विजयादशमी-
दिल्याने दारिद्रय न येता देवत्व येते. प्रारब्ध व प्रयत्न हा प्रत्येक प्राण्याच्या जीवनातील अद्वैत भाग आहे.
प्रयासाने प्रसन्नता,पैसा, प्रतिष्ठा व प्रभूची प्राप्ती होते. प्रयत्नाने इच्छित ध्येयापर्यंत गेल्यावर जी अस्वस्थता अनुभवास येते तिला 'विजय' असे म्हणतात.
सार्थकता,शौर्य व स्थिरता विजयात आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेला दसरा. दश = दहा इंद्रिय + हरा = विजय मिळविणे.
आत्मशक्तीने दहा इंद्रियांवर विजय मिळवून मोहाच्या महिषासुराला मारण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी होय.
याबद्दल इतिहासात एक अत्यंत सुंदर कथा आहे. भगवान श्रीरामाचे पंजे महाराज 'रघु'यांनी विश्वजित यज्ञ केला व आपल्या जवळचे सर्व धन दान केले.
एके दिवशी त्यांच्या दारात वरतंतूचा शिष्य कौत्स्य आला. तो पैठणच्या देवदत्त नावाच्या एका विद्वान् ब्राह्मणाचा मुलगा भडोच नगरीत राहणाऱ्या वरतंतुकडे विद्यार्जनासाठी राहिला.
सर्व विद्या आत्मसात केल्यावर त्याने आपल्या विद्या गुरुला 'आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी' अशी विनंती केली, तेव्हा 'मी तुला कोणत्याही प्रलोभनाने विद्या शिकविली नाही, असे वरतंतुने स्पष्ट केले.
तरीही कौत्स्याचा आग्रह पाहून त्यांनी त्याला 'चौदा कोटी सुवर्णमुद्रा' गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या.
कौत्स्य रघु राजाकडे आला, 'मला माझ्या गुरूंना दक्षिणा देण्यासाठी चौदा कोटी सुवर्णमुद्रा द्या' असे म्हणू लागला.
विश्वजित यज्ञ करून सर्व धन दान केल्याने रघु राजाचा खजिना रिकामा झाला होता.
दारात आलेला अतिथी परत जाऊ नये, म्हणून रघुराजाने इंद्रावर स्वारी करण्याचे ठरविले.
ही बातमी इंद्राला कळल्यावर त्याने रघुराजाच्या अयोध्या नगरीतील ईशान्य दिशेला असलेल्या एका आपट्याच्या व शमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून अगणित सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला.
कौत्स्याने त्यातील फक्त आपल्या गरजेपुरत्या 14 कोटी मुद्रा घेतल्या व आपल्या गुरूंना अर्पण केल्या.
हा दिवस आश्विन शुद्ध दशमी होता. गरजेपुरते घेतो तो ऋषी होतो.
हव्यासाने दुःखी होण्यापेक्षा अल्पसंतोषी असावे. हा आदर्श कौत्स्याच्या चरित्रातून आत्मसात केला पाहिजे.
दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणास मारले. अर्जुनाने अज्ञातवास संपल्यामुळे शमीच्या झाडावर बांधून ठेवलेले आपले शस्त्र काढून विराटनगरीचा राजकुमार उत्तर याच्या रथावर आरूढ होऊन कौरवांचा पराभव केला.
देवीने महिषासुराचा वध केला.
चांगल्या व्यवसायाचा कार्याचा प्रारंभ याच दिवशी केला जातो.
पूर्वी राजे विजय मिळविण्यासाठी या दिवशी प्रस्थान करीत.
या दिवशी रामलीलेचा कार्यक्रम आयोजित करून रावण, कुंभकर्ण व इंद्रजीत यांचे कागदी पुतळे जाळतात.
हिमालयातील कुलू येथे श्रीरामाची मोठी मिरवणूक काढतात.
म्हैसूर, बडोदा, जेजुरी व नांदेड येथेही फार मोठी मिरवणूक काढली जाते.
दसऱ्याच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाल्यामुळे बौद्ध धर्मियांना हा दिवस अत्यंत पवित्र वाटतो.
या दिवशी ग्रंथ, शेतीची अवजारे, वापरातील भांडी, उखळ-मुसळ व शस्त्रे यांची पूजा करतात.
आपट्यामुळे गॅस कमी होतो, कडकी नाहीशी होते, पावसाळ्यापूर्वी पेरलेले धान्य दसऱ्याच्या काळात परिपक्व झालेले असते.
म्हणून या दिवशी गोड पदार्थ खाऊन बाजरीची कणसे, आपट्याच्या पानांची फांदी व देवघरात उगवलेले तृणधान्य हातात घेऊन सायंकाळी वाहनावर व घोड्यावर बसून गावाच्या दिशेने ईशान्य दिशेला जाऊन शमीपूजन केल्यानंतर गावातील देवांचे दर्शन करताना आपट्याचे पान, तृणधान्याची काडी व बाजरीचे कणीस अर्पण करतात.
आपट्याची पाने सुवर्ण रंगाने रंगवून एकमेकांना वाटतात.
वाजत-गाजत काढलेल्या मिरवणुकीमुळे ग्रामऐक्य वाढते. सीमोल्लंघनावरून आल्यावर महिला पुरुषांना ओवाळतात व गहू किंवा तांदळाने काढलेल्या चौकावर बसवून देवीसाठी केलेल्या प्रसादाच्या पापड्या देतात.
यावेळेस सतरंजीवर काढलेल्या तांदळाच्या दोन बाहुल्यातील लपविलेले सोने शोधून काढण्याची पद्धत आहे.
या दिवशी झेंडूच्या माळा घर, देवघर व वाहन यांना बांधतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा