अक्षय्य तृतीया:

अक्षय्य तृतीया  :

अक्षय्य तृतीया, पितृ, देव व शुभ तिथी, वसंतोत्सव, दोलोत्सव, चंदनयात्रा दिन,अखतारी, आखिती व आख्यातरी (गुजरात) अशा अनेक नावाने परिचित असलेला हा सण भारतातील प्रत्येक घरात संपन्न केला जातो.

  अस्याम् तिथौ क्षय मुपैति हुतम् न दत्त| तेना क्षयेति कथिता मुनिभिस तृतीया || उद्दिषदैवत पितृणकीय तेअस्याम् मनुष्य : | स्तच्या क्षयम् भवती भारत सर्व मेव || 

 या तिथीला केलेले चांगले कर्म व दिलेले दान अक्षय टिकते. श्रीकृष्णाने अक्षय्य तृतीयेचे व्रत युधिष्ठिरला सांगितले होते.

 शाकल नावाच्या नगरात सुनिर्मल वाण्याने हे व्रत केल्याने दुसऱ्या जन्मात तो कुशावती नगरीचा राजा झाला अशी एक कथा आहे.

 'नाभी' व 'मरुदेवी' यांचे पुत्र ऋषभदेव हे श्रीविष्णूचे अवतार होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी इंद्राने धरतीवर पाऊस पडला नाही, तेव्हा ऋषभदेवांनी आत्मसामर्थ्याने पाऊस पाडून धरती सुजलाम् सुफलाम् केली, तेव्हा प्रभावीत होवून इंद्राने आपली कन्या जयंती हिचा विवाह ऋषभदेवांबरोबर लावून दिला. ऋषभदेवांना शंभर मुले झाली. गंगा यमुनेच्या मधल्या भूमीचा राजा व ऋषभदेवांचा मुलगा 'ब्रह्मावर्त' ला त्यांनी  जो अध्यात्मिक उद्देश केला तो प्रसिद्ध आहे.

 ज्येष्ठपुत्र 'भरत' याच्या स्वाधीन राजसत्ता देऊन त्यांनी विदेही अवस्थेत कोंक,कुटक, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशात प्रवास केला.

 एकदा ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हस्तिनापूरचा राजा 'श्रेवांस' यांच्या घरी गेले, तेव्हा राजाने त्यांना उसाचा रस दिल्यामुळे त्याच्या भोजनशाळेतील अन्नदेवता व हस्तिनापूरचे (दिल्ली) ऐश्वर्य अक्षय्य टिकले आहे.

१. या दिवशी ओरिसा व बंगाल प्रांतात परस्परांना चंदनाचे तेल लावून तीन आठवडे चालणाऱ्या चंदन यात्रा उत्सवाची सांगता करतात.

२.  जगन्नाथपुरीस मदनमोहन मूर्तीला चंदन तेल लावून शोभा यात्रेने नरेंद्र तलावात नौकाविहार करतात.

३. गुजरातमध्ये द्वितीयेला गावाबाहेर धान्य, कापूस व साखर या वस्तूंचे एक नगर बनवून त्यात एक तांब्याचे नाणे ठेवून त्याला राजा व त्याच्याजवळ एक सुपारी ठेवून त्याला तिला दिवाण असे म्हणतात. गावातील लोक हे नगर पाहण्यासाठी जातात.

४. अक्षय तृतीया ते श्रावण पौर्णिमेपर्यंत समुद्र अशांत असतो, म्हणून या काळात समुद्र पर्यटनाला जाऊ नये. या दिवशी गुजरात मध्ये समुद्र पूजा संपन्न करतात.    

५. कोकणात कुमारिकांना घरी आमंत्रित करून त्यांच्या अंगाला चंदनाचे उटणे लावून, शिरा असलेला शंख फिरवतात व पाद्यपूजा करून कैरीचे किंवा दाह कमी करून पचनशक्ती वाढविणारे कोकणचे सरबत पिण्यास देऊन गुलकंद व मोरावळा देतात.

६. या दिवशी शेती कामाला सुरू प्रारंभ होतो.

७. नगरेंचि रचावी | जळाशये निर्मावी ||महावने लावावी | नानाविधे || श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आज्ञेचे पालन केल्यास प्रदूषण मुक्त वातावरण होऊन 'पाणी अडवापाणी जिरवा' ही संकल्पना संपन्न होईल.तसेच वृक्ष लावून संवर्धन केल्याने जिवंतपणी अक्षय आनंद व नंतर मोक्षप्राप्ती होते, असा वराहपुराणात उल्लेख आहे.

८. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने व्यवसाय प्रारंभ करावा.

९.  अक्षय तृतीयेला सोमवार वा बुधवार व रोहिणी नक्षत्र असेल तर विशेष महत्त्व असते. तसेच चंद्रास्ताला रोहिणी नक्षत्र पुढे असेल तर शुभ व मागे असेल तर अशुभ मानतात.

१०. पळस-पत्रावळीवर गव्हाची रास घालून त्यावर दोन कलश ठेवून त्यात पाणी घालावे व आपल्या पूर्वजांसाठी तर्पण विधी करून ते कलश आमंत्रित केलेल्या व्यक्तीला दानदक्षिणा देऊन दानदक्षिणा देऊन आमरसाचे जेवण घालावे.

११. पूर्वजांच्या स्मरणार्थ देह, नेत्र, रक्त, वस्त्र, धन, जमीन, विद्या, पायातील जोडा, छत्री, जलकुंभ, पंखा, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य दान करावे.

१२. अक्षय तृतीयेला सत्य, कृत व त्रेतायुगांचा प्रारंभ, नर-नारायण, हयग्रीव व परशुराम यांचा जन्मोत्सव संपन्न करून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाने 'चैत्र गौरी' उत्सवाची सांगता करतात.

टिप्पण्या