकारे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली.
ब. कच्च्या मालाची गरज-
व्यापारी स्पर्धेत अनेक स्पर्धक राष्ट्रांपेक्षा स्वतःच्या मालाचा उत्पादनखर्च कमी ठेवणे आवश्यक होते.
उत्पादन खर्च कमी येण्यासाठी कच्चा माल स्वस्तात मिळणे गरजेचे होते.
यासाठी वसाहतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणे, युरोपियन राष्ट्रांना आवश्यक वाटत होते.
या गरजेतूनच वसाहतवादाचा उदय घडून आला.
क. अतिरिक्त भांडवल गुंतवणूक--
औद्योगिक क्रांतीमुळे यूरोपात भांडवलदार वर्ग अधिक श्रीमंत झाला होता.
त्याने अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी सुरक्षित बाजारपेठांचा शोध घ्यायला सुरुवात केली.
त्यादृष्टीने आर्थिकदृष्ट्या प्रगत वसाहतींमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती.
या अतिरिक्त भांडवलाने वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला चालना मिळाली.
ड. खनिज साठे-
आशिया खंडातील देशांमध्ये सोने, चांदी, हिरे, कोळसा यांचे साठे मोठ्या प्रमाणात होते.
यामुळे युरोपीय व्यापार्यांना आशिया अफ्रिकेचे मोठ्या प्रमाणात आकर्षण होते. त्यामुळे वसाहतवादाला चालना मिळाली.
इ. भौगोलिक महत्त्व-
आशिया-आफ्रिका खंडातील काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानावर आहेत, हे युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले.
अशा प्रदेशांपैकी माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान आणि निकोबार बेटे यासारखे प्रदेश इंग्लंडने स्वतःच्या वर्चस्वाखाली आणल्यामुळे वसाहतवादाला चालना मिळाली.
फ. मजुरांची उपलब्धता-
व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आणि स्वस्तात मजूर मिळवण्याची गरज होती.
ही गरज वसाहतींमधून भागली. यातूनच पुढे गुलामांचा व्यापार वाढीस लागला.
ग. वंशश्रेष्ठत्वाची कल्पना--
आशिया-आफ्रिकेतील जनता मागास असून तिला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, अशी भूमिका युरोपीयन वसाहतवाद्यांनी घेतली.
या भूमिकेतून ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. यातून वसाहतवाद अधिक वाढीस लागला.
अशाप्रकारे वसाहतवादाच्या उदयाची कारणे सांगता येतील.
आशिया आणि आफ्रिकाखंडावर वसाहतवादाचे चांगले आणि वाईट असे परिणाम झाले, ते पुढील प्रमाणे-
वसाहतवादाचे विघातक/ वाईट परिणाम - (टिप लिहा.२ गुण.)
आशिया खंडातील लोकांचे शोषण करण्यात आले.
परिणामी स्थानिक लोक दरिद्री झाले.
वसाहतीतील लोकांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले.
देशांच्या वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी आणि वागणुकीमुळे वसाहतीमध्ये लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला.
वसाहतीतील लोकांना आपली संस्कृती आणि इतिहासाबद्दल कमीपणा वाटू लागला आणि त्यांचा आत्मविश्वास कमी झाला.
वसाहतवादाचे विधायक/ चांगले परिणाम: (टिप लिहा. २ गुण.)
वसाहतींमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती झाली.
लोकशाही शासन पद्धत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारखी आधुनिक जीवनमूल्ये यांचा परिचय झाला.
कायद्याचे राज्य, न्यायव्यवस्था, सर्वांसाठी शिक्षण यासारखे विचार पुढे आले.
आपले प्रश्न आपण सोडवायचे, हा विचार पुढे आला.
त्यामुळे वसाहतीवरून स्वातंत्र्याची चळवळ उदयाला आली.
अशाप्रकारे वसाहतवादाच्या विघातक परिणामांसोबतच काही विधायक परिणाम घडून आले.
युरोपीय वसाहतवाद--
युरोपियन वसाहतवादामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांच्या वसाहतवादाचे माहिती पाहता येईल.
अमेरिका खंड: अमेरीकेतील वसाहती.
वसाहतवादी राष्ट्रांमधून स्पर्धा-
प्रश्न- युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. सकारण स्पष्ट करा. ३ गुण.
बलाढ्य युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकाखंडाचा शोध लागल्यानंतर अन्य दुर्बल राष्ट्रांवर आपले प्रभुत्व स्थापन करून वसाहतींना राजकीय गुलामगिरीत ढकलले.
वसाहतवादी युरोपीय स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील मूळ रहिवाशांच्या जमिनी बळकावून प्रसंगी त्यांची कत्तल केली.
मेक्सिको आणि पेरू देशातील स्थानिकांची राज्य नष्ट केली. त्यांच्यावर गुलामगिरी लादली.
युरोपीय राष्ट्रांमध्ये सत्तास्पर्धा सुरू झाल्यावर पोर्तुगाल व स्पेनने त्यात पुढाकार घेतला.
पोर्तुगाल आणि स्पेन यांना तेथे सोन्याचे साठे सापडले. या खाणींमधून त्यांना अफाट खनिजसंपत्ती मिळू लागली.
स्थानिक आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून ते ऊस, तंबाखू यांचे उत्पादन घेऊ लागले.
स्पेनची झालेली भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्सनेदेखील अमेरिका खंडात वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.
या वसाहतींमधील कच्चा माल आपल्या देशात नेवून त्याच्यावर प्रक्रिया करून तयार झालेल्या पक्का माल वसाहतींच्या बाजारपेठांमध्ये आणला जाई.
हक्काची बाजारपेठ म्हणून युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.
स्पेनच्या वसाहती-
प्रश्न-स्पेनने अमेरिकेत आपल्या वसाहती कशा निर्माण केल्या. (सविस्तर उत्तर लिहा. ५ गुण.) किंवा
प्रश्न- अमेरिकेतील वसाहत वादामुळे स्पेनची भरभराट झाली. (तुमचे मत नोंदवा.३ गुण.)
स्पेनने प्रथम मेक्सिको व नंतर पेरू आणि व्हेनेझुअला येथे वसाहती स्थापन केल्या.
स्पेनने अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकवण्यासाठी आफ्रिकेतून गुलाम आणले.
पेरू, मेक्सिको,व्हेनेझुअला येथे सोन्या-चांदीचे साठे सापडले.
स्पेनने शेतीपेक्षा सोने मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले.
स्पेनने दक्षिण अमेरिकेत संपूर्ण किनारपट्टीवर प्रभुत्व स्थापन केले.
अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश स्पेन सत्तेने ताब्यात घेतला.
अमेरिकेतील रेड इंडियन व आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून शेती करून घ्यायला सुरुवात केली.
शेतीबरोबरच अफाट खनिज संपत्ती स्पेनच्या हाती लागली.
या भागाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी गव्हर्नर नेमले.
स्पेनचा राजा या वसाहतींचा सर्वोच्च सत्ताधीश होता.
‘कौन्सिल ऑफ दि इंडीज’ या संघटनेद्वारे सत्ता राबवण्यात येऊ लागली.
.ही कौन्सिल वसाहतींमधील व्यापारही सांभाळत असे.
या वसाहतींमधील कच्चा माल स्पेनला नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून तयार झालेल्या पक्का माल वसाहतींच्या बाजारपेठांमध्ये आणला जाई.
तसेच या प्रदेशातील सोने-चांदीच्या व्यापारासाठी राज्याला मोठा नफा मिळत असे.
स्पेनची झालेली भरभराट पाहून इंग्लंड,हाॅलंंड आणि फ्रान्सनेही अमेरिका खंडात वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.
अमेरिकेतील इंग्लंडच्या वसाहती-
प्रश्न- इंग्लंडने अमेरिकाखंडात आपले बस्तान कसे बसवले? सविस्तर उत्तर लिहा. ५ गुण.
इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिलीच्या काळात सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले.
वसाहती स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले गेले.
राणी एलिझाबेथ पहिलीच्या काळात व्यापारी नफ्याच्या जोडीने ‘स्वराष्ट्राचे हित’ हे उद्दिष्ट वसाहतवादाला जोडले गेले.
इसवीसन १४९६ मध्ये जॉन कॅबट याला इंग्लंडने अमेरिकेत वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली.
जॉन कॅबटने उत्तर अमेरिकेत इंग्लंडचे बस्तान बसवले.
इसवीसन १६०९ मध्ये ब्रिटिशांनी जेम्स नदीच्या काठी ‘जेम्सटाऊन’ ही वसाहत उभारली. तिलाच पुढे वर्जीनिया हे नाव देण्यात आले.
पुढील काळात उत्तर अमेरिकेतील पूर्व किनारी प्रदेशात न्यू इंग्लंडपासून ते कॅरोलीनापर्यंत इंग्रजांच्या १३ वसाहती स्थापन झाल्या.
प्रश्न- अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धची कारणे स्पष्ट करा. ५ गुण.
इंग्लंड विरुद्ध वसाहती यांच्यात झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाची कारणे-
१. वसाहतीवरील निर्बंध-
इंग्लंडने वसाहतींसाठी जलवाहतुकीसंबंधीचा कायदा करून वसाहतींची नाकेबंदी केली.
या कायद्याने वसाहतींमध्ये मालाची वाहतूक करण्याची मक्तेदारी फक्त इंग्लंडमधील कंपन्यांना दिली गेली.
२. स्टॅम्प ॲक्ट -
प्रश्न- स्टॅम्प ॲक्टला अमेरिकेतील इंग्लंडच्या वसाहतीनी विरोध केला. (सकारण स्पष्ट करा.) ३ गुण.
इंग्लंडने १७६५ मध्ये वसाहतींसाठी ‘स्टॅम्प ॲक्ट’ नावाचा कायदा संमत केला.
या कायद्याने महत्त्वाच्या वस्तूंवर वसाहतींना स्टॅम्प ड्युटी भरणे बंधनकारक केले.
या नव्या करामुळे वस्तूंच्या किमती वाढणार होत्या.
स्टॅम्प ॲक्टद्वारे लादल्या गेलेल्या या करारामुळे वसाहतीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
या निर्बंधांना व्हर्जिनिया आणि मॅसॅच्युसेटस् या वसाहतींनी प्रथम विरोध केला.
नंतर हे लोन अन्य वसाहतींमध्येही जाऊन पोहोचले.
बोस्टन टी पार्टी - (टिप लिहा)
ब्रिटिश संसदेने अमेरिकेतील वसाहतीत चहा विकण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीला दिली होती.
वसाहतींवरील निर्बंध रद्द करून वसाहतीना राज्यकारभार करण्याची स्वायत्तता द्यावी, अशी मागणी वसाहती करू लागल्या.
या मागण्यांना नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार घातला.
इसवी सन १७७३ मध्ये बोस्टन बंदरात स्थानिक जनतेने विरोध दर्शवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून आलेल्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या.
या घटनेस ‘बोस्टन टी पार्टी’ असे म्हणतात.
फिलाडेल्फिया परिषद-
बोस्टन टी पार्टीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींची सभा (कॉन्टिनेन्टल काँग्रेस) निर्माण झाली.
इसवी सन १७७४ मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतींच्या अधिवेशन भरले.
यात ब्रिटनमधील मालाच्या आयात-निर्यातीला विरोध करून ब्रिटिश माल वापरू नये, असा निर्णय घेतला.
यातूनच अमेरिकेतील १३ वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला.
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध: टिपा लिहा
इ.स.१७७४ मध्ये फिलाडेल्फिया येथे भरलेल्या परिषदेत अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहती एकत्र येऊन वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला.
आपण इंग्लंडच्या सत्तेपासून स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले.
स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिपा लिहा.
जुलै १७७६ स्वातंत्र्याचा जाहीरनामा संमत करण्यात आला.
हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसनने तयार केला होता.
थॉमस जेफरसनने - जीवन जगणे, स्वातंत्र्य,आनंद मिळवणे. हे मानवाचे निसर्गसिद्ध हक्क असल्याचे आणि ते कोणालाही हिरावून घेता येणार नाहीत,असे नमूद केले.
स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर ब्रिटिश सैन्य आणि 13 वसाहतींमध्ये लढाया होत राहिल्या.
सरतेशेवटी ‘सॅराटोगो’ येथील लढाईत ब्रिटीश सैन्याचा निर्णायक पराभव झाला.
फ्रेंच व स्पेनने वसाहतींच्या संघर्षामध्ये अमेरिकेला मदत केली.
वसाहतींचा प्रमुख सेनापती जॉर्ज वॉशिंग्टनने इंग्रजांचा पराभव केला.
इंग्रज सैन्याचा सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलीस शरण आला आणि अमेरिका स्वतंत्र झाली.
अमेरिकन स्वातंत्र्याच्या देणग्या - टीप लिहा.
मानवाचे निसर्गसिद्ध हक्क नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध लढण्याचा जनतेला हक्क असतो.
जीवन जगणे, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे हे मानवाचे निसर्गसिद्ध हक्क असल्याचे आणि ते कोणालाही हिरावून घेता येणार नाहीत, असे थॉमस जेफरसनने नमूद केले होते.
‘राजाविना राज्य’ ही अमेरिकेने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे.
अमेरिकेतील तेरा वसाहती :
नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अमेरिकेच्या कोणत्या भागात इंग्लंडने आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या?
इंग्लंड आणि अमेरिकेत येथून किती वसाहती स्थापन केल्याचे नकाशात दाखवले आहे?
नकाशात अमेरिकेच्या पूर्वेस कोणता महासागर आहे?
वरील नकाशात गोष्टं बंधन कोणत्या वसाहती दिसते? ते शोधून लिहा.
नकाशातील कोणत्याही दोन शहरांची नावे लिहा. ती कोणत्या वसाहतीत आहे ते लिहा.
अमेरिकेची सर्वात उत्तरेची आणि दक्षिणेची वसाहत नकाशात पाहून सांगा.
नकाशात वसाहतीमधील कोणत्या प्रमुख शहरांची नावे दिलेली आहेत त्यांची यादी करा.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वसाहती -
ऑस्ट्रेलियातील वसाहत. टिपा लिहा.
१८ व्या शतकात इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत ऑस्ट्रेलिया खंडात स्थापन झाली.
१९ व्या शतकातऑस्ट्रेलियातील इतर स्वतंत्र प्रदेशांचे वसाहतीकरण झाले.
त्याखेरीज टास्मानिया भेट आणि न्यूझीलंड मध्ये वसाहती स्थापन करण्यात आल्या.
१९०० मध्ये टास्मानीया बेट ब्रिटिश साम्राज्यांतर्गत अंतर्भूत करून स्वयंशासित असे ऑस्ट्रेलियाचे प्रजासत्ताक राज्य स्थापन केले.
इंग्लंडच्या राजाने ऑस्ट्रेलियात राजप्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलची नेमणूक केली.
ऑस्ट्रेलियात फक्त युरोपीय नागरिकांना स्थलांतरित म्हणून जाण्याची परवानगी दिली.
इंग्लंडप्रमाणे द्विगृही संसद तेथे देण्यात आली.
न्युझीलँडची वसाहत. टिपा लिहा.
प्रश्न- न्यूझीलंडमध्ये इंग्लंडने कोणत्या लोककल्याणकारी योजना राबवल्या?
१९०७ मध्ये न्यूझीलंडला साम्राज्यांतर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा दिला.
न्यूझीलंडमधील वसाहतीनी लोकशाही पद्धतीचा अवलंब केला.
न्युझीलंडमध्ये सार्वत्रिक मताधिकार, सरकारी मालकीची रेल्वे, व अपघात विमा, वृद्धांसाठी निवृत्तीवेतन, कामगारांना कामावर जखमी किंवा मृत झाल्यास नुकसान भरपाई या लोककल्याणकारी योजना इंग्लंडने राबवल्या.
आशियातील वसाहती -
म्यानमार -
प्रश्न- वसाहतींच्या स्वातंत्र्यलढ्यात म्यानमार आणि भारत यांचा संबंध कोण-कोणत्या कारणाने आला? किंवा
प्रश्न - म्यानमारमधील वसाहतींच्या स्वातंत्र्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.
मुद्दे- १. पहिले ब्रम्ही युद्ध. २. दुसरे ब्रम्ही युद्ध. ३. तिसरे ब्रम्ही युद्ध.
१. पहिले ब्रम्ही युद्ध (१८२४ ते १८२६ )
भारताच्या ईशान्येकडील शेजारील राष्ट्र म्हणजे म्यानमार होय.म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश.
म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यामुळे म्यानमारवर कब्जा मिळवणे,हे ब्रिटिशांची उद्दिष्ट होते.
म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी १९ व्या शतकात मणिपूरने आसामवर धडक मारली.इंग्रजांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा होती.
त्यामुळे भारताचा इंग्रज गव्हर्नर लॉर्ड अम्हर्स्ट यांनी युद्ध पुकारले. हे दोन वर्षे चालले. ते पहिले ब्रम्ही युद्ध म्हणून ओळखले जाते.
या युद्धात इंग्रजांच्या आरमाराने रंगून (यांगान) हे बंदर जिंकून घेतले. या युद्धामध्ये दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले.
त्यामुळे इंग्रज आणि म्यानमारचे राजे यांच्यात तह झाला. त्या तहानुसार--
१. म्यानमार कडून इंग्रजांनी मणिपूर परत घेतले.
२. ब्रिटीशांना एक कोटी रुपयांची खंडणी मिळाली.
३.म्यानमारचा किनारी प्रदेश व तेथील जंगल, खनिजसंपत्ती इंग्रजांच्या ताब्यात आले.
४. ब्रह्मदेशाची राजधानी अव्हा येथे एक इंग्रज रेसिडेंट नेमण्यात आला.
२. दुसरे ब्रम्ही युद्ध (१८५२ ते १८५३ )
दुसरे ब्रम्ही युद्ध लॉर्ड डलहौसीच्या काळात लढले गेले.
पहिल्या युद्धानंतरच्या काळात चिंदविन नदी व मणिपूर यामधील प्रदेशाबाबत नवे वाद निर्माण झाले होते.
त्यातच म्यानमारमध्ये राहणाऱ्या दोन इंग्रज नागरिकांना म्यानमार प्रशासनाने म्हणजेच ब्रम्ही सरकारने दंड केला होता.
यामुळे डलहौसीला म्यानमारमध्ये हस्तक्षेप करण्याचे कारण मिळाले.
त्याने ब्रम्ही सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आणि ती न दिल्यास युद्धाची धमकी दिली.
डलहौसीने जॉर्ज लॅम्बर्ट या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली फौजा पाठवून युद्ध पुकारले.
इंग्रजांनी ब्रम्ही सैन्याचा पराभव करून रंगून, पेगु (बेगो), प्रोम ही ठिकाणे जिंकून घेतली.
यातील पेगुचा प्रदेश इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यात विलीन करून घेतला.
या विजयाने इंग्रजांचा म्यानमारच्या किनाऱ्यावरील प्रभाव वाढला.
म्यानमारविरुद्धच्या या लढाईत इंग्रज सैन्यांमध्ये भारतीय सैन्याचा समावेश होता.
इंग्रजांनी या युद्धाच्या खर्चाचा भारसुद्धा भारतीयांवर टाकला.
३. तिसरे ब्रम्ही युद्ध (१८८५-१८८६ )
प्रश्न- गव्हर्नर लॉर्ड डफरीन यांनी म्यानमारशी लढण्यासाठी सैन्य पाठवले. सकारण स्पष्ट करा.
म्यानमारचा (म्हणजेच ब्रम्ही सरकारचा) फ्रान्सशी वाढत चाललेला संपर्क हे या तिसऱ्या युद्धाचे कारण होते.
फ्रेंचांनी व्हिएतनाम (इंडोचायना) मध्ये स्वतःचे प्रभावक्षेत्र निर्माण केले होते.
इंग्रजांना या संभाव्य धोक्याची कल्पना आली. म्यानमारचा राजा थिबा याने इटली व जर्मनी या देशांशी व्यापारी करार करण्याचे प्रयत्न केले होते.
तसेच फ्रान्सबरोबर व्यापारी करार केला.अशातच राजा थिबा याने ‘बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कार्पोरेशन’ या ब्रिटिश व्यापारी कंपनीला दंड ठोठावला.
यामुळे गव्हर्नर डफरीन याने म्यानमारची लढण्यासाठी सैन्य पाठवले.
या युद्धात इंग्रजांनी मंडाले शहर जिंकले. राजा थिबा इंग्रजांना शरण आला आणि उत्तर म्यानमारच्या प्रदेश इंग्रज साम्राज्याचा भाग बनला.
१९३५ च्या कायद्याने इंग्रजांनी म्यानमार भारतापासून वेगळा केला.
पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पासून प्रेरणा घेऊन जानेवारी १९४८ मध्ये स्वतंत्र झाला.
प्रश्न - दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
प्रश्न - वसाहतींच्या स्वातंत्र्याची माहिती लिहा.
अ.नेपाळ ब. सिक्कीम क. भूतान ड.तिबेट.
इंग्रजांचा अंमल असणाऱ्या वसाहतींच्या स्वातंत्र्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर स्पष्ट करता येईल ---
अ. नेपाळ
नेपाळ हे हिमालयाच्या कुशीत वसलेले छोटे राष्ट्र. इंग्रजांनी नेपाळमध्ये आपले राजकीय प्रतिनिधी पाठवले होते. ब्रिटिशांना नेपाळकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
यातूनच इंग्लंड विरुद्ध नेपाळ अशी दोन युद्ध झाली. नेपाळवर इंग्रजांनी आक्रमण केले.
नेपाळी सैन्याने इंग्रजांना जेरीस आणले. मात्र १८१६ मध्ये इंग्रजांनी नेपाळचा मकवानपुर येथे पराभव केला.
त्यानंतर झालेल्या तहानुसार इंग्रजांनी तराई,कुमाऊ ,गढवाल हे प्रदेश ताब्यात घेतले.
काठमांडू येथे एक इंग्रज रेसिडेंट नेमला.
१९२३ मध्ये इंग्रजांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली.
ब. सिक्किम
भारताच्या आसपासचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणणे, हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते.
भारताच्या उत्तर सीमेवर भूटान बंगाल नेपाळ आणि तिबेट या प्रदेशांनी वेढलेले सिक्कीम हे एक छोटे राज्य होते.
१८१५ मध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोवतालचा प्रदेश ब्रिटिशांकडे सुपूर्द केला.
त्याबदल्यात राजाला ब्रिटिशांकडून वार्षिक तनखा सुरू झाला. पुढे लॉर्ड डलहौसीने सैन्य पाठवून सिक्कीमचा आणखी प्रदेश ताब्यात घेतला.
त्यामुळे सिक्कीम इंग्रजी व्यापाऱ्यांसाठी खुले झाले. यामुळे भारत - तिबेट व्यापारावरील जकातीचे अधिकार इंग्रजांना मिळाले.
१८८६ मध्ये तिबेटी लोकांनी सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताच इंग्रजांनी तिबेटी लोकांवर कारवाई केली.
१८९० ब्रिटिश-चीन तहानुसार सिक्किम इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आले.
इंग्रजांनी सिक्कीमला मध्यगत राष्ट्र (बफर झोन) बनवून त्याचे अंतर्गत प्रशासन आणि परराष्ट्र धोरण ताब्यात घेतले.
परंतु सिक्कीमचा दर्जा मात्र एक स्वतंत्र राज्य म्हणून राहिला.
1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले.
त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात घटक राज्याचा दर्जा मिळाला.
क. भूतान
भारताच्या उत्तर सीमाभागात आणि सिक्कीमच्या पूर्वेला भूतान हा देश आहे.
भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन वॉरन हेस्टिंग्जने भूतानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.
त्यामुळे बंगाल ते तिबेट हा भूतानच्या प्रदेशातून जाणारा व्यापारी मार्ग खुला झाला.
१८४१ मध्ये अशले येडन याने भूतानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
१८६५ मध्ये भूतान-इंग्रज युद्ध झाले. त्यानंतर झालेल्या तहानुसार --
१. भूतानने जिंकलेला प्रदेश ब्रिटिशांच्या हवाली करणे.
२. त्या मोबदल्यात ब्रिटिशांनी भूतानच्या राजाला वार्षिक तनखा देणे,हे ठरले.
१९१० च्या तहानुसार भुतानच्या राजाने संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले.
इंग्रजांनी भूतानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करण्याचे मान्य केले.
८ ऑगस्ट १९४९ रोजी भारत व भूतान यांच्यात झालेल्या करारानुसार भूतानचे परराष्ट्र धोरण व संरक्षणासंबंधीची धोरणे यात भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे.
ड. तिबेट
तिबेटचा प्रदेश दलाई लामा यांच्या प्रभावाखाली होता.
रशियाला अटकाव करणे आणि स्वतःचा व्यापार वाढवणे, यासाठी तिबेटच्या प्रदेशावर इंग्रजांची नजर होती.
लॉर्ड कर्झनच्या काळात इंग्रजांच्या फौजा तिबेटची राजधानी ल्हासापर्यंत पोहोचल्या.
१९०७ मध्ये इंग्लंड रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्त्वतः मान्यता दिली.
त्यामुळे चीनला तिबेटवर वर्चस्व प्रस्थापित करण्यास वाव मिळाला.
आफ्रिका
आफ्रिकेतील घनदाट जंगले,विस्तीर्ण सरोवरे,दलदल आणि वाळवंटयुक्त परिसर युरोपीय लोकांसाठी अनोळखी होता.
बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याने काँगोवर वर्चस्व मिळवले होते.
लिओपोल्डने १८७६ मध्ये ब्रुसेल्स भूगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांची एक परिषद भरवली.
या परिषदेत विज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशनअंड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका’ या नावाची संस्था स्थापन करण्याचे ठरले.
आफ्रिकेमध्ये आपल्यासाठी कोणत्या संधी आहे, याचा विचार करण्यासाठी बर्लिन येथे युरोपीय राष्टांची परिषद भरली.
प्रत्यक्षात मात्र ही परिषद युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेतील प्रदेश आपापसात शांततापूर्ण रीतीने कसा वाटून घ्यावा, हे ठरवण्यासाठी परिषद बोलावली होती.
बर्लिन परिषदेत बेल्जियमच्या काँगोवरील प्रभुत्वाला मान्यता देऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यास मान्यता देण्यात आली.
आफ्रिकन वसाहतीमध्ये मानवी आणि नैसर्गिक संपत्तीचा पूर्ण विनियोग करण्यात एखादे युरोपियन राष्ट्र अपयशी ठरले तर, त्या राष्ट्राने तो प्रदेश दुसऱ्या सक्षम राष्ट्राच्या हवाली करावा,असे या परिषदेत ठरले.
प्रश्न -इंग्लंडने आफ्रिका खंडात आपल्या वसाहतींचा विस्तार कसा केला हे सविस्तर लिहा. ५ गुण.
जॉर्ज टॉबमन गोल्डी याने इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केली होती.
त्याला नायजेरियात व्यापार करण्याची सनद दिली.
मात्र पुढे इंग्रज सरकारने ही कंपनीच ताब्यात घेतली व नायजेरिया ही इंग्रज सरकारच्या अधीन असलेली वसाहत बनली.
इंग्लंडच्या ताब्यात अफ्रिकेतील केप कॉलनी आणि नाताळ वसाहती होत्या.
पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांना रस होता.
या तिघांनी मिळून परस्परांचे हितसंबंध जोपासण्यासाठी एक करार केला.
त्यानुसार इंग्लंडला आफ्रिकेच्या किनारपट्टीचा उत्तरेचा भाग देण्याचे ठरले.
इंग्लंडने झांझीबार, पेंबा भेट व न्यासालंड (मालावी) हे प्रदेश ब्रिटिश संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केले.
इंग्लंडच्या प्रभावाखालील हे प्रदेश ईस्ट आफ्रिका या नावाने ओळखला जाऊ लागला.
इजिप्तच्या भूमीत इंग्लंड व फ्रान्स या दोघांनाही रस होता.
इंग्रजांनी अलेक्झांड्रिया ते कैरो हा रेल्वे मार्ग बांधला.
प्रश्न- सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले. सकारण स्पष्ट करा.
भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडण्यासाठी सुएज कालवा फ्रेंच अधिकारी फर्डिनांड द लेसेप्स यांच्या देखरेखीखाली खोदला.
सुरुवातीला या कालव्याचा सर्व खर्च इजिप्त करत होता, मात्र पुढे खर्च एवढा वाढला की इजिप्तला त्यासाठी कर्ज घ्यावे लागले.
कर्जावरचे व्याजही फेडता येईना, म्हणून कालवा कंपनीचे समभाग म्हणजेच शेअर्स विक्रीसाठी काढले.
इंग्लंडने यातील काही समभाग विकत घेतले त्यामुळे सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले.
प्रश्न- इंग्लंडने सुदानवर वर्चस्व प्रस्थापित केले. सकारण स्पष्ट करा.
इंग्लंडने इजिप्तवरील वर्चस्वाच्या आधारे सुदानवरही हक्क सांगितला. मात्र सुदानमधील स्थानिक सत्तांनी याला विरोध केला.
इंग्लंडने आपले सैन्य सुदानपर्यंत विना-अडथळा नेता यावे, म्हणून युगांडा ते सुदान असा रेल्वेमार्ग तयार करण्यास सुरुवात केली.
नाईल नदी इजिप्तची जीवनदायिनी होती. तिचा उगम सुदानमध्ये असल्याने सुदानवर ताबा असणे इंग्रजांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
स्थानिक जनतेचा विरोध लक्षात न घेता शस्त्रबळाच्या जोरावर इंग्लंडने सुदानवर वर्चस्व प्रस्थापित केले.
आफ्रिकेच्या दक्षिण भागात केप कॉलनी आणि नाताळ या भागावर वर्चस्व होते, तर ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सवाल या प्रदेशांवर डचांचे वर्चस्व होते.
जोहान्सबर्ग येथे सोन्याच्या खाणी सापडल्यानंतर युरोपीय राष्ट्रे या भागाकडे आकर्षित झाली.
इंग्लंडने १९०९ पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वसाहतींचे एकीकरण करून त्यास युनियन ऑफ साऊथ आफ्रिका असे नाव दिले.
प्रश्न- फ्रान्सने आफ्रिका खंडात आपल्या वसाहतींचा विस्तार कसा केला ते सविस्तर लिहा. ५ गुण.
फ्रान्सने सेनेगल, गांबिया आणि कांगोच्या उत्तरेकडील प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला.
१८८३ आयव्हरी कोस्ट येथेही फ्रान्सने वसाहत स्थापन केली.
तसेच पोर्तुगालच्या ताब्यातील दाहोमे या प्रदेशावरही फ्रान्सने ताबा मिळवला.
फ्रान्सने १९१४ पर्यंत सहारा वाळवंटापासून ते पश्चिमेला आयव्हरी कोस्टपर्यंत आणि फ्रेंच गिनीया प्रदेशावर वर्चस्व स्थापन केले.
पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी याना रस होता.
या तिघांनी मिळून परस्परांचे हितसंबंध जोपासण्यासाठी एक करार केला.
त्यानुसार फ्रान्सला मादागास्कर बेट देण्याचे ठरले.
१८३० मध्ये फ्रान्सने अल्जेरियावर प्रभुत्व निर्माण केले.
ट्युनिसवर इटली, फ्रान्स आणि इंग्लंडचे लक्ष होते.
मात्र या संघर्षांमध्ये फ्रान्सने बाजी मारून तुर्कीच्या सुलतानाकडून ट्युनिस जिंकून घेतले.
पुढे फ्रांसने मोरक्कोही ताब्यात घेतले.
अशा रीतीने फ्रान्सने आफ्रिका खंडात आपल्या वसाहतींचा विस्तार केला.
आफ्रिकेतील इतर युरोपीय राष्ट्रांच्या वसाहती-
जर्मनीचा चान्सेलर बिस्मार्क याने १८८३ मध्ये पश्चिम आफ्रिकेत टोगोलँड ही जर्मनीची पहिली वसाहत स्थापन केली.
या प्रदेशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांना रस होता. परस्परांचे हितसंबंध जोपासण्यासाठी एक करार केला.
त्यानुसार झांझीबारच्या सुलतानाला झांझिबार,पेम्बा बेट आणि पूर्व किनारपट्टी देण्याचे ठरले.
जर्मनीला दक्षिणेचा प्रदेश देण्याचे ठरले.
१८९७ मध्ये जर्मनीने जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीकडून पूर्व आफ्रिकेतून प्रदेश स्वतःकडे घेतला.
स्पेनच्या ताब्यात मोझांबिक होते. गिनी कॉस्टमधील काही बेटे, मोरोक्कोचा काही भाग, हे प्रदेश स्पेनच्या वर्चस्वाखाली आले.
इटलीने त्रिपोली, सायरेनिका जिंकून घेतले. याच काळात पोर्तुगालने अंगोलाच्या भागात आपले वर्चस्व निर्माण केले
अशाप्रकारे युरोपियन वसाहतवादाच्या इतिहासाचा आढावा घेत असताना युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिकाखंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या. वसाहतींविषयीची माहिती आपण या पाठांमध्ये बघितली. पुढील पाठात युरोपियन वसाहतवादाच्या भारतावरील प्रभाव याविषयीची माहिती घेणार आहोत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा