१२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन -                          


  • १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो.

  • बदलत्या परिस्थितीनुसार आजच्या युवकांसमोर मोठ-मोठी आव्हाने, समस्या उभ्या आहेत. 

  • राष्ट्र उभारणीत युवकांचे महत्त्व खूप मोठे आहे हे स्वामी विवेकानंद यांनी ओळखले होते आणि त्यासंदर्भात विचारही मांडलेले होते.

  • विचारांनी भरकटलेल्या आजच्या युवकाला छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिबा फुले,महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समजून घेण्याची गरज आहे.

  • यापैकी स्वामी विवेकानंद यांचे विचार राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने आपण समजावून घेणार आहोत.

  •  स्वामी विवेकानंद म्हणत, 'मी अशा एका धर्माचा प्रचार करू इच्छितो की, ज्याने माणूस तयार होईल'.

  • स्वामी विवेकानंद युवकांना उद्देशून म्हणाले की, युवक कसा असावा? 

  • तर त्याचे चरित्र नेहमी शुद्ध असावे. आपल्या देशावर प्रेम असावे. त्याच्या मनात उत्साह असावा. त्याची आई-वडिलांवर श्रद्धा असावी. तो निर्व्यसनी असावा.

  • आज भारत एकविसाव्या शतकात सर्वात जास्त युवक असलेला देश आहे.

  •  याच युवकांना योग्य दिशा दिली आणि स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांनी कृतीत आणले तर भारत हा देश निश्चितपणे जगावर राज्य करेल.

  • विवेकानंद हे अद्वितीय दिव्य पुरुष. ईश्वराचे सर्व अवतार व वेदज्ञानाचे नवनीत आहेत, असे विश्वातील सर्व लोकांचे मत आहे.

  • लोकमान्य टिळक म्हणाले होते, 'विवेकानंद हे भारताचे स्वदेशाभिमानी संत आहेत'.

  • मी अशा एका धर्माचा प्रचार करण्यासाठी जात आहे की, जैन व बौद्ध धर्म ज्याचे केवळ एक बंडखोर संतान असून ख्रिस्ती धर्म त्याचा केवळ दूर उमटलेला प्रतिध्वनी होय.

  • स्वामीजींनी माझा हिंदू धर्म महान आहे हे सांगितलेच, पण इतर धर्मांचे देखील कौतुक केले आणि आपण सर्व एकच आहोत आणि अंतिम एकाच मार्गाला पोहोचणार आहोत असा विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.

  •  यावरून भारतीय संस्कृती किती महान आहे, हे समजते.

  •  इ.स.३१ मे १८९३ रोजी शिकागोच्या धर्मपरिषदेला जाण्यासाठी मुंबई बंदरातून निघालेल्या पी अँड ओ कंपनीच्या 'पेनिनशुलर' या बोटीवर चढण्यापूर्वी विश्वयोगी स्वामी विवेकानंदांनी आपल्या प्रवासाची संकल्पना त्यांना निरोप देण्यासाठी आलेल्या खेत्रीच्या महाराजांचे खाजगी सचिव मुनशी जगमोहनलाल व मद्रासचे शिष्य अळसिंगा यांच्याद्वारा विश्वासमोर मांडली होती. त्यांच्या कार्याची दिशा निश्चित होती. 

  • विवेकानंदांचा जन्म पश्चिम बंगाल प्रांतातील कोलकाता महानगराच्या उत्तर विभागातील सिमुलिया मोहल्ल्यात श्रीविश्वनाथ दुर्गाचरण दत्त (कोलकत्यातील प्रतिष्ठित वकील) व सौ. भुवनेश्वरी यांच्या उदरी १२ जानेवारी १८६३ ला झाला.

  • त्यांनी केलेल्या काशीविश्वेश्वराच्या आराधनेमुळे त्यांच्या उदरी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला.

  • त्यांनी केलेल्या संस्कारांतून विवेकानंद विश्वयोगी झाले. 

  • स्वामीजी समाधिस्त झाले, तेव्हा दुसऱ्या दिवशी दिनांक ५ जुलै १९०२ ला त्यांची धडधडणारी चिता पाहून असंख्य लोक रडत असताना माता भुवनेश्वरीदेवीच्याही डोळ्याला आसवे आली, तेव्हा एका साधकाने विचारले, 'माताजी आपण एका योग्याची माता असताना ही मोहमाया का?'

  • तेव्हा माताजी म्हणाल्या, माझा मुलगा नरेंद्र मला सोडून गेला, याचे मला दुःख होत नसून अवघ्या विश्वाला अध्यात्माचे ज्ञान देणारा एक विश्वयोगी गेला व जगाची अपरिमित हानी झाली, म्हणून मला दुःख होत आहे.

  •  अशा या विश्वयोग्याच्या माता मार्च १९०२ ला स्वामी विवेकानंदांबरोबर बंगालमध्ये (बांगलादेश) तीर्थयात्रेसाठी गेल्या होत्या.

  • स्वामीजींनंतर नऊ वर्षांनी माता भुवनेश्वरी १५ जुलै १९११ ला परलोकी निघून गेल्या.

  • बालपणापासून विवेकानंदांचे अंतकरण दयाळू होते.

  • वयाच्या ५ व्या वर्षी एका अतिथीला अंगावरचे उपरणे देणाऱ्या स्वामीजींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहान मुलाला घोड्याच्या टांग्याच्या खालून वाचविले होते.

  •  एकदा स्वामीजींनी डबक्यात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला वर काढून जीवदान दिले.

  •  जमलेले लोक त्यांची स्तुती करू लागले, तेव्हा ते म्हणाले डबक्यातले पिल्लू पाहून मला वेदना झाल्या.

  •  ते दुःख दूर करण्यासाठी मी त्याला बाहेर काढले, त्याच्यावर उपकार करण्यासाठी नाही.

  • स्वामीजींचा हा विचार आत्मसात करण्यासारखा आहे.

  •  त्यांचे आचरण अत्यंत पवित्र होते. महाविद्यालयात असताना ते आजीच्या घरी एका खोलीत अभ्यास करत. 

  • लहानपणापासूनच ईश्वरदर्शनाची तळमळ असणाऱ्या ध्यानमग्न नरेन् ला जवळ एक नाग आला असतानाही कळाले नाही, तर हनुमान केळीच्या बागेत राहतो, हे एका कीर्तनात ऐकल्यावर ते हनुमानाची भेट घेण्यासाठी रात्रभर बागेत थांबले.

  • ईश्वरदर्शनाची त्यांची ही प्रबळ इच्छा भविष्यकाळात श्रीरामकृष्णांनी पूर्ण केली.

  • इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात 'श्रीसुरेंद्रनाथ मित्र' यांच्याकडे श्रीरामकृष्ण यांची पाद्यपूजा करताना गाणे गाण्यासाठी त्यांनी नरेंद्राला बोलावले होते.

  •  नरेंद्राचे गाणे ऐकून रामकृष्ण भावविवश झाले, हीच त्यांची पहिली भेट.

  • त्यांनी नरेंद्रला दक्षिणेश्वरी बोलावले. डॉ. श्रीयुत रामचंद्र दत्त व जनरल असेंबली कॉलेजचे प्रिन्सिपॉल 'विल्यम हेस्टी' म्हणाले, 'नरेंद्रा! ज्याला आपण समाधी म्हणतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव दक्षिणेश्वरचे रामकृष्ण परमहंस यांनी घेतला आहे. तू त्यांच्याकडे जा, तुझे समाधान फक्त तेच करू शकतात.'

  •  नरेंद्र ब्रह्मसमाजात प्रार्थनेसाठी जात असे. बराच काळ नरेंद्र दक्षिणेश्वरी आला नाही तेव्हा रामकृष्ण ब्रम्हसमाजात नरेंद्राचा शोध घेत गेले.

  •  त्यांना पाहून तेथील सभासदांनी बत्त्या विझवून त्यांची उपेक्षा केली. ती नरेंद्राला पाहवली नाही.

  • रामकृष्णांच्या प्रेमाचा व ब्रह्म समाजातील उध्दट वर्तनाचा त्यांना फरक कळाला.त्यांनी ब्रह्मसमाजाचा त्याग केला व ते रामकृष्णांकडे जाऊ लागले.

  •  एकदा त्यांनी रामकृष्णांची परीक्षाही पाहिली. त्यांनी त्यांच्या आसनाखाली एक रुपया ठेवला.

  •  रामकृष्ण आले व पलंगावर बसताच मोठ्याने ओरडले, 'अरे! माझ्याखाली कोणी आग ठेवली आहे.'

  • नरेंद्र तेव्हा आपल्या सद्गुरूंच्या त्यागी जीवनाने प्रभावित झाले.

  • 'आपण ईश्वर पाहिले आहे काय व मला तो दाखवाल का? हा प्रश्न विचारताच श्रीरामकृष्णांनी त्यांना सहज उत्तर दिले,बेटा! तुला पाहतो तसा मी ईश्वराला जवळून पाहिले आहे व मी तुला त्याचे दर्शन घडवून देईल' व त्यांनी नरेंद्राच्या छातीला आपल्या पायाचा स्पर्श केला तेव्हा नरेंद्रला आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू फिरत असून आपण हवेत वर वर जात आहोत, हा अनुभव येऊ लागल्यावर ते घाबरले व ओरडून म्हणाले, 'अहो ! हे काय करत आहात.

  • मला आई-वडील, बहीण-भाऊ आहेत. तेव्हा रामकृष्णांनी आपला पाय काढून घेऊन पूर्वस्थितीला आणून सांगितले, बस,आज एवढेच पुरे !

  • नरेंद्रनाथ बी.ए. झाले त्याच वर्षी (१८४४) त्यांचे वडील अचानक वारले.

  •  घरात पैसे नाही. उपासमार होऊ लागली.

  •  स्वामी रामकृष्णांकडे गेले व म्हणाले,' तुम्ही तुमच्या देवीस मला नोकरी देण्यास सांगा!'

  • तेव्हा रामकृष्ण म्हणाले, 'नोरेन् ! तूच आईला नोकरी माग.' 

  • स्वामीजी मंदिरात गेले. त्यांना जगदंबेचे दर्शन झाले. मातेने त्यांना वरदान मागण्यास सांगितले परंतु 'विवेक, वैराग्य, ज्ञान,भक्ती दे' असे ते मातेला म्हणाले. तेव्हा परमहंस म्हणाले,' जा दोन वेळा जेवावयास मिळेल' व त्यानंतर स्वामीजींना एक नोकरी लागली.

  • जुलै १८८६ मध्ये एकदा रामकृष्ण नरेंद्राला म्हणाले, 'नोरेन् !  माझ्याजवळ अष्टमहासिद्धी आहेत. तुला त्या ऐश्वर्य देतील.मी त्या तुला देऊ इच्छितो.' 

  • नरेंद्र म्हणाले,भगवान्! मला भौतिक सुख नको' तेव्हा रामकृष्णांनी नरेंद्राच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना निर्विकल्प समाधी दिली व म्हणाले, नोरेन् ! आज मी तुला सर्वस्व दिले व मी फकीर झालो.'

  • काशीपूरच्या बागेत गुरुबंधूसह विवेकानंद धूनी पेटवून बसले असताना त्यांनी स्पर्श करताच त्याचे भाव बदलून गेले तेव्हा रामकृष्ण रागावून म्हणाले, 'नोरेन् ! साचण्यापूर्वीच वाटतोस आणि अर्धवट संचार देऊन त्याचे जीवन उद्ध्वस्त करतोस?'

  • एकदा रामकृष्ण म्हणाले, असा एक समय येईल की नरेंद्राच्या फक्त स्पर्शाने कोणत्याही व्यक्तीला ज्ञान अनुभव मिळेल.' पुढे अलमोड्याला असताना भगिनी निवेदिता यांना स्पर्श करताच त्यांना भावसमाधी लागली होती.

  • रामकृष्णांनी देहविसर्जनानंतरही नरेंद्राला सांभाळले.

  •  गाजीपुरच्या पवहारी बाबांच्याकडून योगदीक्षा घेण्यासाठी स्वामीजी निघाले असता अखंड २१ दिवस त्या खोलीत प्रगट होऊन रामकृष्णांनी कोणाकडे जाण्याची गरज नाही याची जाणीव करून दिली. 

  • रोमन कॅथलिक पंथाचे धर्म प्रमुख कार्डिनल गिब्बोंस यांच्या अध्यक्षतेखाली हार्ट पॅलेसमध्ये झालेल्या धर्मपरिषदेत दिनांक ११ सप्टेंबर  १८९३ सोमवारी दुपारी ४.०० वाजता झालेल्या साडे चार मिनिटांच्या पहिल्या भाषणातील "Sisters and brothers of America" या पहिल्याच वाक्याने त्यांचा सर्व विश्वावर प्रभाव पडला.

  •  त्यांनी सर्वधर्म सभा जिंकली. भारत रानटी व अशिक्षित लोकांचा देश आहे, हा पाश्च्यात्य देशात झालेला खोटा प्रचार थांबला व भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, ही भावना सर्वत्र पसरली.

  • स्वातंत्र्याचे बीजारोपण स्वामीजींच्या या पहिल्याच वाक्याने झाले.

  •  सर्व वृत्तपत्रांनी स्वामीजींची मुक्तकंठाने स्तुती केली. त्यानंतर स्वामीजींची अमेरिकेत, इंग्लंडमध्ये प्रवचने झाली. 

  • त्यानंतर त्यांनी इ.स.१८९७ ला 'श्रीरामकृष्ण संघा'ची स्थापना केली.

  • भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले होते, ज्या दिवशी नोरेन् च्या हातून धर्म व देशकार्य संपन्न होईल, त्या दिवशी मी त्याच्या पेटीचे कुलूप उघडील. परंतु त्या दिवशी तो मात्र या जगाचा निरोप घेईल.

  • तसेच 'आपण कोण आहोत?' हे नरेंद्राला ज्यादिवशी कळेल, त्यादिवशी तो देहत्याग करील' आणि तसेच झाले.

  • विवेकानंदांनी एकेदिवशी कोलकात्याच्या बेलूर मठात असताना कॅलेंडर मागून घेतले. त्यातील ४ जुलै हा महाप्रस्थानासाठीचा दिवस व देहदानाची जागा निश्चित केली.

  • एके दिवशी त्यांनी सर्व शिष्यांचे जेवण झाल्यावर त्यांच्या हातावर पाणी घालून सर्वांच्या हात पुसले, याचे कारण एका शिष्याने विचारल्यावर ते म्हणाले, 'येशूनेही एके दिवशी आपल्या शिष्यांचे हात धुतले होते.'

  • सकाळी स्वामीजी ध्यानाला न बसता श्रीकाली मातेची पूजा करण्यास मंदिरात गेले.

  •  तंत्रविद्येतील शास्त्रपारंगत ईश्वरचंद्र भट्टाचार्य, स्वामी बोधानंद व स्वामी शुद्धानंद यांच्या मदतीने पूजा आटोपल्यावर,'मनचल निज निकेतन' हे रामकृष्णांच्या पहिल्या भेटीत गायलेले गीत त्यांनी गायले.

  • मंदिराचे सर्व दरवाजे खिडक्या उघड्या करण्यास सांगितले.

  • सर्व शिष्यांना बोलावून 'लघू कौमुदी' शिकविली आणि सर्वांना संध्या व आरतीसाठी मंदिरात पाठवून दिले.

  • बेलूर मठातील दुसऱ्या मजल्यावर स्वामीजी एकटेच बसले होते.

  • स्वामीजींचे अनेक देश-विदेशी राजे-महाराजे, संस्थानिक व पदाधिकारी शिष्य होते.

  •  स्वामीजींना एकाने प्रश्न विचारला, 'तुम्ही संन्यासी आहात मग राजे महाराजांचा पाहुणचार का घेता?' तेव्हा स्वामीजी म्हणाले, 'मला जर गरिबांना सुखी करावयाचे असेल, तर या सर्व श्रीमंतांना जवळ करून त्यांच्या पैशातून समाजसेवा करावी लागेल.

  • अमेरिकेत एकदा प्रवचन करताना हॉलमधील एका टेबलावर जगातले अनेक धर्मग्रंथ रचून ठेवले होते. त्या सर्व ग्रंथांच्या खाली श्रीमद्भगवद्गीता ठेवलेली पाहून स्वामीजी म्हणाले, आमची गीता जगातील सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे, हे अमेरिकेतील लोकांना माहीत असल्याने त्यांनी गीता सर्व ग्रंथांच्या खाली ठेवली आहे.

  •  तितक्यात सभेच्या अध्यक्षांनी गीता सर्व ग्रंथांच्यावर ठेवली, तेव्हा स्वामीजी म्हणाले,आमची गीता जगातील सर्व धर्मग्रंथांचा पाया आहेच, पण कळसही आहे, हे अध्यक्ष महोदयांना कळाले आहे' अशा या राष्ट्र व धर्म विश्वयोग्याला त्रिवार वंदन!

टिप्पण्या