प्रकरण १० भारतीय इतिहासातील नवे पर्व

प्रकरण-10       भारतीय इतिहासातील नवे पर्व


प्रास्ताविक-

  • मौर्य सम्राट साम्राज्याच्या विघटनानंतर स्थानिक राजसत्तांच्या महत्वाकांक्षा बळावल्या.

  • प्रादेशिक राज्यांच्या उदयाला सुरुवात झाली. त्यातून शुंग, सातवाहन या राजकीय सत्तांचा उदय झाला. 

  • याच सुमारास ग्रीक, शक, पल्लव, कुशाण  या परकीयांची आक्रमणे सुरू झाली.

  • प्रादेशिक राज्यांच्या उदयाचा काळ हा राजकीय आणि सामाजिक संक्रमणाचाही  काळ होता. 

  • कुशाण  साम्राज्याच्या अवशेषातून गुप्त साम्राज्य उदयाला आले. त्यांनी कुशाण तसेच सातवाहनांच्या प्रदेशावर आपले  साम्राज्य  उभारले. 

  •  मध्य आशियातील भटक्या टोळ्या-

  • सिकंदराच्या मृत्यूनंतर त्यांनी नेमलेल्या सत्रपांनी,आपले स्वतंत्र राज्य  प्रस्थापित केली.

  •  वायव्येकडील ग्रीक  राज्यांच्या उतरत्या काळातच  मध्य आशियातील भटक्या टोळ्यांनी बॅक्ट्रियावर आक्रमणे केली.

  • इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात पहलव (पार्थियन) आणि शक (स्कीथियन) त्यांनी हल्ले केले. 

  • मध्य आशियातील शकांना चीनमधून आलेल्या युएची टोळ्यांनी  तेथून स्थलांतर करण्यास भाग पाडले. 

  • युएची हे पशुपालक होते. या भटक्या लोकांनी स्थानिक राजांवर त्यांच्या युद्ध कौशल्याचा जोरावर वर्चस्व मिळवले आणि त्याची तेथे स्वतःची राज्य प्रस्थापित केले. 

प्रश्न-  मध्य आशियातील भटक्या टोळ्यांची माहिती लिहा.  ( थोडक्यात उत्तर लिहा)

  • वायव्येकडील  ‘बॅक्ट्रिया’ या ग्रीक राज्यावर भटक्या टोळ्यांनी आक्रमणे केली.

  • मध्य अशियातील पहलव आणि शकांनी उत्तर भारतावर आक्रमण केले. 

  • चीनमधील युएची टोळ्यांनी शकांना मध्य आशियातून हद्दपार केले. 

  • या भटक्या टोळ्यांनी त्यांच्या युद्ध कौशल्याच्या जोरावर स्थानिक राजांना पराभूत करून तेथे स्वतःचे राज्य स्थापन केली.

  • इंडो-ग्रीक, शक, कुशाण -

  •   इंडो-ग्रीक -  ( संकल्पना स्पष्ट करा)

  • वायव्य भारतातील सत्रपींंना ‘इंडो-ग्रीक’ असे म्हटले जाते.

  • भारतीय परंपरेत त्यांचा उल्लेख ‘यवन’ असा केला जातो. 

  • ग्रीक सम्राट सिकंदराच्या मृत्यूनंतर त्याने नेमलेल्या सत्रपांनी आपापली स्वतंत्र राज्य प्रस्थापित केली होती. 

प्रश्न- इंडो-ग्रीकांची उद्दिष्टे लिहा.    (थोडक्यात उत्तर लिहा)

  •  वायव्य भारतातील  ग्रीक सत्रपांना असे म्हटले जाते. त्यांची उद्दिष्टे-

  1. भूमध्य सागराच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित करणे.

  2. पश्चिम व मध्य आशियातील व्यापारावर आपली पकड दृढ करणे, हे त्यांचे उद्देश होते.     सेल्युकस निकेटर हा वायव्येकडील बॅक्ट्रिया प्रांतातील इंडो-ग्रीक राजा होता. 

 प्रश्न- भारताच्या वायव्य भागात दोन स्वतंत्र इंडो-ग्रीकांचे प्रस्थापित झाली होती. (सकारण स्पष्ट करा)

  • बॅक्ट्रियाचा राजा डिमीट्रस याने इसवीसनपूर्व १८० मध्ये भारतावर आक्रमण करून तक्षशिला जिंकले. 

  • त्याची राजधानी  साकल (सियालकोट) येथे होती. 

  • याच सुमारास युक्रेटायडीस त्याने आपले स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले. त्याची राजधानी तक्षशिला होती.

             अशाप्रकारे भारताच्या वायव्य भागात दोन स्वतंत्र इंडो-ग्रीक राज्य प्रस्थापित झाली.

  • डिमिट्रस  आणि युक्रेटायडिस यांनी स्थापन केलेल्या या दोन्ही शाखांचे मिळून ४०  राजे होऊन गेले.

  • इंडो-ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या नाण्यांवरून समजतो. 

  • नाण्यांवरील ठसे, मजकूर, राजांचे चित्र, देवतांचे चित्र या नाविन्यपूर्ण गोष्टी ही त्यांची भारतीय नाणकपरंपरेला मिळालेली देणगी आहे.

  •  शक-    (संकल्पना स्पष्ट करा)

(प्रश्न- भारतातील शक राज्याच्या स्थापनेचा वृत्तांत लिहा.    थोडक्यात उत्तरे लिहा.)

  • मध्य आशियातील स्किथियन भटक्या टोळ्यांना भारतात ‘शक’ असे म्हटले जात होते.

  • म्हणजेच शक हे मध्य आशियातून आले. त्यांनी बॅक्ट्रियातील इंडो-ग्रीकांना हुसकावून लावून आपले राज्य प्रस्थापित केले.

  • त्यांच्या वसतिस्थानास  ‘शकस्थान’ (शिस्तान) असे म्हटले जात होते. 

  • कुशाणांनी त्यांना पंजाबातून हुसकावून लावल्यानंतर पश्चिम भारतात त्यांनी स्थलांतर केले आणि तेथेच त्यांची अनेक राज्य स्थापन केली.

  •  भारतातील पहिला शक राजा म्हणजे ‘मोएस’ उर्फ ‘मोग’. 

  • त्याने गांधार आणि पंजाब हे प्रदेश जिंकून राज्य स्थापन केले. 

  • त्याच्यानंतर आलेल्या शक राजांच्या दुर्बलतेमुळे पहलव राजा गोंडोफर्नेसने त्याचा पराभव करून भारतात आपली सत्ता निर्माण केली.

प्रश्न-  शकांची राज्यपद्धती विशद करा.     (थोडक्यात उत्तर लिहा)

  • पंजाबमधील राज्य नाहीसे झाल्यानंतर पश्चिम भारतात  शकांची अनेक राज्य स्थापन झाली. 

  • शकांनी आपली राज्यपद्धती इराणमधील ‘अखमोनिय’ व ‘सेल्युकीड’ पद्धतीनुसार स्थापन  केली.

  •  त्याअंतर्गत त्यांनी सत्रपांना पुरेशी स्वायत्तता  दिली. 

  • अखमोनिया व सेल्युकिड -   (संकल्पना स्पष्ट करा)

  • शकांनी आपली राज्यपद्धती इराणमधील राज्यपद्धती म्हणजेच  ‘अखमोनिय’ व ‘सेल्युकीड’  पद्धतीनुसार  केली. 

  • त्यात राज्याची  प्रांतात - सत्रपीमध्ये विभागणी केली जात असे. 

  • प्रत्येक सत्रपीवर महाक्षत्रप हा लष्करी अधिकारी नेमला जात असे. 

  • प्रत्येक सत्रपीची उपविभागणी  करून, त्याची जबाबदारी सत्रपकडे सोपवली जात असे.

 प्रश्न-  शक राजवटीत पुरेशी स्वायत्तता होती.      (सकारण स्पष्ट करा)

  •  शकांनी आपल्या राज्याची विभागणी सत्रपींमध्ये (प्रांत) केली होती. 

  • प्रत्येक सत्रपीवर (म्हणजे प्रांतावर)  महाक्षत्रप हा लष्करी अधिकारी नेमला जात असे.

  • या सत्रपींची (म्हणजे प्रांताची)  उपविभागणी करून त्यावर प्रत्येकी एक सत्रप नेमला जाई.

  • या सत्रपांना  आपले शिलालेख कोरण्याची तसेच नाणी पाडण्याची परवानगी होती. त्यावरून त्यांना पुरेशी स्वायत्तता होती असे दिसते.

  • कुशाण  - (संकल्पना स्पष्ट करा)  

(प्रश्न- कुशाण सत्तेच्या  स्थापनेचा वृत्तांत लिहा.  थोडक्यात उत्तर लिहा.)

  • मध्य आशियातील या भटक्या टोळीने बॅक्ट्रियात आल्यानंतर ग्रीकांच्या संस्कृतीचा अंगीकार केला.

  •  शकांना दक्षिणेकडे हुसकावल्यानंतर कुजूल कडफीसीस या कुशाण प्रमुखाच्या नेतृत्वाखाली युएची टोळ्या एकत्र आल्या.

  • त्याने त्यांना हिंदुकुश पर्वतातून वायव्य भारतात आणले. त्याने बॅक्ट्रियाचे राज्य काबीज केले आणि स्वतःला बॅक्ट्रियाचा राजा घोषित केले. 

  • पुढे कुशानांनी भारतात साम्राज्य प्रस्थापित केले आणि भारतीय संस्कृती आत्मसात  केली. 

  • भारतीय साहित्यामध्ये कुषाणांचा उल्लेख ‘तूखार’ किंवा ‘तुषार’ असा केला जातो.

  • कुशाण साम्राज्य -

 प्रश्न-  कुशाण राजे स्वतःला ‘देवपुत्र’ असे म्हणवत असत.  ( सकारण स्पष्ट करा)

  • कुषाणांनी छोटी-छोटी राज्य जिंकल्यानंतर तेथे सत्रपी प्रस्थापित केल्या. त्यावर सत्रप  (क्षत्रप) नावाचे लष्करी अधिकारी नेमले. 

  • या सर्व क्षत्रपांमधील प्रमुख अधिकारी म्हणून राजा स्वतःला ‘राजाधिराज’ ‘महाराज’ अशी बिरुदे लावू लागला.

  • ‘राजा’ हा ईश्वराचा अंश असतो, ही कल्पना  कुशाणांच्या नाण्यांवरील  लेखांमध्ये प्रथम आढळते.

  • कुशाणांच्या नाण्यांवरील  लेखांमध्ये ‘देवपुत्र’ हा उल्लेख आढळतो. याचा अर्थ कुशाण राजे स्वतःला ‘देवपुत्र’ असे म्हणत असत.

 प्रश्न- कनिष्काच्या कामगिरीचे वर्णन करा.       (थोडक्यात उत्तरे लिहा)

  • अनेक शक राजांना पराभूत करून कनिष्काने काबुलपासून पाटलीपुत्रपर्यंत व काश्मीरपासून माळव्यापर्यंत कुशाण साम्राज्याचा विस्तार करून सम्राटपद मिळवले.

  • त्याने दोन वेळा चीनवर आक्रमण केले. 

  • त्याने आपल्या विस्तीर्ण साम्राज्याच्या राज्यकारभारासाठी पेशावर आणि मथुरा अशा दोन राजधान्या स्थापन केल्या. 

  • तसेच काश्मीरमधील कुंडलवन येथील विहारामध्ये चौथी बौद्ध धर्मपरिषद आयोजित केली होती.

प्रश्न-   कुशाण सत्तेचा ऱ्हास सुरू झाला.

  • कुशाणांचा शेवटचा राजा वासुदेव याच्या नावावरूनच कुशाणांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली होती, हे लक्षात येते. 

  • त्याच्या कारकीर्दीत कुशाणांचा ऱ्हास सुरू झाला.

  • कुशाण साम्राज्याचे तुकडे पडून ठिकठिकाणचे सत्रप स्वतंत्र झाले. 

  • कुशाणांची सत्ता पंजाब व गांधार या प्रदेशात इसवी सन ४ थ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती.

  •  गुप्त साम्राज्य -

प्रश्न-  गुप्त वंशाचा संस्थापक श्री गुप्त याने त्याच्या नावामागे ‘महाराज’ अशी पदवी लावलेली आढळते.         (सकारण स्पष्ट करा)

  • इसवी सन २७५ मध्ये गुप्त घराणे सत्तेवर आले.

  •  या घराण्याचा मूळ संस्थापक श्रीगुप्त होता. त्याच्या नावामागे ‘महाराज’ अशी पदवी लावलेली आढळते. यावरून असे लक्षात येते की तो एक मांडलिक राजा होता.

  •  श्रीगुप्त हा छोट्या राज्याचा राजा होता. त्याने अन्य सामर्थ्यशाली सम्राटांचे मांडलिकत्व पत्करले होते. म्हणून गुप्त वंशाचा संस्थापक श्रीगुप्त याने त्याच्या नावामागे महाराज अशी पदवी लावलेली आढळते.

  •  घटोत्कच -

  • श्रीगुप्ताचा मुलगा घटोत्कच यांनीही ‘महाराज’ हेच बिरुद लावलेले दिसते.

  • घटोत्कच हाच गुप्त साम्राज्याचा खरा संस्थापक होय. 

  • म्हणजेच त्या काळात गुप्त राजे हे मांडलिक होते.

  •  पहिला चंद्रगुप्त-

  • घटोत्कच हा गुप्त घराण्यातील एक कर्तुत्ववान राजा होऊन गेला. 

  • पहिला चंद्रगुप्त घटत्कोच याचाच पुत्र (मुलगा) होय. गुप्त राज्याचा विस्तार वाढवून त्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचे श्रेय पहिला चंद्रगुप्त याच्याकडे जाते. 

  • त्याच्या नावाआधी जोडलेल्या ‘महाराजाधिराज’ या पदवीने गुप्त राजांच्या वाढलेल्या प्रतिष्ठेची कल्पना येते. 

  • पहिल्या चंद्रगुप्ताने नेपाळनजीकच्या लिच्छवी कुळातील कुमारदेवी हिच्याशी विवाह केला.

  • हा विवाह गुप्त राजघराण्याला राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरला.

  •  चंद्रगुप्ताने पाडलेल्या एका नाण्यावर चंद्रगुप्त आणि कुमारदेवी यांची नावे व चित्र कोरलेले आहे. त्यावरून या विवाहास विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते.

  • चंद्रगुप्ताची सत्ता मगध, साकेत (अयोध्या) आणि प्रयाग या प्रदेशांमध्ये पसरलेली होती.

  • त्यानंतरच्या काळात गुप्त घराण्यात होऊन गेलेला प्रतिभावंत, पराक्रमी, कल्याणकारी  राजा म्हणजे समुद्रगुप्त होय.

  •  समुद्रगुप्त- 

  • गुप्त साम्राज्य चौफेर वाढविण्याचे महान कार्य चंद्रगुप्ताच्या मुलाने म्हणजे समुद्रगुप्ताने केले.

  • पिता चंद्रगुप्त त्याच्याबरोबर समुद्रगुप्तास विविध मोहिमांवर जाण्याची संधी मिळाल्याने त्याला उत्कृष्ट प्रशिक्षण मिळू शकले.स्वाभाविकपणेच तो राज्याचा वारस ठरला.

  • नाग राजांचा पराभव करून त्याने गंगेच्या  विस्तीर्ण खोर्‍यात आपले राज्य स्थापन केले.

  • दक्षिणेकडे साम्राज्यविस्तार करण्याची योजना त्यांनी आखली. 

  • मात्र नर्मदा आणि गोदावरीच्या दरम्यान वाकाटकांचे प्रबळ राज्य होते. 

  • त्यांच्याशी संघर्ष टाळून त्याने महाकोसल व ओरिसा यामधून मुसंडी मारून दक्षिणेस कांची पर्यंत मजल मारली.

  • या मोहिमेत समुद्रगुप्ताने बारा राजांचा पराभव करून त्यांना गुप्तांचे मांडलिकत्व स्विकारण्यास भाग पाडले.

  •  हा पराक्रमी, प्रतिभावंत राजा संगीतज्ञही होता.

 प्रश्न-  दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला.     ( तुमचे मत नोंदवा)

  • प्राचीन भारतात चक्रवर्ती राजा आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी अश्वमेध यज्ञ करायचे.

  • मौर्यकाळात खंडित झालेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन पुष्यमित्र शुंग यांनी केले होते.

  • दिग्विजय करून संपूर्ण भारत एकाच सत्तेच्या अधिपत्याखाली आणावा, अशी समुद्रगुप्ताची महत्वाकांक्षा होती.

  • समुद्रगुप्त याने आपल्या नाण्यांवर ‘सर्वराजोच्छेत्ता’  अशी पदवी कोरली होती.त्याचा अर्थ ‘सर्व राजांची संज्ञा संपुष्टात आणणारा’ असा होतो. 

  • समुद्रगुप्ताने आपल्या शेजारील राज्ये जिंकून घेतली. उत्तर दिग्विजयानंतर दक्षिणेकडील राज्य जिंकण्याची मोहीम त्यांनी सुरू केली.

  • वाकाटकांची सत्ता प्रबळ असल्याने वाकाटक राज्य वगळता दक्षिणेत कांचीपर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. 

  • जिंकलेल्या प्रदेशांपलीकडील राजांना मांडलिक बनवले. त्यांना आपले सार्वभौमत्व मान्य करायला लावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली.

  • समुद्रगुप्ताची  ही कृती साम्राज्यवादाची प्रवृत्ती दर्शवते. स्वतःच्या आणि स्वतःच्या राज्याच्या गौरवासाठी अशीकमाछघ तळ"२⁷ आक्रमक कृती केली जाते.

  • आधुनिक काळात सर्व जर्मन भाषिकांना एकसंध करण्याच्या उद्देशाने हिटलरने शेजारील राष्ट्रांवर आक्रमण करून ती काबीज केली.

  • साम्राज्यविस्तारवादाची ही प्रवृत्ती मानवजातीवरचे मोठे संकट आहे. त्यातून मनुष्य संभार आणि संपत्तीचा विनाश घडतो.

  • दुसरा चंद्रगुप्त 

  • दुसरा चंद्रगुप्त याने शकांचा पराभव  केला. 

  • शकांचा  पराभव करून गादीवर आल्यानंतर ‘विक्रमादित्य’ हे बिरूद दुसरा चंद्रगुप्त यांनी धारण केले.

  • त्याने पश्चिमेकडील माळवा, गुजरात व काठेवाड या प्रदेशांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली.

  • त्यामुळे पश्चिमेकडची बंदरे ही गुप्तांच्या वर्चस्वाखाली आली आणि पश्चिमेकडचा व्यापारात गुप्तांचा प्रवेश झाला. 

  • त्यानंतर चंद्रगुप्ताने हिंदुकुश ओलांडून वायव्येकडील प्रदेशही आपल्या सत्तेखाली आणला. 

  • अशा रीतीने संपूर्ण उत्तर भारतात त्याने सार्वभौम राज्य स्थापन केले.

  • चंद्रगुप्ताने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह दक्षिणेतील वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन यांच्याशी करून दिला आणि वाकाटकांची मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले.

  •  नवरत्ने - (संकल्पना स्पष्ट करा)

  • दुसरा चंद्रगुप्त हा पित्याप्रमाणे विद्वानांचा आश्रयदाता आणि विद्या व कला यांचा भोक्ता होता.

  • त्याच्या दरबारात नवरत्ने होती, असे म्हणतात. त्याच्या दरबारातील नऊ विद्वानांना असे म्हणतात.

  • ही नवरत्ने म्हणजेच - धन्वंतरी ( वैद्य), क्षपणाक (फलज्योतिषी), अमरसिह (कोशकार), शंकु (शिल्पज्ञ), वेतालभट्ट (मांत्रिक),घटकर्पूर (लेखक), कालिदास (महाकवी), वराहमिहीर  (खगोल शास्त्रज्ञ),वररुची (वैय्याकरणी) ही  त्या नवरत्नांची नावे होती.

  •  कुमारगुप्त -

  • दुसऱ्या चंद्रगुप्ताचा मुलगा कुमारगुप्त याच्या काळात मध्य अशियातील हुणांनी भारतावर आक्रमणे सुरू केली. 

  • कुमारगुप्ताने हूणांचे आक्रमण थोपवून धरले.

  • कुमारगुप्तानंतरचे राजे आपल्या राज्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले. 

  • शेवटी त्यांचे राज्य आणि छोट्या राज्यांमध्ये विघटित झाले.

  • गुप्तकालीन राज्यव्यवस्था व लोकजीवन

  • गुप्त काळ हा अभिजात संस्कृतीचा काळ मानला जातो. 

  • गुप्तकाळात राजा हा प्रशासनाचा केंद्रबिंदु असे. 

  • गुप्त प्रशासन हे विकेंद्रित होते. स्थानिक पातळीवरच अनेक निर्णय घेतले जात.

  • राजपुत्र, अमात्य आणि सल्लागार राजाला मदत करत. राजपुत्र कित्येक वेळा प्रांताचे प्रांतपाल म्हणून काम पाहत असत.

  •  प्रांतपाल -

  • गुप्त राज्यव्यवस्थेत राज्याची विभागणी प्रांतात केली जात असे. 

  • त्याच्या प्रशासकाचे पदनाम प्रांतपाल होते. 

  • राजपुत्राची प्रांतीय अधिकारी म्हणून नेमणूक करताना त्याचे पदनाम कुमारामात्य असे.

  • विषयपती -

  • उत्तर राज्यव्यवस्थेत प्रत्येक प्रांताचे उपविभाग केले जात असत. 

  • उपविभाग यांना विषय असे म्हटले जाई. त्या विषयावर स्वतंत्र  प्रशासक नेमला जात असे. उपविभाग अधिकार्‍याचे पदनाम विषयपती असे असत.

  •   आयुक्तक -

  • गुप्त राज्यव्यवस्थेत प्रांताच्या उपविभागाची विभागणी जिल्ह्यात केली जात असे.

  • जिल्हाधिकार्याचे पदनाम आयुक्तक असे.

  •  शेतीच्या  अर्थव्यवस्थेची पुनर्रचना -

  • गुप्तकालीन राजांनी शेतीचा अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न केले.

  • स्थानिक लोकांना शेत जमिनी कसायला देण्यावर त्यांचा भर होता.

  • धार्मिक आणि  शैक्षणिक संस्थांना जमिनी दिल्या गेल्या. 

  • करमुक्त असत. या जमिनींना अग्रहार असे म्हटले जाई.

प्रश्न-गुप्तकाळात स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली.   (सकारण स्पष्ट करा)

  • गुप्त राज्यकर्त्यांनी लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगार देण्याऐवजी  इनामी जमिनी देण्याची पद्धत सुरू केली. 

  • इनामी जमिनी या करमुक्त होत्या. राज्याचे उत्पन्न कमी होत जाऊन राजसत्ता आर्थिकदृष्ट्या  दुर्बल होत गेली. 

  • त्याचे वैशिष्ट्य असलेल्या सरंजामी पद्धतीचे मूळ इथे दिसू लागतात. 

  • या गोष्टीमुळे राजा हे सत्तेचे केंद्र न राहता सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली.

  • युआन श्वांग  या  या चिनी प्रवाशाच्या वृत्तानुसार गुप्त साम्राज्यातील वायव्येकडील प्रदेशात ऊस व गहू ही पिके घेतली जात असत. 

  • मगध व त्याच्या  पूर्वेकडे भातशेती केली जात असे. 

 प्रश्न-  गुप्तकाळातील कापड उद्योगाची माहिती लिहा.

  • कापूस  मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असल्याने कापड उद्योग अस्तित्वात  होता. 

  • त्यापासून विविध प्रकारचे कापड तयार केले जात असे. 

  • क्षौम, चित्रपट्ट, दुकुल, पुलकबंध, पुष्पपट्ट, अंशूक अशा विविध प्रकारच्या कापडांना देशी-विदेशी बाजारात  मोठी मागणी होती. परदेशातही निर्यात केली जात असे.

  • खनिजे, प्राणी व वनस्पती इत्यादी  व्यापारी संपत्तीचे स्रोत होते.

  • प्राणी आणि वनस्पती हा गुप्तकाळात व्यापारी संपत्तीचा स्रोत होता. 

  • त्याचबरोबर या काळात कारागिरांची गुणवत्ता उंचावली होती,असे दिसते. 

  • सुवर्णकारांनी घडवलेली गुप्तकालीन सुवर्ण नाणी ही त्याचा उत्तम नमुना आहेत.

  • निगम,  श्रेणी आणि गण अशा संघटना व्यापाऱ्यांनी व उद्योगपतींनी स्थापन  केल्या होत्या.

  • साहित्यनिर्मिती--

 प्रश्न- गुप्तकालीन साहित्यनिर्मितीची माहिती लिहा.   (थोडक्यात उत्तरे लिहा.)

  • गुप्तकाळापर्यंत अनेक परकीय जमाती आक्रमणाच्या निमित्ताने येऊन भारतात स्थायिक झाल्या होत्या. त्यांना समाजव्यवस्थेत सामावून घेण्यात आले.

  • ‘नारदस्मृती’ आणि ‘याज्ञवल्क्यस्मृती’ यासारख्या स्मृतिग्रंथांची निर्मिती या काळात झाली. या ग्रंथांमध्ये त्या अनुषंगाने झालेल्या समाजरचनेचे वर्णन आढळते.

  •  कालिदासाने ‘शाकुंतल’ हे नाटक या काळात लिहिले. राज्यकर्त्यांनी संस्कृत भाषेला राजाश्रय दिल्याने अनेक विषयांवर संस्कृत भाषेत ग्रंथनिर्मिती  झाली.

  • शिल्पकला-

  • भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया काळात रचला गेला. 

  • मानवी आकृती हा गुप्तकाळातील शिल्पकलेचा केंद्रबिंदू होता. 

  • मानवी शिल्पे आणि देवी-देवतांच्या मूर्ती ह्या काळात घडवल्या गेल्या. 

  • सारनाथ,  देवगड अजिंठा अशा अनेक ठिकाणी या काळातील शिल्पे आढळतात. 

  • या काळात हिंदू बौद्ध जैन धर्माच्या मूर्ती घडवल्या गेल्या. विशेष म्हणजे प्रस्तर व धातू यांच्याबरोबरच मातीचा उपयोग मूर्ती बनवण्यासाठी या काळात केला जात असे. 

  • गांधार शैलीत दिसणारा ग्रीक शैलीचा प्रभाव गुप्तकाळातील शिल्पकलेत दिसत नाही.

  • स्थापत्यकला-

 प्रश्न- गुप्तकालीन स्थापत्यकलेचा विकास विशद करा.    (थोडक्यात उत्तरे लिहा.)

  • भारतीय मंदिर स्थापत्याचा पाया  गुप्तकाळात घातला गेला. 

  • मंदिराच्या बांधकामात घडीव दगडांचा वापर करण्याची सुरुवात गुप्तकाळात झाली.

  •  सांची, घुमरा, देवगड या ठिकाणी सुरुवातीच्या मंदिरांचे अवशेष सापडतात.

  •  धातुविज्ञान-

 प्रश्न- गुप्तकाळातील धातुविज्ञानाची माहिती लिहा.    (थोडक्यात उत्तरे लिहा.)

  • गुप्तकाळात धातूंचे मिश्रण व ओतकाम यामध्ये लक्षणीय प्रगती झाली होती.

  • दिल्लीतील मेहरोली येथील लोहस्तंभ कित्येक शतके न गंजता राहिला आहे, ही  बाब त्याची साक्ष देते.

  • यावरून गुप्तकाळातील धातुविज्ञान अत्यंत प्रगत होते, हे लक्षात येते.

  •  वर्धन साम्राज्य -       (टीप लिहा)

  • पुष्यभूती-

  • गुप्त साम्राज्याच्या पडत्या काळात पुष्यभूती यांनी उत्तर भारतातील स्थानेश्वर (ठाणेसर) या ठिकाणी वर्धन राजघराण्याची सत्ता स्थापन केली.

  • याठिकाणी वर्धन’, गंगा यमुना दुआबात  ‘मौखारी’, सौराष्ट्र मध्ये ‘मैत्रक’  इत्यादी वंशांचा उदय झाला.

  •  प्रभाकरवर्धन-

  • प्रभाकरवर्धनाच्या  राज्यारोहणापासून वर्धन  घराणे प्रभावी बनले.

  •  ‘परमाभट्टारक महाराजाधिराज’ हे सार्वभौमत्वाचे बिरूद त्याने धारण केले होते.

  •  हर्षवर्धन-

  • वर्धन घराण्याचा सर्वात प्रभावी राजा म्हणजे हर्षवर्धन होय. साम्राज्यविस्तार नेपाळपासून नर्मदेपर्यंत व सौराष्ट्रापासून बंगालपर्यंत झालेला होता.

  • हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर त्याला कोणी वारस नसल्यामुळे त्याच्या राहत साम्राज्याचे तुकडे पडले व उत्तर भारतात अनेक राज्य स्वतंत्र झाली.

  • हर्षवर्धनाच्या दरबारी असणारा कवी बाणभट्ट यांनी लिहिलेल्या हर्षचरित या ग्रंथातून तसेच चिनी प्रवासी ह्युएन-त्संग याने लिहिलेल्या प्रवासवर्णनातून त्या काळाची बरीच माहिती मिळते.

  • त्याच्या कारकिर्दीत नालंदा व वल्लभी ही विद्यापीठे जगातील श्रेष्ठ विद्याकेंद्रे बनले  होती.

  • भारतातूनच नव्हे तर चीन कोरिया जपान श्रीलंका इत्यादी देशांमधून शेकडो विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी तेथे येत असत. 

  • हर्षवर्धनाचे साम्राज्य हे प्राचीन भारतातील शेवटचे बलाढय साम्राज्य होते.

  • कर्कोटक साम्राज्य -

  • दुर्लभवर्धन -

  • इसवीसनाच्या ७ व्या शतकात काश्मीरमध्ये कर्कोटक घराण्याची स्थापना दुर्लभवर्धन याने केली.

  • त्याचे साम्राज्य नर्मदेपासून तिबेटपर्यंत पसरलेले होते. 

  • कल्हणाच्या राजतरंगिनी या ग्रंथात कर्कोटक घराण्याची माहिती मिळते.

  •  ललितादित्य-

  • दुर्लभवर्धनाचा नातू ललितादित्य (मुक्तापीड, इसवीसन ७२४-७६०) याची कारकीर्द विशेष उल्लेखनीय आहे. त्याने त्याच्या कारकीर्दीत दोनदा दिग्विजय केला.

  • त्यामुळे काश्मीरच्या उत्तर सीमेवरील, विशेषत: अमूदर्या नदीच्या खोऱ्यातील  तूखार (तूर्क) व इतर अनेक जमातींना त्याने पळवून लावले. 

  • उत्तरापथातील अवंतीपासून ते ईशान्येकडील प्राग्ज्योतिषपूर  (आसाम) पर्यंतचा प्रदेश त्यांनी पादाक्रांत केला होता. 

  • अवंतीच्या (कनोज)  यशोवर्मा या राज्याच्या मदतीने त्याने समुद्र पार करून  द्वीपांतर (श्रीलंका) केल्याचा उल्लेख कल्हनाणे केला आहे.

  • यावरून असे दिसते की, ललितादित्य उत्तरेला तिबेटपासून दक्षिणेला कावेरी नदीपर्यंत साम्राज्य प्रस्थापित केले असावे. 

  • ललितादित्य हा विष्णूचा उपासक होता. त्याने मार्तंड मंदिराची निर्मिती केली. 

  • ललितपुर नावाचे नगर वसवले होते. 

  • झेलम नदीच्या तीरावरील आजचे लाटपूर म्हणजेच ललितपुर असावे. 

  • हुष्कपूर (उशकुर)  येथे त्याने बौद्ध विहार बांधले होते.

  • व्यापार, नाणी, कला, मूर्तीशास्त्र -

    व्यापार-      

 (भारत- रोम व्यापार.  (टिप लिहा.) 

  • इसवी सनापूर्वीच्या २ रे शतक ते इसवीसनाच्या ४ थ्या शतकाचा काळ हा भारतीय इतिहासामध्ये मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांच्या आगमनाचा आणि त्यांनी प्रस्थापित केलेल्या राजघराण्यांचा काळ होता आहे.

  • भारतात येईपर्यंत त्यांच्या मार्गातील अनेक संस्कृतीची वैशिष्ट्ये आत्मसात करत ते इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे भारतातील सांस्कृतीक  जीवनातही परिवर्तन घडून आले.

  •  तत्कालीन भारतीय समाजात  शेती व पशुपालन हीच उपजीविकेची प्रमुख साधने होती.

  •  त्याचबरोबर विविध उद्योगधंदे व व्यापार यांची या काळात प्रगती झाली. 

  • त्यामध्ये भारतीयांचा परकीयांशी आलेला संपर्क महत्त्वाचा ठरला. या काळात भारताचा समुद्री व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला. 

  • भारतीय माल जहाजांमधून तांबड्या समुद्रापर्यंत आणि तेथून ईजिप्तमार्गे रोम येथे रवाना होत असे. 

  • भारतातून वाघ, सिंह, माकड यासारखे प्राणी, पोपट, मोर यासारखे पक्षी, लोकर, रेशीम, सुती, कापड, हस्तिदंत, मसाल्याचे पदार्थ, चंदन, औषधी वनस्पती, हिरे, माणके व इतर चैनीच्या वस्तू निर्यात केल्या जात असत.

  •  तसेच शिसे, तांबे, काच,सोने,चांदी, मद्य इ. वस्तू बाहेरील देशातून आयात केल्या जात असत.

  • या व्यापारामुळे भारतात सुवर्ण नाण्यांचा ओघ सतत येत असल्यामुळे भारतभूमी समृद्ध बनली होती.

  •  बॅकट्रीयातील नाणी -

  • बॅरियातील काही नाणी आकार आणि वजन या बाबतीत ग्रीक नाण्यांसारखी होती.

  • त्यामधील काही नाण्यांवर घुबडाची प्रतिमा दिसते. घुबड हे ‘अथेना’ देवीचे चिन्ह आहे.

  • ‘अथेना’ ही अथेन्सची अधिष्ठाती देवता आहे. 

  • ग्रीक भाषेतील मजकूर असलेली इंडो-ग्रीक नाणी बॅकट्रीयात सापडली. त्यामध्ये दर्शनी बाजूवर ग्रीक भाषेत आणि  मागील बाजूवर प्राकृत भाषेतील लेख असे. 

  • प्राकृत भाषेतील लेखासाठी खारोष्टी लिपीचा वापर केलेला असे.  

  • ग्रीकांनी सुवर्ण नाणी चलनात आणि त्यावर राजांच्या व देवदेवतांच्या आकृती कोरलेल्या होत्या.

  • ग्रीक तसेच रोमन नाण्यांचा मोठा प्रभाव शक, कुशाण नाण्यांवर पडलेला दिसतो.

  • शकांच्या नाण्यांवर खारोष्टी लिपी आढळते. या काळातील नाणी ही ग्रीक, भारतीय व इराणी संस्कृतीचा  संमिश्र प्रभाव  दर्शवतात. 

  • भारतीय देवदेवतांच्या प्रतिमा नाण्यांवर दर्शवणारे कुषाण हे पहिले राजे होते. 

  •  शिवप्रतिमा असलेली तांब्याची नाणी त्यांनी चलनात आणली  होती.

कला-

  • भारतीय ग्रीक-रोमन, इराणी आणि ग्रीक संस्कृतीचा संगम गांधार प्रदेशात झाला होता. त्यामुळे या प्रदेशाला सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले होते.

  •  पुष्कलावती, पुरुषपूर, तक्षशिला इत्यादी नगरांमध्ये मूर्ती कलेचा विकास झाला. तिला ‘गांधार शैली’ असे नाव मिळाले. 

  • या प्रकारातील मूर्तींचे विषय भारतीय होते, पण शैली ग्रीक होती.  

  • गांधार शैलीच्या मूर्तीमध्ये प्राकृतिक सौंदर्याला अधिक महत्त्व होते.

  • बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या उदयामुळे कला शैलीला प्रोत्साहन मिळाले. गौतम बुद्ध बोधीसत्व यांच्या स्मृतीबरोबर रस्त्यासाठी दान देणार्‍यांची पुतळेदेखील  पाषाणात कोरले गेले. परंतु ही शैली वायव्येकडे घालता पुरतीच सिमित राहीली. 

  • याच सुमारास मथुरा व वाराणसी कलाशैली विकसित झाली. त्यातील गौतम बुद्धांच्या प्रतिमा पूर्णपणे भारतीय स्वरूपाच्या होत्या. 

  • मथुरा हे भारतीय शिल्पकलेचे महत्त्वाचे केंद्र होते. प्रतिमा- शिल्प हे मथुरा शिल्प पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. 

  • विम, तक्षम व कनिष्क, या कुशाण राजांचे पुतळे या प्रतिमा शिल्पाची नमुने आहेत.

  • तसेच सरस्वती विष्णू, शिव, सूर्य आणि कार्तिकेय  यांच्या मूर्ती प्रथम या काळात निर्माण झाल्या. 

  • कुशाण  काळातील ही शिल्पकला भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात नवनिर्मितीचा काळ दर्शवणारी होती. 

  • या काळात  तत्कालीन संपन्न समाजाचे प्रतिबिंबदेखील कलेतून उमटवण्याचा प्रयत्न केला गेला. 

  • भारत- रोम व्यापार   (महाराष्ट्रातील व्यापाराची केंद्रे)

  • इसवीसन पूर्व पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेल्या  ‘The Periplus of Aerithrian Sea’  (पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी) या ग्रंथात भारत-रोम व्यापाराचे विवरण करण्यात आले आहे. 

  • तांबडा समुद्र आणि भारतीय किनारपट्टी यांना सागरी मार्ग बंद व्यापारात होणाऱ्या वस्तू या सर्वांचे उल्लेख आहेत.

  • भारत-रोम व्यापार तांबडा समुद्रमार्गे केला जात असे. 

  • सोपारा व कल्याण या बंदरातून माल तांबड्या समुद्रापर्यंत आणला जात असे. तेथून तो रोमला पाठवला जात असे.

  • व्यापारी मालामध्ये कापड, मूल्यवान खडे, काळी मिरी, हस्तिदंत आणि मोर असे प्राणी भारतातून निर्यात केले जाऊ लागले. 

  • त्याचा मोबदला सुवर्ण नाण्यांच्या रूपाने दिला जात असे. प्रवाळ आणि मद्य आयात केले जाऊ लागले. 

  • दोन्ही बाजूंना कान असलेली मद्यकुंभाची (अँफोरा) खापरे उत्खननात  सापडली आहे.

  • त्यांच्या तळाशी साठलेल्या द्रव्याचे परीक्षण केल्यानंतर ते मद्याचे अवशेष असल्याचे दिसते. 

  • या व्यतिरिक्त भांड्यांचा वापर  ऑलिव्ह तेल आणि गॅरम  (माशांचे लोणचे) ठेवण्यासाठी होत असे.

  • व्यापारामुळे बाजारपेठ आणि शहरे यांच्या संख्येत वाढ झाली. 

  • भारतातही अनेक महत्त्वाची बंदरे या काळात उदयास आली.

  • महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वस्तूंची कोठारे म्हणजे उत्पादन केंद्रे तेर, नेवासा, भोकरदन, कोंडापूर आणि सन्नती येथे  होती. 

  • सोपारा आणि कल्याण ही बंदरे भारत-रोम व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. तेथे रोमन भांडी (Amphora) आणि तांबडी भांडी उत्खननात सापडतात. 

  • दक्षिण भारतात व्यापाराच्या वाढीबरोबर धरणीकोट, अमरावती, नागार्जुनीकोंडा अशा विविध ठिकाणी बौद्ध केंद्रेही स्थापन  झाली होती.

 प्रश्न- गुप्त कालखंडात विविध क्षेत्रात प्रमाणीकरण कसे झाले ते लिहा.

मुद्दे  -  अ. प्रशासनाची विभागणी        ब. शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना.    क. गुप्तकालीन              नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती.

अ.  प्रशासनाची विभागणी -

  • गुप्तकालीन प्रशासन हे विकेंद्रित होते. स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात असत.

  •  राजा प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. राजपुत्र व सल्लागारांच्या मदतीने तो राज्यकारभार करत असे.

  •  साम्राज्याची प्रांतात विभागणी केली जात असे. प्रांतपाल खात्याचा प्रशासक असे.

  • राजपुत्र प्रांतपाल म्हणून काम करीत असत, तेव्हा त्यांना ‘कुमारामात्य’  म्हटले जायचे.

  • प्रांताची विषय या उपविभागात विभाग केले जात असे. विषयपती हा उपविभागाचा प्रशासक असे.

  • विषयाची जिल्ह्यात विभागणी केली जात असे. आयुक्तक  हा जिल्ह्याचा कारभार बघत असे. 

 ब. शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना-

  •  स्थानिक लोकांना शेतजमिनी कसण्यासाठी दिल्या जायच्या. 

  • धार्मिक व शैक्षणिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या जमिनी- अग्रहार- करमुक्त असायच्या.

  • लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगाराऐवजी इनामी जमीन देण्याची पद्धत सुरू झाली.

  • या प्रथेने मध्ययुगीन सरंजामी पद्धतीची सुरुवात झाली.

  •  या पद्धतीमुळे नागरी केंद्रांचा ऱ्हास झाला. अग्रहार- दान जमिनी व इनामी जमिनी करमुक्त असल्याने महसूल कमी झाला आणि राज्याची अर्थव्यवस्था दुर्बल झाली. 

क. गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती-

  •  सुवर्णकार यांनी घडवलेली सुवर्ण नाणी उत्तम प्रतीची होती. 

  • गुप्तकालीन नाण्यांवर राज्याच्या विविध पैलूंचे सौंदर्यपूर्ण व वास्तववादी चित्रण केले जात असे. 

  • समुद्रगुप्ताच्या काळातील काही नाण्यांवर वीणावादन प्रतिमा आहेत. त्यावरून तो संगीततज्ञ होता, हे लक्षात येते. 

टिप्पण्या