कथा कॅलेंडरची : भाग १

 

  • कथा कॅलेंडरची भाग १

  • घरातील बैठकीत भिंतीवर कॅलेंडर असले पाहिजे, हा घरातील सर्वांचा आग्रह असतो.

  • या कॅलेंडरची कथा व त्याची विविधता पाहणे सर्वांनाच आवडेल.

  • ख्रिस्तपूर्व ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी नाईल, गंगा, सिंधू, तैग्रीस, युफ्रेटीस, हो होयांग हो या नद्यांच्या खोऱ्यात भटक्या मानवाने वसाहती केल्या.

  • हिवाळा, पावसाळा, उन्हाळा तसेच शेती व्यवसायाच्या नियोजनासाठी त्यांना वेळापत्रकाची (कॅलेंडर) गरज भासू लागली.

  • त्यांनी सूर्य व चंद्रकला यांची सांगड घातली आणि येथेच कॅलेंडरचा जन्म झाला.

  • प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे वेगवेगळे कॅलेंडर बनविले. त्यामुळे माणसाला दिनक्रम कळू लागला.

  •  प्राचीन काळी बऱ्याच लोकांनी इजिप्शियन कॅलेंडर मान्य केले होते.

  • नाईल नदीला महापूर आला की, वर्षारंभ मानतात. त्यांनी चंद्रकलेवर आधारित ३०  दिवसांचा १  महिना व १२  महिन्यांचे  १  वर्ष असे गणित मांडले.

  • त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, नाईल नदीला येणारा पूर अनियमित असून पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मात्र  ३६५ दिवस लागतात.

  • त्यामुळे त्यांनी या सर्वांचे गणित मांडून ख्रिस्तपूर्व  ४२३६ मध्ये ३६५ दिवसांचे वर्ष मानले व त्याचबरोबर चंद्रकलांवर आधारित ३० दिवसांचा १ महिना व १२ महिन्यांचे म्हणजे ३६० दिवसांचे एक वर्ष, असे दोन्ही कॅलेंडर स्वीकारले.

  • या दोन कॅलेंडरमध्ये जो ५ दिवसांचा फरक पडला, तो त्यांनी वर्षाच्या अखेरीस परमेश्वराची प्रार्थना व उत्सव यात घालविण्याचे ठरविले.

  • ख्रिस्तपूर्व ५०० च्या सुमारास तैग्रीस व युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यात (इराक) सुमेरियनस नावाच्या जमातीने एका दिवसाचे १२ भाग (तास) केले व ३० दिवसांचा १ महिना केला.

  • ख्रिस्तपूर्व २००० पासून १२ महिन्यांच्या वर्षात आलटून-पालटून २९ किंवा ३० दिवसांचे महिने धरले जात.

  •  ख्रिस्तपूर्व ५२० मध्ये डायरीस या इराणी सम्राटाने इराणसाठी ३६५ दिवसांचे इजिप्शियन कॅलेंडर स्वीकारले.

  • पण त्यांच्या असे लक्षात आले की, गृहीत धरलेले वर्ष ३६५ दिवसांपेक्षा एक चतुर्थांश दिवसांनी मोठे आहे व दरवर्षी एक चतुर्थांश दिवस मोठा धरल्यास १२० वर्षांनी ३० दिवसाच्या एका महिन्याचा फरक पडतो.

  • तेव्हा  १२० वर्षांनी  १३ महिन्यांचे एक वर्ष साजरे करावे, असे डायरीसने जाहीर केले.

  • इ.स. ६४८ मध्ये मुस्लिम धर्मियांनी इराण काबीज करून हिजरा कॅलेंडर लागू केले.

  • इस्लाम धर्म संस्थापक प्रेषित महंमद पैगंबर इसवीसन  १५ जुलै ६२२ रोजी रात्री मदिनेला गेले, त्या दिवसापासून कॅलेंडरचा प्रारंभ झाला.

  • १२ महिन्यांच्या हिजरा वर्षात आलटून-पालटून  २९/३०  दिवसांचे महिने असून, एकूण  ३५४   दिवस धरले गेले.

  •  चंद्रकलावर आधारित असलेले हे कॅलेंडर वर्षांचे एक चक्र मानले जाते.

  • पहिली  २१ वर्ष  ३५४ दिवस पूर्ण झाल्यावर पुढील ११ वर्षात प्रत्येकी  १ दिवस जास्त धरतात.

  • इस्लामिक कॅलेंडरमध्ये एका सूर्यास्तापासून दुसऱ्या सूर्यास्तापर्यंत दिवस धरला जातो.

  • चीनमध्ये ख्रिस्तपूर्व  २६३७ मध्ये सम्राट हुआनग्दीने कॅलेंडरची सुरुवात केली, असे मानले जाते. 

  • अर्थात ख्रिस्तपूर्व  १४०० पासून चीनमध्ये कॅलेंडरचे अस्तित्व असल्याचे पुरावे आहेत.

  •  या कॅलेंडरमध्ये साधारण  १२ महिन्यांचे १ वर्ष सोडून, लीपवर्ष १३ महिन्यांचे झाले.

  • त्यामुळे साधारण वर्षात  ३५३,३५४,३५५ दिवस मानले असून, लीप वर्षात  ३८३,३८४, व ३८५  दिवस वाढले आहेत.

  • त्यांचे  ६० वर्षांचे एक चक्र असून त्यांनी  ३६०० वर्षांचे एक युग मानले आहे.

  • प्रत्येक धर्माने आपल्या पद्धतीने कॅलेंडरची  (कालमापक दर्शक) संकल्पना मांडली आहे.

  • हिंदू धर्म :

  • आपल्या पूर्वजांना कालगणनेची अचूक माहिती होती.

  • सूर्य व त्याभोवती भ्रमण करणारी पृथ्वी व नवग्रह यांचे शास्त्रीय ज्ञान असल्याने वेदकाळापासून कालमापनासाठी सौर व चांद्र अशा दोन पद्धती असत. 

  • चंद्रकलावर आधारित  ३० दिवसांचा एक महिना असे, वर्षाचे  १२ महिने धरून सौरवर्षाशी चांद्रमासाचा मेळ घालण्यासाठी दर तीन वर्षांतून एकदा अधिक मास धरण्याची प्रथा होती व ती आजही आहे.

  • प्रत्येक महिन्याच्या पूर्वार्धाला शुक्ल वा शुद्धपक्ष म्हणत व त्या पक्षाच्या शेवटी पौर्णिमा असे.

  • तसेच उत्तरार्धाला कृष्ण वा वद्यपक्ष म्हणत व त्याच्या शेवटी अमावस्या असे.

  • महिन्याचे---  १. आमांत- अमावस्येला महिना संपतो व   दुसऱ्या दिवसापासून पुढील महिना सुरू होतो.                                          २. पौर्णिमांत-    पौर्णिमेला महिना संपतो व कृष्ण पक्षाच्या सुरुवातीला नवीन महिना सुरू होतो.

  • महिन्याचे असे दोन प्रकार असत. या प्रकारची कालगणना उत्तर भारतात अजूनही रूढ आहे. 

  • सध्या चैत्रादी जी १२ महिन्यांची नावे आहेत, ती ब्राह्मणकाळापासून सुरू झालेली आढळतात.

  • सूर्य व चंद्र यांच्यावर आधारित असलेल्या हिंदू कॅलेंडरचा प्रारंभ ख्रिस्तपूर्व सुमारे २५०० वर्षांपूर्वी झाला.

  • हिंदू कॅलेंडरमध्ये १२ महिने आणि दक्षिणायनउत्तरायण या दोन आयनांना विशेष महत्त्व आहे. 

  • आज १२ महिन्यांची जी प्रचलित नावे आहेत, ती नक्षत्रावरून दिलेली आहेत. 

  • चैत्र-चित्रा,  वैशाख-विशाखा,  ज्येष्ठ-जेष्ठा, आषाढ-पूर्वा व उत्तराषाढा,  श्रावण-श्रवण, भाद्रपद-पूर्वा भाद्रपदा,  अश्विनी-अश्विनी, कार्तिक-कृतिका,  मार्गशीर्ष-मृगशीर्ष, पौष-पुष्य नक्षत्र,  माघ-मघा, फाल्गुन-फाल्गुनी,  अधिकमास (मलमास), दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाला पूर्वी अंहसस्पती, संसर्प, सनिस्त्रस इ. नावे होती. 

  • भारत सरकारने  १९५४  साली यासाठी एक समिती स्थापन करून तिच्या शिफारशीनुसार सूर्य व चंद्रकलावर आधारित असलेले मराठी महिन्याचे कॅलेंडर धार्मिक सुट्ट्यांसाठी मान्य केले व इतर जागतिक संपर्कासाठी इंग्रजी अथवा ग्रेगोरियन कॅलेंडर मांडले आहे.

  • कालनिर्णय, महालक्ष्मी यासारखे पंचांगसारखे कॅलेंडर अलीकडे प्रत्येकाच्या घरी भिंतीवर टांगलेले असते. त्यांचा सर्वांना नित्य उपयोग होतो.

टिप्पण्या