प्रकरण - ९
मौर्योत्तर काळातील भारत
प्रास्ताविक -
प्राचीन भारतातील सत्तेच्या एकत्रीकरणाच्या काळात वायव्येकडून ग्रीक, पर्शियन टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले होते.
या आक्रमणात सिकंदराची स्वारी, डॅरीअसची (दार्युश ) स्वारी उल्लेखनीय आहे. या परिस्थितीतून मगध सत्तेचा उदय झाला.
नंद आणि मौर्य साम्राज्य उदयाला आले. मौर्यांच्या कालखंडातही ग्रीकांनी स्वारी केली. पण चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव केला.
ग्रीकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले. मौर्य कालखंडात पुन्हा आक्रमणे झाली नाहीत.
सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याच्या विनाशाची प्रक्रिया सुरू झाली. साम्राज्य खिळखीळे झाले.
परिणामी पुन्हा आक्रमणे सुरू झाली. शेवटचा मौर्य सम्राट आणि त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग यांच्यात सत्तास्पर्धा सुरू झाली. शेवटी सेनापती पुष्यमित्राने मौर्य सम्राटाला पदच्युत केले.
शुंग साम्राज्य-
प्रश्न- पुष्यमित्र शुंग यांच्या कामगिरीचे वर्णन करा. (थोडक्यात उत्तरे लिहा.)
शेवटचा मौर्य सम्राट बृहद्ररथानंतर पुष्यमित्र शुंग हा गादीवर आला.
‘पुष्यमित्र शुंग’ हा पराक्रमी आणि महत्त्वाकांक्षी होता.
शुंगांचे साम्राज्य पूर्वेला मगध ते पश्चिमेला सियालकोट पंजाब तसेच उत्तरेकडे हिमालय ते दक्षिणेस विदर्भापर्यंत पसरलेले होते.
पाटलीपुत्र मुख्य राजधानी असली तरी पुष्यमित्राने विदिशा /बेसनगर (मध्यप्रदेश) येथे दुसरी राजधानी स्थापन केली.
त्याने कोसल,वत्स, अवंती या प्रांतावरील सत्ता बळकट केली.
पुष्यमित्राच्या काळात ड्रिमिट्रीअस या ग्रीक राजाचे आक्रमण त्याने शौर्याने परतावून लावले.
डिमिट्रीअसच्या या पराभवाचा उल्लेख कालिदासाने ‘मालविकाग्निमित्र’ या नाटकात केला आहे.
ड्रिमिट्रीअसनंतर युक्रॅटिडस सत्तेवर आला. त्यानेही भारतावर स्वारी केली. तसेच नंतरच्या काळातही भारतावर ग्रीकांची आक्रमणे झाली.
ग्रीकांच्या आक्रमणाबरोबरच व्यापारही वाढला. ग्रीक राजांपैकी सगळ्यात ख्यातनाम राजा मिनँडर (मिलिंद) होता.
उत्तर भारतावर आणि दक्षिणेकडील काही भागांवर अधिपत्य स्थापन केल्यावर आणि ग्रीकांना सीमेपार केल्यानंतर आपले सामर्थ्य दर्शविण्यासाठी पुष्यमित्राने दोन वेळा अश्वमेध यज्ञ केला.
मौर्यकाळात खंडित झालेली प्रयत्न करेन करण्याची परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केली.
प्रश्न- पुष्यमित्र शुंग यांनी दोन वेळा अश्वमेध यज्ञ केला. (सकारण स्पष्ट करा.)
उत्तर काळात विघटित झालेल्या साम्राज्याचे पुन्हा संघटन करण्याचे कार्य पुष्यमित्राने केले.
ग्रीक राजा ड्रिमिट्रीअसचे आक्रमण परतवून लावून सियालकोटपर्यंतचा प्रदेश पुन्हा काबीज केला. त्याने कौसल, वत्स, अवंती इत्यादी प्रांतांवर सत्ता बळकट केली.
पूर्वेला मगध ते पश्चिमेला सियालकोट, उत्तरेत हिमालय ते दक्षिणेस विदर्भापर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते.
आपले आधिपत्य स्थापन केल्यानंतर आणि ग्रीकांना सीमेपार केल्यानंतर आपले सामर्थ्य दर्शविण्यासाठी पुष्यमित्र शुंग याने दोन वेळा अश्वमेध यज्ञ केला.
प्रश्न- शुंग काळातील साहित्य क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घ्या. ( थोडक्यात उत्तर लिहा)
पुष्यमित्र शुंग याने साहित्य-संस्कृती साहित्याला उत्तेजन दिले.
संस्कृत भाषेत होत गेलेल्या बदलांचा विचार करण्यासाठी पतंजली यांनी पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथावर महाभारत हा ग्रंथ लिहिला.
या काळात महाभारत या ग्रंथात लक्षणीय भर घातली गेली.
तसेच मनुस्मृती या ग्रंथाची निर्मिती देखील याच काळात झाली.
प्रश्न- शुंग काळातील कलाक्षेत्रातील योगदानाची माहिती लिहा. (थोडक्यात उत्तरे लिहा)
साहित्याबरोबरच कलाक्षेत्रात देखील शुंगांचे योगदान महत्त्वाचे ठरते.
सांची व भारहूत येथील स्तूप आणि बेसनगर येथील गरुडस्तंभ हे या काळातील कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत.
या काळात शिल्पकलेची परंपरा अधिक समाजानुवर्ती झाल्याने सामान्यजनांच्या जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटले.
घराण्याचा शेवटचा राजा देवभूती हा चैनी विलासी होता. त्याचा मंत्री वासुदेव याने त्याला ठार मारून कण्व घराण्याची राजवट स्थापन केली.
या घटनेचे वर्णन बाणभट्टाने ‘हर्षचरित’ या ग्रंथात केलेले आहे.
सातवाहन साम्राज्याचा उदय -
महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजसत्ता म्हणून सातवाहनांचा उल्लेख केला जातो.
उत्तरेत मौर्यांनंतर शुंग घराण्याची राज्य उदयाला आली. दक्षिणेत सातवाहन घराण्याची सत्ता उदयाला आली.
सिमुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. सातवाहन हे नाव सूर्यसूचक आहे. कदाचित सूर्योपासक म्हणूनही हे घराणे त्या नावाने ओळखले जात असावे.
सातवाहनांची सत्ता खरे तर महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण परिसरात उदयाला आली.
सुरुवातीला सातवाहनांची सत्ता नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि कालांतराने महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशांवर पसरली.
महाराष्ट्रातील पैठण हे नगर सातवाहनांची राजधानी होती. सातवाहनांचे असंख्य अवशेष अलीकडे उपलब्ध झाले ते महाराष्ट्रातच. भोकरदन आणि पैठणच्या उत्खननाने तर निश्चित पुरावेच दिले.
पुराणातील संदर्भानुसार सातवाहन घराण्यामध्ये एकूण 30 राजे होऊन गेले.
या राजांपैकी विशेष उल्लेखनीय राजे म्हणून सिमुक सातवाहन, कृष्ण सातवाहन, सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी,वाशिष्ठीपुत्र पुलूमावी यांचा उल्लेख करावा लागेल.
पुराणात आंध्र किंवा आंध्रभृत्य राजांचे उल्लेख येतात. आंध्र राजे म्हणजे सातवाहन राजे होते, असे मत काही इतिहासकारांनी मांडले आहे.
प्रश्न- सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा.
मुद्दे- अ. उदय व राज्यविस्तार ब. प्रशासन व्यवस्था क. उद्योग व व्यापार ड. साहित्य व कला.
अ. सातवाहन घराण्याचा उदय व राज्य विस्तार-
मौर्य साम्राज्याचे विघटन झाल्यामुळे या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन राजा सिमुकने सातवाहन घराण्याची स्थापना केली.
महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजसत्ता म्हणून सातवाहनांचा उल्लेख केला जातो.
सुरुवातीला नाशिक, पुणे आणि औरंगाबाद क्षेत्रात असलेल्या साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशात झाला.
गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करून पश्चिम आणि मध्य भारतात साम्राज्यविस्तार केला.
राजस्थान आणि मध्य भारतातील गणराज्य आपल्या नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण पथत दिग्विजय केला. दक्षिणेकडील अनेक राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले.
ब. प्रशासन व्यवस्था--
राज्याची विभागणी लहान प्रांतात करण्यात आली. प्रत्येक प्रांतात अमात्य आणि महाभोज या मुलकी अधिकाऱ्यांची आणि महासेनापती व महारथी या लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
‘ग्राम’ हा प्रशासनाचा सर्वात लहान घटक होता. ‘ग्राम’ करांचा स्त्रोतप्रसंगी सैनिक भरतीचे साधन होते. ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी संलग्न होते.
क. उद्योग व व्यापार
शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. उद्योग-व्यापारामध्ये वाढ होऊन, कुंभकार, तेलाचे उत्पादन करणारे, विणकर इत्यादी व्यावसायिकांच्या श्रेणी स्थापन झाल्या.
प्रतिष्ठान (पैठण), नगर (तेर), नासिक, करहाटक (कऱ्हाड) यासारखी व्यापारी नगरी उदयाला आली.
सोपारा, कल्याण व भरूच (गुजरात) ही बंदरे रोमशी असलेल्या व्यापाराची प्रमुख केंद्रे होती.
नाणेघाटातून मालाची वाहतूक केली जात असे. सुती कापड, विविध प्रकारची मलमल, अंकित व गोणपाट यांची निर्यात केली जात असे.
ड. साहित्य व कला-
सातवाहन काळात विद्येला आणि कलेला राजाश्रय मिळाला. राज्यकर्त्यांनी प्राकृत भाषेतील साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिले.
राजा हाल याने गाथासप्तशती ह्या भाषासंग्रहाचे संपादन केले.
गुणाढ्य यांनी पैशाची या प्राकृत भाषेत ‘बृहत्कथा’ नामक ग्रंथ लिहिला.
सर्ववर्माने संस्कृत व्याकरणावर ‘कातंत्र’ हा ग्रंथ लिहिला.
शिल्पकलेच्या भारतीय शैलीचा विकास झाला. सांची येथील क्रमांक १ च्या स्तूपाभोवतीची चार तोरणे व कार्ले, भाजे, नासिक इत्यादी ठिकाणांचे डोंगर कोरून निर्मित विहार आणि चैत्यगृह, अजिंठा येथील विश्वविख्यात लेण्यांमधील ८,९,१०,११,१२ आणि १३ क्रमांकाची लेणी हे शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत.
नाणेघाट- महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग - (टिप लिहा)
नाणेघाट महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर ( जुन्नर) व कोकण प्रदेशाला जोडतो. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला तर दुसरे खाली कोकणात ठाणे जिल्ह्यातील मुक्रच्बाच्डचक तालुक्यात आहे.
घाटाच्या तळाशी वैशाखखेडे गावात प्रवाशांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधलेल्या होत्या.
घाटात जकात गोळा करण्यासाठी खोदलेला रांजण आहे.
रोमहून आयात केलेला माल सोपारा- कल्याण- नाणेघाट- जुन्नर- नेवासामार्गे पैठण आणि कोल्हापूरकडे जात असे. उलट दिशेने याच मार्गावरून मालाची निर्यात होत असे.
या घाटामध्ये सातवाहनांनी एक लेणे खोदवले, तेथील लेखांमध्ये सातवाहन सम्राज्ञी नागणिका आणि सातवाहन राजांचा पराक्रम, त्यांनी केलेले दानधर्म याबद्दल माहिती आहे. हे लेख ब्राम्ही लिपीत कोरलेले आहेत.
तेथे सातवाहन राजांचे पुतळे होते. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिलालेखांमध्ये ‘दोन, चार, सहा, सात आणि नऊ हे अंक आणि २,४,६,७ आणि ९ अशा पद्धतीने कोरलेले आहेत. ते प्रचलित अंकलेखनाचे मिळतेजुळते आहेत.
गाथासप्तशती- (टीप लिहा) २ गुण.
सातवाहन राजा हाल यांनी प्राकृत भाषेतील निवडक ७०० गाथांचा संग्रह संपादित केला होता. त्यास गाथासप्तशती असे म्हणतात.
महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला हा पहिला ग्रंथ आहे. त्यामध्ये-- मानवी भावना, व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस व सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. विविध व्रत्ते, आचार आणि उत्सव यांचेही वर्णन त्यात आहेत.
थोडक्यात तत्कालीन महाराष्ट्रातील समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटलेले आहे. आधुनिक मराठी भाषेतील अनेक शब्दांचे मूळ या ग्रंथातील शब्दांमध्ये सापडते. यातील कविता वरून महाराष्ट्र प्राकृत आणि आधुनिक मराठी भाषा यांच्यातील दुवे स्पष्ट होतात.
सातवाहन राजे आपल्या नावाआधी आईचे नाव लावत असत. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या मातेचे नाव गौतमी बलश्री होते.
गौतमी बलश्रीचा नासिक येथील शिलालेख -
सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याची माता गौतमी बलश्रीच्या नाशिक येथील शिलालेखात तिच्या पुत्राची प्रशंसा आहे.
त्याचा गौरव ‘शकपहलवयवननिसुदन’ म्हणजे शक, पल्लव आणि ग्रीकांचे निर्दालन करणारा, असा गौरव करण्यात आला आहे.
तसेच ‘सातवाहनकुलयश: प्रतिष्ठापनकर’ सातवाहन कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यात आहे.
‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’, म्हणजेच ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत, असा उल्लेख केलेला आढळतो.
प्रश्न- गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कामगिरीचे वर्णन करा. (सविस्तर उत्तर लिहा.)
गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा होता. आपल्या नावाच्या आधी तो आपली माता गौतमी बलश्रीचे नाव लावत असे.
गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करून भारताच्या पश्चिम भागावर सातवाहनांचे वर्चस्व पुन:प्रस्थापित केले.
त्याने अवंती, सुराष्ट्र (सौराष्ट्र) आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केला. तरी मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिणापथ दिग्विजय केला. दक्षिणेकडील राजानी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले.
मध्य भारत आणि राजस्थानातील गणराज्यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. त्याने शक, पल्लव व ग्रीकांचे निर्दालन केले.
शक राजा ‘नहपान’ याच्या नाण्यावर गौतमीपुत्राची मुद्रा ही त्याचा नहपानावरील विजय आणि सामर्थ्य दर्शवते.
गौतमीपुत्रानंतर व वाशिष्ठीपुत्र पुळूमावी आणि यज्ञश्री सातकर्णी हे महत्त्वाचे राजे होते.
त्यानंतर मात्र सातवाहनांचा ऱ्हास सुरू झाला. आणि सातवाहनांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे ते दुर्बल होत गेले.
प्रश्न- सातवाहन काळातील समाजव्यवस्था लवचिक होती. (सकारण स्पष्ट करा.)
सातवाहनांच्या काळात ग्रीक, पल्लव, शक, कुशाण अशा परकीयांची आक्रमणे होत राहिली.
हे परके लोक भारतातच स्थायिक झाल्याने भारतीय समाजात मिसळून गेले.
अशाप्रकारे परकीयांना सामावून घेणारी समाजव्यवस्था अस्तित्वात होती. या अर्थाने सातवाहन काळातील समाजव्यवस्था लवचिक होती.
प्रश्न- सातवाहन काळात जातीव्यवस्था दृढ झाली. (सकारण स्पष्ट करा.)
सातवाहन काळात जातीव्यवस्था दृढ झाली, कारण वैदिक काळापासून प्रचलित असलेले वर्ण कायम राहिले.
बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजात अंतर्भाव झाल्यामुळे वर्णसंकर करून आले.
विविध व्यवसायातील श्रेणीना बंदिस्त स्वरूप आले. कालांतराने वर्णांचे जातीत रूपांतर झाले.
प्रश्न- सातवाहन काळात अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला. (सकारण स्पष्ट करा.)
सातवाहन काळात शेतीबरोबरच उद्योग, व्यापारामध्ये वाढ झाली.
श्रेणीमार्फत व्यापार व उद्योगांचे नियंत्रण केले जात असे. श्रेणींमार्फत कारागिरांना कर्ज दिले जात असे.
रोमबरोबर असलेल्या व्यापारामध्ये वृद्धी झाली. त्यामुळे सातवाहन काळात पैठण, तेर, नासिक आणि कऱ्हाड यासारख्या आणि व्यापारी नगरांचा उदय झाला.
प्रश्न- सातवाहनकालीन समाजव्यवस्थेचे वर्णन करा. (थोडक्यात उत्तरे लिहा.)
सातवाहन काळात समाजाची चार वर्णांमध्ये विभागणी झालेली होती. त्यामुळे जातीव्यवस्था अधिक दृढ झाली होती.
वर्णसंकर आणि परकीयांचा समाजात अंतर्भाव या उल्लेखनीय बाबी आहेत.
समाजाची चार वर्गात विभागणी झाली. महारथी, महाभोज आणि महा सेनापती या अधिकाऱ्यांचा समावेश पहिल्या वर्गात होत असे.
दुसऱ्या वर्गात अमात्य, महामात्र आणि भांडागारीक या दुय्यम अधिकाऱ्यांसह व्यापारी, व्यापारी तांड्यांचे प्रमुख (सार्थवाह) आणि श्रेणीचे प्रमुख (श्रेष्ठी) यांचा समावेश होत असे.
तिसऱ्या वर्गात शेतकरी, वैद्य, लेखनिक (कारकून), सुवर्णकार, गांधीक इत्यादी.
तर चौथ्या वर्गात वर्धकी (सुतार), लोहवाणीज (लोहार), मालाकार (माळी), दासक (मच्छिमार) इत्यादींचा समावेश होत असे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा