शिक्षकदिन - ५ सप्टेंबर...

 

  • शिक्षकदिन :   सप्टेंबर...

  • विश्वातील सर्व शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य ज्या महान शिक्षकास लाभले, त्यांचे नाव आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. 

  •  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून संपूर्ण भारतात संपन्न केला जातो.

  •  भारतरत्न (१९५४), भारताचे पहिले उपराष्ट्रपती (१९५२ ते १९६२), व दुसरे राष्ट्रपती  (१३ मे १९६२ ते १९६७), थोर तत्वचिंतक, राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व (१९३१ ते १९३९), भारताचे रशियातील राजदूत (१९४९ ते १९५२), कुलगुरू (वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठ (१९३१ ते १९३५), बनारस हिंदू विद्यापीठ (१९३९ ते १९४८).

  • तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक-

प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रास, म्हैसूर विद्यापीठ, राजे पंचम चार्ज अध्यासन कलकत्ता विद्यापीठ येथील मॅंचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड- तुलनात्मक धर्मशास्त्र, येथे 'पौरस्त्य धर्म आणि नितीशास्त्र' लंडन- स्फाल्डिंग प्रोफेसर.

  • अध्यक्ष - अखिल भारतीय तत्वज्ञान परिषद (१९२७) व अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे अध्यक्ष (१९३०).

  • पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे, ऑक्सफर्ड येथील आफ्टन व्याख्यानमाला, तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमान प्राप्त झालेले, स्टॅलिनची भेट झालेले, थोर तत्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुपती या गावी ५ सप्टेंबर १८८८ ला झाला.

  • त्यांचे उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले.

  •  राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर ते मद्रास येथे जाऊन राहिले व तेथेच त्यांचे १६ एप्रिल १९७५ ला निधन झाले.

  •  त्यांनी इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात भारतीय तत्त्वज्ञान मांडले तर, प्रिन्सिपल उपनिषदस (१९५३),   ब्रह्मसूत्राज (१९६०), भगवद्गीता (१९४८) या प्रस्थानत्रयींवर भाष्यस्वरूप  ग्रंथांची निर्मिती केली.

  •   फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर  (१९१८), 

द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ  (१९२६),

 ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन  (१९३३),

ईस्टर्न रिलिजन अँड वेस्टर्न थॉट  (१९३९), 

धम्मपद  (१९५०), 

रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इत्यादी ग्रंथांची रचना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केली. 

  • द रेन ऑफ रिलिजन इन कंटेम्पररी फिलॉसॉफी या १९२० मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांचा कल रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत मताकडे  (सगुणोपासना) झुकलेला दिसतो, तर पुढे १९२३ मध्ये पहिला भाग व १९२७ साली प्रसिद्ध झालेल्या (दुसरा भाग) इंडियन फिलॉसॉफी  या ग्रंथात शंकराचार्यांचे केवलाद्वैत मत मानलेले दिसते, पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या ॲन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्वज्ञान साररूपाने आले आहे.

  •  त्यात ते म्हणतात -  "देहपातापूर्वीही व्यक्तीला ईश्वराशी सायुज्यता मिळू शकेल, पण अंतिम मोक्ष अथवा ब्रम्ह-निर्वाण हे सर्व सजीव मुक्त झाल्याशिवाय एका व्यक्तीला प्राप्त होणार नाही, म्हणून सायुज्यमुक्ती प्राप्त झालेले महामानव हे इतर जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहतात."

  • डॉ. राधाकृष्णन इतर ठिकाणी असे म्हणतात की-

  •  "सर्व धर्मातील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने विशेष करून जोपासली आहे."

  • धर्म ही माणसा-माणसांना जोडणारी शक्ती असून त्यांच्यात फूट पाडणारी नाही, हे ओळखले पाहिजे.

  • गौतम बुद्ध, आद्य शंकराचार्य इत्यादी अनेक तत्त्वज्ञांच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केले आणि संपूर्ण जगाला एक वेगळी दृष्टी दिली.

टिप्पण्या