मल्हारराव होळकर यांची पुण्यतिथी - २० मे
जन्म - १६ मार्च १६९४
मृत्यू - २० मे १७६६
मल्हारराव होळकर यांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबात १६ मार्च १६९४ ला झाला होता.
मल्हारराव होळकर यांचे पूर्वज खानदेशातले वाम या गावी राहत.
नंतर ते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील नीरेच्या काठी 'होळ' या गावी स्थायिक झाले.
त्यावरून त्यांना होळकर किंवा वायूगावकर असे म्हणत.
भोजराज मामांची मुलगी गौतमी हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला.
त्यांना खंडेराव हा एक मुलगा होता.
मल्हारराव आपल्या पराक्रमाने, घराणेशाहीची कसलीही परंपरा नसतांना, स्वबळावर पुढे येत, पुढे मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले.
ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते.
अंगी गुण असले, वीरश्री असली तर सामान्य धनगर मुलगा कसा बनू शकतो, हे मल्हाररावांनी सिध्द करून दाखवले.
गनिमी कावा आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर उत्तर हिंदुस्थानात त्यांचा मोठा दबदबा निर्माण झाला होता.
मल्हारराव सुरुवातीला खानदेशातील कंठाजी कदमबांडे यांच्या सैन्यात होते.
पहिल्या बाजीरावाने त्यांचे कौशल्य हेरून आपल्या पदरी ठेवले आणि त्यांच्या खर्या उत्कर्षाला प्रारंभ झाला.
सन १७४५ पर्यंत त्यांच्या ताब्यात ७४|| लक्षांचा मुलूख होता.
मल्हाररावांनी इंदौर येथे राजधानी करून अनेक धनगर कुटुंबे ऊर्जितावस्थेत आणली.
मल्हारराव केवळ शिपाईगडी नव्हता.
धर्मरक्षण, विद्येस उत्तेजन, मंदिरांची निर्मिती, इंदौर शहराचा विकास याकडेही त्यांनी लक्ष दिले.
दुर्दैवाने खंडेराव हा मल्हाराव होळकर यांचा मुलगा १७५४ मध्ये कुंभेरी येथे सुरजमल जाटाबरोबरच्या लढाईत ठार झाला.
पुत्रवियोगाचे दुःख पचवून त्यांनी अनेक मोहिमा उघडल्या.
मोगली सरदार नजीबखानाने केलेल्या चुका अनेकदा पोटात घातल्या. त्याला मोकळे सोडून दिले.
त्यांच्या याच कृतीने त्यांचा घात झाला. पुढे याच नजीबखानाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले.
'शीर सलामत तो पगडी पचास' या न्यायाने वागणा-या मल्हाररावांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या वेळी पेशव्यांना गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला दिला.
त्यावरून सदाशिवराव भाऊंशी मल्हाररावांचे मतभेद झाले.
मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि मराठ्यांना पानिपतावर मोठा पराभव स्वीकारावा लागला.
मल्हारराव होळकर गनिमी काव्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.
पानिपतच्या रणांगणातून कसाबसा जीव वाचवून परत ते आले.
पराभवाचे शल्य बोचत असतानाच सप्टेंबर १७६१ मध्ये त्यांची पत्नी गौतमीबाई यांचे निधन झाले. त्यामुळे मल्हारराव आणखीनच खचले.
बादशहाचे सर्व सरदार, वजीर मल्हारराव आणि राणोजी यांना टरकून असायचे.
अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठे बादशहाचे रक्षण करू शकतात, असा विश्वास बादशहाच्या मनात निर्माण झाला.
मुलगा खंडेरावाच्या मृत्यूनंतर प्रजाहित व दौलतीचा सांभाळ करण्यासाठी सासरे मल्हारराव यांनी सून अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही.
अहिल्याबाईंची राजकारणातील समज पाहून ते त्यांच्याशी अनेकदा सल्लामसलत करीत असत.
पेशव्यांकडून इंदौर संस्थानची जहागिरी मिळवून, त्यानंतर २० मे १७६६ मध्ये मल्हाररावांचा मृत्यू झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा