गणेशोत्सव...

 

  • गणेशोत्सव-

  • जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांच्या आज्ञेने प्रत्येक हिंदूच्या घरातील देवघरात श्रीगणेश, श्रीविष्णू, श्रीशिव, श्रीजगदंबा श्रीसूर्य या पंचदेवतांची (पंचायतन) पूजा करण्याची प्रथा आहे.

  • भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्म झाल्यामुळे या उत्सवाचे आयोजन प्रत्येक घरात केले जाते.

  •  सुखकर्ता दुःखहर्ता श्रीगणेश चतुर्थीव्रताने प्रसन्न होतो, अशी श्रद्धा आहे.

  • शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी, वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्टी व चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी या नावाने ओळखतात.

  •  अंगारक म्हणजे मंगळ म्हणून श्रीगणरायाला मंगलमुर्ती असे म्हणतात.

  • विश्वामध्ये जेवढे पदार्थ आहेत  त्या सर्वांना गणांमध्ये मोजले जाते. उदाहरणार्थ पशुगण, पक्षीगण, मानवगण, देवगण या सर्व गणांचा अधिपती तो गणपती होय.

  • 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी इ.स.१८९३ ला सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाचा प्रारंभ केला.

  • महाराष्ट्रामध्ये हिंदु-मुसलमानांचे दंगे झाले, तेव्हा पुण्यात ऐक्यासाठी एका सभेचे आयोजन केले होते.

  • घराघरात संपन्न केला जाणारा श्रीगणेशोत्सव समाजाच्या ऐक्यासाठी सार्वजनिक स्वरूपात केला पाहिजे, असा ठराव लोकमान्य टिळकांनी मांडला.

  • हिंदू धर्मात कितीही पंथ, संप्रदाय असले तरी सर्व लोक श्रीगणेशाची प्रत्येक कार्यात प्रथम पूजा करतात.

  •  तसेच श्रीगणेश हा श्रीविष्णूचा अवतार असल्यामुळे वैष्णव व तो भगवान श्रीशंकराचा पुत्र असल्यामुळे शिव असे दोन्ही पंथाचे लोक श्रीगणेशाची पूजा करतात.

 म्हणून श्रीगणेशाचा सार्वजनिक उत्सव करताना कोणाचेही मतभेद होणार नाहीत, तसेच श्रीगणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असल्यामुळे इंग्रजांना त्यावर बंदी आणता येणार नाही. 

या उत्सवामुळे सर्व हिंदूंचे ऐक्य होऊन स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करता येईल, या कल्पनेतून या उत्सवाचा जन्म झाला.

  • त्रेतायुगात उन्नत्त सिंदुरासुराने देवांना कैदेत टाकले, तेव्हा त्र्यंबकेश्वरच्या गुहेत शंकराच्या आज्ञेने पार्वतीने आद्य गणपतीची आराधना केली.

  •  तिने श्रावण शुद्ध ||१|| ते ||५|| व भाद्रपद शुद्ध ||१|| ते ||५|| या काळात मातीचा गणपती करून पूजा-अर्चा करून विसर्जन करणे, असे व्रत केले.

  •  एके दिवशी मूर्तीतून श्रीगणराज प्रकट झाले व पार्वतीच्या विनंतीला मान देण्यासाठी श्रीगणरायाने पार्वतीच्या पोटी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मयुरेश्वर नावाने जन्म घेतला व सिंदुरासुराचा वध केला.

  • त्याची स्मृती म्हणून मापे व शाडूच्या गणरायाच्या मूर्ती करून त्याची पूजा केली जाते.

  •  भाद्रपद शुद्ध ||४|| ते ||१४|| असा श्री गणेशोत्सव संपन्न केला जातो.

  • जन्मकथा-

  • श्रीगणेशाच्या अनेक जन्मकथा आहेत. 

  • एकदा पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून एक मूल तयार केले व त्याला दारात बसून सांगितले, 'हे बाळा! मी स्नान करीत आहे. तू कोणालाही आत येऊ देऊ नकोस.'

  •  पार्वती स्नानाला गेल्यावर भगवान शंकर आले. परंतु दारात बसलेला हा मुलगा त्यांना आत जाऊ देईना, तेव्हा भगवान शंकराने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे केले. त्यामुळे पार्वतीला दुःख झाले.

  • पत्नीचे दुःख दूर करण्यासाठी भगवान श्रीशंकरांनी गजासुरास ठार मारून त्याचे शीर मुलाला बसविले.‌ तेव्हापासून या मुलाला 'गजवदन' म्हणू लागले (स्कंदपुराण).

  •  गंडकी नगरीच्या चक्रपाणी राजाला सूर्यकृपेने सिंधू नावाचा मुलगा झाला.

  •  सिंधूने उग्र तपश्चर्या केल्यावर भगवान सूर्य प्रसन्न झाले व त्याला अमृताचे जेवण दिले.

  • हे अमृत जोपर्यंत तुझ्या शरीरात आहे, तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही, असा आशीर्वादही दिला.

  • उन्मत्त झालेल्या सिंधूने कैलासावर आक्रमण केले, तेव्हा पार्वतीने भगवान श्रीविष्णूचा धावा केला.

  •  'मी आपल्या उदरी जन्म घेऊन सिंधूचा अंत करीन' असे पार्वतीला वचन दिले.

  • आपला वध करणारा आपला शत्रू पार्वतीच्या उदरामध्ये वाढत आहे, असे कळाल्यावर सिंधूने सूक्ष्म रूप घेऊन पार्वतीच्या गर्भातील मुलाचे शिर धडावेगळे केले.

  •  पार्वतीला मस्तकविरहित मूल झाले, तेव्हा भगवान शंकराने गजासुराला मारून त्याचे शीर मुलाच्या धडाला जोडले.

  • भगवान गजाननाने भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सिंधूसुराचा वध केला व सर्व देवांना संकटमुक्त केले.

  • त्या आनंदाप्रीत्यर्थ सर्वांनी श्रीगजाननाची घराघरात प्राणप्रतिष्ठा करून उत्सव संपन्न केला.

  •  एकदा भगवान श्रीकृष्ण वृद्धाचे रूप घेऊन पार्वतीकडे आले व पार्वतीला म्हणाले, 'हे देवी! भगवान श्रीविष्णु आपले उदरी जन्म घेऊन जगाचा उद्धार करणार आहेत.' हे सांगून श्रीकृष्ण अदृश्य झाले. 

  • त्याच वेळेस पार्वतीच्या शय्येवर एक अतिसुंदर बालक प्रगट झाले. ते बालक पाहण्यासाठी सर्व आले.

  •  त्यात शनिमहाराजही आले होते. 'माझ्या मुलाला आपण पहा' असा आग्रह पार्वतीने शनिला केल्यावर शनिमहाराज म्हणाले, 'माताजी! मी ज्याच्याकडे पाहिल त्याचे शीर धडावेगळे होईल, असा मला शाप आहे. त्यामुळे कृपया मला आपण आग्रह करू नये'. परंतु पार्वतीने हट्ट धरल्यामुळे शनिने श्रीगणरायाकडे पाहिले व श्री गणरायाचे शिर धडापासून वेगळे झाले.

  •  त्यामुळे पार्वती दुःखी झाली. तेव्हा भगवान श्रीविष्णूने पुष्पभद्रा नदीच्या खोर्‍यातील एका हत्तीच्या बाळाचे शीर कापून आणून त्या बालकास बसविले. मुलाचे नाव गजानन ठेवले. 

  • गजासूर हा महिषासुराचा मुलगा. आपल्या पित्याचा वध पार्वतीचा अवतार असलेल्या देवीने केला, म्हणून त्याला पार्वतीबद्दल राग होता. त्याने भगवान श्रीशिवशंकराला प्रसन्न करून घेतल्यावर, अखिल ब्रह्मांडाची सत्ता हस्तगत केली.

  •  सर्व देव गजासुराला घाबरू लागले, तेव्हा त्यांनी गजाननाची स्तुती केली.

  •  श्री गजाननाने पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन गजासुराचा अंत केला.

  • भगवान शंकराचा कमंडलू गजासुराने लाथाडून शिवाचा अपमान केला व गजासूर निघून गेला.

  •  ध्यानभंग झालेल्या शंकराला दारात बसलेल्या पार्वतीनंदनाने आपला कमंडलू सांडला, असे वाटले. म्हणून त्यांनी त्या मुलाचा शिरच्छेद केला.

  •  परंतु सत्य लक्षात आल्यावर शिवाने गजासुराचा पाठलाग करून त्याचा शिरच्छेद केला व त्याचे शीर पार्वतीनंदनाला जोडले.

  • एकदा पार्वती व शिव वनविहारास गेले असता तिथे त्यांना एक गजदांपत्य रतिक्रिडा करताना दिसले, तेव्हा शिव-पार्वतीने गजरूप घेऊन विहार केला.

  •  त्यांना गजानन हा मुलगा झाला. 

  • श्रीशिवाने आपल्या तप: तेजाने एक मुलगा निर्माण केला.

  •  आपल्याशिवाय मुलगा निर्माण केला, म्हणून पार्वतीला राग आला व तिने हा मुलगा बेडौल होईल असा शाप दिला.

  •  श्रीशंकराने अनेक शस्त्रधारी विनायक निर्माण केले व श्री गणपतीला त्यांचा नायक बनविले. म्हणून या मुलाला श्रीगणनायक असे म्हणू लागले.

  •  श्रीगणेशजन्माच्या जरी अनेक कथा असल्या तरी तो शिव-पार्वती नंदन आहे, यात शंका नाही.

  •  या सर्व घटना भाद्रपद शुद्ध ||४|| ला  घडल्या अशी श्रीगणेश भक्तांची श्रद्धा असल्यामुळे या तिथीला श्रीगणेशपूजन केले जाते.

  • श्री गणेशाचे वाहन उंदीर- 

इंद्रसभेत वावरताना क्रौंच गंधर्वाची वामदेवाला लाथ लागली, तेव्हा 'तू उंदीर होशील' असा त्यांनी त्याला शाप दिला.

  •  उंदीर झालेला क्रौंच पराशरऋषींच्या आश्रमात राहू लागला.

  • ऋषींच्या आश्रमातही तो उन्मत्तासारखा वागू लागल्यावर पराशरांनी श्रीगणेशाचे स्मरण केले.

  •  श्रीगणेशाने त्या उंदरास आपल्या पायाखाली दाबून धरले, तेव्हा तो श्रीगणेशास शरण आला.

  •  'तुला पाहिजे तो वर माग' असे श्रीगणेश म्हणाल्यावर स्वभावात परिवर्तन न करता उंदीर म्हणाला, 'मी तुम्हाला काही मागण्याऐवजी तुम्हीच मला वर मागा' तेव्हा श्रीगणराज म्हणाले, 'तू माझे वाहन हो.'

  •  क्रौंचाने ते मान्य केले व तो श्रीगणेशाचे वाहन झाला.

  • कोणत्याही मोठ्या माणसाने लहान वृतीच्या माणसाशी भांडत बसण्याऐवजी त्याच्या कलेने घेऊन त्याचा उपद्रव थांबवावा, हेच या घटनेतून सिद्ध होते.


टिप्पण्या