"न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती"
ऋग्वेदकाळात स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य होते, तिचा दर्जा चांगला होता. स्रियांना सामाजिक, राजकीय, धार्मिक स्वातंत्र्य होते.
त्याकाळात गार्गी, मैत्रेयी, अपाला, घोषा, लोपामुद्रा, सूर्या यासारख्या विदुषी होऊन गेल्या.
परंतु प्राचीन व मध्ययुगीन काळात परकीय आक्रमणे भारतावर सुरू झाली, त्यावेळी स्त्रीजीवन चार भिंतीच्या आत गुंतून पडले.
त्यामुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर पर्यायाने शिक्षणावरही बंधने आली.
भारतात स्री शिक्षणाचे कार्य सुरू करण्याचे श्रेय ख्रिस्ती मिशनरींकडे जाते.
अमेरिकन मराठी मिशनने १८२४ मध्ये, तर चर्च मिशन सोसायटीने १८२८ मध्ये स्रीशिक्षणाची चळवळ सुरू केली.
जॉन विल्सन यांच्या पत्नी मार्गारेट यांनी मुंबईत १८३९ च्या सुमारास मुलींसाठी तीन शाळा सुरू केल्या.
मेरी कारपेंटरने स्त्रियांसाठी शिक्षणप्रसाराचे कार्य केले.
स्री शिक्षक तयार करण्यासाठी नॉर्मल स्कूल काढावे,अशी मागणी सरकारकडे केली.
या शिक्षणासाठी येणाऱ्या स्त्रियांना शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली.
ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर भारतीयांना पाश्चात्त्य ज्ञान व संस्कृतीची ओळख झाली.
प्रशासनाचा व्याप सांभाळण्यासाठी भारतीयांना तयार करण्याच्या उद्देशाने शिक्षणाची सुरुवात ब्रिटिशांनी केली.
बुद्धिवाद, स्वातंत्र्य व समता यांना महत्त्व आले.
सामाजिक बदलाला प्रारंभ झाला.
भारतात स्त्री शिक्षणाचे कार्य भारतातील अनेक समाजसुधारकांनी केले.
राजा राममोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीही स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला.
समाजसुधारक स्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे कार्य करत असताना महात्मा फुले यांनी १८४८ ते १८५२ या काळात पुणे येथे मुलींसाठी तीन शाळा सुरू करून सावित्रीबाईंना घरी शिक्षण देऊन नंतर शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्त केले.
जगन्नाथ नाना शंकरशेठ, लोकहितवादी, महात्मा फुले, महर्षी कर्वे अशा शिक्षण महर्षींनी स्री शिक्षणाचा आग्रह धरला.
महर्षी कर्वे यांनी १९१६ मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.
खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली.
स्वातंत्र्योत्तर काळात विविध आयोग व समित्यांनी स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला.
मुलींसाठी शाळा-महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था सुरू झाल्या.
त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला गती मिळून आधुनिक काळातील स्त्रीची जडणघडण होऊ लागली.
स्रीशिक्षणावर विशेष भर देण्यात आल्याने स्त्रिया मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होऊ लागल्या.
त्यांनी नवनवीन क्षेत्र, व्यवसाय, उद्योग यामध्ये शिरकाव केला.
शासनाने सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व नोकऱ्यांमध्ये 33 टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव दिलेल्या आहेत.
त्यामुळेच राजकीय, व्यावसायिक, सामाजिक, क्रीडा, आर्थिक, शैक्षणिक सर्वच क्षेत्रात स्त्रिया घर सांभाळून चांगली जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.
शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात महिलांनी प्रगती केलेली आहे.
स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तर शिक्षणाची आवश्यकता आहेच, पण समाजात संस्कृतीसंवर्धनाची जबाबदारी स्त्रियांवर असल्याने शिक्षणाची नितांत गरज आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा