विषय - इतिहास
प्रकरण-३ रे
भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव - वसाहती
भारतात ज्या कालखंडातील हत्यारे व उपकरणांसाठी पाषाणाबरोबरच प्रथम तांब्याचा
उपयोग होऊ लागला, या कालखंडाला ‘ताम्रपाषाणयुग’ असे म्हटले जाते.
या कालखंडात तांबे वितळवण्याचे तंत्र भारतातील मानवाने चांगलेच आत्मसात केलेले होते.
या कालखंडात तांब्याच्या कुऱ्हाडी, छिन्न्या आणि अनेक प्रकारचे छोटी शस्त्र तयार झालेले आहेत.
याशिवाय तांब्याचे अनेक उपकरणे आणि अलंकारही उत्खननात सापडले आहेत.
या कालखंडात तांब्याची व मातीची भांडी आढळतात.
ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणजे तांबे आणि दगड या दोहोंची हत्यारे वापरणार्या लोकांची संस्कृती होय.
नैसर्गिक आपत्तीमुळे हडप्पा संस्कृती काळातील लोकांना स्थलांतर करावे लागले. ते लोक जेथे नव्याने वसले, तेथे गाव-वसाहती या स्वरुपात नवीन संस्कृती उदयाला आल्या.
या नवीन संस्कृतीचा प्रसार भारतात राजस्थान, गुजरात,बिहार,बंगाल,ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गंगेचे खोरे या प्रदेशात झाला.या संस्कृतीना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणतात.
उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोक जेथे जेथे पोहोचले तेथे स्थानिक संस्कृतीमध्ये ते मिसळून गेले.
या ठिकाणी भांडी घडवणे, तांब्याच्या वस्तू बनवणे, शेती करणे या गोष्टींचे स्थानिक लोकांना ज्ञान दिले.
त्यातून प्रादेशिकतेनुसार वैशिष्ट्यांचे वैविध्य दर्शविणाऱ्या वसाहतींच्या स्वरूपातील नवीन संस्कृती उदयाला आल्या.
ग्राम-वसाहतीच्या रचनेत नागरी हडप्पा काळातील शिस्त दिसत नाही.
हडप्पा येथील ‘एच’ या दफनस्थळातील मिळालेल्या अस्थीकुंभावरील नक्षीचे नमुने हे वेगळ्या प्रकारचे आहेत.
त्यामध्ये चंद्र,सूर्य,मासे, हरीण आणि मोर या प्रतीकांचा वापर केलेला दिसतो.
अस्थीकुंभावरील मोराच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे.
उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक आर्य होते,असे काही पुरातत्वज्ञाचे मत आहे,पण हे लोक निश्चित कोण होते, हे ठरविण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.
राजस्थान --
‘आहाड’ किंवा ‘बनास’ संस्कृती--(टीप लिहा.)
राजस्थानमधील मेवाड प्रदेशातील ही संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन संस्कृती आहे.
तिचा कालखंड इ.स.पू. ४००० इतका प्राचीन आहे.
उदयपूर जवळच्या आहाड येथे सर्वप्रथम तिचा शोध लागला, म्हणून तिला आहाड संस्कृती असे म्हणतात.
आहाड संस्कृतीला ‘बनास संस्कृती’ असेही म्हणतात; कारण ही संस्कृती बनास नदीच्या उपनदीवर वसलेली आहे.
बालाथल आणि गिलुंड ही या संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत.
बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते.
त्याचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर गाव- वसाहतींना केला जात होता.
आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची आहेत.ती चाकावर घडवलेली असत.त्यांचा आतील भाग आणि तोंडाजवळचा भाग काळा आणि उरलेला भाग तांबडा असे.
मातीच्या भांड्याबरोबरच मातीचे बैल, शंखांच्या वस्तू, दगडी पाती, छिन्न्या, बाणाची अग्रे, तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात मिळाल्या.
बालाथल येथील घरे पक्क्या विटांची (इंग्लिश बॉण्ड पद्धत) बांधली होती.
बालाथलभोवती तटबंदी होती. हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचा पुरावा आहे.
हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत,असे दिसते.
तांबे वितळवून ते शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते.
राजस्थानातील खेत्री येथील तांब्याच्या खाणींमधून हे लोक तांबे मिळवत होते.
गणेश्वर-जोधपुरा संस्कृती-
गणेश्वर-जोधपुरा संस्कृतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची अनेक स्थळे राजस्थानातील खेत्री परिसरात सापडले आहेत.
या गाव-वसाहती हडप्पापूर्व काळातील होत्या.
गणेश्वर येथील उत्खननामध्ये तांब्याचे बाण आणि भाले यांचे अग्रे, मासेमारीचे गळ,बांगड्या, छिन्न्या यासारख्या वस्तू आणि आणि मातीची भांडी मिळाले.
गणेश्वर-जोधपुरा संस्कृतीचे लोक हडप्पा संस्कृतीच्या लोकांना तांब्याच्या वस्तू पुरवत असत.
गंगेचे खोरे-
गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी-
गेरू रंगाच्या भांड्यांची खापरे नदीच्या पात्रात सापडतात. सहसा पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडतात.
या संस्कृतीची स्थळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात सापडतात.
राजस्थान-
गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या संस्कृतीचा राजस्थानातील काळ इ.स.पू. 3000 वर्षे इतका प्राचीन आहे.
गंगा-यमुना या नद्यांच्या दुआबात इ.स.पू. 2000 च्या सुमारास नांदत होती.
या काळातील लोक स्थिर गाव-वसाहतीमध्ये राहत होते. त्यांची घरे, घरातील जमिनी चोपून तयार केलेल्या आहेत.
त्या घरांच्या आतमध्ये चूली, मातीच्या पक्क्या भाजलेल्या पुरुषरुपी बाहुल्या, बैल गाईगुरांची हाडे, तांदूळ ,सातू यासारख्या वस्तू सापडल्या.
यावरून या संस्कृतीचे लोक स्थिर गाव- वसाहतींमधून राहत होते आणि ते शेती करत होते, हे स्पष्ट होते.
भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, ओडिसा आणि मध्य प्रदेश येथे मिळाले आहेत.
ताम्रनिधीमधील वस्तूंचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते, हे स्पष्ट आहे.
गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात सापडतात.
त्यामुळे ताम्रनिधीतील वस्तू घडवणारे कारागीर गेरू रंगाच्या भांड्याच्या संस्कृतीचे होते, असे मानले जाते.
ही संस्कृती उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोकांची आहे, असे काही पुरातत्वज्ञांचे मत होते.
तर काही पुरातत्त्वज्ञ गंगा-यमुना नद्यांच्या दुआबात सापडलेल्या ताम्रनिधींचा संबंध वैदिक आर्यांशी जोडतात.
या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सान्निध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी, असाही एक मतप्रवाह आहे.
बंगाल, बिहार, ओडिसा-
प्रश्न- हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. ( तुमचे मत नोंदवा)
बंगाल, बिहार, ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये ताम्रनिधी मिळाले असले तरी गेरू रंगाची भांडी या प्रदेशांमध्ये मिळत नाहीत.
या राज्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींची स्थळे उजेडात आली आहेत.
बिहारमधील चिरांड, सोनपूर येथील उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मिळाली.
या भांड्यांचे घाट (बनावट) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या घाटांसारखे आहेत.
हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बंगाल, बिहार,ओडिसा या प्रदेशात स्थलांतर केले.
ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी होय.
शिवाय बंगाल आणि ओडिसातील ताम्रपाषाणयुगीन स्थळांमधील मातीच्या भांड्यांवर हडप्पा संस्कृतीचा प्रभाव आहे.
त्यामध्ये वाडगे, कुंडे यांची घडणही हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवणारी आहे.
यावरून असे अनुमान काढले जाते की, हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते.
मध्य प्रदेश : कायथा संस्कृती -
मध्य प्रदेशातील कायथा जि.उज्जैन येथे या संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम सापडले, म्हणून तिला कायथा संस्कृती म्हणतात.
कायथा संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. याचा शोध प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. वाकणकर यांनी लावला.
कायथा संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते.
हे लोक प्रामुख्याने हाताने बनवलेली मातीची भांडी, गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सुक्ष्मास्त्रे वापरत होते.
याशिवाय कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आणि बांगड्या, मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार सापडले.
याशिवाय संगजिरा (steatite) या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी सापडले.
यावरून कायथा आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्परसंबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा,असे दिसते.
कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्यप्रदेशात आले. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्यप्रदेशात एकत्र नांदल्या असण्याचीही शक्यता आहे.
त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात.
माळवा संस्कृती- (टिप लिहा)
माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झाला.
या संस्कृतीचा कालखंड इ.स.पूर्व १८०० ते १२०० इतका आहे.
नर्मदा नदीतीरावरील नावडाटोली हे या संस्कृतीचे महत्त्व जास्त आहे.
याशिवाय मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण, उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्वाची स्थळे आहेत.
नागदा आणि एरण येथील माळवा संस्कृतीच्या गाव-वसाहती तटबंदीयुक्त होत्या.
या लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस असत.
गुजरात -
प्रश्न- गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे-१. कालखंड २. व्यवसाय ३. विस्तार ४. इतर संस्कृतींची आलेल्या संबंधाचा पुरावा.
गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन गाव-वसाहतींचा काळ हडप्पा संस्कृतीचे समकालीन आहे. त्यामध्ये -
कालखंड--
१. पूर्व हडप्पा इसवी सन पूर्व ३९५० -२६००
२. नागरी हडप्पा इ.स.पू.२६०० -१९००
३. हडप्पा संस्कृतीच्या नाशानंतर हडप्पोत्तर काळ.
या हडप्पा संस्कृतीच्या तिनही काळाशी मिळताजुळता आहे.
व्यवसाय -
गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या मातीच्या भांड्यांमध्ये कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य आढळते.
गुजरातमध्ये गारगोटीच्या खड्यांपासून रंगी-बेरंगी मणी बनवणे, हा हडप्पा संस्कृतीमधील एक मोठा उद्योग होता.
गाव वसाहतींमधून मण्यांसाठी कच्चा माल मिळवणे. मातीची नक्षीदार भांडी बनवणे.
शेतीतून अन्नधान्य पिकवणे.
यासारखे व्यवसाय ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या काळात गुजरातमध्ये अस्तित्वात असावे, असे दिसते.
विस्तार -
गुजरातमधील या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात अशा विस्तीर्ण प्रदेशात झालेला होता.
इतर संस्कृतींशी आलेल्या संबंधाचा पुरावा -
या संस्कृतीचा संबंध दक्षिण सौराष्ट्रातील ‘प्रभाव संस्कृती’ आणि ईशान्य सौराष्ट्रातील ‘रंगपुर संस्कृती’ यांच्याशी होता.
उत्तर हडप्पा काळात दक्षिण सौराष्ट्रात प्रभास जि. जुनागड येथे प्रभास संस्कृती, तर ईशान्य सौराष्ट्र रंगपूर जि. लिम्बडी येथे रंगपुर संस्कृती उदयाला आली.
या दोन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांचे रंग, नक्षी, घाट याबाबतीत साम्य होते.
या संस्कृती इसवी सनापूर्वी १८०० - १२०० या काळात अस्तित्वात होत्या.
ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र -
महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे.
हडप्पा संस्कृतीचे लोक तिथे पोहोचण्याआधीच्या काळात तिथे जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती, तिला सावळदा संस्कृती म्हणतात.
त्यानंतरच्या काळात तेथे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत.
सावळदा संस्कृती -
धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या काठी हे स्थळ आहे.
सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सनापूर्वी सुमारे २००० -१८०० असा होता.
या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांचा सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा.
कारण धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखांच्या वस्तू महाराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांची असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे.
दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते.
त्या भांड्यांवरील नक्षीमध्ये तीराग्रे ,माशांचे गळ, विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश होता.
याशिवाय तांब्याच्या वस्तू, हाडांपासून बनवलेली तिराग्रे,खड्यांचे मणी ,दगडी पाटे-वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या.
त्यांच्या गाव-वसाहतींभोवती तटबंदी बांधलेली होती. त्यांची घरे मातीची असून, घरातील जमिनी गाळ आणि माती एकत्र चोपून बनवलेल्या होत्या.
माळवा आणि जोर्वे संस्कृती : महाराष्ट्राचे आद्य शेतकरी -
प्रश्न- माळवा संस्कृतीच्या लोकांना ‘महाराष्ट्राचे आद्य शेतकरी’ म्हटले जाते. (सकारण स्पष्ट करा.)
महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव-वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या.
इसवी सनापूर्वी १६०० च्या माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले.
माळवा संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती वसविल्या.
हे शेतकरी शेतीत गहू, बार्ली, ज्वारी अशी पिके घेऊ लागले.
त्यामुळे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते.
महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी
आला .
त्यामुळे सावळदा संस्कृतीचे लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्यांचे तंत्रज्ञान, घाट नक्षीचे नमुने यामध्ये काही बदल घडून आले आणि जोर्वे संस्कृती या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती उदयास आली.
अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे येथे हे संस्कृती प्रथम उजेडात आली. म्हणून तिला जोर्वे संस्कृती असे म्हणतात.
महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार तापी, गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या खोऱ्यात झाला होता.
इनामगाव,ता.शिरूर, जि. पुणे. येथील विस्तृत उत्खननामुळे माळवा आणि जोर्वे संस्कृतीमधील लोकांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध झालेली आहे.
१. माळवा संस्कृती--- इ.स.पू.१६०० -१४००
२. पूर्व जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१४०० -१०००
३. उत्तर जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१००० -७००
उत्खनित स्थळे-
दायमाबाद,प्रकाशे, जिल्हा नंदुरबार, चांडोली, सोनगाव, इनामगाव, वाळकी जिल्हा पुणे, नेवासे जिल्हा अहमदनगर, पिंपळदर जिल्हा नासिक,
माळवा संस्कृती ( इ.स.पू.१६००-१४०० )
या काळातील लोकांची घरे--
लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस होती. घराच्या भिंती कुडाच्या असत.
घरामध्ये आडभिंत घालून घराचे दोन भाग केलेले असत.
जमिनीतून गोल खड्डा करून झोपड्या( गर्तावास ) उभारल्या जात.
धान्य साठवण व्यवस्था--
कोठी ठेवण्यासाठी एक गोल ओटा,चार पायांचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे चार चपटे दगड आणि चून्याने लिंपलेले बळद यासारख्या गोष्टीवरून घरामध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद लक्षात येते.
मातीची भांडी-
मातीची भांडी पिवळसर रंगाची असत. त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असे. त्यांचा पोत खरबरीत असतो.
पूर्व जोर्वे संस्कृती ( इ.स.पू.१४००-१०००)
या काळातील लोकांची घरे-
घरे चौकोणी, प्रशस्त, एकापेक्षा अधिक खोल्यांचे होते. गोल खड्डा करून त्यावर उघडलेल्या झोपड्यांची (गर्तावास) संख्या नगण्य होती.
गाव प्रमुखाचे मध्यवर्ती जागेत पाच खोल्यांचे घर होते.
मातीची भांडी--
त्या काळातील भांडी खणखणीत भाजलेली असल्यामुळे त्यांचा नाद धातूच्या भांड्याप्रमाणे असतो.
त्यांचा रंग लाल असतो आणि काळ्या रंगाने नक्षी काढलेली असते.
मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे आणि कुंडे, चंबु, घडे अशा घाटाच्या भांडयांचा समावेश होता.
या काळातील कुंभकाराच्या भट्ट्या गोल आकाराच्या होत्या. त्यांची क्षमता जास्त होते.
इनामगाव हे इतर गावांना मातीची भांडी पुरवणारे केंद्र होते.
पूर्व जोर्वे काळात इनामगावमध्ये नदीला कालवा काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केली होती.
सिंचनासाठी वापर होत असे. गाव प्रमुखाकडे पाणीवाटपाचे अधिकार होते. गाव प्रमुख पद वंशपरंपरागत होते. हे दर्शवणारी दफणे प्रमुखाच्या घरालगत सर्वसाधारण दफना पेक्षा वेगळ्या पद्धतीची होती.
धान्य साठवण व्यवस्था-घराच्या बाहेर बरीच बळदे होती.येथील शेतकरी गहू,बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीथ यासारखी पिके घेत होते.
दफनपद्धती- प्रमुखाची दफने घरालगतच वेगळ्या पद्धतीची होती.
साधारणत: जमिनीत खड्डा खणून मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेत पुरले जाई. तर कधी मृत व्यक्तीला एका चार पायाच्या, फुगिर पोटाच्या रांजणात बसलेल्या अवस्थेत पुरले जाई.
दोन पद्धतीने दफन केले जाई. मृत बालकाला पुरण्यासाठी कुंभाचा वापर करत असत.
उत्तर जोर्वे संस्कृती ( इ.स.पू.१००० -७०० )-
या काळातील लोकांची घरे- या काळात हवा शुष्क होऊ लागली, त्यामुळे लोकांना फिरस्ते जीवन जगावे लागले.
परिणामी घराऐवजी झोपड्यांची संख्या वाढली. त्या गर्तावासाहून वेगळ्या होत्या.टोकाला बांधलेला जुडगा तळाकडे पसरून तंबूप्रमाणे शंक्वाकृती झोपड्या होत्या.
मातीची भांडी- पूर्व जोर्वे संस्कृती काळासारखे भांड्यांचे घाट असले तरी त्यावर फारसे नक्षीकाम नव्हते.
कुंभाराचे आवे( भट्ट्या) जमिनीवरच रचले जात.
भारतातील महापाषाण युग -
प्रतिकूल हवामानामुळे उत्तर जोर्वे काळात म्हणजे इ.स.पु. ७०० च्या काळात इनामगाव पूर्णपणे उजाड झाले.
तेथील लोक भटके जीवन जगू लागले. त्या आकाराने मोठ्या असलेल्या शिळांचा उपयोग करून उभारलेली शिलावर्तुळे सापडतात.
त्या वर्तुळात दफने असत.
या शिळा आकाराने मोठ्या असल्याने त्यांना महापाषण तर ही शिळावर्तुळे ज्या काळातील आहेत, त्यांना महापाषाणयंग म्हणतात.
ही शिलावर्तुळे अस्थी पुरण्यासाठी स्मारक म्हणून वापरली जात.
जगभर शीलावर्तुळे सापडतात, त्यांची परंपरा प्रागैतिहासिक काळापासून आजपर्यंत आहे.
प्राचीन शिलावर्तुळे इसवीसन पूर्व १५०० ते इ.स.पू.५०० या काळातील आहे.
महाराष्ट्रातील शिलावर्तुळे इसवीसन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ४०० या काळातील आहेत.
ती उभारणारे लोक दक्षिण भारतातून आले असावेत. ती लोह युगातील आहे.
महाराष्ट्रात विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात टाकळघाट,माहूरझरी, खापा, नायकुड अशा अनेक ठिकाणी उत्खनन केले.
अनेक शिलावर्तुळे प्राचीन व्यापारी मार्गावर होती.
या काळातील कारागिरांच्या स्थिर गाव-वसाहतीचे अवशेष क्वचित सापडतात.
शीलावर्तुळाच्या दफनात घोड्याची हाडे व दागिने मिळाले.
यावरून या काळात लोक वाहन आणि सामान लादण्यासाठी घोड्यांचा वापर करत असावेत.
- समाप्त -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा