दादोबा पांडुरंग तर्खडकर, जयंती : ९ मे
मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून परिचित असलेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म इ.स.९ मे १८१४ रोजी मुंबईत झाला.
त्यांना 'मराठी व्याकरणाचे पाणिनी' असे म्हणतात.
महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक, व्याकरण आणि भाष्यकार, किंबहुना स्वतंत्र राज्याचे पहिले ग्रंथकार म्हणून त्यांना अग्रमान दिला जातो.
त्यांचे साहित्य हे मौलिक, रसपूर्ण आणि विचारप्रवर्तक आहे.
समाजप्रबोधनातही त्यांचा फार मोठा वाटा आहे.
त्यांनी शिक्षण आणि धर्म या क्षेत्रात नाविण्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्यांचे घराणे हे वसई तर्खड येथील. त्यामुळे त्यांना 'तर्खडकर' म्हणून ओळखले जाते.
ते वैश्य जमातीतील होते. त्यांचे आजोबा व्यवसायानिमित्त मुंबईत आले आणि तेथेच स्थिर झाले.
घरातील वातावरण धार्मिक असल्यामुळे लहानपणीच त्यांच्यावर तसे संस्कार झाले होते.
शिक्षण चालू असतानाच त्यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाचे पुस्तक लिहिले.
काही काळ ते जावरा संस्थानच्या नबाबाचे शिक्षक होते.
१८४० मध्ये एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून ते दाखल झाले.सुरत येथे त्यांची बदली झाली.
सन १८४६ मध्ये बाळशास्त्री जांभेकर मृत्यू झाल्यामुळे ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टरची जागा रिकामी झाली. त्या जागेवर दादोबा पांडुरंग यांची नियुक्ती झाली.
सन १८५२ मध्ये अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर पदावर दादोबांची नेमणूक झाली.
भिल्लांच्या बंडाचा यशस्वीपणे मोड केल्यामुळे सरकारने त्यांना 'रावबहाद्दूर' ही पदवी देऊन सन्मानित केले.
दादोबा पांडुरंग यांनी आपली सरकारी नोकरी सांभाळत सार्वजनिक कार्याकडे विशेष लक्ष दिले होते.
त्यांनी राजकारण, समाजकारण व धर्मकारणांमध्ये हिरीरीने भाग घेतला.
त्याकाळातील समविचारी लोकांना एकत्र करून त्यांनी मानवधर्म सभा, परमहंस सभा, बॉम्बे असोसिएशन, सरकारी पुस्तक समिती इत्यादी संघटना स्थापन करून त्यात सक्रिय भाग घेतला.
या सभांच्या माध्यमातून समाजाला आपल्या धर्माचे सत्य स्वरूप दाखविण्याचे कार्य केले.
शिक्षण, लेखन, पुनर्विवाह इत्यादी संदर्भात त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे.
त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. दादोबांचे व्यक्तिमत्व, धार्मिक प्रवृत्ती व बालपणापासूनचे संस्कार यामुळे त्यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रात भरीव कार्य केले.
समाजजीवन गतीशील बनविण्याचा प्रयत्न केला.
इंग्रजी विद्येच्या प्रसारामुळे महाराष्ट्रात एक नवशिक्षितांचा वर्ग अस्तित्वात आला होता.
त्यांना ख्रिश्चन धर्मातील चांगल्या गोष्टींबद्दल आकर्षण होते.
मिशनऱ्यांच्या सेवाभावी व मानवतावादी कार्याने असे तरुण भारावलेले होते. मात्र ते हिंदू धर्माभिमानी होते.
त्यांनी स्वधर्मात चांगल्या तत्त्वप्रणाली स्वीकारण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले.
दादोबा पांडुरंग यांनी आपले विचार पटणाऱ्या लोकांच्या मदतीने मानवधर्म सभा स्थापन केली.
मिशनरी लोकांचे प्रयत्न व सरकारचे प्रोत्साहन यामुळे अनेक लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत होते.
त्यामुळे महाराष्ट्रात धर्मांतराची लाटच उसळली होती. त्यावेळी त्यांनी जांभेकरांची मदत केली.
श्रीपाद शेषाद्री याला शुद्ध करून हिंदु धर्मात परत घेतले.
त्यावरून त्यांची धर्मविषयक मते स्पष्ट होतात.
उदारमतवादी व समतावादी मते त्यांनी मांडली.
आपल्या धर्मात अनेक वाईट प्रथांची बजबजपुरी माजली आहे. ती दूर सारून तिला शुद्ध स्वरूप दिले पाहिजे, या मताचे ते पुरस्कर्ते होते.
देशबांधवांना खरा धर्म समजावा, म्हणून त्यांनी, बंधुभावाने वागावे, एकेश्वरवादाचा पुरस्कार करावा यासारखे अनेक उपक्रम हाती घेतले.
दादोबांना अभिप्रेत असलेल्या सुधारणांची कल्पना त्यांच्याच काही काव्यपंक्तीवरून येते.उदा.
विश्वकुटुंबी जो | सर्वाधिक कारण | बापा त्या शरण | जावे तुम्ही |
बंधुच्या नात्याने | वागा मानवाशी | उदार मनाशी | ठेवुनिया |
जातीभेद सर्व | सोडा अभिमान | द्यावे आलिंगन | एकमेका |
भूत दयेने ती | करा देवपूजा | हेच अधोक्षजा | आवडले |
करणे असेल | व्यर्थची नक्कल | तरी दोरी घाल | सुके गळा |
मुंबई येथे एलफिन्स्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसार व सामाजिक जागृतीच्या कार्यासाठी दादोबा पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली १८४८ मध्ये ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली.
विद्येच्या लाभाविषयी त्यांनी जे व्याख्यान दिले आहे, ते आजही विचार करावयास लावणारे आहे. ते म्हणतात, "ज्ञानशक्तीचा प्रसार प्राचीन काळी आपल्यात खूप झाला होता. ज्यावेळी इतर देश अज्ञान अवस्थेत होते, त्यावेळी आपण उत्तमावस्थेत होतो. आपणामध्ये पूर्वी व्यासादि ऋषी,कालिदास, भास्कराचार्य यासारखे पंडित व शास्त्रज्ञ होते. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथरचना केली. आपल्या पूर्वजांनी जो विद्या बुद्धीचा क्रम घालून दिला होता, तो तसाच पुढे चालू राहिला असता, तर आपली किती प्रगती झाली असती? आपण पुन्हा एकदा सर्व देशाची सुधारणा करण्याचा प्रयत्न करूया."
राजकारणामध्येही दादोबा पांडुरंग यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
ते ब्रिटीशांच्या अन्याय्य, अत्याचारी धोरणाविरुद्ध होते.
त्यासंदर्भात ते म्हणतात, "ज्या वेळी प्रजेवर अन्याय होतो, त्यावेळी जनतेने शासनकर्त्याशी लढा देणे योग्यच असते. राज्य हे जनकल्याणासाठी असते. प्रजेसंबंधी समभाव राखणे गरजेचे आहे. शासनकर्ता जनतेला पीडा देऊ लागला तर लढा देणेच योग्य."
दादोबा पांडुरंग यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे ग्रंथ प्रचार.
त्यांना साहित्यिक दृष्टी होती. ग्रंथाचे प्रचंड भांडार लिहिले नाही, परंतु जे लिहिले ते सर्व स्वतंत्रपणे लिहिले.
त्यांनी मराठी भाषेचे 'व्याकरण', 'मराठी नकाशाचे पुस्तक', 'विद्येच्या लाभाविषयी',' 'विधवाश्रुमार्जुन','यशोदा पांडुरंगी', 'मराठी लघु व्याकरण', 'पारमहंसिक ब्राह्मधर्म,' 'आत्मचरित्र', 'शिशूबोध' इत्यादी ग्रंथ लिहिले.
"यमुना पर्यटन" या बाबा पद्मनजींच्या कादंबरीला दादोबा पांडुरंग यांचा पुनर्विवाह विषयक संस्कृत लेख जोडला आहे.
दादोबांचा सर्वोत्कृष्ट निबंध म्हणजे "यशोदा पांडुरंगी"
मराठी भाषेबद्दल त्यांना अपार प्रेम होते. त्यांनी लिहिलेल्या व्याकरणाने त्यांची लोकप्रियता वाढविली आहे.
मराठी भाषेचे व्याकरण लिहून 'मराठी भाषेचे पाणिनी' हा किताब मिळविला.
न्यायमूर्ती रानडे म्हणतात, "धर्म जिज्ञासा करणाऱ्या तत्त्वचिंतकांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग यांना अत्युच्च स्थान देण्यात यावे, अशीच त्यांची योग्यता आहे."
आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जातात.
अशा या मराठी व्याकरणकाराच्या पाणिनीचा मृत्यू इसवीसन १७ ऑक्टोबर १८८२ रोजी झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा