स्वातंत्र्यवीर सावरकर---
एक साहित्यिक व विचारवंत, समाजसुधारक आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धीचे पुरस्कर्ते विनायक दामोदर सावरकर उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे रोजी जयंती….
ने मजसी ने परत मातृ भूमीला|, जयोस्तुते, श्रीमहन्मंगले| शिवास्पदे शुभदे| किंवा
तुजसाठी मरण ते जनन|
अशा अनेक अमरकाव्यांची निर्मिती करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्या यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला.
त्यांना गणेश उर्फ बाबाराव, नारायण हे दोन भाऊ व मैना नावाची एक बहीण होती.
विनायक दामोदर सावरकर हे ९ वर्षांचे असतांना आई राधाबाई यांचा मृत्यू झाला.
१८९९ ला त्यांचे पिता श्री. दामोदरराव यांचा मृत्यू झाल्यानंतर ही सर्व मुले नाशिकला राहण्यास आली.
त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले.
१९०५ साली पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले.
त्यांचा विवाह भाऊसाहेब चिपळूणकर यांची कन्या यमुना यांच्याशी झाला.
सावरकरांनी १८९९ मध्ये 'राष्ट्रभक्तसमूह', १ जानेवारी १९०० रोजी नासिक येथे 'मित्रमेळा' या संस्था स्थापन केल्या.
लहानपणापासूनच त्यांच्यावर क्रांतिकारक विचारांचा प्रभाव होता.
इ.स.१९०४ ला नासिक येथे मोठा मित्रमेळा भरविला व त्यातून 'अभिनव भारत' या संघटनेची स्थापना केली.
बी.ए. झाल्यानंतर ते मुंबईला जाऊन एल.एल.बी. झाले.नंतर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले.
तेथे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलेल्या 'इंडिया हाऊस' मध्ये राहिले.
अभ्यास करीत असताना ते १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाचा वाढदिवस, शिवजयंती वगैरेंसारखे राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यात पुढाकार घेत.
तिथे त्यांनी अभिनव भारत या संस्थेची स्थापना केली.
अभिनव भारत या संस्थेचे कार्यकर्ते भारतातील स्वातंत्र्यवीरांना शस्त्रे पाठवीत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘जोसेफ मॅझिनी’ यांचे आत्मचरित्र व राजकारण आणि ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे ग्रंथ लिहिले व आपले बंधू श्री बाबाराव सावरकरांजवळ प्रकाशित करण्यास भारतात पाठविले.
हे दोन्ही ग्रंथ सरकारला बाबाराव सावरकरांजवळ सापडल्यामुळे त्यांना अटक करून देशद्रोहाचा आरोप ठेवून काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानमध्ये पाठवून दिले.
बाबाराव सावरकरांचा कोणताही दोष नसताना सरकारने त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली.
त्यांना ही शिक्षा होण्यास नाशिकचा कलेक्टर जॅक्सन व इंग्लंडमध्ये लंडनमधील इंडिया हाऊसमधील कर्झन वायली हे दोघे कारणीभूत असल्यामुळे त्यातील कलेक्टर जॅक्सनचा वध अनंत कान्हेरे यांनी मंगळवार २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात केला.
त्यासाठी अनंत कान्हेरे यांना १९ एप्रिल १९१० या दिवशी फाशी देण्यात आले.
तर मदनलाल धिंग्रा यांनी १ जुलै १९०९ ला कर्झन वायली याचा नॅशनल असोसिएशनच्या वार्षिक उत्सवात जहांगीर हॉलमध्ये रात्री ९ वाजता वध केला.
मदनलाल धिंग्रा यांनादेखील १६ ऑगस्ट १९१० ला फाशी देण्यात आली.
या दोघांच्या खुनामागे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हात असल्याचा शोध सरकारने लावला.
अनंत कान्हेरे यांनी ज्या पिस्तुलाने जॅक्सनला मारले, ते पिस्तुल स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांनी इंग्लंडमधून पाठविले, अशी सरकारची धारणा होती.
आपल्या दोन जिवलगांना हौतात्म्य मिळाल्याने निराश झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मादाम कामा यांच्या आमंत्रणामुळे पॅरिसला गेले व काही दिवसांनी भारतात येण्यासाठी निघाले असताना त्यांना लंडनच्या व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनवर १३ मार्च १९१० रोजी अटक केली.
भारतात घेऊन जाऊ लागले असताना ती बोट दुरुस्तीसाठी फ्रान्समधील ७ जुलै १९१० ला थांबली. त्याचवेळी सावरकर बोटीच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीतून ८ जुलै १९१० ला समुद्रात उडी मारून पळून जाऊ लागले.
ते फ्रान्समधील मार्सेलिस बंदराची भिंत ओलांडणार, इतक्यात त्यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर भारतात आणून त्यांच्यावर खटला भरला. त्यांना पन्नास वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि अंदमानात पाठविण्यात आले.
"पन्नास वर्ष! तोवर ब्रिटिश राज्य टिकले तर ना!" हे त्यांचे शिक्षा ऐकल्यानंतरचे तेजस्वी उद्गार भारताच्या इतिहासात नोंदले गेले आहेत.
त्यांना २४ डिसेंबर १९१० ला पहिली व ३१ जानेवारी १९११ ला दुसरी अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा, ५० वर्ष काळ्यापाण्याच्या शिक्षा झाल्या व त्यांना अंदमानमधील सेल्युलर जेलमधील कोठडीत ठेवून, त्यांच्याकडून घाण्याला जुंपून तेल गाळून घेणे, काथ्याची दोर वळणे, असली जुलुमी कामे करून घेण्यात आली.
सावरकर बंधूंची अंदमानच्या जेलमध्ये भेट झाली.
परंतु त्यांना तेथे एकमेकांशी बोलता येत नसे. म्हणून आवाजातून सांकेतिक भाषा तयार करून ते परस्परांशी बोलत असत.
जेलमधील भिंतीवर ते कविता लिहित व पाठ करीत.
बंधु बाबाराव यांना इ.स. १९२१ साली अंदमानातून मुक्त करण्यात आले व भारतात आणून १९२२ ला बाबाराव सावरकरांना तर इसवी सन १९२४ ला सावरकरांना मुक्त करण्यात आले.
अर्थात ‘रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये’, असे सावरकरांना बंधन घालण्यात आले.
त्यांनी 'माझी जन्मठेप' हा ग्रंथ लिहून तुरुंगवासातील आत्मानुभव कथन केले आहेत.
त्यामुळे ते इसवीसन १९२४ ते १९३७ पर्यंत रत्नागिरीत आपल्या पत्नीसोबत राहिले.
त्यांना प्रभात ही कन्या व विश्वास हा मुलगा होते.
रत्नागिरीत त्यांनी पतितपावन मंदिराची उभारणी केली व शंकराचार्यांच्या हस्ते त्याचे उद्घघाटन केले.
अस्पृश्यता निवारण, सहभोजन, रोटीभेदास विरोध या मार्गांनी हिंदू धर्मियांच्या ऐक्यासाठी प्रयत्न केले.
'हिंदू एकता' व 'अखंड भारत' हे त्यांचे ध्येय होते.
१९३७ ला मुक्त झाल्यावर ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले.
इ. स.१९४८ ला गांधीहत्येत त्यांचा हात असल्याच्या संशयावरून त्यांना अटक झाली. पण ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले.
१९६० ला सावरकर बंधूंसाठी ‘मृत्युंजयदिन’ पाळून अंदमानमधील ज्या खोलीत ते राहिले, त्या खोलीला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करून तिथे त्यांचा नामफलक लावण्यात आला.
जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा असलेल्या या थोर क्रांतिकारकास भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी बजावलेल्या महान कामगिरीबद्दल इ.स. १९६५ ला त्यांचा ‘अग्रगण्य स्वातंत्र्यवीर’ म्हणून गौरव करण्यात आला.
माझी जन्मठेप, भारतीय स्वातंत्र्यसमर, संन्यस्त खड्ग, हिंदूपदपादशाही, कमला (काव्यसंग्रह) व काळे पाणी ही त्यांची ग्रंथसंपदा.
१९३८ साली मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
१९४५ ला बाबाराव,१९५६ ला नारायणराव व १९६५ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई देवाघरी गेल्यावर सावरकरांच्या मनावर आघात झाला व त्यांनी २२ दिवस अन्नत्याग करून २६ फेब्रुवारी १९६६ ला आपला प्राण अनंतात विलीन केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा