प्रस्तावना -
दिल्लीचा सुलतानकाळ हा मुघलपूर्व काळ भारतातील इस्लामी सत्तेचा पहिला कालखंड ठरतो.
भारतात मुघल सत्तेची मुहूर्तमेढ बाबरने केली.
भारतातील मुघल काळ हे जगातील इतिहासाचे अत्यंत वैभवशाली युग गणले गेले.
दिल्लीच्या तख्तावर शेवटचा सुलतान लोदी घराण्यातील इब्राहिम लोदी हा होता.
१ नोव्हेंबर १५२५ रोजी बाबराने भारतावरील मोहीम सुरू केली.
बाबर दिल्लीकडे निघाला, इब्राहिम लोदी देखील १ लाख शिपायांसह प्रतीकारासाठी तयार झाला.
पानिपतच्या मैदानात दोन्ही सैन्याने समोरासमोर तळ ठोकला.
जवळपास ८ दिवसानंतर बाबर सर्व तयारीनिशी सज्ज झाला.
बाबराने याप्रसंगी उत्तम व्यूहरचना केली.
बाबराकडे एकूण शिपायांची संख्या १२००० होती.तर इब्राहीम लोदीने १ लाख शिपायांना तैनात केले होते.
दोन्ही सैन्यात युद्ध होवून इब्राहीम लोदी ठार झाला.
त्यानंतर सुलतानशाही राजवट संपुष्टात येऊन मुघल सत्ता प्रस्थापित झाली.
सुलतानशाहीच्या ऱ्हासानंतर मुघल सत्ता इ.स.१५२६ ते १७०७ पर्यंत प्रबळ होती.
याकाळात मुघलांचे राज्य भारतात सर्वत्र पसरले होते.
कला, वाॾमयीन क्षेत्रातील निर्मिती, प्रशासन व्यवस्था, परराष्ट्र संबंध, व्यापार उदीम या क्षेत्रात मुघल काळात भरभराट झाली होती.
मुघल अथवा मोगल हा 'मंगोल' या पर्शियन शब्दाचा अपभ्रंश आहे.
मुघल हे मध्य आशियातून आले होते.
ते 'मंगोल' राज्यकर्ता 'चंगीझखान' आणि तुर्क तैमुरलंग यांचे वंशज होते.
आपल्या पूर्वजांचा मुघलांना अभिमान होता.
तैमुरने केलेल्या भारतावरील स्वाऱ्या यांच्या स्मृतीने बाबराला भारतात स्वारी करण्यास प्रोत्साहित केले होते.
मुघल बादशहा बाबराचा जन्म उझबेकिस्तान येथे झाला.
तो मध्य आशियातील फरघाणा प्रांताचा राजा होता.
भारतातील मुघल सत्ता -
प्रश्न - मुघल भारतात आपली सत्ता स्थापन करू जर शकले.
सोळाव्या शतकाच्या प्रारंभी भारताची राजकीय घडी काहीसी विस्कळित झाली होती.
मुहम्मद तुघलकानंतर सुलतानशाहीला उतरती कळा लागली होती.
दिल्लीची सुलतानशाही मोडकळीस येऊन उत्तर, मध्य व दक्षिण भारतात अनेक स्वतंत्र राज्य निर्माण झाली होती.
दक्षिणेतील बहमनी राज्य पाच शाह्यांमध्ये विभागले गेले आणि दक्षिणेकडील विजयनगरचे राज्य उत्कर्षाच्या शिखरावर होते.
पोर्तुगिजांनी पश्चिम किनारपट्टीलगतच्या भागात आपले बस्तान बसवायला सुरुवात केली होती.
मध्ययुगातील सत्तांची परंपरागत लष्करी व्यवस्था नवीन आक्रमणांना तोंड देण्यास समर्थ नव्हती.
अद्ययावत शस्त्रास्त्रांचा वापर भारतीय करू शकले नाहीत.
या सगळ्यांचा फायदा घेऊनच मुघलांनी भारतावर अधिसत्ता स्थापन केली.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील मुघल काळ हा वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.
या काळात प्रबळ राज्यसत्ता साम्राज्य विस्ताराबरोबरच सांस्कृतिक प्रगती झाली.
व्यापारवाढीबरोबरच परकीय व्यापारी यांनी येथे प्रवेश करून आपल्या वखारी ही याच काळात स्थापन केल्या.
स्थापत्यकलेबाबत या काळात नेत्रदीपक प्रगती झाली.
सामाजिक जीवन गतिमान करणारा हा काळ होता.
आपण येथे मुघल सत्तेचा संस्थापक बाबर ते औरंगजेबाच्या कारकीर्दीपर्यंतचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत.
तसेच मुघलांची प्रशासन व्यवस्थाही समजावून घेणार आहोत.
बाबर (इ.स.१५२६ ते १५३०) -
प्रश्न - बाबराच्या विरोधात तर राजपूत राजे एकत्र आले. (सकारण स्पष्ट करा)
किंवा
बाबर - (टिप लिहा.)
भारताच्या मध्ययुगीन काळातील मुघल सत्तेचा संस्थापक जहिरोद्दीन मोहम्मद बाबर होता.
त्याचा जन्म मध्य आशियातील फरगणा प्रांतात १४८३ मध्ये झाला.(उझबेकिस्तान)
बाबर तैमुरलंग (तूर्क) आणि चंगीझखान (मुघल) यांचा वारसदार होता.
बाबर हा राज्यसंस्थापक व पराक्रमी सेनानी म्हणून त्याची कारकीर्द उल्लेखनीय आहे.
तो द्रुढनिश्चयी आणि महत्त्वाकांक्षी होता.
पानिपतच्या रणांगणावर झालेल्या युद्धात बाबरासमोर इब्राहिम लोदीचे विशाल सैन्य टिकू शकले नाही.
व्यूहरचनेचे कौशल्य, शक्तिशाली तोफखाना, हेरखाते आणि खंबीर नेतृत्व यांच्या जोरावर बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि दिल्ली येथे मुघलांची सत्ता स्थापन केली.
त्यासाठी मेवाडचा राजा राणासंग यांच्या नेतृत्वाखाली राजपुत राजे एकत्र आले.
राजस्थानमधील खानूआ येथे झालेल्या लढाईत बाबराने आपल्या युद्धकौशल्याच्या जोरावर राजपूत यांना पराभूत केले.
बाबर सुसंस्कृत व कवी हृदयाचा होता.त्याने स्वतःचे आत्मचरित्र तुर्की भाषेत लिहिले. विद्या व कला यांचा तो भोक्ता होता.
त्याच्या कार्याचे मूल्यमापन करताना लेनपुल म्हणतात, "बाबर हा त्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ आशियाई राज्यकर्ता होता."
नंतर त्याचा थोरला मुलगा सत्तेवर आला.
(इब्राहीम लोदी याचा पराभव करणारा - बाबर.)
हुमायुन (१५३० ते १५४० आणि १५५५ ते १५५६)
बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा हुमायून हा सत्तेवर आला.
हुमायुनचे भाऊ तसेच बिहारमधील अफगाण त्याला विरोध करीतच होते.
त्यातीलच शेरशहा सूरने बिलग्रामच्या लढाईत मुघल बादशहा हुमायूनचा पराभव केला आणि दिल्लीची सत्ता मिळवली.
शत्रूचा नायनाट करताना दाखवावयाच्या कठोरपणाच्या अभावामुळे त्याला आपल्या राज्याला मुकावे लागले.
शेरशहा सूर (१५४० ते १५४५) -
प्रश्न - शेरशहा सूर आदर्श राज्यकारभारासाठी प्रसिद्ध होता. (सकारण स्पष्ट करा.)
हुमायूनच्या पराभवानंतर दिल्लीमध्ये सूर या अफगाण घराण्याची सत्ता शेरशहाने निर्माण केली.
त्याचे वडील बिहारमध्ये जहागीरदार होते. शेरशहा धाडशी व शूर होता.
मुहम्मद लोदी, इब्राहिम लोदी, बाबर अशा अनेक राज्यकर्त्यांच्या पदरी राहून राजनीती आणि युद्धनीतीचे शिक्षण शेरशहाने घेतले होते.
शेरशहाने प्रशासन यंत्रणेत काही सुधारणा केल्या.
त्याने उत्तर भारतात विखुरलेल्या अफगाण सरदारांना एकत्र आणले आणि अफगाणांची सत्ता स्थापन केली.
पिक उत्पन्नापैकी शेतकऱ्यांनी सरकारला द्यायचा सारा निश्चित केला.
लोककल्याणाकडे लक्ष देऊन त्याने अनेक लोकोपयोगी कामे केली.
व्यापार व व्यवसायाला चालना दिली.
राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली.
शेरशहाचे वंशज कर्तबगार नव्हते.
त्यामुळे शेरशाहच्या मृत्यूनंतर हुमायूनने आपले गमावलेले राज्य पुन्हा मिळवले.
त्याच्या या कामांमुळे आदर्श राज्यकारभारासाठी शेरशहा प्रसिद्ध होता हे सिद्ध होते.
अकबर (१५५६ ते १६०५)
अकबराचा जन्म अमरकोट येथे १५४२ मध्ये झाला.
सत्ताग्रहणावेळी अकबर अल्पवयीन होता.
त्याच्यासमोर अनंत अडचणी होत्या.
सुसंघटित सैन्याचा अभाव, द्रव्याची चणचण, आणि शत्रूच्या हालचालींना सामोरे जाणे इ.
बैरामखानाच्या आधाराने या सर्व संकटांवर अकबराने मात करून भारतात विशाल साम्राज्य निर्माण केले.
प्रश्न - सम्राट अकबराने हिंदुस्थानात मुघल सत्तेचा पाया भक्कम केला.
अकबर बुद्धिमत्ता, सहिष्णुता, खंबीरपणा व धडाडी यामुळे सर्वश्रेष्ठ मुघल सम्राट ठरला.
बाबराने स्थापन केलेल्या राजसत्तेचे रूपांतर अकबराच्या काळात वैभवशाली साम्राज्य सत्तेत झाले.
हुमायूननंतर सत्तेवर आलेल्या सम्राट अकबराने काबुलपासून बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून वर्हाड, खानदेशापर्यंत आपली अधिसत्ता निर्माण केली.
या कालखंडात मेवाडचा अधिपती राजा महाराणा प्रताप यांच्याकडून अकबराला तीव्र विरोध झाला.
अकबराला शेवटपर्यंत मेवाड जिंकता आले नाही.
त्यामुळे साम्राज्यविस्तार करत असताना अकबराने राजपुतांबरोबर सामोपचाराचे धोरण स्वीकारले.
अकबराचे राजपूतविषयक धोरण त्याच्या दूरदर्शीत्वाची व व्यावहारिकतेची साक्ष पटविणारे ठरते.
अकबराने बहाद्दूर राजपूत जातीस राष्ट्रीय राज्याच्या निर्मितीसाठी सहकारी बनवले.
आमेर (जयपुर), बिकानेर, जैसलमर इ. ठिकाणच्या राजपूत शासकांनी आपल्या मुलींचा विवाह अकबराशी लावून त्याची कृपादृष्टी प्राप्त केली.
बेनीप्रसादच्या मते- या वैवाहिक संबंधांमुळे भारतीय राजकारणात नवीन युगाचा प्रारंभ झाला.
हिंदुस्थानात मुघल सत्ता मजबूत करायची असेल तर, येथील लोकांची मने न दुखावता मुघल राज्याचा पाया भक्कम करता येईल, हे अकबराच्या लक्षात आले होते.
कुशल सेनानी आणि प्रशासक वेगवेगळ्या क्षेत्रातील निष्णात लोक त्याच्या दरबाराची भूषणे होती.
त्याच्या प्रोत्साहनामुळेच हिंदी व फारशी भाषांचा विकास झाला.
अकबराच्या कारकीर्दीत मुघल स्थापत्यशैली उदयाला आली.
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, एका दृष्टीने अकबर हा भारतीय एक राष्ट्रीयत्वाचा जनक होऊन गेला, असे म्हणता येईल.
ज्याकाळी धर्मावरून वेगवेगळे गट पडलेले होते. त्याकाळी त्याने धर्म, जाती निरपेक्ष असे एक राष्ट्रीयत्वाचे ध्येय उचलून धरले.
अकबरानंतर जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांनी दिल्लीचे तख्त समर्थपणे सांभाळले.
(प्रश्न - अकबराच्या दक्षिण मोहीमेविषयी माहिती लिहा.
बाबर आणि हुमायुन यांच्या काळात उत्तर भारतात मर्यादित असणारी मुघल सत्ता अकबराच्या काळात दक्षिणेत त्याने निजामशाही जिंकण्यासाठी १५९५ मध्ये अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला.
निजामशहाची मुलगी चांद सुलताना हिने प्रतिकार केला.
तिच्या मृत्यूनंतर अकबराने अहमदनगर जिंकले.
अकबराने दक्षिणेत जिंकलेल्या प्रदेशाचे अहमदनगर, वऱ्हाड व खानदेश असे तीन सुभे केले.
शहजादा सलीम यांनी पिता अकबर यांच्या विरुद्ध केलेल्या बंडामुळे आपली दक्षिण मोहीम अर्धवट सोडून अकबराला माघारी फिरावे लागले.)
जहांगीर (१६०५ ते १६२७) -
अकबराचा पुत्र सलीम उर्फ जहांगीर हा अकबरानंतर सम्राट झाला.
त्याने पित्याचे साम्राज्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला.
इस्लाम धर्मात हस्तक्षेप केला नाही.
अकबराचे हिंदू विषयक धोरण तसेच चालू ठेवले.
सुरुवातीच्या काळात त्याचा पत्र खुश्रू याने बंड केले. परंतु हे बंड त्याने मोडून काढले.
जहांगीरच्या कारकीर्दीत नूरजहान या लावण्यवती पत्नीचा प्रभाव होता. ती कर्तबगार व महत्वाकांक्षी होती.
त्याच्या उत्तर काळात राज्यकारभारात तिचा प्रभाव होता.
जहांगीर चित्रकार होता. जहांगीरची एकूण कारकीर्द शांततेची आणि समृद्धीची होती.
१६२७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
शहाजहान (इ.स. १६२८ ते १६५८)
शहाजहानची ३१ वर्षांची कारकीर्द भरभराटीची आणि वैभवाची होती. त्याच्या कारकिर्दीला बादशाहीचा सुवर्णकाळ असे संबोधले जाते.
राजकीय स्थैर्य, आर्थिक समृद्धी आणि सांस्कृतिक प्रगती ही या काळाचे वैशिष्ट्ये होती.
ताजमहाल हे त्याच्या कला दृष्टीचे आणि पत्नी प्रेमाचे प्रतीक निर्माण झाले.
दक्षिणेतील निजामशाही राज्य त्याने जिंकून घेतले.
त्याचा पुत्र औरंगजेब याने बंड करून त्याला कैदी म्हणून आग्र्याच्या किल्ल्यात डांबून ठेवले. तेथेच त्याचा मृत्यू झाला.
औरंगजेब (इ. स.१६५८ ते १७०७) -
औरंगजेब अत्यंत धूर्त आणि कावेबाज होता. पित्याला अटक करून वारसा युद्धात दारा,शुजा, मुराद याबंधुंचा त्याने शेवट केला.
स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि आलमगीर ही पदवी धारण केली.
राज्यकर्ता म्हणून मोगलांचे साम्राज्य दख्खनच्या प्रदेशात विस्तारण्यासाठी सतत प्रयत्न केले.
त्याची कारकीर्द सरहद्द प्रांतातील युद्ध उत्तर व दक्षिण भारत विषयी धोरण कट्टर धार्मिक धोरण मराठा मुघल संघर्ष इत्यादींसाठी विशेष महत्त्वाची ठरली.
औरंगजेबाची शेवटची पंचवीस वर्ष दक्षिण हिंदुस्थानात मराठ्यांशी संघर्ष करण्यात गेली.
या काळात दक्षिणेतील मराठ्यांचा राज्यविस्तार, युरोपीय लोकांचा हिंदुस्थानच्या राजकारणातील हस्तक्षेप या गोष्टींना सुरुवात झाली होती.
इ.स.१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात बहादूरशहाच्या काळात मोगल सत्तेची अखेर झाली.
महसूल व्यवस्थेतील सुधारणा-
प्रश्न - मोगल काळामध्ये महसूल व्यवस्थेत कोणते बदल करण्यात आले?
मुघल साम्राज्याचा खरा संस्थापक बादशहा अकबरच ठरतो.
त्यांनी राज्य विस्तारित करणे बरोबरच मुघल सत्तेचा वैभव काळही प्रस्थापित केला.
राज्याच्या धोरणाची पायाभरणी केली. महसूल, प्रशासन,न्यायव्यवस्था इत्यादी अनेक क्षेत्रात सूत्रबद्ध रचना करून मुघल साम्राज्याचे आधारस्तंभ रेखीव केले.
अकबराने शेरशहा सूर याने निर्माण केलेल्या महसूल व्यवस्थेत काही सुधारणा केल्या.
त्यामुळे मोगलांची महसूल व्यवस्था अधिक शिस्तबद्ध बनली.
अकबराने जमिनीचे सर्वेक्षण करून जमिनीची प्रतवारी केली.
त्यानुसार जमिनीची विभागणी सुपीक, नापीक, बागायत आणि जिरायती अशा चार प्रतींमध्ये करण्यात येऊ लागली.
प्रत्येक शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र नोंदवले गेले.
जमिनीतील उत्पादन ठरवण्यासाठी तत्पूर्वीच्या १० वर्षातील उत्पादनाची सरासरी काढली गेली.
या सरासरी उत्पन्नाचा एक तृतीयांश १/३ हिस्सा जमीन महसूल म्हणून निश्चित करण्यात आला.
हा महसूल १० वर्षांसाठी कायम केला गेला.
यामुळे शेतकरी पुढील दहा वर्ष जमीन महसूलाबाबत निश्चिंत होत होते.
महसुलाची निश्चिती झाल्यावर शेतकऱ्यांकडून त्यासंबंधीची कबुलायत व पट्टा ही कागदपत्रे तयार केली जात असत.
महसूल रोख अथवा शेतमालाच्या रूपात वसूल केला जात असे.
शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी काही कर्जाऊ रक्कम दिली जाई व पुढील काळात सुलभ हप्त्याने ती वसूल केली जात असे.
दुष्काळ, महापूर, रोगराई अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना महसुलात माफी अथवा सूट मिळण्याची तरतूद या पद्धतीत होती.
अशा पद्धतीने महसुलाबाबत निश्चिंती निर्माण झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाला.
यामध्ये बादशाह अकबराचे लोककल्याणकारी धोरण प्रतिबिंबित झालेले दिसते.
अकबराच्या दरबारातील राजा तोडरमल हा त्याने केलेल्या जमिनविषयक सुधारणांसाठी प्रसिद्ध आहे.
कला, स्थापत्य, साहित्य -
प्रश्न - मुघल काळातील स्थापत्याची वैशिष्टे स्पष्ट करा.
अकबर, जहांगीर व शहाजहान अशा तीन सम्राटांच्या कारकिर्दीचा प्रदीर्घ कालखंड शांतता व सुव्यवस्था व समृद्धीचा होता.
कला आणि स्थापत्य या क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाले होते.
मुघलांची स्थापत्य कलेतील, वास्तुकलेतील कामगिरी खरोखरच दैदिप्यमान अशी आहे.
राजवाडे, सुंदर प्रवेशद्वारे, सार्वजनिक इमारती, मशिदी, तलाव, कारंजी अशी अनेक प्रकारची कामे मुघल काळात झाली.
वाहणारे पाणी व कारंजी ही तर त्यांची खास वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी मानावी लागते.
मशिदी,कबरी व प्रासाद येथील संगमरवरी दगडातील वेलबुट्टीचे कोरीवकाम त्याकाळातील कलाक्षेत्रातील प्रगतीची साक्ष देतात.
सौंदर्य ही या स्थापत्याची वैशिष्ट्ये आहेत.
वस्तूच्या बांधणी लाल दगडांचा आणि संगमरवरी दगडांचा वापर केलेला आहे.
भव्य घुमत कमानी नक्षीदार जाळी या काळातील स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये होती.
मोगल काळात विस्तीर्ण बागा कारंजी यांची उभारणी करण्यात आली.
बाबर बाग-बगीचे यांचा अत्यंत प्रेमी होता. त्याने लाहोर,आग्रा येथे अनेक बागा बांधल्या.
अकबराने आग्र्याचा सुंदर किल्ला बांधला.
संपूर्ण लाल दगडाने बांधलेली ही वास्तू अनेक दरवाजे असलेली आहे.
अकबराने फत्तेपुर सिक्री हे नगर वसविले. त्यामध्ये जामा मशीद, बुलंद दरवाजा अशा वास्तूंची उभारणी केली.येथे राजवाडा व किल्ला अशी संमिश्र वास्तू बांधली.
अकबराने आग्र्याचा किल्ला, लाहोरचा किल्ला, अलाहाबादचा किल्ला,अटकचा किल्ला असे महत्त्वाचे किल्ले बांधले.
अकबरानंतर भारतीय स्थापत्यकलेचा प्रभावातून भारतीय इस्लामी (इंडो-इस्लामिक) स्थापत्यकला उदयाला आली.
जहांगीर काळात वास्तुशिल्प शोभेचे दगड व संगमरवर कमान इराणकडून आलेला प्रभाव होय.
शहाजहान यांनी दिल्लीचा लाल किल्ला बांधला.
पांढर्याशुभ्र संगमरवराचा वापर हे शहाजहान कालीन वास्तुशिल्पाचा खास वैशिष्ट्य होय.
ताजमहाल म्हणजे मुघलकालीन वास्तुशिल्पाचा सुंदर नमुना होय.
मुघलकालीन चित्रकला -
मुघल काळात चित्रकला, संगीत, कला, शिल्पकला या सर्वच कलांना राजाश्रय आणि प्रोत्साहन मिळाले.
चित्रकलेचा उगम इराणी चित्रकलेत झाला.
अकबराने आपल्या दरबारात कुशल चित्रकारांची नेमणूक करून चित्रकलेला उत्तेजन दिले.
मशिदी कबरी प्रासाद यावरील संगमरवरी दगडातील कोरीव काम मुघल काळातील चित्रकलेची प्रगती दर्शवतात.
फत्तेपूर सिक्री येथील शेख सलिम चिश्तीच्या कबरीची व ताजमहालची कोरीव नक्षी उकृष्ट चित्रकलेचे नमुने आहेत.
जहांगीरच्या काळात दरबारातील व शिकारीच्या प्रसंगांची चित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले गेले.
पशुपक्षी, ढगांची रचना, मनुष्याकृती, नैसर्गिक दृश्ये या वैशिष्ट्यांमुळे मुघल काळातील चित्रकला वास्तव, जिवंत व आकर्षक बनली.
प्रश्न -औरंगजेबाने राजाश्रय काढून घेतल्यानंतर चित्रकारांनी आपली कला कशी जोपासली?
औरंगजेबाने चित्रकारांचा राजाश्रय काढून घेतल्यानंतर हे चित्रकार राजस्थान, बुंदेलखंड, गुजरात, हिमालय, पहाडी प्रदेश येथील सत्ताधीशांच्या आश्रयाला गेले.
येथे राहून त्यांनी आपली चित्रकला जोपासली.
त्यातूनच 'राजस्थानी' व 'पहाडी' अशा दोन चित्रशैलीचा उदय झाला.
निसर्गाच्या विविध वस्तू, ऋतूंची रेखाटने त्यांनी केली.
दैनंदिन जीवनातील विषयांव्यतिरिक्त धार्मिक, ऐतिहासिक अशा विषयांवरही त्यांनी चित्रे काढली.
पहाडी चित्रशैलीतूनच बसौली, गढवाली व कांगडा अशा विविध चित्रशैली उदयाला आल्या.
प्रश्न - औरंगजेबाच्या काळात कलेचा ऱ्हास झाला. (सकारण स्पष्ट करा.)
सम्राट अकबर ते सम्राट शहाजहान या सम्राटांच्या काळात सर्व कलांना राजाश्रय मिळाला. सम्राट अकबराच्या काळात हिंदुस्थानी संगीताचा उत्कर्ष झाला.
जहांगीर आणि शहाजहानने संगीत कलेला उत्तेजन दिले.
चित्रकला आणि स्थापत्य कलेला प्रोत्साहन मिळाले.
मात्र औरंगजेबाच्या कारकीर्दीत या सर्व कलांवर बंदी घालण्यात आली.
त्यामुळे त्याच्या काळात कलेचा ऱ्हास झाला.
मुघलकालीन साहित्य -
मुघलकाळात फारसी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य निर्माण झाले.
फारशी व तुर्की भाषांचा जाणकार असलेल्या बाबराने बाबरनामा हे आत्मचरित्र लिहिले.
अकबराने राजतरंगिणी, लीलावती, रामायण, महाभारत, हरिवंश व पंचतंत्र या संस्कृत ग्रंथांचे फारसीत भाषांतर करून घेतले.
अबुल फजल याचे 'अकबरनामा' व 'ऐन-ए-अकबरी' तसेच खाफीखानाचा 'तारीखे-खाफीखान' हा ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
दारा शुकोह याने उपनिषदांचे फारशीमध्ये भाषांतर केले.
मुघल काळातच तुलसीदासांचे 'रामचरितमानस', मलिक मुहम्मद जायसीचे 'पद्मावत' तसेच संत मीराबाई व संत कबीर यांचे दोहे हे स्थानिक बोली भाषेतील साहित्य प्रसिद्ध आहे.
व्यापार, उद्योग, समाजजीवन -
प्रश्न - मुघल कालखंडातील व्यापार, उद्योग व शिक्षणपद्धती या मुद्द्यांच्या आधारे मुघल कालखंडाची सविस्तर माहिती लिहा. (सविस्तर उत्तर लिहा)
मुघलकालीन व्यापार -
मुघल काळात मुघल राज्यकर्त्यांनी अंतर्गत व्यापारासाठी नवे महामार्ग तयार केले.
आग्रा येथून काबुल, कंदाहार, खंबायत, बुऱ्हाणपूर, मुंबईकडे जाणारे मार्ग तयार करण्यात आले होते.
समुद्रमार्गाने खंबायत, भरुच, कालिकत अशा बंदरातून व्यापार चाले.
अरबस्तान, इराण, आर्मीनियर, युरोप खंडातील काही देश यांच्याशी भारताचा व्यापार चालत असे.
रेशमी कापड, चामड्याच्या वस्तूंची परदेशात निर्यात होत असे.
सोने-चांदी व रेशमी कापड भारतात आयात केले जात असे.
प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ, सुती कापड निर्यात होई.
मुघलकालीन उद्योग -
मुघलकाळात भारतातील कापड उद्योग अधिक भरभराटीस आला.
भारतीय सुती कापडाला अरबस्थान, आफ्रिकेचा पूर्व किनारा, म्यानमार, मला क्का इत्यादी देशातून मोठी मागणी होती.
आग्रा येथे कापड रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगांचे उत्पादन होत असे.
हळद, लाख, कुसुम इत्यादी पदार्थांपासून विविध प्रकारचे रंग तयार केले जात असत.
शास्त्रीय शेतीची अवजारे तयार केली जात.
तांबे व पितळेची भांडी तयार करण्याचा उद्योग मोठा होता.
साखर, कागदनिर्मिती, रेशमापासून कागद तयार करणे हे उद्योग मोठ्या प्रमाणात होते.
सियालकोटचा कागद पांढराशुभ्र म्हणून प्रसिद्ध होता.
मीठ आणि साखर यांचे उत्पादन हे या काळातील महत्त्वाचे उद्योग होते.
मुघलकालीन शिक्षण पद्धती -
सुलतानशाही काळातील शिक्षण पद्धती मध्ये अकबराने महत्वाच्या सुधारणा केल्या.
इस्लामच्या धर्म शिक्षणाबरोबरच त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, कृषिशास्त्र व राज्यशास्त्र व खगोलशास्त्र अशा अनेक नवीन शास्त्रांचा अभ्यासक्रमात समावेश केला.
मुघल काळात उत्तर प्रदेशात अनेक मदरसे सुरू झाले.
विजापूर, गोवळकोंडा, हैदराबाद,बुऱ्हाणपूर, अहमदनगर, गुलबर्गा येथेही मदरसे मोठ्या प्रमाणात होते.
अहमदनगर येथे संत ताहीर यांनी प्रस्थापित केलेला मदरसा होता.
मदरशांमध्ये सुसज्ज ग्रंथालय होते.
मदरशांची देखभाल करण्यासाठी सेवकवर्ग असे.
मुघलकालीन समाज जीवन
प्रश्न - मुघलकालीन समाजजीवनाविषयी थोडक्यात माहिती लिहा.
मुघल काळात बहुसंख्य लोक खेड्यात राहात असत.
प्रत्येक गाव स्वयंपूर्ण असे. गावाची सुरक्षितता भव्य व सुव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाच्या गरजा गावातच पूर्ण होत असत.
यावरून गावे / खेडी स्वयंपूर्ण होती.
या काळात जातीव्यवस्था स्थिर राहिली.
उच्च वर्गातील मुसलमान व हिंदू या दोन्ही समाजात पडदा पद्धती प्रचलित होती.
मंदिरे, मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जात होते.
शेती हा बहुसंख्य लोकांचा व्यवसाय होता. त्याशिवाय व्यापार व अन्य उद्योगही चालू असत होते.
मुघल साम्राज्य आणि दख्खन -
प्रश्न - अकबराच्या दक्षिणमोहिमेविषयी माहिती लिहा.
बाबर व हुमायून यांच्या काळात राज्याचा विस्तार उत्तर भारतापुरता मर्यादित होता.
नर्मदा नदीच्या दक्षिणेला खानदेशच्या सुलतानाचे राज्य, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी प्रमुख राज्ये होती.
अकबराने निजामशाही जिंकण्यासाठी मोहीम राबवली.
अकबराने निजामशाही जिंकण्यासाठी १५९५ मध्ये अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला.
निजामशहाची मुलगी चांद सुलतानाने अत्यंत धैर्याने आणि हुशारीने यशस्वी प्रतिकार केला.
तिच्या मृत्यूनंतर अकबराने निजामशाहीची राजधानी अहमदनगर जिंकले.
अकबर स्वतः दक्षिणेकडे आला व दक्षिणेस जिंकलेल्या प्रदेशाचे त्याने अहमदनगर, वर्हाड व खानदेशाचे तीन सुभे निर्माण केले.
अकबराच्या दक्षिण मोहिमेच्या वेळी शहजादा सलीम याने पित्याविरुद्ध बंड पुकारले.
त्यामुळे अकबराला त्याची दक्षिण मोहीम घाईने आटोपती घ्यावी लागली.
शहाजहानच्या काळात निजामशाही राज्य लयाला गेले.
मात्र आदिलशाही व कुतुबशाही यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले.
नंतरच्या काळात औरंगजेबाला त्यांचे उच्चाटन करण्यात यश मिळाले.
यादरम्यान दख्खनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठ्यांच्या राज्याने औरंगजेबाशी तीव्र निकराचा संघर्ष केला.
त्याचा आढावा आपण पुढील पाठामध्ये घेणार आहोत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा