गुरुपौर्णिमा :
लघु अवस्थेतून गुरु अवस्थेकडे नेतो तो ‘गुरु’ आणि लघू व गुरू या दोनही अवस्थेतून विश्वव्यापी प्रभूचा साक्षात्कार घडवितो ‘सदगुरू’ होय.
ज्याला आपले जीवन समृद्ध व्हावे असे वाटते, त्यांनी सदगुरूंना शरण जावे.
परमेश्वरालासुद्धा सदगुरूंची गरज वाटली म्हणून तर भगवान श्रीरामांनी वशिष्ट यांची व प्रभू श्रीकृष्णाने संदीपनींची सेवा केली, म्हणून गुरु गीता सांगते----- गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा: || गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः || त्या सदगुरू माऊलींची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा वा ‘व्यासपौर्णिमा’ होय.
‘व्यासोच्छीष्टम जगत्सर्वम्’ व्यासांनी वेदांचे व्यवस्थापन केले. प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले.
श्रीव्यासांनी महाभारत सांगितले व ते श्रीगणरायाने लिहिले. त्यात भीष्म पर्वात असलेली ‘गीता’ विश्वप्रसिद्ध आहे.
वशिष्ठ ऋषींचा मुलगा ‘शतकीर्ती’ यांना आईच्या गर्भात वेदमंत्राचे पठण करणारा ‘पराशर’ हा मुलगा झाला.
एकदा यमुना नदी पार करताना होडी व लढविणार्या ‘सत्यवती’ नावाच्या धीवर कन्येची व पराशर ऋषींची एक झाली.
पराशरांपासून सत्यवतीला ‘श्रीव्यास’हा विश्वप्रसिद्ध मुलगा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला म्हणून गुरुपौर्णिमा चे आयोजन केले जाते.
‘ज्ञानाची व्यवस्था करतो तो व्यास’ व तो ज्या उच्च आसनावर बसून लोकांना ज्ञान सांगतो, त्या स्थानाला ‘व्यासपीठ’ म्हणतात.
व्यासांना जगद्गुरु व आचार्य अशा पदव्यांनी विभूषित केले आहे. प्रत्येक विषयाचे ज्ञान अधिकृत ग्रंथातून आत्मसात करून, त्याचा विचार करून अनुभव घेतल्यावर जनकल्याणासाठी ते ज्ञान लोकांना सांगतो, त्याला आचार्य म्हणतात.
जन्म देणारी, सांभाळणारी ,ज्ञान देणारी, संकटात प्राणरक्षण करणारी व मोक्षाला नेणारी अशा पाच माता आहेत, त्यातील सदगुरू ज्ञान देऊन मोक्षाला नेतात, म्हणून त्यांना ‘माऊली’ म्हणतात.
अनुग्रह देऊन आत्मज्ञान देणाऱ्या सदगुरूना सदगुरू दीक्षा, मोक्ष व अनुग्रह गुरु म्हणतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा