किल्ला शिवनेरी.....

शिवनेरी किल्ला -  जुन्नर, जि पुणे.


  • ३५०० फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला नाणेघाट डोंगररांगेतील आहे.

  •  जुन्नरमध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. शिवरायांचे जन्मस्थान, महाराष्ट्राचे दैवत.

  • सन १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंधात, 'या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे' असा उल्लेख केला आहे.

  •  जीर्णनगर, जुन्नेर म्हणजेच जुन्नर इसवीसनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे.

  •  जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि आपले वर्चस्व या परिसरावर प्रस्थापित केले.

  •  नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली होती.

  • सातवाहन सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक लेणी खोदवून घेण्यात आली.

  • सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या सत्तेखाली होता.

  • सन ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.

  •  नंतर सन १४४३ मध्ये मलिक- उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला.

  •  अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला.

  • सन १४७० मध्ये मलिक उल- तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने नाकेबंदी करून किल्ला पुन्हा सर केला.

  • मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली.

  •  पुढे १४९८ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली.

  •  इसवीसन १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.

  • यानंतर सन १५९५  मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांचेकडे आला.

  •  जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी पाचशे स्वार त्यांच्यासोबत देऊन रातोरात त्यांना शिवनेरीवर घेऊन गेले.

  • शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस जिजाऊने नवस केला, आपल्याला पुत्र झाला, तर तुझें नांव ठेवीन, त्याउपर शिवाजीराजे यांचा जन्म शके १५५६ नाव संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार झाला.

  • इ.स.१६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला व शिवनेरी १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला.

  •  सन १६५० मध्ये मोगलांविरुद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला.

  •  इसवी सन १६७१ मध्ये शिवरायांनी किल्ल्याचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

  •  त्यानंतर पुन्हा सन १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश आले.

  • पुढे चाळीस वर्षानंतर १७१६ मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

  •  गडावर सात दरवाज्यांच्या वाटेने पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर उजवीकडे शिवाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात सहा ते सात गुहा आहेत, परंतु त्या मुक्कामास अयोग्य आहेत.

  • शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यास अंबारखाना लागतो. पूर्वी याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. मात्र आता त्याची पडझड झालेली आहे.

  • अंबरखान्यापासून दोन वाटा आहेत. एक समोर टेकडावर जाते. या टेकडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगाह आहे.

  •  दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा यमुना याशिवायही पाण्याची अनेक टाकी लागतात.

  • जिजाऊंच्या पुढ्यात बालशिवाजी हातातील छोटी तलवार असा शिवकुंजामध्ये हा पुतळा आहे. समोरच कमानी मशीद व समोरच खाली पाण्याचे टाके आहे. येथून पुढे गेल्यास हमामखाना लागतो.

टिप्पण्या