१२.भारत, वायव्येकडील देश आणि चीन
प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध : -
भारतीयांचे विशेष-
भारताच्या प्राचीन इतिहासाचा आढावा घेत असताना आपण सुमारे ४००० वर्ष इतक्या प्रदीर्घ कालखंडातील ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रांमध्ये होत गेलेल्या स्थित्यंतराचा अभ्यास केला.
या पाठात आपण भारताबाहेरील प्रदेशांमध्ये दिसणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या गुणांचा परिचय करून घेणार आहोत.
परकीय प्रदेशात गेलेल्या भारतीयांनी त्यांची संस्कृती, धर्म आणि राजकीय सत्ता स्थानिक लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला नाही, ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.
मात्र त्या प्रदेशांमधील स्थानिक लोकांशी त्यांची सांस्कृतिक देवाण-घेवाण झाली आणि त्यातून त्या स्थानिक संस्कृतीमध्ये मोलाची भर पडत गेली.
हिंदुकुश पर्वतापलीकडच्या प्रदेशात झालेला भारतीय संस्कृतीचा प्रसार हा प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराशी निगडित आहे.
कथासरित्सागर, जातककथा, दीपवंश, महावंश या ग्रंथांमधून प्राचीन काळातील भारतातून दूरवरच्या प्रदेशांशी चालणाऱ्या व्यापाराचे संदर्भ दिलेले आढळतात.(संकल्पना चित्रासाठी महत्त्वाचे.)
प्रश्न - प्राचीन काळातील भारताच्या व्यापारासंबंधी कोणती माहिती आपल्या ग्रंथांमधून आलेली आहे?
प्राचीन काळातील भारतातून दूरवरच्या प्रदेशांशी चालणाऱ्या व्यापाराचे उल्लेख बौद्ध साहित्यात आलेले आहेत.
भारतीय व्यापाऱ्यांच्या समुद्री प्रवासाच्या आणि त्यांच्या धाडसाच्या अनेक गोष्टी जातककथा, कथासरित्सागर, दीपवंश, महावंश अशा ग्रंथांमधून आलेल्या आहेत.
संघम साहित्यात भारतात सोने घेऊन येणार्या आणि भारतातून काळीमिरी घेऊन जाणाऱ्या यवन जहाजांचा उल्लेख आलेला आहे.
भारतीय जहाजांवरील खलाशी दिशांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी कावळ्यांचा (दिशाकाक) उपयोग करीत असल्याचा उल्लेख ‘बावेरू जातक’ या जातककथेत केलेला आहे.
भारत आणि पश्चिम आशिया यांच्यामधील व्यापाराच्या संदर्भात जुन्या बायबलमध्ये उल्लेख असलेले ओफीर म्हणजे ‘सोपारा’ बंदर असावे, असे मानले जाते.
समुद्री प्रवासात एका अनामिक खलाशांनी केलेल्या दैनंदिन नोंदींचा वृत्तांत ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी’ या नावाने प्रसिद्ध आहे.
त्यामध्ये प्राचीन भारतातील भरूच, सोपारा, कल्याण यासारखे बंदरे, उज्जैनसारखी महत्त्वाची व्यापारी केंद्रे यांची माहिती मिळते.
याशिवाय स्ट्रॅबो या इतिहासकाराने लिहिलेला ‘जिओग्राफीया थोरल्या प्लिनीने लिहिलेला ‘नॅचरॅलिस हिस्टोरीया’, क्लॉडियस टॉलेमी या ग्रीक गणित-भूगोल तज्ञाने लिहिलेला ‘जिओग्राफीया’, एरियन या ग्रीक इतिहासकारांनी लिहिलेला ‘इंडिका’ यासारखे ग्रंथ भारत- रोम यांच्यातील व्यापाराची माहिती देणाऱ्या साधनांमध्ये महत्त्वाचे आहे.
प्रश्न- थोरला प्लिनी याने रोमन खजिना भारतामध्ये रिकामा होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
भारताचा रोमन साम्राज्याशी प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होता.
रोमन व्यापारी भारतात सोने घेऊन येतात आणि काळीमिरी घेऊन जात असल्याचे उल्लेख साहित्यात येतात.
रोमन सम्राट निरो याने पाचूच्या भारतीय प्याल्यासाठी एक दशलक्ष सुवर्ण नाणी मोजली असल्याचा उल्लेख आहे.
रोममधून मोठ्या प्रमाणात सोने भारताकडे जाते, म्हणून प्लिनीने भारताचे वर्णन ‘जगातील सर्व सुवर्ण आपल्याकडे ओढून घेणारे कुंड’ असे केले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रोमन खजिना भारतामध्ये रिकामा होत असल्याबद्दल थोरला प्लिनी या रोमन विचारवंताने चिंता व्यक्त केली होती.
प्रश्न- भारतातून कोणत्या गोष्टी प्राचीन काळात निर्यात होत असत?
प्राचीन काळात भारताचा व्यापार अफगाणिस्तान, चीन, रोम इ. देशांशी होत असे.
त्या काळात भारतातून पुढील गोष्टी निर्यात होत असत---
बॅबीलोनमधील इमारतींसाठी लागणारे सागवानी आणि देवदार लाकूड.
सुगंधी पदार्थ, काळी मिरी, दालचिनी आणि मसाल्याचे पदार्थ.
हस्तिदंत, कासवाच्या पाठी, माकडे आणि मोर.
मोती आणि मौल्यवान खडे इत्यादी. गोष्टीही भारतातून निर्यात होत असत.
प्रश्न - भारत आणि रोम यांच्यातील व्यापाराविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा.
मुद्दे - अ. भारताची निर्यात ब. भारताची आयात क. महत्वाची व्यापारी केंद्रे व बंदरे.
भारत-रोम यांच्यातील व्यापार इसवीसनाच्या पहिल्या शतकात रोमचा पहिला सम्राट ऑगस्टस याच्या काळात वाढीस लागला. शिष्टमंडळ त्याच्या भेटीसाठी केल्याचे उल्लेख आहेत.
अ. भारताची निर्यात--
भारतातून रोमला मसाल्याचे पदार्थ, उंची वस्त्रे, मोती निर्यात होत असत.
सर्प,शिकारी कुत्रे, वाघ,हत्ती यांसारखे प्राणी विक्रीस नेले जात.
पोपट, मोर यासारखे पक्षी निर्यात केले जात असत.
गेंड्याचे कातडे, हस्तिदंत अशा अमूल्य गोष्टींना रोममध्ये मोठी मागणी असे.
या वस्तू सुवर्ण नाण्यांच्या बदल्यात निर्यात होत असत.
ब. भारतात आयात---
रोममधून भारतात सोने, शिसे, जस्त हे धातू आयात होत असत.
पोवळी, मद्य, ऑलिव्ह तेल अशा वस्तूंची आयात केली जात असे.
क. महत्वाची व्यापारी केंद्रे व बंदरे--
भारत व रोम यांच्यातील व्यापार रेशीममार्ग आणि समुद्रीमार्ग या दोन्ही मार्गांनी होत असे.
भारतातील भरूच,सोपारा, कल्याण इत्यादी बंदरांतून हा व्यापार चाले.
उज्जैन तसेच महाराष्ट्रातील पैठण, तेर, कोल्हापूर, जिल्ह्यातील भोकरदन हे त्या काळातील महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती.
भारत आणि गांधार -
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भौगोलिकदृष्ट्या अफगाणिस्तानचे म्हणजेच गांधारचे स्थान भारत आणि मध्य आशिया यांना जोडणार्या व्यापारी मार्गावर अत्यंत महत्त्वाचे होते.
प्रश्न- इस्लामपूर्व काळात गांधार प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी संलग्न होता.
प्राचीन सोळा महाजनपदांपैकी गांधार हे महाजनपद महत्वाचे होते.
त्याचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशांमध्ये झालेला होता.
जनपदांच्या काळापासून ते इस्लामच्या आगमनापर्यंत गांधार हे सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी एकत्र जोडलेले होते.
मध्य आशियातून भारतात आलेले आक्रमक या प्रदेशातच भारतामध्ये आले.
चिनी भिक्खूही याच मार्गाने भारतात आले आणि भारतातून धर्मप्रसारासाठी अशोकाने पाठवलेले भिक्खू याच मार्गाने पश्चिमेकडील देशांमध्ये गेले.
हिंदू देव-देवतांच्या अनेक मूर्ती अफगाणिस्तानमध्ये म्हणजे तेव्हाच्या गांधार प्रदेशात उत्खननात सापडल्या आहेत.
बाम यांच्या पर्वतरांगात बौद्ध मूर्ती स्तूप, गुहा आहेत. त्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे.
या प्रदेशात सापडलेले स्तूप, विहार आणि शिल्पे गांधार शैलीचा उत्तम नमुना आहेत.
या गांधार शिल्पशैलीच्या प्रभावातून मथुरा व वाराणसी कलाशैली विकसित झाली.
यावरून हे सिद्ध होते की, इस्लामपूर्व काळातील गांधार प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी संलग्न होता.
सम्राट अशोकाचा काळ -
सम्राट अशोकाच्या १३ क्रमांकाच्या लेखात समकालीन ग्रीक राज्यांची नावे दिलेली आहेत.
कंबोज या प्राचीन अफगाणिस्तानमधील राज्याचा उल्लेखही आहे.
अफगाणिस्तानातील कंदाहार येथील सम्राट अशोकाच्या ग्रीक भाषेतील शिलालेखात ग्रीक, अरेमाईक लिपीचा वापर केलेला आहे.
या शिलालेखावरून अफगाणिस्तानचा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा अंतर्गत भाग होता, हे स्पष्ट होते.
सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी काश्मीर आणि अफगाणिस्तानामध्ये पाठवलेल्या भिख्खूचे नाव ‘थेर मह्यांतिक’ (मज्झांतिक) आणि ग्रीक (योन) राज्यांमध्ये पाठवलेल्या भिक्खूचे नाव ‘थेर महारक्खित’ असे होते.
कुषाण सम्राट कनिष्क आणि कुषाण सत्तेनंतरचा काळ
सम्राट कनिष्क -- टिप लिहा. २ गुण.
कनिष्क याचे साम्राज्य पूर्वेकडे पाटलीपुत्र आणि उत्तरेकडे काश्मीरपासून मध्य आशियापर्यंत पसरले होते.
त्याचे साम्राज्य खूप मोठे असल्याने त्याने ‘पुरुषपूर’ (पेशावर) व ‘मथुरा’ अशा दोन राजधान्या स्थापन केल्या होत्या.
प्राचीन कपिषा (बेग्राम) ही कुशाणांची आणखी एक राजधानी होती.
कनिष्काने सोन्याची नाणी पाडली होती. गौतम बुद्धांची प्रतिमा असून त्याखाली ‘बोद्दो’ असा लेख आहे.
कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत झाला.
पेशावरजवळील ‘शाहजी की ढेरी’ येथे सापडलेला स्तूप कनिष्काच्या काळात उभारलेला होता.
तो स्तूप ‘कनिष्क स्तूप’ म्हणून ओळखला जातो.
कनिष्काने काश्मीरमध्ये कुंडलवन येथील विहारात चौथी बौद्ध धर्मपरिषद आयोजित केली होती.
प्रश्न - कुशाण राजवटीत बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत झाला.
कुशाण सम्राट कनिष्क यांचे साम्राज्य पाटलीपुत्र आणि उत्तरेकडे काश्मीरपासून मध्य आशियापर्यंत पसरलेले होते.
प्राचीन कपिषा (बेग्राम) प्राचीन राजधानी रेशीम मार्गाच्या मोक्याच्या ठिकाणी होती.
अफगाणिस्तान ते चीनपर्यंतचा व्यापारी मार्ग कुशाणांच्या ताब्यात होता.
हा मार्ग तक्षशिला-खैबरखिंड-अफगाणिस्तान व तेथून चीनकडे जात असे. या मार्गामुळे कुशाण राजवटीत बौद्ध धर्माचा प्रसार चीनपर्यंत झाला.
अफगाणिस्तानमार्गे भारतात आलेल्या फाहियान, युआन श्वांग यासारख्या चिनी बौद्ध भिक्खूंनी तिथे पाहिलेल्या बौद्ध विहार आणि स्तूप यांचे वर्णन केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये बौद्ध विहार आणि स्तूप यांचे असंख्य अवशेष आहेत.
त्यातील ‘शाहजी-की-ढेरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थळाचे उत्खनन झाले आहे.
शाहजी-की-ढेरी - टिपा लिहा २ गुण
पाकिस्तानातील पेशावरजवळील शाहजी-की-ढेरी याठिकाणी झालेल्या उत्खननात एका स्तूपाचे अवशेष सापडले.
हा स्तूप कुशाण सम्राट कनिष्क याने बांधला होता, म्हणून तो ‘कनिष्क स्तूप’ या नावानेही ओळखला जातो.
या स्तूपात सापडलेल्या करंडकामध्ये मिळालेल्या अस्थी गौतम बुद्धांच्या आहेत, असे मानले जाते.
या करंडकावर महासेन संघारामातील (बौद्ध भिक्खूंच्या निवासस्थान) कनिष्क विहाराच्या बांधकामावर देखरेख करणारा प्रमुख सेवक ‘अग्निशाल’ असे कोरलेले आहे. हा करंडक सध्या पेशावरच्या संग्रहालयात आहे.
अफगाणिस्तानातील बौद्ध धर्माचे आणखी एक महत्त्वाचे केंद्र होते. म्हणजे हड्डा होय.
हड्डा- (टिपा लिहा) २ गुण.
प्राचीन काळी ‘नगराहार’ या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण आधुनिक काळात ‘हड्डा’ या नावाने प्रसिद्ध आहे.
अफगाणिस्तानातील जलालाबादजवळ असणारे हे ठिकाण प्राचीन काळी बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते.
येथे अनेक स्तूप आणि विहार यांचे अवशेष आहेत. या स्तूपांच्या परिसरात मिळालेली शिल्पे गांधार शिल्पशैलीचा अत्युत्कृष्ट नमुना आहे.
हड्डा येथील या शिल्पांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळालेला आहे.
जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त झालेले आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे ते तख्त-इ -बाही या नावाने ओळखले जाते.
तख्त- इ- बाही-
‘तख्त-इ-बाही’ हे गांधार प्रदेशातील ‘पख्तुनख्वा’ या प्रांतात आहे. हा भाग आता पाकिस्तानमध्ये समाविष्ट झालेला आहे.
तख्त-इ-बाही येथील विहाराच्या वास्तुसंकुलाचे बांधकाम इसवीसनाच्या पहिल्या शतकात सुरू झाले.
त्यानंतर तिथे इसवीसनाच्या सातव्या शतकापर्यंत विविध वास्तूंचे बांधकाम केले गेले.
तेथील अवशेषांमध्ये तीन स्तूप व इतर वास्तूंचे अवशेष आहेत.
अफगाणिस्तानातील प्राचीन बौद्ध स्तूप, विहार याखेरीज जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा प्राप्त झालेल्या बामियानच्या बुद्धमूर्ती विशेष उल्लेखनीय आहेत.
बामियानच्या बुद्धमूर्ती (टिपा लिहा.) २ गुण.
अफगाणिस्तानातील काबूलच्या पश्चिमेला २५० किलोमीटर अंतरावर जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा प्राप्त केलेल्या बामियानच्या बुद्धमूर्ती आहेत.
‘कुह-ए- बाबा’ नावाच्या पर्वतरांगांमध्ये ७५० गुहा, बौद्ध भित्तिचित्रे आणि उभ्या दोन मूर्ती उभारलेल्या होत्या.
यातील एक मूर्ती ५३ मीटर तर दुसरी ३८ मीटर उंचीची असून मूर्तीचा मूळ गाभा कड्याच्या मूळ दगडात कोरलेला होता.
त्यावर मातीचे अनेक थर चढवून बुद्धांची प्रतिमा, अंगावरील वस्त्र यांचा साज चढवला होता.
लाकडी खुंटा त्यांच्या सहाय्याने मूर्तींना हात बसवलेले होते.
मूर्तीच्या बाजूने रंगीत भित्तीचित्रे रेखाटली होती.
मूळ मूर्ती रंगीत सोन्याचा मुलामा चढवलेल्या व मौल्यवान रत्ने जडवलेल्या होत्या.
२००१ साली तालिबान मूलतत्त्ववादी संघटनेने या मूर्ती नष्ट केल्या.
युनेस्को आणि जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा अनेक देशांमधील संघटनांच्या मदतीने अफगाणिस्तानचे सरकार बामियान येथील हा जागतिक वारसा पुन्हा पूर्वस्थितीला आणण्यासाठी काम करत आहे.
हे काम सुरू झाल्यानंतर बामियान येथील काही गुहांमधील रंगीत भित्तिचित्रे उजेडात आले.
त्याखेरीज एका १९ मीटर लांबीच्या महापरीनिब्बान मूर्तीचे अवशेषही मिळाले आहेत.
युआन श्वांगने केलेल्या वर्णनानुसार बामियान येथे दुर्मिळ बौद्ध हस्तलिखितांचे एक ग्रंथालयही होते.
पुरातत्त्वीय संशोधकांना भूर्जपत्रे आणि ताडपत्रे (तालपत्रे) यांच्यावर लिहिलेली काही हस्तलिखिते बामियान येथील एका विहारात मिळाली आहेत.
अफगाणिस्तानमध्ये हिंदू देवदेवतांच्या मूर्ती मिळालेल्या आहेत.
त्यात काबूल शहराच्या जवळ मिळालेली एक गणेशाची मूर्ती आहे.
इसवीसनाच्या चौथ्या शतकातील ही मूर्ती गणेशाच्या मूर्तीमध्ये सर्वाधिक प्राचीन आहे.
विशेष म्हणजे गणेशाची इतकी प्राचीन मूर्ती भारतातही मिळालेली नाही.
काबुलजवळ ‘खैर खाना’ नावाचे एक मंदिर आहे. येथील उत्खननात सूर्यदेवतेची रथारूढ मूर्ती मिळाली.
यावरून गांधार हा प्रदेश भारताशी संलग्न होता, हे निर्विवादपणे लक्षात येते.
प्रश्न -इस्लामपूर्व काळात गांधार प्रदेश सांस्कृतिक दृष्ट्या भारताशी संलग्न होता. (तुमचे मत नोंदवा)
प्राचीन काळी १६ महाजनपदांपैकी गांधार हे महाजनपद महत्त्वाचे होते.
त्याचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशांमध्ये झालेला होता.
जनपदांच्या काळापासून इस्लामच्या आगमनापर्यंत गांधार हे सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी एकत्र जोडलेले होते.
मध्य आशियातून अनेक आक्रमक या प्रदेशातूनच भारतात आले.
भारतातून धर्मप्रसारासाठी अशोकाने पाठवलेले बौद्ध भिक्खू पश्चिमेकडील देशांमध्ये देखील याच मार्गाने गेले.
हिंदू देव-देवतांच्या अनेक मूर्ती अफगाणिस्थानमध्ये म्हणजे तेव्हाच्या गांधार प्रदेशात उत्खननात सापडल्या आहेत.
या पर्वतरांगांमध्ये बौद्ध मूर्ती, स्तूप, गुहा आहेत. ज्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
या प्रदेशात सापडलेले स्तूप, विहार आणि शिल्पे गांधार शैलीचा उत्तम नमुना आहेत.
या गांधार शिल्प शैलीच्या प्रभावातून मथुरा व वाराणसी कलाशैली विकसित झाली.
यावरून हे सिद्ध होते की, इस्लाम पूर्व काळात गांधार प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी संलग्न होता.
भारत आणि चीन -
रेशीममार्ग-. (टिपा लिहा) २ गुण.
आशिया आणि युरोप यांना जोडणाऱ्या मार्गाचा रेशीम मार्ग म्हणून प्रथम उल्लेख ‘फर्डिनांड व्हाॅन रिश्टोफेन’ या जर्मन भूगोल शास्त्रज्ञाने केला.
या रेशीम मार्गाची लांबी ६००० किलोमीटरहून अधिक आहे. महामार्ग अनेक शाखोपशाखा यांचे जाळे आहे.
या मार्गाची प्रमुख शाखा चीन, भारत, मध्य आशिया अशा मार्गाने जाते, तर दुसरी शाखा उत्तरेकडे गवताळ प्रदेशातून जाते.
या मार्गावरील शहरांतून व्यापार्यांच्या निवार्याची व भोजनाची सोय होत असे.
रेशीम मार्गामुळे मालाच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध होत असत.
प्रश्न- व्यापारी रेशीम मार्गाच्या कमी अंतराच्या शाखेचा अवलंब क्वचितच करीत असत. (सकारण स्पष्ट करा.)
आशिया आणि युरोप यांना जोडणाऱ्या रेशीम मार्गाच्या अनेक शाखा होत्या.
यातील प्रमुख शाखेच्या उत्तरेकडे असलेल्या गवताळ प्रदेशातून दुसरी कमी अंतर असलेली शाखा होती.
या मार्गावर भटक्या पशुपालक टोळ्यांचा उपद्रव होत असे.
या मार्गावर मुख्य मार्गावरील असणाऱ्या निवास, भोजन आणि बाजारपेठा या सोयी उपलब्ध नव्हत्या.
त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे.
म्हणून रेशीम मार्गाच्या कमी अंतराच्या शाखेचा अवलंब व्यापारी क्वचितच करत असत.
प्रश्न - भारत आणि चीन यांच्या संबंधाची माहिती लिहा.
मुद्दे- अ. व्यापारी संबंध ब. बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार क. सेरेंडियन कलाशैली
भारत आणि चीन यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते.
अ. व्यापारी संबंध -
भारत आणि चीन यांच्यात रेशीम मार्गाने व्यापार चालत असे.
हा व्यापारी मार्ग भारत, मध्य आशिया व चीन या देशांमधून जातो.
झिंजिंयांग प्रांतातून रेशीम मार्गाच्या दोन उपशाखा तक्षशिला नगरीपर्यंत येत असत.
त्यातील एक शाखा गांधार प्रदेशाकडे तर दुसरी लेहमार्गे काश्मीरमध्ये पोहोचत असे.
रेशीम मार्गाच्या मुख्य मार्गावर व्यापाऱ्यांसाठी निवासाची व भोजनाची ही सोय असे.
ब. बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार -
इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला सुरुवात झाली.
‘हान’ घराण्यातील राजा मिंग-ती याने भारतात पाठवलेल्या प्रतिनिधींबरोबर चीनमध्ये गेलेल्या कश्यप मातंग आणि धर्मरक्ष या भिक्खूनी हे दोन बौद्धाचार्य मध्य भारतातून इ.स. ६७ च्या सुमारास चीन मध्ये गेले.
त्यांनी त्यांच्यासोबत अनेक बौद्ध ग्रंथ पांढऱ्या घोड्यांवरून नेले.
चीनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केल्याने धर्माप्रसाराला चालना मिळाली.
या दोघांच्या सन्मानार्थ चिनी सम्राटाने एक मंदिर बांधले ‘व्हाईट हॉर्स टेम्पल’ या नावाने हे मंदिर ओळखले जाते.
सहाव्या शतकापर्यंत बौद्ध धर्माची चीनमध्ये लोकप्रियता शिगेस पोहोचली. बौद्ध धर्माचे सर्व संप्रदाय चीनमध्ये प्रस्थापित झाले.
क. सेरेडियन कलाशैली -
चीनमध्ये महायान बौद्ध भिक्खू मध्य आशियातून आलेले होते.
त्यांच्या प्रभावाखाली चीनमध्ये गौतम बुद्ध व बोधिसत्व यांच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली.
चीनच्या झिंजियांग प्रांतात उदयाला आलेल्या या कलाशैलीला ‘सेरेडियन कलाशैली’ असे म्हणतात.
सेरेन म्हणजे चीन व इंडिया असे दोन शब्द एकत्र येऊन ‘सेरेडियन’ हा शब्द तयार होतो.
सेरेडियन कलाशैलीवर गांधार शैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
व्हाईट हॉर्स टेम्पल - (टिपा लिहा) २ गुण.
‘हान’ घराण्यातील दुसरा राजा ‘मिंग-ती’ याने भारतात पाठवलेल्या त्याच्या प्रतिनिधींबरोबर ‘कश्यप मातंग’ व ‘धर्मरक्षक’ हे दोन आचार्य चीनमध्ये गेले.
या आचार्यांनी आपल्याबरोबर पांढऱ्या रंगाच्या घोड्यांवर अनेक बौद्ध ग्रंथ चीनमध्ये नेले.
तेथे या आचार्यांनी बरोबर नेलेल्या बौद्ध ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद केल्यामुळे चिनी लोकांना ते ग्रंथ वाचता येऊ लागले.
‘मिंग-ती’ या सम्राटाने या दोन बौद्ध आचार्यांच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधले. हे मंदिर ‘व्हाईट हॉर्स टेम्पल’ या नावाने ओळखले जाते.
चीनमध्ये बांधलेले हे पहिले बौद्ध मंदिर होय.
प्रश्न - चिनी पॅगोडाविषयी माहिती लिहा.
चीनमध्ये चौथ्या ते सहाव्या शतकात प्रत्येक मंदिरात चिनी धाटणीचा एक पॅगोडा असल्याने यातील बहुतेक इमारती आज अस्तित्वात नाहीत.
हे पॅगोडे अनेक मजली असत. प्रत्येक मजला खालच्या मजल्यापेक्षा लहान होत जाई.
सर्वात वरच्या मजल्यावर धातूची दांडी आणि त्यावर खालून वर लहान होत जाणाऱ्या धातूच्या कड्या असत.
नंतरच्या काळात पॅगोडांचे बांधकाम विटा व दगड वापरून केले जाऊ लागले.
प्रश्न- डुनहुआंग हे ठिकाण कशाविषयी प्रसिद्ध आहे?
रेशीम मार्गावर असणारे चीनमधील डुनहूआंग हे ठिकाण प्राचीन बौद्ध लेण्यांविषयी प्रसिद्ध आहे.
ही लेणी ‘मोगाओ लेणी’ म्हणून ओळखली जातात.
या लेण्यांची निर्मिती १३ व्या- १४ व्या शतकापर्यंत सुरू होती.
लेण्यांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळालेला आहे.
येथील जवळपास ५०० लेण्यांमधील शिल्पे व भित्तिचित्रे विलोभनीय आहेत.
या लेण्यांमधून बौद्ध ग्रंथांची हजारो हस्तलिखिते मिळाली आहेत.
‘डुनहूऑग’ हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
भारत व पश्चिमेकडील व्यापारी चीनमधील व्यापाऱ्यांना या नगरात भेटून सौदे करीत असत.
भारतीय संस्कृतीचा प्रसार श्रीलंका आणि आशियातील देशांमध्ये कसा झाला, त्याचा इतिहास आणि भारतीय संस्कृतीच्या तेथे आजही अस्तित्वात असणाऱ्या खुणा यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
Exercise
उत्तर द्याहटवा