भास्करराव जाधव: बुद्धिवादी व स्पष्टवक्ते समाजसुधारक :- नागाव, अलिबाग.
महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा विचार व आचारांनी प्रभावित झालेले कार्यकर्ते, छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणेच्या कार्यातील सहाय्यक व ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख नेते म्हणून भास्करराव जाधव महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.
महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात त्यांच्या कार्याचा प्रेरणांचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
भास्करराव जाधव यांचा जन्म अलिबाग जिल्ह्यातील 'नागाव' येथे १७ जून १८६७ ला झाला.
त्यांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध विषयांचा सखोल अभ्यास केला.
याच काळात महाराष्ट्रात सुरू असलेल्या सामाजिक सुधारणांची ते उत्सुकतेने माहिती मिळवत होते.
महात्मा फुले यांच्या कार्याचा व लेखनाचा त्यांच्या मनावर परिणाम होत होता.
जून १८९५ मध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात नोकरी स्वीकारली.
या काळात त्यांनी एल.एल.बी. ही कायद्याच्या अभ्यासातील पदवीही संपादन केली.
छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात त्यांनी निरनिराळ्या हुद्द्यांवर व निरनिराळ्या खात्यांतून कामे केली.
त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे महाराजांचा त्यांच्यावर विश्वास बसला.
इतकेच नाही तर पुढील काळात शाहू महाराजांच्या दरबारातील ते एक महत्त्वाचे घटक बनले.
भास्कररावांनी महाराजांच्या शिक्षणविषयक, सामाजिक व धार्मिक चळवळीत भाग घेतला.
बहुजन समाजाच्या प्रगतीच्या महाराजांच्या कार्याला मदत केली.
शिक्षण घेत असतानाच 'सत्यशोधक समाजाच्या' शिकवणीचा भास्करराव यांच्या मनावर प्रभाव पडलेला होता.
शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी सुरू केलेल्या कार्यात ते सहभागी झाले.
प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणे किती आवश्यक आहे, याविषयीचा सविस्तर अहवाल तयार केला.
बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शहरात आल्यानंतर भोजन व राहण्याच्या व्यवस्थेची अडचण येत असे.
ही अडचण दूर करण्यासाठी महाराजांनी वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला.
भास्करराव व इतर सदस्यांनी मिळून 'मराठा एज्युकेशन असोसिएशन' ची स्थापना केली.
या असोसिएशनकडे मराठा वसतिगृहाची स्थापना करण्याचे व नंतर देखरेख ठेवण्याचे काम सोपवले गेले.
महाराजांच्या शिक्षणविषयक सर्व कार्याला त्यांनी पूर्ण सहकार्य केले.
११ जानेवारी १९११ मध्ये भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात 'सत्यशोधक समाजाची' शाखा स्थापन केली.
भास्करराव जाधव यांनी 'घरचा पुरोहित' नावाचे अतिशय सोप्या भाषेत पुस्तक लिहिले.
त्यात निरनिराळे धार्मिक विधी कसे करावेत, याविषयी सविस्तर विवेचन करण्यात आले होते.
सत्यशोधक समाजाचा महाराजांच्या प्रेरणेने व भास्करराव यांच्या कार्यामुळे प्रचार व प्रसार झाला.
भास्करराव हे बुद्धिवादी व स्पष्टवक्ते होते.
कोणतीही गोष्ट आपल्या मनाला योग्य न वाटल्यास ते तिचा स्वीकार करीत नसत.
१९१९ मध्ये इंग्लंडला जाऊन इंडिया बिलावरील सिलेक्ट कमिटीपुढे साक्ष देऊन त्यांनी मराठ्यांसाठी राखीव जागा मागितल्या.
१९२२ च्या सुरुवातीस निवृत्तीवेतन घेतल्यावर मुंबई सरकारने त्यांना कायदे मंडळाचे सदस्य केले.
सातारा जिल्ह्यातर्फे त्यांची मुंबईच्या कायदेमंडळात निवड झाली.
१९२३ मध्ये शिक्षण व मेडिकल रिलिफ या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले.
१९२६ च्या निवडणुकीत ते विजयी झाले.
१९२८ मध्ये ते शेतकी खात्याचे मंत्री म्हणून काम पाहत होते.
१९३० मध्ये लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याचे त्यांना निमंत्रण आले.
१९३१ साली ते परिषदेला उपस्थित राहिले.
१९३४ पर्यंत असेंब्लीमध्ये असताना विविध कमिट्यांवर त्यांनी काम केले.
१९३५ च्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या कॉपर मंत्रिमंडळात यांचा समावेश होता.
१९२६ मध्ये भाऊराव पाटलांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात," मला असे वाटते की, हल्लीच्या परिस्थितीत सरकारच्या पाठिंब्याशिवाय या ब्राह्मणेतर पक्षाची प्रगती होणार नाही. आपण जर सरकारची सहानुभूती गमावली तर आपला टिकाव लागणार नाही."
ब्राह्मणेतर चळवळीला त्यांनी नेतृत्व देऊन शिक्षण, सामाजिक सुधारणा या कार्याला चालना दिली.
जवळकरांच्या मदतीने 'कैवारी' नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
यानंतरच्या काळात भास्कररावांनी वॉर्डन इन्शुरन्स कंपनी, रिझर्व बँक मुंबई शाखा, इंटरनॅशनल बँक बॉम्बे, बॉम्बे को-ऑपरेटिव्ह इन्शुरन्स कंपनी यामध्ये डायरेक्टर किंवा चेअरमन म्हणून काम केले.
रीजन्सी कौन्सिलमध्ये मुलकी खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.
विविध क्षेत्रात कार्य करताना त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला.
बुद्धिवादी व सत्यधर्माचे पालन करणारा ज्योतिबा फुले यांचा निष्ठावान अनुयायी म्हणून भास्करराव प्रसिद्ध होते.
शाहू महाराजांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला.
त्यांनी विविध धार्मिक, सामाजिक विषयांवर ग्रंथलेखन व संशोधनात्मक लेख लिहिले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा