महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन….
महात्मा फुले यांनी आपले व्यक्तिमत्त्व स्वयंप्रेरणेने आणि आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतिशील क्रांतिकारकाचा होता.
महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भारावून जाऊन सर्व जीवन समर्पित करणारे थोर पुरुष होते.
आधुनिक भारतातला पहिला समाज क्रांतिकारक म्हणजे महात्मा फुले होय.
कारण ते सामान्यातील असले तरी विचाराने आणि कर्तुत्वाने असामान्य होते.
- सामाजिक विषमतेविरुद्ध जोतिबांनी बंड पुकारले.समतेसाठी त्यांनी शूद्रातिशूद्रांना संघटित करण्याचे प्रयत्न केले.
शिक्षण व समता या दोन शब्दात त्यांच्या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.
महात्मा फुले नुसते बोलघेवडे समाजसुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते.
बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अविरत झगडणारे ते ऋषी होते.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.
त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले होते.
त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रयोगप्रवण व विकसनशील होते.
ग्रंथपांडित्यापेक्षा समाजप्रवाहातील भल्याबुऱ्या प्रवृत्तींचा अन्वयार्थ लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
प्रत्येक बाबींच्या मुळाशी जाऊन चिंतनशीलपणे त्यावर ते विचार करीत असत.
त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे अग्रणी म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाला त्यांनी वेगळी दिशा दाखवली.
स्त्रियांचा आणि अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ते चंदनासारखे झिजले.
त्यांच्या या कार्यात अनेकांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हालअपेष्टा सहन केल्या. परंतु आपल्या ध्येयापासून ज्योतिबा फुले कधीच विचलित झाले नाही.
इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रात स्थिर होऊ लागली.त्याचबरोबर सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनेही होऊ लागली होती.
शिक्षणाचा प्रसार होऊ लागला होता, परंतु तो ठराविक वर्गापुरताच मर्यादित होता.
समाजातील तोच वर्ग आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करू लागला होता.
मात्र बहुजन समाज हा आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागासलेलाच राहिला.
समाजात जातिभेदाचा विकृत कल्पनेने काहूर मांडले होते.
शिक्षणापासूनचे फायदे सामान्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते.
बहुजनसमाज अंधकारात चाचपडत होता. जातीयवादाची पोलादी चौकट भक्कम होती.
स्त्रियांच्या व अस्पृश्यांच्या दुर्दैवी स्थितीत काहीच फरक पडला नाही.
वेगवेगळ्या प्रकारचे पाश समाजाभोवती आवळले गेले होते.
अशा काळात ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यांच्यासाठी केलेले कार्य फार मोलाचे आहे.
त्यांना "स्त्रियांचा उद्धारकर्ता" म्हटले जाते.ते सामाजिक समतेच्या क्रांतीचे आद्य जनक होते.
समाजपरिवर्तनासाठी ज्योतीबांनी सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन घाव घातला.
सामाजिक चळवळीला सामाजिक वर्गविग्रहाचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे, हे या समाजाचे मुख्य उद्दीष्ट होते.
'सार्वजनिक सत्यधर्म' आणि 'गुलामगिरी' या पुस्तकात ज्योतीबांनी सत्यशोधक समाज याबद्दलचे आपले विचार मांडले आहेत.
'सर्वसाक्ष जगत्पती। त्याला नकोच मध्यस्थी।' हे या समाजाचे ब्रीदवाक्य होते.
ते एक बंडखोर विचारांचे सुधारक होते. धार्मिक विषमतेविरुद्ध बंड करणारे व धार्मिक सहिष्णुतेच्या मूल्यांसाठी प्रयत्न करणारे थोर समाजसेवक होते.
महात्मा फुले यांचा जीवनपट:-
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवीसन १८२७ मध्ये पुणे येथे झाला.
फुले घराण्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण होते.
त्यांचे मूळ उपनाव गोऱ्हे असे होते.ते जातीने क्षत्रिय माळी होते.
ते कटगुणचे चौगुले होते. बारा बलुतेदारांपैकी चौगुले हे एक होते.
परंतु गावातील प्रस्थापितांच्या बरोबर त्यांच्या आजोबांचे भांडण झाले आणि त्यांनी ते गाव सोडले.
त्यांनी पुरंदर तालुक्यातील खानवडी गावी स्थलांतर केले. तेथे त्यांनी चांगलाच जम बसवला.त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव शेरीबा असे ठेवण्यात आले.
शेरीबा भोळसट आणि उधळे होते. तसेच त्यांना व्यसनही लागले होते.त्यांनी संपूर्ण इस्टेट उधळली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची स्थिती वाईट झाली.
परिणाम शेरीबांना उदरनिर्वाहासाठी कुटुंबाचे स्थलांतर पुण्याला करावे लागले.
त्यांना राणोजी, कृष्णा व गोविंदा अशी तीन मुले होती.
घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे प्रारंभी या मुलांनी शेळ्या राखण्याचे काम केले.
त्यांच्या धन्याने त्यांचा प्रामाणिकपणा, हुशारी आणि कष्टाळूपणा पाहून त्यांना फुलांचा व्यवसाय शिकवला.
त्यांनी या व्यवसायात चांगलाच लौकिक कमावला. त्यामुळेच त्यांचे गोऱ्हे हे उपनाव मागे पडून फुले या नावाने ते ओळखले जाऊ लागले.
पेशव्यांच्या कानावर त्यांची कीर्ती गेली. पेशव्यांनी त्यांना खाजगीत फुले घालण्याचे काम दिले.
त्याचबरोबर ३५ एकर जमीन इनाम म्हणून दिली.
शेरिबांच्या मृत्यूनंतर राणोजीने आपल्या दोन बंधूंना बाजूला करून इनाम जमीन स्वतःच्या नावे करून घेतली.
त्यामुळे पुन्हा कृष्णा आणि गोविंदा यांना वाईट दिवस आले.त्यांनी पूर्वीप्रमाणेच चिकाटीने, सचोटीने आपला धंदा चालवला.
भाजीपाला विक्रीचे दुकानही त्यांनी सुरू केले.
गोविंदाचा चिमणाबाईशी विवाह झाला. त्यांच्या पोटी ज्योतिबा फुले आणि राजाराम यांचा जन्म झाला.
ज्योती म्हणजे ज्योत. ज्योत दुसर्यास प्रकाश देते व स्वत: नाहीशी होते.
त्याचप्रमाणे ज्योतीबांनी समाजसेवेत स्वतः झिजून संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव अजरामर केले.
महात्मा फुले यांचे स्त्री उद्धाराचे कार्य :
भारतीय समाजाने स्त्रियांना समतेपासून व शिक्षणापासून वंचित ठेवले होते.
व्यक्तीचे जीवन विकसित करण्यासाठी 'शिक्षण' हे एक प्रमुख साधन आहे, असे ज्योतीबा यांचे मत होते.
शिक्षणामुळे मनुष्यात स्वाभिमान निर्माण होतो.सत्य- असत्याचा उलगडा होतो, म्हणून शिक्षण हे सर्व सुधारणांचे मूळ आहे, असे त्यांचे मत होते.
"जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी" या तत्त्वाचे ते पाईक होते.
मुलांच्या कर्तव्याचे मार्गदर्शन मातेकडून होत असते. कर्तव्याची जाणीव झाली तरच, देशाची प्रगती होते. या विचारांचे ते होते.
सनातन्यांच्या मते, स्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना शिक्षण देणे म्हणजे देव, धर्म व समाज यांच्याविरुद्ध वर्तन करणे होय.
स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे भ्रष्टाचार करणे, असे मानले जात होते.
बालविवाह, जरठकुमारी विवाह,केशवपन यांच्या प्रथा असल्यामुळे विधवांची स्थिती अत्यंत दयनीय होती.
स्री परतंत्र अबला म्हणून ओळखली जात होती. क्रूर आणि लज्जास्पद चालीरीतींमुळे स्त्रियांची दयनीय अवस्था झाली होती.
उपभोग्य वस्तू अशीच त्यांच्याकडे पाहण्याची वृत्ती होती.
अशावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले.त्यासाठी त्यांनी फार मोठे कष्ट सहन केले.
स्री ही समाजाचे मूळ आहे, असे मानून जोतिबांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, बालहत्या प्रतिबंधक, केशवपन यासारख्या महत्वाच्या सामाजिक समस्येबाबत भरीव कार्य केले.
स्त्री शिक्षण म्हणजे पर्यायाने तिच्या मुलांचे शिक्षण.
एका स्त्रीला शिक्षण दिले तर, ते सर्व कुटुंबाला दिल्यासारखे आहे, हे ओळखून जोतिबांनी स्त्री शिक्षणाला प्रारंभ केला.
पुण्यामध्ये इसवीसन १८४८ मध्ये मुलींसाठी एक शाळा सुरू केली.
अस्पृश्य समाजातील स्त्रियांना तेथे शिक्षण दिले जात होते.
ज्योतिबा स्वतः शिक्षकाचे काम करीत होते.
स्वतंत्रपणे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढणारे ते पहिले भारतीय होते.
या शाळेत अस्पृश्यांच्या मुलींना शिकविण्यासाठी शिक्षिका मिळेना, म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि शिक्षिका म्हणून नेमले.
सनातन्यांना ही गोष्ट समाजद्रोही आणि धर्मद्रोही वाटली.
सनातन्यांनी सावित्रीबाईंना शाळेत जाता-येता त्रास द्यायला सुरुवात केली.
चिखल फेकणे,दगड मारणे, शिव्या देणे अशा प्रकारे त्यांना त्रास दिला जात होता.
मात्र या माऊलीने हा त्रास सहन करून आपले कार्य चालूच ठेवले.
मुलींची पहिली शाळा बंद पडली, म्हणून ज्योतिबा नाउमेद झाले नाही.
त्यांनी इसवीसन १८५१ मध्ये बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा सुरु केली.
सन १८५१ मध्येच रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा आणि १८५२ मध्ये वेताळ पेठेत मुलींची चौथी शाळा सुरु केली.
ज्योतीबांनी स्रीशिक्षणाला महाराष्ट्रात एक वेगळी दिशा लावून दिली.
जोतिबांनी विधवा पुनर्विवाहाचा धडाडीने पुरस्कार केला.
त्यांनी इ.स.१८६४ मध्ये पुण्यातील गोखले यांच्या बागेत एक विधवा पुनर्विवाह घडवून आणला.
बालहत्या प्रतिबंधक गृह आपल्या घराशेजारी उघडले.
ज्योतिबांचे अस्पृश्योद्धाराचे कार्य-
म. ज्योतिबा फुले हे सामाजिक समतेच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते.
समाजातील पददलितांच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य हाती घेतले.
अस्पृश्यांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी, म्हणून त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे कार्य जोतिबांनी हाती घेतले.
इ.स.१८५२ मध्ये अस्पृश्यांच्यासाठी वेताळ पेठेत एक शाळा सुरू केली.
१८५३ साली काही होतकरू मित्रांच्या मदतीने 'महार,मांग लोकास विद्या शिकविण्याकरिता मंडळी' नावाची संस्था काढली.
या संस्थेमार्फत पुण्यात तीन शाळा सुरू करण्यात आल्या.
शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य -
भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची समृद्धी आणि भरभराट शेतकऱ्यांवर अवलंबून असते. असे असले तरी भारतातील शेतकरी सुखी आणि समाधानी नव्हता.
मागासलेपणा, अज्ञान, कर्जबाजारीपणा यामुळे भारतीय शेतकरी पिचलेला होता. याचे म.फुलेंनी सूक्ष्म अवलोकन केले होते.
शिक्षणाशिवाय कष्टकरी समाजाची स्थिती सुधारणार नाही, हे त्यांनी ओळखले.त्यासाठी त्यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला.
'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथात शिक्षणाअभावी समाजाची कशी दुर्दशा झाली आहे, याचे वर्णन त्यांनी पुढीलप्रमाणे केले आहे.
विद्येविना मती गेली; मतीविना नीती गेली;
नीतीविना गती गेली; गतीविना वित्त गेले;
वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले.
शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण द्यावे, सरकारने त्यासाठी खास प्रयत्न करावेत, शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी वस्तीगृह काढावेत, धंदेशिक्षण द्यावे, कनिष्ठ वर्गातील लोकांना नोकर्यांमध्ये प्राधान्य द्यावे अशा सूचना महात्मा फुले यांनी केल्या.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वतोपरी मदत करावी, असा आग्रह देखील त्यांनी धरला.
१८७० च्या दुष्काळाच्या वेळी त्यांनी दुष्काळपीडितांना मदत देण्यास पुढाकार घेतला होता.
तसेच धनकवडी येथे दुष्काळ पिडीत विद्यार्थ्यांच्यासाठी कॅम्प उभारला होता.
इतर कार्य :-
ज्योतिबा चरितार्थासाठी वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे घेत होते.
त्यामुळे त्यांचे मजुरांशी जवळचे संबंध आले.
ज्योतीबांच्या प्रोत्साहनामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांची 'मिल हॅन्ड असोसिएशन सोसायटी' १८९० मध्ये स्थापन केली.
भारतातील ही पहिलीच मजूर संघटना होय.
महात्मा फुले मूलगामी विचारवंत होते.
महात्मा फुले यांनी तृतीयरत्न नाटक लिहून अज्ञानी लोकांना कसे फसवले जाते, हे या नाटकाच्या माध्यमातून लोकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व, पराक्रम यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी "छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा" हा पोवाडा रचला.
ज्योतीबांनी ग्रंथनिर्मिती सहेतुक केली होती.
सत्य, समता आणि मानवतावादी या शिकवणीवर त्यांचा भर होता.
ज्योतिबा एकेश्वरीमताचे व बुद्धिप्रामाण्यवादी होते.
हृदयाने थोर आणि कृतीने उदार होते. ज्यांचे हृदय गरिबांसाठी द्रवते तोच महात्मा होय.
तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, "हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय आणि आत्मावलोकन करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले होय."
ज्योतिबांची वाड्मयनिर्मिती मराठी भाषेत मोलाची भर घालणारी आहे.
समाज, राजकारण, शिक्षण, जातीयता या क्षेत्रातील त्यांची कामगिरी गौरवास्पद आहे.
सामाजिक सुधारणेच्या सर्व अंगांना त्यांनी स्पर्श केला होता.
बहुजन समाजाच्या आणि अस्पृश्यांच्या उत्त उद्धारासाठी ते झटले.
समाजाला धार्मिक, सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक समतेचा संदेश त्यांनी दिला.
सर्वांगीण समतेचा पाया घातला. खऱ्या अर्थाने ज्योतिबा हे 'महात्मा' होते.

सुंदर माहिती, सुंदर विचार👍
उत्तर द्याहटवा