स्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करीत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा---
भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वडील खंडोजीराव पाटील यांनी बाळाचे नाव सावित्री ठेवले. बघता बघता सावित्री ९ वर्षांची झाली आणि १२ वर्षांच्या ज्योतीबांशी त्यांचे लग्न लावण्यात आले.
एकीकडे आई-वडिलांना सोडावे लागणाऱ याचे दुःख होते, तर दुसरीकडे शहरात जायला मिळणार, याची उत्सुकता होती.शिक्षणाचा अंशही माहीत नसणारी सावित्री सासरी निघाली.
इ.स. १८४८ मध्ये महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. पण त्याकाळी मुलींना शिकवण्यासाठी कोणी तयारच होईना, तेव्हा सावित्रीबाईंनी शाळेत शिकवावे, असे ज्योतिबांनी ठरवले.
सावित्रीबाई अक्षर गिरवायला लागल्या आणि पुढे शाळेत शिकवायला लागल्या.
पुण्यातील जुन्या, कर्मठ लोकांना ही गोष्ट आवडली नाही.
पिढ्यान् पिढ्या चूल आणि मूल करत आलेली स्री घराचा उंबरठा ओलांडते, म्हणून येन-केन प्रकारे ते सावित्रीबाईंना त्रास देऊ लागले.
अहो पण म्हणतात ना…
"श्याम सुरज को ढलना सिखाती है|
शमा परवाने को जलना सिखाती है|
अरे इतिहास बदलनेवालों को, होती है थोडी तकलीफ, मगर ये तकलीफ इंसान को चलना सिखाती है| मगर हे तकलीफ इंसान को चलना सिखाती है|"
अशा अनेक तकलिफा सहन करत त्या माऊलीने स्री शिक्षणाचा वसा निष्ठेने चालू ठेवला.
शेवटी या कर्मठ लोकांनी जोतिबांच्या वडिलांचे कान भरले आणि ज्योतिबांच्या वडिलांनी सावित्रीबाईंसह ज्योतिबांना घराबाहेर काढले.
पण… हिमालयासारख्या इच्छाशक्तीपुढे असले छोटे-छोटे भूकंप टिकू शकत नाही. सावित्रीबाईंनी आपले काम अधिक जोरात सुरू केले.
त्यांनी विधवा स्त्रिया आणि निराधार मुलांना आश्रय दिला. या अनाथांवर सावित्रीबाई मातेच्या वात्सल्याने प्रेम करू लागल्या.
पुढे अशाच एका अनाथाला त्यांनी दत्तक घेतले आणि हा अनाथ मुलगा यशवंत झाला.
जोतिबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुतण्याने यशवंतास मडके धरण्यास मनाई केली, तेव्हा सावित्रीबाईंनी ते मडके स्वतःच्या हाती धरले आणि त्या अंत्ययात्रेच्या पुढे चालू लागल्या. स्मशानात जोतिबांच्या पार्थिवाला त्यांनी स्वतः अग्नी दिला.
महात्मा फुलेंनंतर सत्यशोधक समाजाची धुरादेखील सावित्रीबाईंनी यशस्वीपणे सांभाळली.
सावित्रीबाईंनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर यासारखे काव्यसंग्रह लिहिले.
स्रीशिक्षणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या, दीनदलितांना मायेने जवळ घेणाऱ्या, अनाथांना आश्रय देणाऱ्या आणि ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्रीशिक्षणाचा दिवा उभ्या देशात लावणाऱ्या या माऊलीने जगातील कोणत्याही नामवंत विद्यापीठात शिक्षण घेतले नाही, परंतु त्यांनी आमच्या वाईट प्रथेला ओळखले, त्याला विरोध केला आणि येथेच राहून त्यांचे निराकरणही केले.
स्रीशिक्षणातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंना ओळखले जाते.
१८९७ च्या प्लेगमध्ये रुग्णांची सेवा करत असताना प्लेगग्रस्त दलित मुलास खांद्यावर घेऊन दवाखान्यात जाताना सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्या १० मार्च १८९७ ला स्वर्गवासी झाल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन…जय महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा