नवरात्रोत्सव...

  • नवरात्रोत्सव -

  • स्रीजीवनाची पूजा बांधून तिने केलेल्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व पुर्वी नऊ दिवस युद्ध करून देवीने महिषासुराचा वध केला आणि सर्व धरतीला त्याच्या अन्यायातून मुक्त केले,त्या आनंदाप्रित्यर्थ अश्विन शुद्ध ||१|| ते अश्विन शुद्ध ||१०|| असा दहा दिवस नवरात्र उत्सव संपन्न होतो. 

  • सर्व धर्मात शक्ती उपासना केली जाते. इस्लाम धर्मात रोशनी = चिराग म्हणजेच ज्योतीची, पारशी लोकांत अग्यारीमधून अग्निकुंड सतत धगधगत असते व ख्रिश्चन धर्मात ग्रेट मदर,अर्थ मदर याआधी शक्तीला पूज्य मानतात, तर हिंदु धर्मात श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाकाली यांची पूजा केली जाते. एभि: स्तवैश्च मां नित्यं स्तोष्यते य:  समाहित: | तस्याहं सकलां बाधां नाशयिष्याम्य संशयम् ||२|| 'जे भक्त एकाग्रचित्ताने माझी नित्य स्तुती करतील त्यांची सर्व बाधा व संकटे दूर करीन' असे देवीने वचन दिले आहे. म्हणून दुःख मुक्तीसाठी भवानी मातेची आराधना करण्याची प्रथा आहे.

  •  शस्त्रावाचून सामर्थ्य नाही व  सामर्थ्याशिवाय संरक्षण करता येत नाही.

  • अर्थात शस्त्र जर दैवी व्यक्तीच्या हातात असेल, तर त्याचा विधायक उपयोग होतो, हे देवीने आपल्या चरित्रातून सिद्ध करून दिले. 

  • तिने इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यती | यदा तदो वतीर्याहं करीष्याम्यरिसंक्षयम् || (ज्या ज्या वेळी असुरांचे सामर्थ्य वाढून ते सज्जनांना त्रास देऊ लागतील, त्या त्या वेळी मी अवतार घेऊन असुरांचा नाश करीन.) हे वचन देऊन सज्जनांचे रक्षण व मानवधर्माची प्रतिष्ठापना हा देवीचा हातात शस्त्र घेण्याचा मुख्य उद्देश असल्याचे सिद्ध होते. 

  • उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी,चामुंडा उग्र रूपे आहेत. ती द्विभुजा, चतुर्भुजा, षॾभुजा,अष्टभुजा, दशभुजा, अष्ट-दशभुजा तर अष्टोत्तरशत भुजा अशा अनेक रूपात असून तिच्या सर्व हातात शस्त्र आहेत.

  •  ब्रह्मरूप असलेली देवी जगन्माता असून तिला यज्ञात हविर्भाग ग्रहण करण्याचा अधिकार आहे. तेज, ज्ञान व शौर्य तसेच अन्यायाचा प्रतिकार करणारी शक्ती असून मंत्रसमुदायात ती मातृका म्हणून निवास करते.ब्राम्ही, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा महालक्ष्मी या तिच्या अष्टशक्ती आहेत.

  •  कोल्हापूरची अंबाबाई, आंबेजोगाईची जगदंबा व तुळजापूरची भवानी या चतुर्भुज असून तलवार, ढाल, त्रिशूळ, कुऱ्हाड, वज्र, चक्र,दंडु, शक्ती, कमंडलू डमरू, धनुष्य, गदा, पानपात्र व बाण अशी आयुधे आहेत.

  •  सप्तशृंगीच्या देवीला अठरा हात असून मणीमाळ, कमळ, शंख,घंटा, तलवार,ढाल, त्रिशूळ, कुऱ्हाड, वज्र, चक्र दंडू,शक्ती, कमंडलू, डमरू, धनुष्य,गदा, पानपात्र व बाण अशी आयुधे आहेत.

  •  बंगाल प्रांतात काळ्या पाषाणाची मुखातून लाल जीभ बाहेर आलेली, गळ्यात मुंडक्यांची माळ असलेली व राक्षसाच्या छातीवर त्रिशूळ धरून पाय रोवून उभी असलेली कालीमाता प्रसिद्ध आहे.

  • रामकृष्ण परमहंस यांना कालीमातेने दर्शन देऊन विश्वप्रसिद्ध केले. बंगाल प्रांतात दुर्गा पुजा उत्सव फार मोठ्या प्रमाणात संपन्न होतो.

  • चंद्रवंशातील राजांचे राज्य येथे होते. बळीच्या पाच मित्रांनी एकत्र येऊन बंग नावाच्या स्वतंत्र देशाची स्थापना केली व शक्ति उपासना म्हणून देवीची आराधना केली. या स्मृत्यर्थ दहा दिवस चालणारा दुर्गापूजा उत्सव संपन्न केला जातो.

  •  दहा दिशांचे प्रतीक असलेले दहा हात धारण केलेल्या या देवीला ते महामाया असे म्हणून अल्पना या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीने संपन्न असलेल्या रांगोळ्या काढून या उत्सवात अधिक रंग भरविला जातो.

  • माता, मातृभूमी व जगन्माता, जगदंबा ही भारतीय संस्कृतीची श्रीमंती असून व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक ऐहिक व पारलौकिक अशा सर्व पातळीवर देवी आराधना करण्याची पद्धत आहे.

  • गरबा,रासदांडिया, भोंडला, लळीत, कीर्तन, भजन, पुजन,गोंधळ व महाआरत्यांच्या कार्यक्रमाने मंगलमय वातावरण निर्माण करणारे नवरात्र म्हणजे शक्तीपूजेचा महोत्सव.

  •  बंगाल प्रांतात तर महाराष्ट्रातील श्रीगणेशोत्सवासारखा दुर्गापुजा उत्सव संपन्न केला जातो. कोलकात्यात चौकाचौकात देवीच्या अनेक भुजांच्या सुंदर मूर्तींची नऊ दिवसांसाठी स्थापना करून उत्सवाची सांगता मिरवणूक व विसर्जनाने केली जाते.

  • गुजरात प्रांतात रंगीत घागरे घातलेल्या आणि गरबा नृत्यावर टिपऱ्या खेळणाऱ्या गुर्जर युवती गावागावात आनंदोत्सव साजरा करतात.

  •  देवीला शुक्रवार, मंगळवार, अष्टमी,चतुर्दशी, नवमी हे दिवस अत्यंत प्रिय आहेत.

  • देवी भागवत, देवी पुराण व मार्कंडेय अशाप्रकारे दसऱ्याच्या दिवशी ईशान्य दिशेला जाऊन शमी वृक्षाची पूजा करून आपट्याची पाने सर्वांना प्रेमाने देऊन नवरात्रोत्सव संपन्न केला जातो.

टिप्पण्या