उपक्रमशील राहीबाई पोपेरे----
‘बीज माता’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पापेरे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावच्या.
काय केलं या सामान्य महिलेने?
त्यांच्या विषयीची माहिती जाणून घेतली की त्यांच्यापुढे विनम्रपणे हात जोडावे, असे वाटते. त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी, कर्तृत्वासाठी.!!!
राहीबाई यांच्या कार्याला सुरुवात कशी झाली?
तर संकरित धान्य आणि भाजीपाला खाऊन त्यांचा नातू आजारी पडला. या समस्येवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नातून राहीबाईंना देशी वाण वापरण्याचा उपाय सुचला.
आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारे धान्य आणि भाजीपाला देशी वाणातून निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले आणि त्या कामाला लागल्या. त्यासाठी राहीबाईंनी घरात खाण्यासाठी देशी वाण पिकवायचे आणि पीक आल्यावर त्यातून निवडक बिया साठवून ठेवण्याचे काम सुरू केले.
विविध प्रकारच्या भाज्या, रानभाज्या, तांदूळ आणि कडधान्य यांचे वाण त्यांनी जपले.
राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या आणि वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे.
राहीबाईंकडे जे बियाणे आहेत, ते शेकडो वर्ष आपले पूर्वज खात होते, ते मूळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच 20 प्रकार आहेत.
ही बियाणे राहीबाई साठवतात तरी कशी?
राहीबाई मातीच्या मडक्यात देशी वाणाची बियाणे घालून, त्या मडक्याला शेणामातीने लिंपतात. मडक्यामध्ये राखेचा आणि कडुनिंबाच्या पानांचा वापर त्या करतात. त्यामुळे साठवलेल्या बियाण्यांना भुंगे, मुंग्या लागत नाही आणि बियाण्यांची हानी होत नाही.
त्यांच्या स्वतःच्या घरापासून सुरु झालेला हा उपक्रम, त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवायला सुरुवात केली.
त्यांनी तीन हजार महिला व शेतकरी यांचा बचत गट बनवला आहे.त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी आणि संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या जातात आणि त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते.
हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे उपलब्ध नाही.
भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांचा हा उपक्रम सर्वत्र फोफावला आहे. आता राहीबाईंच्या बियाणे बँकेत 50 हून अधिक पिकांचे आणि 30 हून अधिक भाजीपाल्याचे वाण जमा झाले आहे.
सध्या आपल्याला ज्या भाज्या मिळतात, त्यांच्या बियाण्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेले आहे, ही संकरीत बियाणे असून त्यांचे Yield जास्त असल्याने आजचा शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. दुर्दैवाने Commercial सोडा, परंतु घरी वापरण्यासाठी सुद्धा शेतकरी हे पारंपारिक उत्पादन घेत नाही.
आज अशी परिस्थिती आहे की, या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु राहीबाईंनी 'सीड बँक' उभारली असून, त्यांच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत.
अहमदनगरच्या अकोलेसह 4 तालुक्यात 50 टक्के शेतकरी हे गावरान बियाणे वापरतात. विशेष म्हणजे प्रत्येक बियाण्याविषयी माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे.
देशभरातून कृषी तंत्रज्ञान शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांचा हा प्रोजेक्ट बघायला येतात. संपूर्ण जगातील हा अशा प्रकारचा एकमेव प्रोजेक्ट आहे.
राहीबाईंना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहेत. राहीबाईनी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून आपल्या कामाचा व्याप वाढवला आहे.
8 मार्च 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या बियाणे संवर्धनाच्या कामाबद्दल नारीशक्ती पुरस्कार दिला.
बीबीसीने 2018 मध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील 100 महिलांची निवड केली, त्यामध्ये राहीबाई यांचाही समावेश आहे.
इतकेच नाही तर, त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारचा गतवर्षीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देखील बहाल करण्यात आला आहे.
अशा या ‘सिड मदर या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पापेरे यांनी देशी वाण निर्माण करणे, ते जतन करून ठेवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे फार मोठे कार्य केले आहे. अशा या राहीबाईंच्या कर्तृत्वाला सलाम!!!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा