महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी समाज रचना :
ग्रामीण समाज हा पारंपरिक समाज असून तो खेडोपाडी विखुरलेला आहे, तर नागर समाज हा लहान-मोठ्या, नव्या-जुन्या शहरांमध्ये विखुरलेला आहे.
मात्र स्वातंत्र्योत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणाच्या प्रभावाखाली व वाढत्या सामाजिक अभिसरणामुळे पारंपारिक ग्रामीण समाजाची विशिष्ट रचना, म्हणजेच महाराष्ट्रातील बलुतेदारी-अलुतेदारी पद्धती विस्कळीत होत आहे.
याचबरोबर समाजाची नवीन जडणघडणही होत आहे.
ग्रामीण समाज --
महाराष्ट्रातील पारंपारिक ग्रामीण समाज शेतीनिष्ठ किंवा कृषिकेंद्री आहे.
या समाजात शेतकरी हा मध्यस्थानी असून त्याच्या विविध गरजा भागवणारे बिगर शेतकरी व्यावसायिक समाजगट शेतकऱ्यांवर अवलंबून आहे.
शेतकरीही बिगर-शेतकरी व्यवसायिकांवर अवलंबून आहेत.
शेतकरी व त्याच्यावर अवलंबून असणारे भटक्या जमातींचे लोकही ग्रामीण समाजाचा अविभाज्य भाग आहेत.
हा सर्व ग्रामीण समाज अर्थातच, जाती बद्ध समाज आहे.
पारंपारिक ग्रामीण समाजात बलुतेदारी पद्धती होती.
यानुसार शेतकऱ्यांची अधिक महत्त्वाची कामे करणाऱ्या व त्यांच्या नित्याच्या गरजा भागविणाऱ्या बिगरशेती व्यवसायिकांना बलुतेदार म्हणत. त्यांना कारू असेही म्हणत.
हे बलुतेदार पुढीलप्रमाणे होते --१. चौगुला २. महार ३. सुतार ४. लोहार ५. कुंभार ६. चांभार ७. न्हावी. ८. सोनार ९. जोशी १०. परिट ११. गुरव १२. कोळी.
याशिवाय शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागविणाऱ्या बिगरशेती व्यावसायिकांना अलुतेदार म्हणत. त्यांना नारू असेही म्हणत.
हे अलुतेदार पुढीलप्रमाणे होते -
१. तेली २. तांबोळी ३. साळी ४. सनगर ५. माळी ६. शिंपी ७. गोंधळी ८.भाट ९. डवऱ्या १०. ठाकर ११. गोसावी १२. मुलाणी १३. वाजंत्री १४. घडशी १५. कलावंत १६.तराळ १७. कोरव १८.भोई.
१९५८ च्या कायद्यानुसार बलुतेदार-अलुतेदार या गावकामगारांची कामातील वतनदारी रद्द करण्यात आली व हे बलुतेदार-अलुतेदार स्वतंत्र बनले.
नागर समाज--
महाराष्ट्रातील जुन्या व नव्या शहरात उद्योगधंदे, व्यापार व अनेक प्रकारच्या सेवा यामुळे नागरी समाजाचे प्रमाण वाढत आहे.
महाराष्ट्रातील ४२ टक्क्यांपेक्षा अधिक लोक नागरी /शहरी समाजात मोडतात. हे प्रमाण अजूनही वाढत आहे.
नागर समाजातही जाती आहेत, पण नागर अर्थव्यवस्थेत जातीव्यवस्थेचे प्रतिबिंब आढळत नाही.
कारण शहरातील हजारो नवीन व्यवसाय जातीव्यवस्थेशी संबंधित नाहीत.
या नागर समाजात मुंबईतील लोकांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.
धर्म, भाषा, वंश, राष्ट्रीयत्व, जाती-जमाती अशा सर्व पातळ्यांवरील विविधता मुंबईत पाहायला मिळते.
या दृष्टीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात मुंबई हे एकमेव शहर असे आहे की, जे खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक शहर आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा