१ मे, महाराष्ट्र दिन :-


१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, जाणून घेऊ या दिवसाचे महत्त्व...



  • महाराष्ट्राला वैभवशाली ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे.

  •  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. रयतेमध्ये स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा व स्व-संस्कृतीविषयी जागृती घडवून आणली.

  • यामुळे मराठी माणसांमध्ये अस्मिता निर्माण झाली.

  • १८१८ मध्ये मराठी सत्ता नष्ट होऊन त्यांची जागा इंग्रजांनी घेतली.

  •  इंग्रजांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे देशात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली.

  • महाराष्ट्रात या चळवळीला वेग आला. अनेक समाजसुधारकांनी समाज प्रगतशील व पुरोगामी होण्यासाठी समाजसुधारणा चळवळ गतिमान केली.

  • धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक जागृती होऊन भारतीयांमध्ये राष्ट्रवाद वाढीस लागला.

  •  यातूनच राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागून इ.स.१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला.

  •  भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढीस लागली.

  •  महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इ.स. १९४६ पासून सुरू झाली. 

  • अनेक स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

  • मराठी भाषिक लोकांच्या महाराष्ट्राच्या एकीकरणाचा विचार २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

  • त्या दृष्टीने साहित्य संमेलनांचा वाटा महत्त्वाचा ठरतो.

  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या ऋणानुबंधमध्ये लिहितात, मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली.


  • १९०८ च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैद्य यांनी एकीकरणाचा उल्लेख केला होता.

  •  तेव्हा महाराष्ट्राच्या एकीकरणाशी संमेलनाचा निकटचा संबंध आहे.

  • याप्रमाणे अनेकांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाची स्वप्न १९१० पासून पाहिली होती.

  • १९११  इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली.

  •  त्यासंदर्भात भाषा व राष्ट्रीयत्व या शिर्षकाखाली केसरीमध्ये न.चि. केळकर यांनी लिहिले की, मराठी भाषा बोलणार्‍यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी.

  •  लोकमान्य टिळकांनी १९१५ साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. 

  • आपल्या दैनिक 'केसरी'तून त्याचे महत्व व आवश्यकता त्यांनी जनतेला समजावून सांगितली होती.

  •  परंतु त्या दरम्यानच्या काळात देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही व ते साहजिकही होते. तेव्हा सामान्य मराठी माणसापर्यंत हा विषय गेला नाही.

  •  पण आंध्र व कर्नाटकच्या लोकांनी आपल्या चळवळी लवकर सुरू केल्या होत्या.

  • महाराष्ट्रात तशा काही हालचाली होत नाहीत, याचे पटवर्धनांना वाईट वाटत होते.

  • म्हणून त्यांनी या विषयाला चालना देण्यासाठी प्रश्नावलीच्या रुपाने ४० पुढार्‍यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या.

  •  त्यामध्ये रामराव देशमुख, अनुसयाबाई काळे, डॉ. टी.जे. केदार इत्यादींचे विचार होते.

  • १ ऑक्टोबर १९३८  साली वऱ्हाडचा वेगळा प्रांत करावा, असा ठराव मांडला.

  •  १९३९ साली अहमदनगर येथे भरलेल्या साहित्य संमेलनात मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र असे नाव द्यावे, असा ठराव संमत झाला.

  •  २८ जानेवारी १९४० साली देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र  संघटना स्थापन झाली.

  •  २४ मे १९४० रोजी केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरविण्यात आली. 

  • त्यांच्या मते, जो महाराष्ट्रात जन्मला व येथे कायम त्याचे वास्तव्य आहे, तो महाराष्ट्रीयन.

  •  असे स्पष्ट करून सर्व मराठी भाषा बोलणाऱ्यांचे  एक राज्य व्हावे, अशी त्त्यांनी मागणी केली. तर महाविदर्भ व्हावा, असे लोकनायक बापूजी अणेंना वाटत होते.

  •  त्यांच्या मते, एकच भाषा बोलणाऱ्यांची दोन राज्य झाले तर काही बिघडणार नाही.

  •  संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यात मराठी भाषिकांना खूप त्रास सहन करावा लागला. 

  • कारण या आंदोलनात समोर अनेक अडथळे होते.

  • यात प्रामुख्याने राष्ट्रीय नेत्यांचा  दृष्टिकोण, मराठी भाषिकांतील एकतेचा अभाव, मुंबई काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व, मराठी लोकांना  मराठ्यांचा विरोध, मोरारजी देसाई यांचा विरोध इत्यादी.

  • स्वतंत्र महाराष्ट्र राज्यनिर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्र देणं नाकारलं होतं.

  • मराठी माणसांपासून मुंबई तोडली जात असल्याची चीड त्यावेळी मराठी माणसांच्या मनात होती.

  • २१ नोव्हेंबर १९५६  रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरोफाउंटन समोरील चौकात जमला.

  • संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 


  • पोलिसांना हा मोर्चा आवरेना, त्यांनी लाठीचार्ज केला, तरीही जमाव पांगला नाही.

  •  त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला.

  •  या गोळीबारात १०६ जण हुतात्मा झाले.

  •  संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या १०६ सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरोफाउंटनजवळ १९६५ मध्ये उभारले. 

  • महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण १  मे या दिवशी केले जाते.

  • १  मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणूनही ओळखला जातो.

  • सन १७६४ ला सूत काढण्याचा शोध लागला. तसेच औद्योगिक क्रांतीला सुरवात होऊन कामगार व त्यांच्या हक्कांचा प्रश्न निर्माण झाला.

  •  अमेरिकेत शिकागो येथील कामगारांनी हा दिवस १८८६ साली साजरा केला.

  •  त्यांनी कामाचे ८ तास असावेत, अशी मागणी केली.

  •  १ मे ला शिकागो येथे कामगारांनी मोठी मिरवणूक काढली. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस संपन्न करण्याचे ठरले व त्याला १ मे १८९० ला संपूर्ण जगात पाठिंबा मिळाला.

  •  भारतात चेट्टीयार यांनी १९२३ ला हा दिवस साजरा केला.


टिप्पण्या