डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना (१४ एप्रिल) जयंतीनिमित्त अभिवादन-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राष्ट्रप्रमुखांतील अग्रगण्य व कार्यशील प्रमुख नेते होते.
उच्चविद्याविभूषित झाल्यानंतरही वैयक्तिक स्वार्थाच्या भूमिकेतून आर्थिक प्रलोभनांचा स्वीकार न करता बाबासाहेबांनी आपले सर्व जीवन दलित बांधवांच्या उन्नतीसाठी समर्पित केले.
अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले व सदैव विद्याव्यासंग, ग्रंथलेखन यात रममाण होणारे प्रगाढ, विद्वान व प्रजासत्ताक भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजाला ज्ञात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून ८ कि.मी.वर असलेले आंबावडे हे त्यांचे मूळ गाव.
लहानपणीच मातृछत्र हरपल्याने वडिलांनीच बाबासाहेबांचे पालन-पोषण केले.
घरची गरिबी असली तरी, बाबासाहेबांचे वडील विद्येचे भोक्ते होते.
विद्येची उपासना करावी, आपले चारित्र्य चांगले असावे, याविषयी ते दक्ष असून, हीच शिकवण त्यांनी आपल्या मुलांना दिली.
बाबासाहेबांचे वडील सैन्यात नोकरीला होते.
स्वतःच्या कर्तबगारीवर ते सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचले होते.
या काळातच सैन्याची जातीय तत्वावर उभारणी करण्याचा हुकुम दिला गेला.
त्यामुळे रामजी सुभेदारांना उरलेली दोन वर्ष सेवा पूर्ण केल्यावर निवृत्त व्हावे लागले.
कालांतराने सातार्याला दुसरी नोकरी मिळाल्याने ते सातार्याला राहिले.
बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबावडेकर होते.आंबावडे या गावावरून पडलेले हे नाव.
सातारा येथील हायस्कूलमध्ये त्यांना आंबेडकर नावाचे शिक्षक होते.त्यांचा भीमरावांवर फार लोभ होता.
आपल्या प्रेमळ गुरूबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी भीमरावांनी आंबेडकर हे नाव स्वीकारले.
१९०७ साली भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९१३ साली पर्शियन व इंग्रजी हे विषय घेऊन बाबासाहेब बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना एम.ए.पदवी मिळाली.
१९२७ मध्ये त्यांनी पीएचडीची पदवी मिळवली.
१९२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले.
ते १९२१ मध्ये एम.एस.सी. झाले.
डी.एस.सी. ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी त्यांनी मिळवली.
त्यानंतर १९२४ मध्ये मुंबईला परत आल्यानंतर त्यांनी हायकोर्टात वकिली सुरू केली.
२० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली.
महाड सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन या माध्यमातून अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.
मंदिर प्रवेश सत्याग्रहदेखील त्यांनी केला.
बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभापासूनच अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्याच्या कार्यावर भर दिला.
संधीचा योग्य उपयोग केल्यास अस्पृश्य व्यक्तीही उच्चविद्याविभूषित होते, हे तत्त्व त्यांनी आपल्या उदाहरणाने समाजासमोर मांडले.
सन १९४६ मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
या संस्थेच्या वतीने मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.
इतर अनेक संस्था, विविध वसतीगृहे निर्माण करून दलित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रगतीसाठी विशेष दक्षता घेतली.
समाजपरिवर्तनाचा विचार रुजवण्यासाठी वृत्तपत्रे सुरू केली.
१९२० साली छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आर्थिक सहाय्याच्या मदतीने आंबेडकरांनी 'मूकनायक' नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरु केले. 'समता' हे पत्र सुरू केले.
तसेच 'जनता' व 'प्रबुद्ध भारत' ही पत्रे सुरू केली.
वर्तमानपत्रांप्रमाणेच आपल्या ग्रंथांच्याद्वारे त्यांनी समाजाच्या प्रबोधनाचे आणि परिवर्तनाचे प्रयत्न केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथाला आपले गुरु मानत असत.
गव्हर्नरच्या कायदे कौन्सिलचे सभासद म्हणून काम करताना, ब्रिटिश शासनाबरोबर धोरण ठरविताना, राजकीय चळवळीला विरोध करतांना, कायदा मंत्री म्हणून काम करताना, भारतीय घटनेचा आराखडा तयार करताना किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय कार्याच्या वेळी डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्कांविषयी असलेली वचनबद्धता कधीही सोडली नाही.
गांधीजींचा हा मार्ग सुधारणावादी होता, तर बाबासाहेबांचा मार्ग क्रांतिकारी होता.
१५ ऑगस्ट १९४७ नंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री झाले आणि त्यांच्याकडे घटनेच्या मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली.
घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम डॉ.आंबेडकर यांच्या अंगावर पडले आणि ते त्यांनी अतिशय यशस्वीपणे पार पाडले.म्हणूनच त्यांना 'भारतीय घटनेचे शिल्पकार' म्हटले जाते.
अतिशय परिश्रम करून स्त्रियांना व समाजातील सर्व घटकांना समान हक्क देणारे 'हिंदू कोड बिल' त्यांनी तयार केले होते.
सर्वांना समान हक्क हीच त्यांची मागणी होती.
डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याला भारताच्या इतिहासात तोड नाही.
डॉ. आंबेडकरांबद्दल धनंजय कीर म्हणतात, "या युगातील पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये त्यांचे स्थान आहे.जे आजवर जगात पददलितांचे रक्षणकर्ते व कैवारी होऊन गेले, मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार होऊन गेले, त्यात त्यांचे स्थान उच्च आहे."

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा