रक्षाबंधन :
येन बध्दो बलीराजा दानवेंद्रो महाबल:|| येन त्वां अनुबंध्नामि रक्षे मा चल मा चल||
या मंत्राचा उच्चार करून बहिण भावाच्या उजव्या हातात 'भावाने आपले रक्षण करावे' या सदभावनेने राखी बांधते.
रक्षाबंधनाचा सण अनादिकालापासून चालत आला आहे.
असुरांबरोबर युद्ध करताना आत्मविश्वास गमावलेल्या इंद्राला इंद्राणीने श्रावण पौर्णिमेला राखी बांधली. त्यामुळे त्याला आत्मविश्वास आला व त्याने असुरांचा पराभव केला. त्या मंगल घटनेची स्मृती म्हणून रक्षाबंधनाचा सण संपन्न केला जातो.
कौरव-पांडवांच्या युद्धात चक्रव्युह भेदण्यासाठी जेव्हा अभिमन्यु निघाला, तेव्हा कुंतीने त्याला राखी बांधली, असा महाभारतात उल्लेख आहे.
राजा पौरस व अंभी या दोघांच्या संघर्षामुळे पौरसचा पराभव करण्यासाठी अंभीने जगज्जेत्या सिकंदरास आमंत्रित केले.
पौरसाच्या सैन्याची पाहणी करण्यासाठी झेलम नदीतून पोहत सिकंदर जेव्हा आला, तेव्हा पौरसाची बहीण सावित्री हातात राखी घेऊन नदीकिनारी उभी होती.
सिकंदराने परिचय विचारल्यावर मी अंभीची बहिण असून त्याला रक्षाबंधन करू शकत नसल्यामुळे ही राखी समुद्राला या नदीद्वारे पाठवित आहे, असे ती म्हणाली. तेव्हा सिकंदराने 'ही राखी आपण मला बांधा' असे सांगून ती राखी बांधून घेतली व आपल्या नावाचा शिक्का असलेली मुद्रिका सावित्रीला भेट दिली. ही मुद्रिका दाखविल्यास माझ्यापर्यंत येण्यास आपल्याला कोणीही अडवणार नाही, असे सांगितले.
युद्धामध्ये जेव्हा पौरसाचा पराभव झाला, तेव्हा सिकंदराने पौरसाला अटक करून विचारले, 'मी तुला कसे वागवावे ?
तेव्हा हा भारतपुत्र म्हणाला, 'मी राजा आहे व मला राजासारखेच वागवावे'.
अशा या स्वाभिमानी राजाची बहीण सावित्री सिकंदराकडे जाऊन त्याने दिलेली मुद्रिका दाखविते, तेव्हा सिकंदर तिला पाहिजे ते मागण्यास सांगतो. ती बंधू पौरसाची मुक्तता व गेलेले राज्य परत मागते.
सिकंदर या मानलेल्या बहिणीला निराश करत नाही.
जे शस्त्राने जमले नाही, ते राखीने शक्य झाले.
चितोडची महाराणी करुणावती उर्फ कर्मावतीची कहाणी हृदयद्रावक व राखीचे महत्त्व सांगणारी आहे.
करुणावती ही चितोडचा महाराणा संग्रामसिंह याची दुसरी पत्नी.
तिला विक्रमादित्य व रतनसिंह हे दोन मुले.
दुर्दैवाने चितोडच्या सत्तेसाठी या दोघा भावांमध्ये संघर्ष सुरू झाला.
याच दरम्यान बुंदेलचा राजा सूरजमल व रतनसिंह या दोघांमध्ये ऑवेरीच्या राजकुमारीशी कोणी लग्न करावयाचे? यासाठी युद्ध झाले व त्यात रतनसिंहाचा वध झाला.
तेव्हा चितोडच्या गादीवर विक्रमादित्य बसला. तो भित्रा परंतु दुष्ट होता. गुजरातचा बादशहा बहादूरशहाने चितोडवर स्वारी केली, तेव्हा करुणावतीने दिल्लीचा बादशाह हुमायून याला राखी पाठवून शीलरक्षणासाठी मदत करण्याची विनंती केली.
दुर्दैवाने हुमायून तेव्हा बंगाल प्रांतात शेरशहाचा बीमोड करण्यासाठी गेला होता.
त्यामुळे त्याला राखी उशिरा मिळाली.
युद्ध थांबवून तो आपल्या मानलेल्या बहिणीच्या रक्षणासाठी चितोडला आला. परंतु येण्यास उशीर झाला होता.
बहादूरखानाच्या हाती लागण्यापेक्षा मरण परवडले, म्हणून राजपुतांनी केसरिया परिधान करून बहादूरखानाशी युद्धात वीरमरण पत्करले व राणी कर्मावतीने गडावरील तेरा हजार स्त्रियांसह जोहार पत्करुन एकाच चितेत आत्मदहन केले.
राख व हाडांच्या सांगडयाशिवाय गडावर काहीही उरले नाही.
बहादुरखानाचा ध्वज चितोडवर फडकला, तोच हुमायून चितोडवर आला.
हुमायूनने खानाचा पराभव केला व मरणोपरांत आपली मानलेली बहीण कर्मावतीला राखी पौर्णिमेची सप्रेम भेट म्हणून चितोडगड अर्पण केला.
रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणपौर्णिमा असते, या दिवशी सागराची पूजा केली जाते.
अक्षयतृतीयेला उचंबळणारा सागर श्रावणपौर्णिमेला शांत होतो, अशी
कोळ्यांची श्रद्धा आहे.
आपल्या या सागरबंधूने मासे पकडण्यास सागरात गेलेल्या आपल्या पतीचे रक्षण करावे, म्हणून कोळ्यांच्या महिला सागरात राखी सोडतात व कोळी लोक सागरपूजन करून श्रीफळ अर्पण करतात.
या दिवशी यज्ञोपवित बदलण्यासाठी श्रावणी हा विधी संपन्न केला जातो.
ज्या स्त्रियांना भाऊ नसतो, त्या चंद्राला राखी बांधतात.
अर्थात अशा महिलांनी एखाद्या बहिण नसलेल्या पुरुषास भाऊ मानून राखी बांधावी.
या दिवशी सैनिक, शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना राखी बांधावी.
इतर धर्मातील पुरुषांना राखी बांधून धर्मसलोखा वाढवावा.
लग्न करून दिल्यानंतर आता आपली जबाबदारी संपली, असा विचार कोणत्याही भावाने न करता बहिणीच्या रक्षणासाठी आयुष्यभर तत्पर राहिले पाहिजे.
यामुळे सासरच्या छळाने होणाऱ्या आत्महत्या, हत्या, हुंडाबळी होणार नाहीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा