प्राचीन विद्यापीठे .....

 

  • प्राचीन विद्यापीठे:

  • मौर्यपूर्वकाळात व मौर्यकाळात लेखनकलेचा झालेला विकास, धार्मिक व वाङ्मयीन क्षेत्रात संस्कृत भाषेला मिळणारे उत्तेजन, प्रशासनात व लोकव्यवहारातून अर्धमागधी व पाली सदृश प्राकृत भाषांचा वापर, त्यातून निर्माण झालेली ग्रंथनिर्मिती, गुरुकुले,जैन व बौद्ध मठ, विहार, तीर्थक्षेत्रे यांना मिळणारा राजाश्रय व लोकाश्रय, राजधान्यांंच्या ठिकाणी अथवा तीर्थक्षेत्री आयोजित करण्यात आलेल्या विद्वत सभा, त्यातून आध्यात्मिक विषयांवर घडून येणाऱ्या चर्चा व वाद-विवाद, सर्वसामान्यांची ज्ञानलालसा, यातून विद्या केंद्रे व विद्यापीठांच्या उभारणीस अनुकूल असे वातावरण निर्माण झाले. 

  • या सर्व घडामोडींमधून उत्तर वैदिक कालखंडानंतर भारतात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, गुणशीला, काशी, बनारस, उज्जैनी, कांची, अयोध्या, मिथिला, नाशिक, प्रतिष्ठान, वल्लभी अशी शेकडो छोटी मोठी विद्या केंद्रे व विद्यापीठे उभी राहिली.त्यातील नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला या विद्यापीठांची माहिती बघूया….

  • तक्षशिला :

  • जगाला माहित असलेल्या प्राचीन विद्यापीठांपैकी सर्वात पहिले विद्यापीठ म्हणजे तक्षशिला.

  • हे विद्यापीठ सध्याच्या पाकिस्तानात रावळपिंडी जिल्ह्यातील शाहजी की ढेरी या ठिकाणी वसले होते.

  • तज्ज्ञांच्या मते, इसवी सन पूर्व ८०० च्या पूर्वीपासून हे एक पश्चिमेकडील प्रसिद्ध असे सांस्कृतिक, शैक्षणिक व व्यापारी केंद्र होते.

  • या ठिकाणी भारतातील विद्यार्थ्यांशिवाय बॅबिलोनिया, ग्रीसपासून पूर्वेकडील प्रदेशापर्यंत अनेक देशातील पंडित शिक्षणासाठी येत.

  • अर्थातच त्यासाठी प्रथम घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत त्यांना पास व्हावे लागे.

  • येथील ऋषितुल्य तज्ज्ञ शिक्षक एकाच वेळी ५०० विद्यार्थ्यांना शिक्षण देत असत.

  • तेथे अनेक आचार्य राहत होते आणि त्यांच्याकडे विद्यार्थी स्वतंत्रपणे शिक्षण घेत होते.

  • चंद्रगुप्त मौर्यांचा गुरु आर्य चाणक्य हे देखील तेथील अध्यापक होते.

  • तेथील विद्वानांची विद्वत्ता पाहून जगज्जेता सिकंदरही थक्क झाला होता.

  •  इ.स. ५ व्या व ६ व्या शतकात हुणांचा नेता क्रूरकर्मा मिहिरगुल याने तक्षशीलेचे  विद्यापीठ नष्ट केले.

  • तक्षशिला याठिकाणी ब्राह्मी व खारोष्टी लिपीचा अभ्यास होत होता.

  • स्थापत्यशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, धनुर्विद्या यांचे तेथे शिक्षण दिले जात होते.

  • नालंदा (इसवीसन पूर्व ४०० ते १२००)

  • बिहार राज्यात पाटणा शहराच्या नैऋत्येस सुमारे ४० मैल (६४ कि.मी.) अंतरावर असलेल्या वटगाव येथे या विद्यापीठाचे अवशेष सापडले आहेत.

  • अगदी प्राचीन काळापासून हे विद्या केंद्र प्रसिद्ध आहे.

  • महावीर जैन व गौतम बुद्ध यांनी या विद्या केंद्रात कित्येक वेळा वास्तव्य केल्याचे उल्लेख आढळतात.

  • गुप्त राजांनी उदार आर्थिक सहकार्य दिल्यामुळे ते प्रसिद्ध शिक्षण केंद्र बनले.

  • सम्राट कुमारगुप्त यांच्या काळात म्हणजेच इसवीसन ४१३ ते ४५५ या काळातच खऱ्या अर्थाने या विद्यापीठाची भरभराट झाली.

  •  हे विश्वविख्यात विद्यापीठ असून देशोदेशीच्या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश घ्यावा लागे. 

  • काळातील चिनी प्रवासी फाहियान, हर्षकाळातील युवान श्वांग,इत्सिंग इत्यादी प्रवाशांनी तेथे काही वर्ष वास्तव्य करून बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे.

  • एकाच वेळी १०,००० विद्यार्थी येथे शिक्षण घेत.

  • देशाच्या विविध भागातून आलेले १५१० शिक्षक त्यांच्या अध्यापनाचे काम करीत.

  •  हे एक प्रगत विद्याकेंद्र असून भाषाशास्त्रापासून विज्ञानापर्यंत सर्व विषय सारख्याच तन्मयतेने शिकविले जात.

  • याठिकाणी आयुर्वेदाचे स्वतंत्र केंद्र होते.

  • त्या त्या काळातील अनेक राज्यकर्त्यांनी या विद्यापीठाला राजाश्रय दिला होता.

  • तेथील उत्खननावरून नालंदा विद्यापीठाचा परिसर साडेअकरा कि.मी.चा होता.

  • अध्ययन-अध्यापनासाठी २०० खोल्या होत्या. इतरही अनेक इमारती तेथे होत्या.

  • राजा हर्षवर्धन यांनी तर २०० गावे या विद्यापीठाला दान दिली होती.

  • धर्मपाल, चन्‍द्रपाल, गुणमती, स्थिरमती, शिलभद्र असे प्रसिद्ध कुलपती तेथे होऊन गेले.

  •  तेथील ग्रंथालय प्रसिद्ध होते. बौद्ध वाङ्मयाचे तेथे जतन केले होते.

  •  इतर विषय शिकविण्याचीही सोय तेथे होती.

  •  या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्ण मुद्रांकित प्रशस्तिपत्रे किंवा पदके दिली जात.

  • विक्रमशिला  (इ.स. ८०० ते १२००)

  • नालंदापासून अवघ्या २० मैल ३२ कि.मी. अंतरावर सहा महाविद्यालयांमध्ये हे विद्यापीठ वसले होते.

  • पाल घराण्याचा संस्थापक धर्मपाल याने इ.स. ८ व्या शतकात उत्तर भारतात जागतिक कीर्ती मिळविलेल्या विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली होती.

  • तेथे विविध इमारती व ग्रंथालये होती.

  • तिबेटी विद्यार्थ्यांच्यासाठी स्वतंत्र सोय होती.

  • तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत.

  • आचार्य अतिश यांच्या नेतृत्वाखाली १०८ आचार्य तेथे अध्यापन करीत, असे उल्लेख आहेत.

  • विक्रमशिला विद्यापीठ स्थापन करण्यात पालवंशीय, बौद्धधर्मीय राजा धर्मपाल यांचा फार मोठा वाटा होता.

  • व्याकरण, तर्कशास्त्र, अध्यात्म व तंत्रवाद इत्यादी विषयांचे तेथे शिक्षण दिले जात होते.

  • पाल राजानंतर सेन या हिंदू राज्यकर्त्याने त्यास राजाश्रय दिला होता.

  •  प्रामुख्याने बौद्ध धर्म व साहित्य, तत्त्वज्ञानावर तेथे अभ्यास होई, विशेषत: तिबेटी पंडित तेथे विद्यार्थी म्हणून येत.

  •  याही विद्यापीठाचा विध्वंस बख्तियार खिलजीने करून तेथील ग्रंथसंपदा जाळून टाकली.

  • या सर्व विद्यापीठांनी विविध विषयांच्या पारंपरिक ज्ञानाचे जतन केले. त्यात वाढ केली आणि भारतीय संस्कृतीला समृद्ध बनविले.

  • व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या प्रगतीसाठी या विद्यापीठांनी मौलिक कामगिरी केली. 

  • मानवाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, शीलसंवर्धन व समाजाची नैतिक धारणा हे प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीचे वैशिष्ट्य होय.

टिप्पण्या