अनेक तीर्थक्षेत्रे व मंदिरे, मंदिरांचा जीर्णोद्धार, भांडारगृहे, घाट धर्मशाळा व विहिरी बांधणार्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आज जन्मदिन.
वयाच्या ८ व्या वर्षी त्यांचा विवाह सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला.
त्यांना मालेराव व मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली.
दुर्दैवाने इ.स.१७५४ मध्ये खंडेराव हे कुंभेरी येथे सूरजमल जाटाबरोबरच्या लढाईत गोळी लागून मरण पावले.
प्रजाहित व दौलतीचा सांभाळ करण्यासाठी सासरे मल्हारराव यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही.
पेशव्यांकडून इंदोर संस्थानाची जहागिरी मिळवून इ.स.१७६६ मध्ये मल्हारराव मरण पावले.
त्यांच्यानंतर मालेरावला पेशव्यांकडून सरदारकीची वस्त्रे मिळाली, परंतु तो आठ-दहा महिने कारभार केल्यावर मरण पावला.
पुण्यश्लोक अहिल्याबाईनी होळकरांची सरदारी समर्थपणे पेलली.
अहिल्याबाईंनी राज्यातील शेतकरी सुखी व्हावे, म्हणून शेकडो विहिरी, तलाव बांधले. तीर्थक्षेत्री नदीवर घाट बांधले.मंदिरे, धर्मशाळा बांधल्या.
त्यांना विलक्षण राजकीय समाज होती. तसेच विकासाची दूरदृष्टीही त्यांच्याजवळ होती.
अहिल्याबाईंनी तुकोजी होळकर नावाच्या आप्त तरुणाला सासुबाई गौतमाबाईंच्या मांडीवर दत्तक घेऊन त्याच्याकडे फौज व मोहिमेची जबाबदारी सोपवली.
स्वतःकडे खाजगी व दौलतीचा कारभार ठेवला.
अहिल्याबाईंना तुकोजी होळकर यांचे बहुमोल साहाय्य झाले.
अहिल्याबाई या धार्मिक वृत्तीच्या असल्या तरी कुशल प्रशासक होत्या.
बारभाईंच्या काळातही त्यांनी होळकरांचे महत्त्व टिकवून ठेवले होते.
इंदोरजवळील नर्मदेकाठी महेश्वर येथे राजधानी केली.
राघोबादादांनी अहिल्याबाईंचे वतन हडप करण्याचा निर्धार करून ते क्षिप्रा नदीपर्यंत आले, तेव्हा अहिल्याबाईंनी राघोबांबरोबर युद्धाची तयारी केली.
हे पाहून राघोबा घाबरले व त्यांनी माघार घेतली.
अहिल्याबाईंच्या मुत्सद्दी, दातृत्व व निर्भय स्वभावामुळे राघोबांसह माधवराव पेशवे, शिंदे, मोगल, निजाम व प्रजेतील सर्व लोकांना त्यांचा आदर वाटत असे.
त्यांच्या कारकीर्दीत राज्याचे उत्पन्न एक कोटी रुपयांपर्यंत गेले.
त्यांनी काही कायद्यात सुधारणा करून कर पद्धत सौम्य केली.
पाटील-कुलकर्णी यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी व गावोगावी योग्य न्याय मिळावा, म्हणून पंचाधिकारी नेमले.
नातू नथ्याबा (मुलीचा मुलगा), मुलगी मुक्ताबाई व जावई यशवंतराव फणसे हे अहिल्याबाईंदेखत मृत्यू पावले.
अहिल्याबाईंवर दु:खाचे आघात झाले. अगोदर पतीनिधन, नंतर पुत्राचे निधन, त्यानंतर मुलगी, जावई, नातू नथ्याबा यांचा मृत्यू अहिल्याबाईंनी समक्ष पाहिला.
मात्र स्वतःच्या दुःखाचा बाऊ न करता अहिल्यादेवींनी न डगमगता मराठा साम्राज्य सांभाळले.
सोरटी सोमनाथ येथे शिवमंदिर बांधून देत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला.
त्यांच्या धर्मशील व उदारहृदयी कार्याने लोक त्यांना देवी संबोधत.
अहिल्याबाई वयाच्या ७० व्या वर्षी १७९५ मध्ये १२००० ब्राह्मणांना भोजन घालून व त्यांचे तीर्थ घेऊन इंदोरला १३ ऑगस्ट रोजी कैलासवासी झाल्या.
त्यांच्या उपदेशाने तमासगीर आनंद फंदी कीर्तनकार झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा