महात्मा गांधी....

 

  • महात्मा गांधी -

  • रघुपती राघव राजाराम|| पतित पावन सिताराम||   व वैष्णव जन तो|| हे सुमधुर भजन कानावर पडले की डोळ्यांसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधींची चष्मा घातलेली शांत प्रतिमा उभी राहते. 

  • श्रीमद्भगवद्गीता ,श्रावण बाळाची मातृपितृभक्ती, हरिश्‍चंद्राची सत्यनिष्ठ यांच्या आदर्शांचे आचरण आयुष्यभर करणाऱ्या श्री मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी व्यापारी व पोरबंदरच्या राजाचे दिवाण उत्तमचंद गांधी यांचे पुत्र करमचंद गांधी व सौ. पुतळीबाई यांच्या उदरी  २ ऑक्टोबर १८६९ ला झाला.

  •  महात्मा गांधीजींचा विवाह वयाच्या १३ व्या वर्षी १३ वर्षांच्या कस्तुरबांशी झाला.

  •  कस्तुरबा या पोरबंदरचे व्यापारी व महापौर गोकुळदास माकनजी कपाडिया यांच्या कन्या.

  •  लोक श्रद्धेने त्यांना 'बा' असे म्हणत.

  •  महात्मा गांधीजी बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी लंडनला गेले होते. 'बॅरिस्टर ऍट लॉ' ही पदवी प्राप्त झालेले गांधीजी १२ जुन १८९१ ला इंग्लंडहून मुंबईमध्ये वकिली करण्यास आले.

  • परंतु वकिली न चालल्याने ते राजकोटला आले व त्यांना दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा योग आला.

  •  दक्षिण आफ्रिकेतील एक व्यापारी दादा अब्दुल्ला यांच्या नातेवाईकाच्या एका खटल्यात तेथील इंग्लिश वकिलाचा मदतनीस म्हणून ते १८९३ च्या एप्रिलमध्ये आफ्रिकेत गेले.

  • त्याबद्दल त्यांना १०५ पौंड मिळणार होते. तेथे नाताळ राज्यातील दरबान या गावी ते राहत होते. 

  • आफ्रिकेत त्यांच्या मनाला वेदना होतील अशा काही घटना घडल्या.

  •  'मुसलमान वकिलाशिवाय इतर वकिलांनी पगडी घालू नये' हा कोर्टातला नियम त्यांना जाचक ठरला.

  •  कारण ते पगडी घालत होते.त्यांनी पगडी काढण्यास नकार दिला व सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे यासाठी ते लढले.

  • आगगाडीचे प्रथम वर्गाचे तिकीट असूनही त्यांना मारिझबर्गला एका गोर्‍या अधिकार्‍याला बसण्यास जागा देऊन त्यांनी लाल डब्यात बसावे, असे सांगण्यात आले.

  •  त्यांनी नकार देत असताना बळजबरीने उतरून देण्यात आले.

  •  गांधीजी या स्टेशनवर आफ्रिकेतला काळा-गोरा हा रंगभेद या विषयाचे चिंतन करत रात्रभर कुडकुडत बसले.

  •  दुसऱ्या दिवशी घोडा गाडीने प्रवास करताना त्यांना टांगेवाल्याशेजारी बसावे लागले.

  •  युरोपियन लोकांशिवाय घोडागाडीच्या आतल्या बाजूस त्यांनी बसू नये हा आफ्रिकेतील अजब नियम त्यांना खटकला.

  •  तेथील युरोपियनाने त्यांना पायदानावर बसण्यास हुकूम केला.

  •  हुकूम पाळण्यास त्यांनी नकार देत  लोकांनी त्यांना बेदम मारले व गाडीतून उतरून दिले.

  •  इ. स.१८०७ पासून हिंदुस्तानी लोक आफ्रिकेत स्थायिक होते. परंतु त्यांना तिथे कोणतेही मालकीहक्क नव्हते.

  • आफ्रिकेत हिंदुस्तानी लोकांना कुली म्हणत असत. हिंदुस्तानी व्यक्तीस स्थायिक होण्यास तीन पौंड कर भरावा लागे व गलिच्छ वस्तीत राहावे लागे.

  •  या सर्व गोष्टींचे चिंतन केल्यावर महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत हिंदुस्तानी लोकांची सभा आयोजित केली व हिंदुस्थानी मताधिकार या मथळ्याखाली आलेल्या बातमीबद्दल चर्चा केली.

  •  वसाहतकारांची 'नागरिक हक्क संघर्ष समिती'ची स्थापना करून त्यांनी हिंदी बांधवांच्या हक्कांसाठी नाताळ इंडियन काँग्रेस ही संघटना सुरू करून दि इंडियन ओपिनियन नावाचे वर्तमानपत्र सुरू केले.

  •  यादरम्यान ते एकदा भारतात आले व राष्ट्रसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहून आफ्रिकेतील भारतीय लोकांवर होणारे अन्यायास वाचा फोडली.

  •  त्यामुळे ते जेव्हा परत आफ्रिकेत गेले, तेव्हा जहाजातून उतरल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात येऊन गांधीजींना फाशी द्या अशा घोषणा देण्यात आल्या.

  •  आफ्रिकेचे मूळ रहिवासी झुलू यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले.

  •  या काळात महात्मा गांधींनी सैनिकांची शुश्रुषा केली. या कार्याची ब्रिटिशांनीही त्यांना कैसर-ए-हिंद हे पदक देऊन स्तुती केली.

  •  सन १९०७ च्या अखेरीस आफ्रिका सरकारने एशियाटिक ॲक्ट हा कायदा काढून ८ वर्षांवरील स्थानिक स्त्री-पुरुषांना नाव नोंदणी आवश्यक, हिंदू - मुस्लिमांच्या विवाहास कायद्याची मान्यता नसणे व  एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाण्यास निर्बंध. अशा जाचक अटी घातल्या.

  •  महात्मा गांधींनी याविरुद्ध शांतिदलाची स्थापना करून सत्याग्रह नावाचे आंदोलन सुरू केले. याला ते सविनय कायदेभंग असे म्हणत. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांसह तुरुंगात ठेवण्यात आले.

  •  महात्मा गांधीजींची जगात कीर्ती पसरली. आफ्रिकेतील लोकांनी त्यांना येशूचा अवतार संबोधले, तर भारतीय लोक त्यांना महात्मा म्हणू लागले.

  •  हरिद्वार येथील कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांनी इ.स. १९१५ ला त्यांना महात्मा ही पदवी दिली. 

  • २२ वर्ष दक्षिण आफ्रिकेत आंदोलन करून ते भारतात अहमदाबाद येथे आले.

  •  सरकारी शाळा, महाविद्यालये, न्यायालये व  कायदा मंडळे या सर्वांवर बहिष्कार घालून असहकारीतेची चळवळ त्यांनी सुरू केली.

  • लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेसाठी त्यांना तीन वेळा जावे लागले.

  • मीठ तयार करण्यात सरकारचा एकाधिकार, मिठाचा कर नाहीसा करण्यासाठी त्यांनी सविनय कायदेभंग करावयाचा ठरवून साबरमती आश्रम ते दांडी हे २४१ मैलांचे अंतर आपल्या ७९ अनुयायांसह पदयात्रेने पार केले.

  •  गांधीजी अस्पृश्यांना हरिजन म्हणत. सवर्ण व हरिजन यांच्या ऐक्यासाठी त्यांनी मंदिरे, विहिरी व सार्वजनिक ठिकाणे सर्वांसाठी मुक्त करण्याचा प्रयत्न केला.

  •  हरिजनसेवक, हरिजनबंधू व हरिजन अशी तीन नियतकालिके सुरू केली.

  •  जोपर्यंत हे ऐक्य होत नाही, तोपर्यंत साबरमतीला न जाण्याचा निर्धार करून त्यांनी वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम सुरू करून तेथे निवास केला.

  •  ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदानावर भरलेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात भारत छोडो हा प्रस्ताव संमत करण्यात आला.

  • त्यांनी करेंगे या मरेंगे हा नारा देऊन चले जाव ही घोषणा करून भारतमातेला स्वतंत्र करा, इंग्रजांनो भारत सोडून जा असा आदेश ब्रिटिशांना दिला. 

  • ब्रिटिशांनी ९ ऑगस्ट १९४२ च्या पहाटे महात्मा गांधीजींसह अनेक मान्यवर नेत्यांना अटक केली.

  • अनेक पातळीवर केलेल्या संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले.

  • परंतु बॅरिस्टर जीना यांच्या आग्रहामुळे भारताचे भारतपाकिस्तान असे दोन भाग झाले.

  • गांधीजी दिल्लीला बिर्ला हाउसमध्ये मुक्कामाला असताना ३० जानेवारी १९४८ रोजी शुक्रवारी संध्याकाळी ५.३०; वाजता नित्याप्रमाणे प्रार्थना सभा घेण्यासाठी निघाले असता नथुराम विनायक गोडसे या तरुणाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली.

  • त्यांची दिल्लीला यमुनातीरी राजघाटावर समाधी आहे. 

  • उघडे डोके, डोळ्यावर चष्मा, हातात काठी, पायात वहाणा, गुडघ्याच्या वर नेसलेला पंचा व अंगावर एक खादीचे उपरणे या साध्या वेशातील हा महात्मा विश्वप्रसिद्ध झाला.

  •  प्रथम ते कोट, पाटलोण, नेकटाॅय या साहेबी वेशात राहत.

  •  परंतु रस्किन व टॉलस्टाॅय यांच्या विचारांच्या प्रभावाने ते अंगरखा व पायजमा वापरू लागले.कधीतरी ते लुंगी घालत.

  •  दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर लांबलचक फेटा, अंगरखा,खमीस, उपरणे व पायघोळ धोतर हा काठेवाडी पोषाख त्यांनी पसंत केला.

  •  आपल्यासारखे खादीचे एवढे भारी कपडे वापरले तर आमचे दिवाळे निघेल, असे एका शेतकऱ्याच्या मुखातून ऐकल्यावर त्यांनी टोपी, कुडता व लहानसे धोतर नेसण्यास प्रारंभ केला.

  •  स्वदेशी चळवळीत मद्रास प्रांतात एका सभेत जवळचे सर्व विदेशी कपडे जाळा असे सांगितल्यावर आमच्याजवळ एकच कपडा आहे. तोही जाळल्यावर आम्ही काय घालावे? असे त्यांना एका मजुराने सांगितल्यावर त्यांनी मायबहिणींची मर्यादा राखण्याकरता गुडघ्यापर्यंत एक पंचा नेसण्याचे व्रत घेतले व शेवटपर्यंत पाळले.

  •  गोलमेज परिषदेवेळी इंग्लंडच्या पंचम जॉर्ज राजाला बंकिमहॅम राजवाड्यात भेटावयास गेल्यावरही त्यांनी आपल्या पेहरावात बदल केला नाही.

  • 'बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सूनो' हा संदेश देणारे त्यांची तीन माकडे अत्यंत प्रसिद्ध आहे.

  • शेळीचे दूध घेऊन, रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास करून, स्वतःचा संडास स्वतः साफ करून, स्वावलंबनाचा आदर्श देणार्‍या महात्मा गांधींचे कमरेला लटकलेले घड्याळ, चरखा, खादी, ग्रामसेवा सर्वश्रुत आहे.

  • लोक त्यांना 'बापू' म्हणत असत.

टिप्पण्या