आचार्य बाळशास्त्री जांभेकर.....

 

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी - १७ मे

  • स्वतःच्या कुटुंबाच्या योगक्षेमाची आद्य जबाबदारी प्रथम पाहून नंतर राष्ट्राच्या जबाबदारीकडे लक्ष घालणारे अनेक महापुरुष होऊन गेले.

  • आजही काही तसे आढळतात. तथापि असे काही महाभाग आहेत की, जे आपल्या ध्येयापायी कुटुंब पोषणाची जबाबदारी मानून सर्वस्वी ध्येयपूर्तीकरिता स्वतःला वाहून घेतात.

  • अशा ध्येयनिष्ठांपैकी आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे एक होय.

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक.

  •  मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत होते.

  • त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले (पोफळे) या खेडेगावी इ.स.१८१० मध्ये झाला. (काही ठिकाणी हे साल इ.स. १८१२ असे आहे.) ते एका पुराणिकाचे सुपुत्र होते.

  •  त्यांनी संस्कृत, इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल  गुजराती, बंगाली, फारशी या विषयांचे ज्ञान संपादन केले होते.

  • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी झाले.

  • त्यानंतर त्यांची सरकारमार्फत अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून नेमणूक झाली. तेथेच त्यांनी कानडी भाषा आत्मसात केली.

  • याच सुमारास एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

  •  पुढे त्यांची शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे डिरेक्टर आणि मुंबई इलाख्यातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून सरकारने नियुक्ती केली. 

  • विविध पदांवर काम करीत असताना त्यांनी इतिहास संशोधनातही भाग घेतला.

  • इ.स. १८४६ मध्ये प्राचीन शिलालेखांच्या वाचनासाठी बनेश्वरला गेले असता तेथे त्यांना तापाने पछाडले. त्यातच त्यांचे १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे आकस्मित निधन झाले.

  • शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी त्यांनी अनेक शालेय पाठ्यपुस्तके तयार केली. ते थोर शिक्षणतज्ज्ञ होते.

  •  त्यांनी 'शून्यल ओझोनब्धि' हे पुस्तक मराठी भाषेत लिहिले. 

  • बाळशास्त्री जांभेकर यांचे शिष्य केशवराव भवाळकरांनी जांभेकरांनी शिक्षकांना केलेला उपदेश आपल्या चरित्रात दिला आहे. ते म्हणतात -- "पूर्वकाळचे महाप्रबुद्ध ऋषिजन हे अरण्यवास पत्करून विद्यासंपन्न होत आणि विद्यादान करीत. त्यांनी आपल्या देशात अपूर्व ज्ञानभांडारे भरून ठेवली आहेत. ती इतकी तुडुंब आणि ओतप्रोत आहेत की, ती  नुसतीच चाळावयालाच संबंध जन्म पुरायचा नाही. त्या ऋषींचे आपण वंशच म्हणवतो. मग विद्याभ्यास अन्  विद्यादान करण्याची आपणास का लाज वाटावी? विद्याभिलाषि व्हा, विद्याभ्यास करा, लोकांना सुशिक्षण द्या, स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा," यावरून त्यांच्या शिक्षणाविषयी विचारांची कल्पना येते.

  • वृत्तपत्र हे जनजागृतीसाठी सार्वजनिक जीवनातील प्रचंड शक्ती आहे, हे ओळखून 'दर्पण' हे  ६ जानेवारी १८३२ मध्ये मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरु केले.

  •  इंग्रजी व मराठी भाषेत ते निघत होते.

  •  त्यांनी समाजाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे विचार त्यातून मांडले आहेत.

  • स्री-शिक्षण, पाश्चात्त्य ज्ञान, विधवाविवाह, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, शुद्धीकरण इत्यादी सुधारणांचा त्यांनी त्यातून पुरस्कार केला. 

  •  तसेच बुद्धिनिष्ठ व प्रगत आचार-विचार स्वीकारण्याचे समाजाला आवाहन केले.

  • म्हणूनच त्यांना आपण महाराष्ट्रातील आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक आणि सुधारणा वाद्यांचे प्रवर्तक मानतो. 

  • आचार्य जावडेकर म्हणतात, "महाराष्ट्राच्या बुद्धीला आधुनिक वळण देणारा पहिला सुधारक विचारवंत होय."

  • ज्ञान आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणे, सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, जनतेला त्यांची कर्तव्य सांगणे, राजकर्त्यांच्या हुकूमशाहीला लगाम घालणे, हे सामर्थ्य वृत्तपत्रांच्या अंगी आहे.

  • जीवनाकडे उदार दृष्टीने पाहिले पाहिजे, या प्रश्‍नाकडे त्यांनी लोकांचे लक्ष केंद्रित केले.

  • प्रकारच्या अन्यायी व अत्याचारी धोरणावरही टीका केली. 

  • जनतेतील दोष, त्यांच्या अडाणी समजुती दूर करण्याचे प्रयत्न केले.

  • दर्पण बंद होण्याच्या सुमारास म्हणजेच सन १८४० मध्ये त्यांनी 'दिग्दर्शन' नावाचे मराठी भाषेतील पहिले मासिक सुरू केले.

  • विज्ञानाचा लोकांमध्ये प्रचार करणे, हा त्यामागील उद्देश होता. 

  • या मासिकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे, "विद्या मनुष्यमात्राचे उपयोगी आहे. विद्येपासून कीर्ती, द्रव्य यांचा लाभ होतो. विद्येमुळे पुरुषांचा बहुमान होतो, विद्या श्रीमंतास भूषण,  गरीबास पोटास साधन, तरुणास उत्तम उद्योग, वृद्धास विश्रांती आणि सर्वांना मोक्षप्राप्तीचा उपाय आहे."

  • त्यांचे कार्य व गुण पाहूनच सरकारने त्यांना "जस्टिस ऑफ पीस" हा बहुमान बहाल केला होता.

  • साहित्यिक गुण, विद्वत्ता आणि अनेक विषयांचा गाढा अभ्यास यामुळे जांभेकरांनी इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, व्याकरण व विज्ञान इत्यादी विषयांवर पुस्तके लिहिली.

  •  भारतीय शिलालेख आणि ताम्रपट यांचे संशोधन व वाचन करून अनेक निबंध लिहिले. 

  • त्यामुळे त्यांना आद्य इतिहासकार मानले जाते. 

  • जांभेकरांच्या विद्वत्तेला कल्पकतेची व लोककल्याणाची दृष्टी होती.

  •  बाल व्याकरण, नीतिकथा, सार संग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, संध्येचे भाषांतर, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इत्यादी त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत.

  • या काळातील एकूण विचारसरणीचा विचार करता बाळशास्त्री जांभेकर सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातही आघाडीवर होते.

  • इंग्रजांच्या आगमनाबरोबर इंग्रजी विद्या, त्यांचा धर्म व संस्कृतीही भारतात आली.

  • त्यामुळे इंग्रजी शिक्षणाबरोबरच ख्रिस्ती धर्माचा ही प्रसार भारतात होऊ लागला, हे जांभेकरांच्या लक्षात आले. 

  • हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना परत शुद्ध करून स्वधर्मात घ्यावे, असे त्यांचे स्पष्ट विचार होते. 

  • या विचारांशी निगडीत असे शेषाद्रि यांचे प्रकरण उद्भवले.

  •  शेषाद्री या ब्राह्मणाची नारायण व श्रीपाद अशी दोन मुले होती.

  •  मिशनर्‍यांच्या शाळेतील सहवासामुळे नारायण यांनी धर्मांतर केले. ही घटना मुंबईत खळबळ उडवून देणारी ठरली.

  • त्यामुळे श्रीपादने धर्मांतर करू नये, म्हणून जांभेकरांनी त्याच्या वडिलांना पुढे करू करून सुप्रीम कोर्टाकडून ताबा मिळवला.

  • तो भ्रष्ट झाला आहे, त्यामुळे एकदा भ्रष्ट झालेला हिंदू शुद्ध करून घेण्यास शास्त्राची अनुमती नाही, असे मत काही सनातनी पंडितांनी मांडले. 

  • मात्र जांभेकरांनी श्रीपादला काशीला पाठवून स्वधर्मात शुद्ध करून घेतले. 

  •  त्याचा परिणाम म्हणून सनातनी लोकांनी शास्त्रींना बहिष्कृत केले.

  •  समाजात फूट पडणे धोक्याचे आहे, हे ओळखून शास्त्रींनी प्रायश्चित्त करून घेतले.

  • सामाजिक व धार्मिक सुधारणा या बुद्धीवादाने आणि तारतम्याने करावयास पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती, म्हणूनच त्यांना 'आद्य समाजसुधारक,' 'मराठी वृत्तपत्राचे जनक,' 'आद्य इतिहास संशोधक,' 'सुधारणावाद्यांचे प्रवर्तक,' 'व्यासंगी पंडित' अशा शब्दांनी गौरविले जाते. 

  • बाळशास्त्री यांच्यासंदर्भात हर्डीकर म्हणतात, 'निरपेक्षपणे संपूर्ण आयुष्यभर सर्व प्रकारची झीज सोसून लोकशिक्षण, वाङमय व इतिहास यांची एकनिष्ठेने सेवा करणारा असा त्यागी कार्यकर्ता फार विरळा. जांभेकरांच्या आयुष्याचे सिंहावलोकन केल्यास, त्यात देशभक्ती, लोकसेवेची तळमळ, तत्त्वनिष्ठा व तिच्यासाठी त्याग करण्याची तयारी, लेखनचातुर्य, व्यासंग, चिकाटी इत्यादी सद्गुण प्रकट झालेले आढळून येतात.'



टिप्पण्या