थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, पहिल्या भारतीय महिला विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांना विनम्र अभिवादन…..
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सर्वसामान्यपणे सामाजिक सुधारणेसाठी आणि विशेषतः स्री शिक्षणासाठी वाहिलेले आधुनिक ऋषि-जीवन होते.
मानवतेचा उद्धार करण्यासाठी त्यांनी खडतर प्रयत्न केले. ते लोकोत्तर सेवामूर्ती होते.
त्यांच्या कार्याचा प्रारंभ विधवाविवाहापासून झाला असला तरी, त्याचे पर्यवसान स्रियांचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात झाले.
स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी अविरत कार्य केले. पुरुषांच्या गुलामगिरीतून आणि सामाजिक परावलंबीत्वातून स्वाभिमानाने सुटका करून घेण्याचा मार्ग महर्षी कर्वे यांनी स्त्रियांना दाखवला.
त्यांनी खर्या अर्थाने भारतातील नव्या स्त्रीला जन्म दिला. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातील महत्त्वाचे गुण म्हणजे कार्यतत्परता, परिश्रमशीलता, निर्लोभता, साधी व स्वतंत्र वृत्ती आणि चिकाटी.
महर्षी कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या खेडेगावी झाला. घरची परिस्थिती गरिबीची होती. परंतु घरातील वातावरण समाधानी होते.
बालपणापासूनच त्यांना ज्ञानदानाची, शिक्षणाची आवड होती. मुरुड या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.त्यांना तेथील सोमण गुरुजींकडून निस्वार्थीपणाची आणि लोकसेवेची प्रेरणा मिळाली.
ज्ञानाबद्दलच्या तीव्र इच्छेपोटी पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. स्वाभिमानाने व स्वावलंबनाने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
काबाडकष्ट करून, शिकवण्या घेऊन आपला चरितार्थ भागवला.
विल्सन कॉलेजमधून गणित हा विषय घेऊन ते बी.ए.परीक्षा उत्तीर्ण झाले. महर्षी कर्वेंचा विवाह इ.स. 1873 मध्ये म्हणजेच शिक्षण चालू असतानाच राधाबाईंशी झाला होता.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीऐवजी त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली.
त्यादरम्यान न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर यासारख्या थोरांच्याकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी लोकसेवेचा मार्ग पत्करला.
त्यांच्या जीवनात एक दुःखद घटना घडली.त्यांच्या धर्मपत्नीचे म्हणजेच राधाबाईंचे अचानक निधन झाले.
त्याचवर्षी त्यांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून घेण्यात आले. त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यही करून घेण्यात आले. 1914 पर्यंत त्यांनी तेथे अत्यंत निष्ठेने कार्य केले.
विधवा विवाहाच्या संदर्भात त्यांनी पुरोगामी विचार मांडले होते.ते विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी त्यांनी शारदा सदनमधील गोदूबाई या विधवेशी 1893 साली विवाह केला.
मुरुडमधील लोकांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला.. हीच घटना कर्व्यांच्या जीवनात क्रांतिकारक ठरली.
त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी अविरतपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला.
अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय, महिला विद्यापीठ यासारख्या अनेक संस्था स्थापन करून त्यांनी स्त्रियांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले.
विधवाविवाह करून इतरांना आदर्श घालून दिला. एका स्त्रीला शिक्षण देणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाला शिक्षण देणे, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले.
स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले. शिक्षण देऊन स्त्रियांना स्वावलंबी केल्याशिवाय त्यांची दुःखे दूर होणार नाहीत, म्हणून कर्वे स्त्री शिक्षणाकडे वळले.
कर्वे हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. स्त्री जातीविषयी त्यांच्या ठिकाणी सहानुभूती होती. हिंदू समाजातील विधवा स्त्रियांवर होणारे अन्याय,अत्याचार पाहून त्यांचे हृदय हेलावून जात असे.
स्त्रियांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत बनले.
हिंदू समाजात त्याकाळी बालविवाहाची पद्धत होती. त्यामुळेच समाजात विधवांची संख्या जास्त होती. विधवांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला.
विधवाविवाहाला चालना मिळावी, म्हणून 1893 मध्ये ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळी’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत विधवापुनर्विवाहाचे कुटुंब मेळावे भरविण्यास सुरुवात केली.
पुरुषांच्या जुलुमाखाली, अन्यायाखाली दबल्या गेलेल्या स्त्रीजातीला सोडविण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले.
महिलांचा विकास व्हावा, स्त्रियांना चांगले उत्कर्षाचे, सुखाचे दिवस यावेत, यासाठी कर्वे सतत प्रयत्नशील राहिले.
सर्वसामान्य मुलींना उपयुक्त असे शिक्षण देण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स.1960 मध्ये हिंगणे येथे महिला विद्यालयाची तसेच स्त्रियांसाठी एक स्वतंत्र विद्यापीठ असावे, असे त्यांना वाटत होते.अशा विद्यापीठात मुलींना प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला, गायनकला इ. स्रीजीवनाला आवश्यक अशा सर्व विषयांचे शिक्षण मिळावे, असा उद्देश समोर ठेवून इ.स.1916 साली त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली.
स्त्रियांच्या शिक्षणाच्या आड इंग्रजी माध्यम येत होते, म्हणून मातृभाषेतून शिक्षणाचे माध्यम स्वीकारण्यात आले.
सर विठ्ठलदास ठाकरसी या दानशूर व्यक्तीने आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाखांची देणगी संस्थेला दिली.
हे विद्यापीठ आज एस. एन. डी. टी.विद्यापीठ या नावानेच लोकमान्य झाले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षण प्रसार व्हावा, म्हणून ‘ग्राम प्राथमिक शिक्षण’ मंडळ स्थापन केले.
त्यांच्या कार्याविषयी प्र. के.अत्रे म्हणतात, "महर्षी अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एका क्रांतिकारक शतकाचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्पकार होते".
महर्षी कर्वे यांच्या व्यापक कार्याचा यथोचित गौरव झाला.
बनारस विद्यापीठाने त्यांना डि.लीट ही पदवी इ.स. 1952 मध्ये दिली. तसेच पुणे व महिला विद्यापीठानेही अशाच पदव्या त्यांना दिल्या.
त्यांना भारत सरकारने पद्मभूषण व भारतरत्न या सर्वोच्च पदव्या देऊन गौरवले.
मुंबई विद्यापीठाने एल. एल. डी. ही पदवी बहाल केली.
स्त्रियांच्या शिक्षणामध्ये त्यांना सुपत्नी व सुमाता होण्याची पात्रता निर्माण करणारे अनेक शैक्षणिक उपक्रम कर्वे यांनी हाती घेतले.
भारतातील स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, हे पवित्र कार्य आहे, असे समजून त्यांनी या क्षेत्रात कार्य केले.
इ.स. 1910 मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना त्यांनी केली.
लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन-मन-धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणे, हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा