१७ व्या शतकात युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली.
स्वराज्याची स्थापना ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी घटना होती.
महाराजांनी मराठी माणसांचे संघटन करून त्यांना स्वातंत्र्याच्या विचारांनी भारून टाकले.
सामान्य मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत केला. त्याला स्वराज्य, स्वधर्म, स्वदेश व स्व-संस्कृती यांच्या रक्षणासाठी लढण्याची व प्रसंगी आत्मसमर्पण करण्याची प्रेरणा दिली.
त्यांनी आदिलशाही, मुघल यांच्यासारख्या प्रबळ सत्तांशी संघर्ष करून मराठी सत्तेला स्थिर पायावर उभे केले.
सन १६८० मध्ये हा युगपुरुष अनंतात विलीन झाल्यानंतर युवराज संभाजीराजे हे मराठ्यांचे छत्रपती झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपतींच्या गादीसाठी थोडा संघर्ष झाला.
पण युवराज संभाजीराजेच छत्रपती झाले.
संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनंतर आदिलशहा, पोर्तुगीज व सिद्दी यांच्याविरुद्धच्या मोहिमांमध्ये यश मिळवले, पराक्रम दाखवला, त्यामुळे संभाजीराजांचा दरारा वाढला.
जून १६८० मध्ये बादशहा औरंगजेबाचा मुलगा शाहजादा अकबर बापाविरुद्ध बंड करून दक्षिण भारतात छत्रपती संभाजींच्या आश्रयाला आला.
ही घटना औरंगजेबाने गांभीर्याने घेतली. आपल्या साम्राज्याला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी अकबर व मराठ्यांचा नि:पात करण्याचे त्याने ठरवले.
प्रचंड मोगल फौजेसह तो दक्षिणेत आला. १६८१ ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच १७०७ पर्यंतच्या या २६ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात मराठा- मोगल यांच्यात मोठा संघर्ष झाला.
या काळात मराठे मोठ्या जिद्दीने मोगलांच्या बरोबर लढले. हा लढा मराठ्यांच्या इतिहासात 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध' म्हणून ओळखला जातो.
मोगलांनी चार वर्ष मराठ्यांच्या स्वराज्यावर झंझावाती हल्ले चढवले.
परंतु संभाजीराजांवर त्यांना निर्णायक विजय मिळविता आला नाही. म्हणून त्यांनी आदिलशाही व कुतुबशाहीकडे आपला मोर्चा वळविला.
दोनच वर्षात सन १६८६-१६८७ मध्ये मोगलांनी हे दोन्ही राज्य नष्ट केले.
उत्साहित झालेल्या मोगलांनी संभाजीराजांवर पुन्हा नेटाने हल्ले चढवले.
त्याला छत्रपती संभाजीं महाराजांनी देखील तितक्याच समर्थपणे तोंड दिले.
पण कोकणातील संगमेश्वर येथे संभाजीराजेंना मोगलांनी पकडले.
मार्च १६८९ मध्ये वडु बुद्रुक येथे औरंगजेब बादशहाने संभाजीराजांना हाल-हाल करून क्रूरपणे त्यांचा वध केला.
स्वकीयांचा विरोध, कमी लष्करी ताकद, अपुरी साधनसामग्री असतानासुद्धा संभाजीराजांनी ज्या धैर्याने, शौर्याने व बेडरपणे मुघलांशी ८-९ वर्ष लढा दिला, तो मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाचा व अप्रतिम मानला जातो.
संभाजी महाराजांच्या दिव्य बलिदानाने मराठी राज्य थरारले. पण लवकरच मराठे या धक्क्यातून सावरले.
आपल्या छत्रपतींनी ज्या पद्धतीने मृत्यू स्वीकारला, त्याचा जादूसारखा परिणाम मराठ्यांवर झाला.
छत्रपतींच्या वधाचा सूड घेण्यासाठी ते सज्ज झाले.
संभाजी राजांनी मराठ्यांना स्वराज्य व स्व-धर्माच्या रक्षणासाठी आत्माहुती देण्यास प्रवृत्त केले.
आता मराठ्यांची राजधानी 'रायगड' ही बादशहाचे लक्ष होते.
त्या वेळी रायगडावर छत्रपती संभाजी राजांच्या पत्नी येसूबाई, मुलगा शाहू, भाऊ राजाराम महाराज, राजकुटुंब व प्रधानमंडळ, काही सेनानी आणि मुत्सद्दी होते.
राजधानी व वरील सर्व व्यक्ती आपल्या हाती आल्यास मराठ्यांचे राज्य संपुष्टात येईल, असा विचार करून मोगलांनी ताबडतोब रायगडाला वेढा घातला.
या वेळी रायगडावर असणाऱ्या सर्व प्रमुख मंडळींनी सल्लामसलत केली. त्यात प्रमुख राणी येसूबाई होत्या.
त्यांनी निस्वार्थीपणाचा एक महान आदर्श मराठ्यांना घालून दिला.
त्यांनी मोठ्या धीराने आणि दूरदृष्टीने मराठ्यांची बाजू सावरली.
राजाराम महाराजांना गादीवर बसवून, त्यांना मराठ्यांचे छत्रपती म्हणून घोषित केले.
छत्रपती राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून मुघलांशी लढा चालू ठेवावा.
महाराष्ट्रातून न जमल्यास जिंजीस जावे,असा सल्ला येसूबाईंनी दिला.
सर्व मुत्सद्दी व सेनानींना मोगलांशी संघर्ष करण्यास सांगितले. सर्वजण रायगडाच्या बाहेर पडले.
स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी प्रयत्न करू लागले.
मराठ्यांच्या या राजाने स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केलाच, पण मोगली शत्रूशी लढा देण्याची तयारी केली.
शत्रूशी सतत आठ-नऊ वर्षे लष्करी संघर्ष केला.
हा संघर्ष चालू असतानाच ते शत्रूच्या जाळ्यात पकडले गेले आणि शत्रूने त्यांचा वध केला.
संभाजी महाराजांच्या हौतात्म्याने मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे एक पर्व समाप्त झाले.
या पर्वाचा शेवट अत्यंत दुःखद झाला, तरी हा मराठी प्रजेला आपल्या छत्रपतींच्या वतीने धक्का दिला गेला.
त्यामुळे एक अनामिक चेतावणी दिली गेली.
पुरंदर किल्ल्यावर १४ मे रोजी मराठ्यांचा दुसरा छत्रपती संभाजी राजा सईबाई राणीसाहेबांच्या पोटी जन्मला.
राजे अवघे दोन वर्षांचे असतानाच मातृसुखाला पारखे झाले. तेव्हापासून ते आपली आजी जिजाबाईंच्या मायेखाली वाढले.
आईविना पोर म्हणून संभाजीराजांचे कोडकौतुक अधिक झाले असणे स्वाभाविक होते.
स्वराज्याचा युवराज म्हणून संभाजीराजांना हळूहळू महत्व प्राप्त होत होते.
पुरंदरच्या तहाच्या वेळी त्यांचे वय अवघे ८ वर्षांचे असूनही त्यांना बादशहाकडून पंचहजारी मनसब बहाल करण्यात आली.
राजकारणाशी इतक्या लहान वयात त्यांचा संबंध आला होता.
पुढच्याच वर्षी शिवाजी महाराजांबरोबर त्यांना जावे लागले.
दिल्लीच्या बादशहाच्या दरबारातील वैभव, थाटमाट, मोगली राहणी इत्यादी गोष्टींचा ठसा त्यांच्या बालमनावर उमटला असावा.
आग्रा भेटीत पिता-पुत्रांवर संकट कोसळले.
त्यातून पित्याच्या असामान्य कर्तृत्वाने ते सहीसलामत सुटले. तरी त्यांना परतीचा प्रवास एक गरीब ब्राह्मणाचा पोर म्हणून लपत-छपत करावा लागला.
वयाच्या ९-१० व्या वर्षी केवढ्या मोठ्या संकटातून या युवराजाला जावे लागले, याची आपण कल्पना करू शकतो.
आग्र्याहून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांचा मोगलांशी पुन्हा १६६७ मध्ये सहकार्याचा करार झाला.
यानुसार संभाजीराजांना पुन्हा मोगलांची मनसबदारी मिळाली.
मोगलांच्या विलासी जीवनाशी आणि त्यांच्या आचार-विचारांशी त्यांचा पुन्हा एकदा जवळचा संबंध आला.
सन १६७१ साली वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना रायगडावर राज्याचा काही कारभार सांगितला.
पुढच्या वर्षापासून युवराज संभाजी मराठी सैन्याचे अधिपत्यही करू लागले.
सन १६७२ सालीच अॅबे करे हा फ्रेंच प्रवासी संभाजीराजांबद्दल लिहितो, "शिवाजीराजांनी १०,००० शूर अशा सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या किर्तीस साजेल, असाच शूरवीर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल बापाबरोबर तो युद्धकलेत तरबेज झालेला असून, चांगल्या वयोवृद्ध सेनापतीशीही बरोबरी करील, इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अति स्वरुपवान आहे."
सन १६७४ ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या वेळी युवराज म्हणून संभाजीराजांना मान मिळाला.
यानंतर महाराजांनी त्यांना मुलकी व लष्करी कारभारातील अनेक कामगिरी सांगून त्यास राज्यकारभाराचे शिक्षण मिळावे, म्हणून प्रयत्न केलेला दिसतो.
याच सुमारास शाक्तपंथीय निश्चलपुरी कवी कलश या पंडिताच्या सहवासात संभाजीराजे आले असावेत.
संभाजी महाराजांना राजपद मिळू नये, म्हणून ज्यांनी कारस्थान केले, त्यांच्या अपराधांना क्षमा करून संभाजी महाराजांनी त्यांना अधिकाराच्या व सन्मानाच्या जागा दिल्या.
एखाद्या व्यक्तीवर अशी संकटे एकामागून एक येतात, की ती व्यक्ती संकटांसाठी जन्मली आहे, असे वाटावे.
संभाजी महाराजांचे जीवन हे असेच संकटांनी भरलेले आहे.
पित्याच्या मृत्यूनंतर हक्काने प्राप्त होणाऱ्या राजपदासाठी त्यांच्यावर कोसळलेले संकट कमी गांभीर्याचे होते म्हणून की काय, त्यांच्यावर लागोपाठ दोन संकटे कोसळली. एक विष प्रयोगाचे आणि दुसरे पदच्युत करण्याचे.
या प्रसंगावर भाष्य करताना श्री. सेतुमाधवराव पगडी म्हणतात, "संभाजी राजे या तीनही कारस्थानातून सुखरूपपणे बाहेर पडले. औरंगजेबाच्या रुपाने स्वराज्यावर भयंकर संकट कोसळू पाहत असता अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद,बाळाजी आवजी इ. शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या मुत्सद्द्यांनी अकबराची मदत घेऊन संभाजी राजांना गादीवरून काढून टाकण्याचे कारस्थान करावे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हे कृत्य राष्ट्रद्रोहीच म्हटले पाहिजे. हे कारस्थान यशस्वी झाले असते, तर हिंदवी स्वराज्याचा ग्रंथच आटोपला असता."
मराठ्यांच्या राज्यावर येऊ घातलेल्या संकटांचा फायदा सिद्दीसारख्या मराठ्यांच्या शत्रूंनी घेतला नसता, तरच नवल होते.
त्यांनी मराठ्यांच्या ठाण्यांवर हल्ले सुरू केले होते.
परिणामी त्यांना शिक्षा करण्यासाठी संभाजी महाराज व अकबर यांनी २०,००० फौजेनिशी दंडराजापुरीस वेढा घातला.
स्वराज्य आणि स्वराज्याच्या बाहेर शक्य तेथे व शक्य होईल त्या शक्तीनिशी मराठे मोगलांचा प्रतिकार करत होते.
त्यांच्या फौजा नाशिक, बागलाण, औरंगाबाद, अहमदनगर विभागात धुमाकूळ घालत होत्या.
रामशेज हा किल्ला नाशिकजवळ आहे. तो यावेळी मराठ्यांच्या ताब्यात होता.
रामशेज काबीज करण्याच्या कामगिरीवर बादशहाने शहाबुद्दीन नावाच्या सरदारास एप्रिल १६८२ मध्ये पाठवले.
त्याने किल्ल्याला वेढा घालून किल्ला घेण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. तथापि किल्ल्यावरील मराठ्यांनी तेवढ्याच शौर्याने प्रतिकार केला.
शहाबुद्दीन खाननंतर बादशहाने बहादुरखानास रामसेजवर पाठवले. किल्ला काबीज करण्याचा त्यानेही बराच खटाटोप केला. परंतु तो सर्व वाया गेला. त्यालाही यश आले नाही.
त्यानंतर बादशहाने कासीमखान किरमाणी या तिसऱ्या सेनानीची नेमणूक केली. त्यालाही अपयश आले.
अशाप्रकारे रामसेजच्या किल्ल्यातील मराठ्यांनी मोठ्या पराक्रमाने तीन मोठ्या सरदारांशी लढा दिला.
रामसेजचा किल्ला अजिंक्य ठेवला. म्हणून
संभाजी महाराजांनी पोशाख, रत्नजडित कडे बक्षीस देऊन रामसेजच्या किल्लेदाराचा सन्मान केला.
सरदार हसन अली खान, रणमस्तखान, रहुल्लाखान, शहाजादा आजमशहा यांचा मराठ्यांपुढे टिकाव लागला नाही.
संभाजी राजांच्या मृत्यूपूर्वी महाराष्ट्रात मोगल-मराठा यांची स्थिती कशी होती, हे सांगताना श्री. पगडी म्हणतात की, "घाटावरील मैदानी भागात मोगलांनी साऱ्याच ठिकाणी आपली ठाणी बसवली होती. चाकण, शिरवळ, वाई, सुपे, बारामती, इंदापूर, कोल्हापूर या आणि इतर काही ठिकाणी मोगल ठाणेदार नेमले होते. मराठ्यांशी त्यांच्या सारख्या चकमकी चालू होत्या. उत्तर कर्नाटकात मराठे आणि विजापूरचे काही जुने सरदार एकत्र होऊन मोगलांशी लढत होते. मराठ्यांचे मोठे बळ म्हणजे किल्ले. पन्हाळगड, विशाळगड, पुरंदर, सिंहगड, रायगड, तोरणा, प्रतापगड इत्यादी किल्ले शाबूत होते. ते लढविण्याची संभाजी राजांची जय्यत तयारी होती."
आपणास दिसून येईल की, संभाजी महाराजांची कैद होण्यापूर्वी मराठ्यांचे राज्य बहुतांशी सुरक्षित होते. ते नष्ट झाले ते संभाजी महाराजांची कैद झाल्यानंतर, ही गोष्ट ध्यानात येणे आवश्यक आहे.
मुघल, सिद्दी, पोर्तुगीज अशा तीन प्रमुख शत्रूंशी लढताना संभाजी महाराजांना मोठ्या फौजा उभाराव्या लागल्या.
त्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांच्या १०,०००, २०,०००, ३०,००० अशा फौजा स्वराज्यात आणि स्वराज्याच्या बाहेर फिरताना दिसतात.
या सर्व फौजांचे संयोजन व नेतृत्व करणे म्हणजे सोपी बाब नव्हती.
संभाजीराजे जर विलासात राहणारे राजे असते, तर मोगली आक्रमणापुढे त्यांचा कधीच टिकाव लागला नसता.
आपल्या राज्याचे आपल्या सर्व सामर्थ्यानिशी ते संरक्षण करत असल्याचे त्यांच्या चरित्रावरून दिसते.
कर्तबगार,पराक्रमी व तेजस्वी राजा संभाजी--
संभाजी हा एक नादान राजा होऊन गेला व त्याने मराठ्यांचे राज्य बुडविले, अशाप्रकारे एक गैरसमज आमच्या इतिहासात आढळून येतो.
बखरकारांनी आणि आधुनिक नाटककारांनी व कादंबरीकारांनी संभाजीराजे म्हणजे अविचारी, दारूबाज, बाहेरख्याली, विलासी होता, असे चित्र रंगवले.
यामुळे त्यांच्याबद्दलचा बराच गैरसमज महाराष्ट्रात पसरला होता.
इतिहासकार सरदेसाई व सर जदुनाथ सरकार यासारख्या इतिहासकारांनीही असाच संभाजी आपल्या इतिहासात रेखाटला आहे.
संभाजी महाराज यांचे हे विकृत चित्र पुसून त्यांची खरी कर्तबगारी जगापुढे मांडण्याचे काम वा.सी. बेंद्रे, सेतू माधवराव पगडी, डॉ. सौ.कमल गोखले इ. इतिहासकारांनी केले आहे.
या इतिहासकारांनी आपल्या ग्रंथात हे साधार दाखवून दिले आहे की, संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने मोगली आक्रमणाशी सतत ८-९ वर्षे लढा दिला.
साधनसामग्री अपुरी असतांना, लष्करी ताकद कमी पडत असताना, स्वकीयांचा विरोध होत असतानाही त्यांनी ज्या तडफेने फौजांचा प्रतिकार केला, ती तडफ मराठ्यांच्या इतिहासात विलक्षण महत्त्वाची मानली पाहिजे.
संभाजी महाराजांच्या क्रूर वधाने सर्व महाराष्ट्र थरारून उठला.
हा एका व्यक्तीचा वध नव्हता, तर हा मराठ्यांच्या राजाचा, छत्रपतींचा वध होता; आणि तोही हाल-हाल करून केलेला वध होता.
त्या वधाच्या धक्क्याने मराठ्यांना काही काळ दिग्मूढ करून टाकले.
संभाजी महाराजांचा वध केल्यावर बादशाहाला वाटले होते की, मराठ्यांचे राज्य बुडाले.
वर्षाच्या आतच त्यास कळून चुकले की, मराठे त्वेषाने लढत आहे.आपण जिंकलेले किल्ले परत जिंकून घेत आहे.
हा चमत्कार संभाजी महाराजांच्या वधामुळे व त्यातून मराठ्यांना मिळालेल्या प्रेरणेने झाला होता.
छत्रपती संभाजी महाराजांनी मराठी राज्यासाठी केलेली ही शेवटची आणि तेजस्वी कामगिरी होती.
आपल्या हौतात्म्याने त्यांनी स्वातंत्र्यदेवतेचे होमकुंड प्रज्वलित केले आणि असंख्य मराठ्यांना आपल्या प्राणाची आहुती देण्यास प्रवृत्त केले.
संभाजी महाराजांचा वध ही मोगल बादशहाची फार मोठी चूक झाली.
या चुकीचे प्रायश्चित्त त्याला पुढे १८-१९ वर्ष मराठ्यांशी झगडून घ्यावे लागले. शेवटी त्यातच औरंगजेबाचा अंत झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा