१९ व्या शतकातील महाराष्ट्र.....

 १९ व्या शतकातील महाराष्ट्र :

१९ व्या शतकातील सुरुवातीचा कालखंड म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील नव्या युगाची सुरुवात होती. 

राजकीय जीवनात अनावस्था, अराजक व अशांततेचा कालखंड संपून नव्या राज्यकर्त्यांच्या नियंत्रणाखाली सुव्यवस्थित व योजनाबद्ध अशा कार्यक्षम शासनपद्धतीला या काळात सुरुवात झाली. 

समाजात नवीन आचार, विचार व प्रेरणांचा स्वीकार करण्याची जाणीव झाली. या नवीन प्रेरणांचा स्वीकार करतानाच स्वतःचे वेगळेपण, स्वाभिमान, आत्मवैभव टिकवून ठेवण्याचा नवा विचारही मांडला जाण्यास प्रारंभ झाला. 

याच काळात इंग्रजांच्या परकीय सत्तेचे राजकीय स्वरूप वेगळे असले तरी त्यांचा आर्थिक हेतू वेगळाच आहे,याची जाणीव काही समाजधुरिणांना झाली.

महाराष्ट्राचे भौगोलिक सांस्कृतिक वेगळेपण

भारतातील इतर कोणत्याही प्रांतांपेक्षा महाराष्ट्राचे भौगोलिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून वेगळेपण आहे.

महाराष्ट्रावर आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात इस्लामी राज्यकर्त्यांना इ स. १४ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत यश मिळाले नाही. 

भारतीय संघराज्यात आपले भौगोलिक व सांस्कृतिक वेगळेपण टिकविणाऱ्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वावर करण्यात आली.

आधुनिक काळात करण्यात आलेल्या उत्खनन व संशोधनावरून महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची माहिती उपलब्ध झालेली आहे.

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास :

 पुरातत्त्व शास्त्राच्या दृष्टीने सध्याच्या महाराष्ट्रात अंतर्भूत असलेली गंगावाडी, नाशिक यासारखी स्थळे प्रागैतिहासिक आदिपाषाण युगातील म्हणजेच इ. स. पूर्व तीन लाख वर्षा पूर्वीच्या पुरातन काळातील आहेत.

 संगमनेरजवळ जोर्वे येथे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. तर कोल्हापूरजवळ ब्रह्मपुरी येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून दोन हजार वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक जीवनाचे ज्ञान होते. प्राचीन समाजाची व त्यांच्या सांस्कृतिक प्रगतीची माहिती देणारी ही ठिकाणे महाराष्ट्रात समाविष्ट होती.

 आज महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता. तो दक्षिणपथमध्ये समाविष्ट होता.

आर्यांनी या दंडकारण्यात प्रवेश करून तेथे वस्ती करण्यास प्रारंभ केला. दंडकारण्याच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना रठ्ठ,महाराठ्ठ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाण्यास सुरुवात झाली. 

महाराठ्ठ या प्राकृत रूपावरूनच महाराष्ट्र हे नाव प्राप्त झाले असावे.

महाराष्ट्र हे नाव प्रांत व तेथे राहणारे लोक या दोघांच्या बाबतीत वापरले जात होते.

 महाराष्ट्राची लोकभाषा महाराष्ट्री हिला इसवी सनापूर्वी इतर प्राकृत भाषांच्या मानाने मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळाली होती.

 विविध संस्कृत व प्राकृत ग्रंथ, आलेख यांत दक्षिणपथ व दंडकारण्याचे उल्लेख मिळतात. 

सातवाहन ते यादव घराण्यापर्यंत :

पुराणांमध्ये सातवाहनानंतरच्या आभीर, वाकाटक राष्ट्रकूट चालुक्य,शिलाहार,गोंड,यवन,शक,तुषार इत्यादी घराण्यांनी राज्य केले. त्यातील आभीर हे खानदेशच्या प्रदेशावर राज्य करीत असावेत.

 सातवाहनानंतर सातारा, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटकचा काही भाग यांसह उत्तर कुंतल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशावर राष्ट्रकूट घराण्यातील सत्ताधीशांनी राज्य केले. विदर्भाच्या प्रदेशावर इसवी सन २५० ते ६० च्या सुमारास वाकाटकांनी आपली सत्ता स्थापन केली. मराठवाड्याचा प्रदेश त्यांच्या ताब्यात असावा. वाकाटकांच्या काळात विद्या, कला, साहित्य इत्यादींच्या विकासाला चालना मिळाली. कर्नाटकातील चालुक्य व राष्ट्रकूट घराण्यातील राजांनी इसवी स. च्या ६ व्या ते इसवी स.च्या ११ व्या शतकापर्यंत महाराष्ट्राच्या बहुतेक भागावर राज्य केले.

 बदामी या राजधानीमधून महाराष्ट्रावर आपले वर्चस्व ठेवणाऱ्या चालुक्यांच्या घराण्यातील ११ राजांनी सव्वादोनशे वर्षे राज्य केले.

 तर महाराष्ट्रातील मान्यखेटक ही राजधानी असलेल्या राष्ट्रकूट घराण्यातील १४ राजांनी महाराष्ट्रात २२० वर्ष राज्य केले.

नाशिकगोदावरी यांच्यामध्ये असणाऱ्या सेऊण प्रदेशावर मांडलिक असलेल्या यादवांनी आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली. 

नगर, पुणेसाताऱ्याच्या काही प्रदेशांवर त्यांनी आपले राजकीय वर्चस्व स्थापन केले. या घराण्यातील सिंघण राजाने आपल्या साम्राज्याचे रक्षण करून कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा हे प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणले.

 यादवांचा कालखंड हा महाराष्ट्रात शांततेचे व साहित्यिक, सांस्कृतिक प्रगतीचे युग मानले जाते. 

त्यामुळेच या काळात विद्या, साहित्य, कला व व्यापाऱ यासारख्या क्षेत्रात समाजाची मोठी प्रगती झाली.

इस्लामी राजवट व स्वातंत्र्याची पहाट

 इसवी सन १२९४ ते १३०० या काळात अल्लाउद्दीन खिलजीने यादवांच्या सत्तेचा पराभव केला व महाराष्ट्रात इस्लामी सत्तेचा प्रारंभ झाला.

 इसवी सन १३४७ मध्ये हसन गंगू बहामनी यांनी बहामनी घराण्याची सत्ता स्थापन केली आणि दक्षिणेत कायमची इस्लामी सत्ता स्थापन झाली.

इसवी सन १४९० ते १५२२ या काळात बहामनी राज्याचे तुकडे होऊन पाच स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली.

वऱ्हाडातील इमादशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही ,बिदरची बरीदशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही या पाच राज्यांपैकी अहमदनगरची निजामशाही व विजापूरच्या आदिलशाहीचे महाराष्ट्राच्या प्रदेशावर दीर्घकाळ वर्चस्व होते. अनेक पराक्रमी मराठा सरदारांच्या मदतीने ह्या इस्लामी सत्तांनी आपले वर्चस्व कायम टिकवले. 

मराठी सत्तेची स्थापना व विस्तार :

बहामनी सत्तेच्या स्थापनेपासून सुमारे 300 वर्षे महाराष्ट्राच्या प्रदेशावर इस्लामी सत्ता होती.

 या परकीय सत्तेला विरोध करण्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणीही मांडलेला किंवा समाजाने स्वीकारलेला दिसत नाही.

 “पातशाही” हिंदूंसाठी नाहीच असे मानणाऱ्या समाजाने या सत्तांची चाकरी इमाने - इतवारे केली.

 बादशहाबद्दल मराठ्यांइतकी स्वामीनिष्ठा मुसलमानांनीही दर्शविलेली दिसत नाही.

१७ व्या शतकाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केलेली स्वराज्याची निर्मिती ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी घटना होती. प्रतिकारहीन व औदासिन्यपूर्ण बनलेल्या समाजास  गोब्राह्मण प्रतिपाल व धर्मरक्षण या ध्येयांनी प्रेरित करून कार्यक्षम बनविण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले.

 येथील समाजाच्या अंतकरणात स्वातंत्र्याचा स्फुलिंग त्यांनी निर्माण केला.

 स्वधर्मस्वराष्ट्र यांच्या रक्षणासाठी प्रसंगी आत्मार्पण करण्याची प्रेरणा त्यांनी येथील समाजात निर्माण केली.

स्वराज्यनिर्मिती करतानाच त्यांनी तेथील समाजाचा स्वाभिमान जागृत केला.

 मोगल, आदिलशाही व निजामशाही या बलवान इस्लामी सत्तांना प्रखरपणे विरोध करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली व त्या स्वराज्याला स्थिर स्वरूप दिले. 

मात्र शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सर्वसामर्थ्यांनिशी दक्षिणेत मराठ्यांची सत्ता नष्ट करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाचा मराठ्यांपुढे टिकाऊ लागला नाही.

  मराठ्यांची सत्ता आणि उतरती कळा :

छत्रपती संभाजी महाराज ,छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराबाईंच्या काळापर्यंत स्वधर्मरक्षणासाठी प्राणार्पणाची प्रेरणा कायम होती.

 छत्रपती शाहूंच्या काळापासून मराठी सत्तेचे स्वरूप बदलले. राष्ट्रहितापेक्षा वतनप्रेम मोठे वाटण्यास प्रारंभ झाला.

 पेशवे कारभाराचे प्रमुख बनले. पहिल्या चार पेशव्यांनी मराठ्यांच्या सत्तेचा उत्तर भारतात विस्तार करण्यात यश मिळवले. मराठी सत्तेला भारतात एक श्रेष्ठ सत्ता म्हणून स्थान मिळाले.

 मात्र पानिपतच्या १७६१ च्या तिसऱ्या युद्धानंतर या सत्तेला उतरती कळा लागली. या सत्तेला पुन्हा वैभवाचे स्थान मिळवून देण्याचे पहिल्या माधवराव पेशव्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

नंतरच्या काळात अकार्यक्षम पेशवे सत्तेवर आल्याने मराठ्यांची सत्ता कमकुवत बनत केली. 

दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात इंग्रजांनी मराठ्यांचा पूर्ण पराभव करून महाराष्ट्रावर आपले राजकीय वर्चस्व स्थापन केले.

 इसवी सन १८१८ ते १९४७ या सुमारे १३० वर्षांच्या काळात भारताप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रजेलाही पारतंत्र्यात राहावे लागले.

इंग्रजी सत्तेची स्थापना विस्तार :

आधुनिक भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासात इंग्रजी सत्तेच्या कालखंडाला विशेष महत्त्व आहे. या काळाने केवळ राजकीय सत्तेत बदल घडवून आणला, असे नाही तर येथील समाजाचे सर्वांगीण जीवन बदलून टाकले. आचार व विचारांच्या क्षेत्रात नवीन प्रेरणा निर्माण केल्या.

इसवी सन १७५७ च्या प्लासीच्या लढाईत विजय मिळवून इंग्रजांनी बंगालच्या प्रदेशात आपल्या राजकीय सत्तेचा पाया घातला.

  प्रगत शस्त्रास्त्रे, तांत्रिक ज्ञान, आर्थिक संपन्नता व अधिकाऱ्यांची कार्यक्षमता यांच्याबरोबरच भारतातील सत्ताधीशांमध्ये असलेला एकजुटीचा अभाव, घरभेदी व धनलोभासाठी स्वजनद्रोह करणाऱ्या लोकांचे मिळालेले सहकार्य यांमुळेच इंग्रजांना भारतात आपल्या राजकीय सत्तेचा सहज व गतिशीलतेने विस्तार करण्यात यश आले. 

भारतात राजकीय सत्तेचा विस्तार करताना त्यांनी भारतातील फ्रेंच, डच, पोर्तुगीज या युरोपीय स्पर्धकांनाही पराभूत केले.

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांना विरोध करणारी मराठ्यांची एकमेव सत्ता होती. 

शिवकाळापासूनच मराठ्यांच्या सत्तेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्रजांना १९ व्या शतकाच्या प्रारंभी मराठ्यांची स्वतंत्र सत्ता नष्ट करण्यात यश मिळाले.

 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलेल्या ध्येयाचा नंतरच्या काळात पडलेला विसर, राष्ट्रहितापेक्षा आपल्या वतनाविषयी वाटणारे विशेष प्रेम, वतनाच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वजनांशी संघर्ष करण्याची वाढलेली प्रवृत्ती, परस्परातील संघर्ष, अकार्यक्षम नीतिशून्य मध्यवर्ती सत्ता मराठ्यांच्या सत्तेच्या विनाशाला कारणीभूत ठरली.

या काळात आधुनिक शिक्षण, नवीन विचारसरणी, सामाजिक सुधारणा, सुधारणा चळवळी यांची सुरुवात झाली.




टिप्पण्या