पक्षपंधरवडा..

 

  • पक्षपंधरवडा-

  • कधीतरी कोणीतरी मृत्यूवर खटला भरला आहे का? हे मृत्यो! तू आमच्या प्रिय व्यक्तीला घेऊन गेलास? असा साधा प्रश्न तरी त्याला कोणी विचारला आहे का? केवढा अजब आहे हा मृत्यू ! जो अप्रिय असूनही सर्वमान्य आहे.

  • ईश्वराचे अवतार असो वा साक्षात्कारी संत, राजा असो वा रंक, सज्जन असो वा दुर्जन पण त्याच्या तडाख्यातून कधीच कोणी सुटले नाही.

  • एका क्षणात सगळा खेळ संपून जातो. उरतात त्या फक्त आठवणी,रडणे,विरह, गुणवर्णन.

  • मृत्यू तसा सुंदरही आहे, कारण असाध्य रोगाने जर्जर झालेल्या माणसाला हा अपरिचित पाहुणा जवळ येऊन प्रेमाने सांगतो,'चल बाबा माझ्याबरोबर',या धरतीवर आता तुला सगळेच कंटाळले आहेत.

  • असा हा सर्वांचा गोड दोस्त आहे तरी कोण? याचा विचार करावयास भाग पाडणारा भाद्रपदातील पक्षपंधरवडा.

  •  हा सण नाही, उत्सव नाही, तर आपल्याला सोडून गेलेल्या माणसाला तृप्त करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ.

  •  त्यांच्यासारखेच आपल्यालाही हे  जग सोडून जायचे आहे, याची जाणीव करून देणारा काळ.

  •  पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे सत्य असून या विश्वात श्रीविष्णू-वैकुंठ, श्रीशिव-कैलास, ब्रम्हदेव -सत्यलोक,इंद्र-स्वर्ग व यम-यमलोकहे दिव्य लोक आहेत, असे म्हटले आहे.

  • जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले- मी धर्मकार्य करण्यासाठी वैकुंठातून धरतीवर आलो आहे. 'आम्ही वैकुंठवासी| आलो याच कारणासी|| 

  • आपल्या कार्य समाप्तीनंतर ते सदेह वैकुंठाला गेले, असा इतिहास आहे. 

  • पूर्वजन्म आणि पुनर्जन्म आहे सत्य वाटते, कारण काही लोकांचे वय व ज्ञान याचा कोठेच मेळ बसत नाही.

  • शंकराचार्य आठव्या वर्षी सर्वज्ञ होते.हस्तामलक हा जन्मताच वेडा वाटणारा मुलगा आद्य शंकराचार्यांना पाहताक्षणी सर्वज्ञ झाला. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी खूपच लहान वयात 'ज्ञानेश्वरी'सारखा असामान्य ग्रंथ लिहिला. अर्थरयंग  ८ व्या वर्षी गणितज्ञ. कालबर्न आठव्या वर्षी गणिते सोडवत.इ.

  • सूर्य व संज्ञा यांना वैवस्वत मनु आणि यमी  ( यमुना) एक कन्या झाली. सूर्यपुत्र यमाला त्याच्या कर्तृत्वाने भगवान शंकराने यमलोकांचे प्रमुखपद दिले. कारण शंकर हे मृत्यूची प्रथम देवता आहे. म्हणून मृत्यू टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्याची पद्धत आहे.

  •  माणूस कधीही  मृत होवो,तो ज्या तिथीला मृत झाला असेल त्या तिथीला भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत त्याच्या नावाने 'श्राद्ध'कर्म करावे, म्हणजे मृत आत्म्याला आनंद होतो, अशी श्रद्धा व प्रथा आहे.

  •  मृत पितरांना मंत्राद्वारा आवाहन करून त्यांना प्रिय असलेले भोजन श्रद्धेने समंत्रक विधीपूर्वक अर्पण केले जाते, त्या कर्माला श्राद्ध म्हणतात.

  • श्रध्दया यत् क्रियेते तत् श्राद्ध:|'श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध.

  •  पितरांना तृप्त करण्यासाठी केलेल्या विधीला तर्पण म्हणतात. 

  • पितृपक्ष वा श्राद्धपक्ष, महालयपक्ष व पितृपंधरवडा इत्यादी नावाने हा काळ ओळखला जातो. 

  • सुरुवातीच्या काळात अग्नीमध्ये समिधा व पिंड अर्पण करून होत असे. नंतर पितरांच्या नावाने भाताचे पिंड तयार करून पिंडदान करण्याची प्रथा पडली. 

  • त्यानंतर पितरांच्या नावाने ब्राह्मण वा एखाद्या व्यक्तीला भाताची खीर, बेसनाचा लाडू, पाटवडी, पंचामृत इत्यादी पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत पडली. 

  • भाद्रपद वद्य पक्षात आपली पितरे यमलोक सोडून मृत्युलोकी आपल्या कुटुंबीयांकडे राहण्यासाठी येतात, अशी श्रद्धा आहे.

  • पितरांचे श्राद्ध करण्यासाठी पितृपंधरवडा निवडण्यामागे काही कारणे आहेत.

  •  उत्तरायण , दक्षिणायन असे ६-६ महिन्यांचे वर्षाचे दोन भाग आहेत.

  •  प्राचीन काळी आपले पूर्वज ज्या भागात राहत होते, तेथे दक्षिणायन भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होत असे.

  • दक्षिणायन सुरू झाल्यानंतर पहिले पंधरा दिवस पितृपक्ष सुरू होत असे.

  •  पित्तरांसाठी बळी देणे,यज्ञ करणे,काही दान करणे  या काळात केले जात असे

  • आता तर दक्षिणायन व उत्तरायण यांचे स्वरूप बदलले आहे. पौष महिन्यात मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होऊन आषाढ महिन्यात संपते व नंतर दक्षिणायन सुरू होते.

  • कालमापन जरी बदलले असले तरी पितरांचा पक्ष म्हणून भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतरचा पंधरा दिवसांचा काळ आहे, तो तसाच ठेवण्यात आला. 

  • श्राद्धाच्या दिवशी आमंत्रित व्यक्तीस श्राद्धाचे जेवण घालून पितरांच्या नावाने दान द्यावे.

टिप्पण्या