प्रकरण - ४ वसाहतवाद आणि मराठे
प्रास्ताविक-
इ.स. १६ व्या शतकापासून युरोपियन व्यापारी भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आले होते.
या युरोपीय व्यापार्यांपैकी फक्त पोर्तुगीजांनी आपली राजकीय सत्ता पश्चिम किनाऱ्यावर स्थापन केली होती.
इंग्रज, फ्रेंच, डच हे युरोपीय व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर वखारी स्थापन करून आपला व्यापार करत असत.
त्यांच्याजवळ प्रबळ आरमार असल्याने सागरावर त्यांची सत्ता चालत असे.
तेव्हा या युरोपियन व्यापाऱ्यांवर आणि सिद्दी सारख्या क्रूर मुसलमानी जमातीवर आपली जरब बसवायची असेल तर आरमाराची निर्मिती करावयास हवी, हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते.
त्यामुळे त्यांनी सक्षम आरमार उभे केले. या पाठामध्ये आपण ह्याच मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण अभ्यासणार आहोत.
मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण ----
प्रश्न- मराठी सत्तेचे वसाहत विरोधी धोरण स्पष्ट करा. किंवा
प्रश्न - मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते. किंवा
प्रश्न -छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.
व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या पोर्तुगीज,डच, फ्रेंच, इंग्रज या युरोपियन राष्ट्रांनी राजकीय सत्तेची स्थापना केली.
भारतात आलेल्या या युरोपियनांचा प्रवास तराजू -तलवार- तख्त असा होता.
तराजू म्हणजे व्यापार होय.
तलवार म्हणजे लष्करी सामर्थ्य वाढविणे.
तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे.
या युरोपियनांनी भारतात आपल्या व्यापारी वखारी स्थापन केल्या.
वखारीना संरक्षण मिळावे म्हणून वखारीना तटबंदी केली. किल्ले बांधले.
युरोपियनांमध्ये भारतात सर्वप्रथम पोर्तुगीज आले.
त्त्यांचे आरमार प्रबळ होते. तसेच पोर्तुगालमधून येणाऱ्या जहाजांवर तोफाही असत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्यांचा प्रतिकार केला.
समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील, म्हणून या परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणे यासारखे उपाय शिवाजी महाराजांनी केले.(म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार उभारले.)
शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्यात जी दूरदृष्टी दाखवली, ती समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावानेच आढळते.
अशारितीने परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी देखील प्रखर विरोध केला.संभाजी 1महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला.
त्यानंतर पेशवेकाळात थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांचा पराभव केला.
अशा रीतीने परकीय सत्तेचा पराभव करणारी एकमेव भारतीय सत्ता म्हणजे मराठ्यांची सत्ता होती.
युरोपियनांमध्ये पोर्तुगीज भारतात सर्वप्रथम आले.
पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रांमध्ये फिरंगी असा केलेला आहे.
त्यांच्या ताब्यातील प्रदेशाला फिरंगान असे म्हणत.
फिरंग -म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार होय.
फिरंगी -म्हणजे पोर्तुगीज लोक होय.
कालांतराने सर्वच युरोपियन लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागला.
पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. (गुण ५)
प्रश्न- छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपियन व्यापाऱ्यांना ओळखण्यात जी दूरदृष्टी दाखवली होती, ती समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावानेच आढळते. युरोपीय व्यापार्यांविषयी आज्ञापत्रातील पुढील धोरण मननीय आहे --
इंग्रज,डच,डेन्स, पोर्तुगीज व्यापारी इतर सावकारांसारखे नसून त्यांना आपल्या प्रदेशावर राज्य करायचे आहे.
युरोपियन व्यापारी आपल्या देशातील राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या भागात येतात आणि जम बसवतात.
परदेशातील राज्यकर्त्यांना आपल्या देशात जागेचा मोह आहेच. येथील प्रदेशांवर त्यांना राज्य करण्याची इच्छा आहे.
हे व्यापारी हट्टी आहेत, हाती घेतलेली जागा ते सोडणार नाहीत. म्हणून त्यांच्याशी कामापुरतेच संबंध ठेवावेत.
वखारीसाठी जागा देणे अपरिहार्य झाले तर त्यांना जलदुर्गाजवळ, खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनारी वखारीसाठी जागा देऊ नये.
आरमाराच्या मदतीने हे लोक बंदरांच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात.म्हणून त्यांना समुद्रकिनाऱ्यापासून लांब, गावाजवळ जागा द्यावी.
त्यांना पक्क्या इमारती बांधू देऊ नये.आपल्या मार्गात येऊ देऊ नये आणि आपणही त्यांच्या मार्गात आडवे जाऊ नये.
शत्रु मुलुखात आपण स्वारी केल्यावर तेथे परकिय व्यापारी हाती लागले तर त्यांच्याकडून दंड घेऊन त्यांना त्यांच्या स्थळी पाठवावे. त्यांच्याशी शत्रु सारखे वागू नये.
पोर्तुगीज आणि मराठे-----
किल्ले
दीव, दमन, संजान,वसई, करंजा , उरण, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुज युक्त किल्ले होते.
या किल्ल्यांमुळे पोर्तुगीजांचा बारदेश प्रदेश सुरक्षित होता.
पनवेल येथे पोर्तुगीजांचा सगळा दारुगोळा होता.
बारदेश प्रदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग होय. आजच्या गोवा राज्यामध्ये याच नावाचा एक तालुका आहे.
शिवाजी महाराज व पोर्तुगीज सुरुवातीचे संबंध -
शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी प्रथम संबंध आला.
महाराजांनी आरमार उभारल्यामुळे या परिसरातील पोर्तुगीज सावध झाले होते. नंतरच्या काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणले.
पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते.परंतु गोव्याच्या व्हाइसरॉयने दडपण आणल्यामुळे ही मदत बंद झाली.
मराठ्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीविरोधात कारवाई करताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली.
पोर्तुगीज व मराठे यांच्यातील लवचिक राजकीय धोरण----
प्रश्न- पोर्तुगीज व मराठे यांचे परस्परसंबंधीचे राजकीय धोरण लवचिक होते, हे विधान उदाहरणे देऊन स्पष्ट करा. (५ गुण)
पोर्तुगिजांच्या वसाहतवादी धोरणाला शिवरायांनी नेहमीच विरोध केला.
शिवराय आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये कधी सहकार्याचे तर कधी संघर्षाचे संबंध राहिले.
सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करणाऱ्या पोर्तुगीजांनी जेव्हा मराठ्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धी विरोधात कारवाई केली, तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली.
इ.स.१६६५ मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागर किनाऱ्याच्या प्रदेशातून जात होते त्यावेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांची तेरा जहाजे पळवून नेली.
नंतर मराठ्यांच्या धाकामुळे पोर्तुगीजांना जहाजे सोडून द्यावी लागली.
इ.स.१६६६ मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला, त्यावेळी पोर्तुगीजांनी तेथील किल्लेदाराला दारुगोळा पुरवला.
परंतु सुरत स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच स्वराज्यात सुखरूप परत आले.
मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणाच्या वेळी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांना सहानुभूती दाखवली.
पोर्तुगिजांना दाभोळ येथे वखार उघडण्यात शिवरायांनी परवानगी दिली.
मात्र पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले, म्हणून पोर्तुगिजांच्या वखारीतील स्थानिक लोक असंतुष्ट होते.
त्यामुळे इ.स.१६६७ मध्ये शिवरायांनी बारदेशावर स्वारी केली.
इ.स.१६६९ मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या दंडराजापुरी परिसराला वेढा घातला, तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीला धान्य आणि दारुगोळा पुरवला.
आदिलशाही-मराठे संघर्षामध्ये पोर्तुगीज आदिलशहाला मदत करत असत.
रायगडावर पोर्तुगिजांचा वकील गोन्सालु मार्तीस हा शिवाजी महाराजांना भेटायला येऊन गेला होता. त्यावेळी या दोघांनी संघर्ष टाळण्याचे ठरविले होते.
सकारण स्पष्ट करा.
प्रश्न - शिवरायांची पोर्तुगीजांविरुद्धची योजना मोहिमेपूर्वीच अयशस्वी झाली. (३गुण)
पोर्तुगीजांची सत्ता समुळ नष्ट करण्याची योजना शिवरायांनी तयार केली होती.
त्यानुसार शिवाजी महाराजांनी आपली माणसे गटागटाने गोव्यात पाठवली होती.
सैन्य संख्या पुरेशी झाल्यावर सर्वांनी एकाच वेळी उठाव करायचा आणि पोर्तुगीज सत्तेचे जोखड फेकून द्यायचे असे ठरले होते.
परंतु पोर्तुगीज व्हाइसरॉयला याचा सुगावा लागला. त्यामुळे पोर्तुगीजांची गोव्यातील सत्ता समुळ नष्ट करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांची योजना अयशस्वी झाली.
रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात कायमच संघर्ष राहिला.
हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली होती. परंतु या वकिलांनाही फारसे यश आले नाही.
अशा अनेक उदाहरणांवरून लक्षात येते की, पोर्तुगीज आणि मराठा संबंध परिस्थितीनुसार बदलत गेले.
पोर्तुगिज- मराठे तह- (१० फेब्रुवारी १६७० ) टीप लिहा.२ गुण.
१० फेब्रुवारी १६७० पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील तहानुसार --
लुटलेल्या जहाजांसाठी एकमेकांना नुकसान भरपाई द्यावी.
मोगलाप्रमाणे मराठ्यांना जहाजासंदर्भात सवलती मिळाव्यात.
एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत.
सिद्धीला स्वराज्य विरुद्ध मदत करू नये.
ठाणे जिल्ह्यातील रामनगर च्या हद्दीत किल्ले बांधू नयेत.
पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार -
प्रश्न- सकारण स्पष्ट करा.
१. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. (३ गुण)
सन १६७९ मध्ये खांदेरी उंदेरी बेटांवरून मराठे- इंग्रज लढाई सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली.
चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला ही पोर्तुगिजांनी विरोध केला.
गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने पोर्तुगीजांनी धर्मांतरे चालवलेली होती.
समुद्री व्यापारातील लुटालूट.
रामनगर राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे- पोर्तुगीज संघर्ष चालू होता.
मराठ्यांनी कोंड्याच्या वेढ्यात पोर्तुगिजांना पराभूत केले होते.
या सर्व कारणांमुळे शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचा निर्धार केला होता.
( चौथाई म्हणजे मराठ्यांनी एखाद्या राज्याच्या संरक्षणासाठी आकारलेला कर किंवा एकूण उत्पन्नाच्या एक चतुर्थांश कर म्हणजे चौथाई होय.)
टीप लिहा.
पोर्तुगिजांनी शिवरायांचे केलेले गुणगान. (२ गुण.)
महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भातील एका पोर्तुगीज लेखकाने लिहिलेला ग्रंथ महत्त्वाचा आहे.
‘कास्मो द ग्वार्द’ या पोर्तुगीज इतिहासकारांनी शिवाजी महाराजांवर ‘Vide de Celebre Sevagy’ (Life of celebrated Shivaji) हा ग्रंथ लिहिला.
छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा तो पहिला युरोपीय लेखक होता. या ग्रंथात कास्मो द ग्वार्द लिहितो की,
‘’छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे की, शिवरायांना आव्हान देण्याचे धाडस क्वचितच कोणी करतो’’, असे तो म्हणतो.
शिवाजी महाराज हे कोणतेही बक्षीस अथवा शिक्षा नि:पक्षपातीपणे देतात.
त्यांचे शौर्य आणि वागणूक यामुळे सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतात.
हे सर्व हिंदुस्थानात दरारा आणि प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात.
महाराजांच्या युद्धकौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात असलेली भीती पोर्तुगीज गव्हर्नरने व्यक्त केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य भीती निर्माण करणारे होते, याबद्दल शंकाच नाही.
परंतु त्यांची शत्रू संबंधीची धोरणे शांततेच्या काळातही भीतीदायक होती.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले, असा अभिप्राय तत्कालीन पोर्तुगिज गव्हर्नरने व्यक्त केला आहे.
यावरून महाराजांच्या युद्धकौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात असलेली भीती लक्षात येते.
पोर्तुगीज- संभाजी महाराज संबंध -
प्रश्न- सकारण स्पष्ट करा.
१. गोव्यावरील हाताशी आलेला विजय सोडून छत्रपती संभाजी महाराजांना माघारी परतावे लागले. ३ गुण.
मराठ्यांविरुद्ध औरंगजेबाला मिळालेल्या पोर्तुगीजांना अद्दल घडविण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवले.
त्यांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला.
प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला.
गोव्याच्या चढाईच्या वेळी मराठा पायदळाचे प्रमुख येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि या युद्धात मराठ्यांनी पोर्तुगीजांनाही पराभूत केले.
पोर्तुगीज गव्हर्नर जखमी होऊन त्यांना माघार घ्यावी लागली.
याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याने मोगलांचा प्रतिकार करण्यासाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजी महाराजांना पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम अर्धवट सोडावी लागली.
छत्रपती शाहू महाराज- पोर्तुगीज संबंध -
मुघलांच्या दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद यांच्याशी झालेल्या कराराप्रमाणे मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला.
पोर्तुगीजांकडे केलेली चौथाईची मागणी वसईच्या गव्हर्नरने फेटाळली.
मराठ्यांना तोंड देण्यासाठी पोर्तुगिजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमन व रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या.
पोर्तुगीजांनी स्थानिक प्रोजे वरील अत्याचारांचे प्रमाण वाढवले.
वसईचा किल्ला - (टीप लिहा.) २ गुण.
पहिल्या बाजीराव पेशवे यांनी चिमाजी आप्पांकडे पोर्तुगीज विरोधी मोहिमेची सूत्रे दिली.
चिमाजी आप्पांनी प्रथम ठाण्याचा किल्ला जिंकून घेतला.
त्यानंतर मार्च १७३७ मध्ये साष्टी बेट जिंकले.
शंकराची पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश करून छोटी-मोठी ठाणी जिंकली.
मराठ्यांकडे प्र्भावी आरमार नसल्याने वसई किल्ल्याचा वेढा दोन वर्षे चालला. शेवटी चिमाजी आप्पांनी पराक्रमाची शर्थ करून वसईचा किल्ला जिंकला.
डच- मराठे -
प्रश्न-- डच-मराठे यांच्यातील संबंध स्पष्ट करा. (५ गुण).
‘वेंगुर्ला’ येथे डचांची वखार असल्याने त्यांचा स्वराज्याशी संबंध येणे अपरिहार्य होते.
मराठे आणि डच यामधील राजकीय संबंध लवचिक होते.
इ.स.१६४९ मध्ये सुरू झालेल्या वेंगुर्ल्याच्या वखारीमुळे डच यांचे व्यापारात चांगले बस्तान बसले होते.
परंतु कुडाळवर शिवाजी महाराजांची स्वारी झाल्याने डच यांच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला.
इ.स.१६६५ मध्ये सुरतच्या मुघल सुभेदाराने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्याकरिता डच यांची मदत मागितली. मात्र डच यांनी मदत नाकारली.
शिवाजी महाराजांनी दाभोळ येथे वखार काढण्यासाठी डच यांना जागा देण्यास परवानगी दिली होती. परंतु काही कारणास्तव ती वखार सुरू झाली नाही.
मुंबईतून इंग्रजांचे उच्चाटन करण्यास मराठ्यांनी आपणास मदत करावी, अशी डच यांची इच्छा होती.
सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी डच यांच्या वखारीला नुकसान पोहोचवले नाही.
कर्नाटक स्वारीत डच वखारीचे संरक्षण आणि परवान्यांसाठी डच यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा नजराणा दिला.
पोर्टो नोव्हो किंवा परंगी पेटाइ , तेगणापट्टम उर्फ देवनापट्टीनम येथील डच यांच्या वखारी शिवाजी महाराजांनी सुरक्षित राहू दिल्या.
फ्रेंच- मराठे संबंध -
प्रश्न -टिपा लिहा.
१. फ्रेंच- मराठे संबंध. (२ गुण)
शिवाजी महाराजांच्या परवानगीने डिसेंबर १६६८ मध्ये फ्रेंच यांनी राजापूर येथे वखार सुरू केली.
फ्रेंचांनी स्वराज्याला दारुगोळा पुरवला.
सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी फ्रेंचांच्या वखारीला नुकसान पोहोचवले नाही. त्यामुळे त्यांनी मराठ्यांना मोठा नजराणा दिला.
इ.स.१६७७ मध्ये पॉन्डेचरीचा गव्हर्नर जनरल फ्रोन्स्वा मार्टिन याने फ्रेंच वखारीला संरक्षण व परवाना मिळवला.
फ्रेंचांच्या तालमीत तयार झालेल्या इब्राहिम खान गारदी याला सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी मराठ्यांच्या लष्कराच्या तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमले.
इ.स.१७६१ मध्ये इब्राहिम खानाने पानिपतच्या तिसऱ्या युद्धात केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन महादजी शिंदे यांनी फ्रेंच प्रशिक्षक डिवाइन व पॅरा यांच्या मदतीने कवायती फौज तयार केली होती.
या कवायती फौजेच्या जोरावर त्यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले. तसेच इंग्रजांनाही धाकात ठेवले.
इंग्रज - मराठे संबंध -
अफजल खान जहाज प्रकरण : -
प्रश्न- सविस्तर उत्तर लिहा.
१. अफजलखान जहाज प्रकरणामुळे इंग्रज- मराठे यांच्यात वितुष्ट आले. ५ गुण.
छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजलखानाच्या जहाज प्रकरणात आला.
अफजलखान- शिवाजी महाराज यांच्या भेटीपूर्वी मराठ्यांनी जिंकलेल्या दाभोळ बंदरामध्ये अफजलखानाची तीन जहाज लागली होती.
अफजलखानाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अफजलखानाचा दाभोळ येथील प्रतिनिधी महमूद शरीफ हा सर्व संपत्ती, जहाजे घेऊन राजापूरला पळून गेला.
त्यामुळे खानाचा मुलगा फाजलखान याने राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याला आपल्या वडिलांच्या जहाजावरील माल उतरण्यास सांगितले.
मराठ्यांनी संधी साधून राजापूर बंदरातील ही जहाजे जिंकून घेतली.
अब्दुल करिम याने इंग्रजांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज तो फेडू शकत नव्हता.
त्यामुळे इंग्रजांनी त्या तीन जहाजपैकी एक जहाज कर्जफेडीसाठी ताब्यात घेतले.
मराठ्यांनी मागूनही इंग्रज हे जहाज द्यायला तयार होत नव्हते.
त्यावर उपाय म्हणून मराठ्यांनी जैतापूर येथील इंग्रजांचा दलाल याला अटक केली.
त्याच्या सुटकेसाठी गेलेला फिलिप गिफर्ड यालाही मराठ्यांनी अटक केली व कैदेत टाकले.
पुढे या दोघांची सुटका करण्यात आली तरीदेखील या घटनेमुळे इंग्रज- मराठे यांच्यात वितुष्ट आले.
इंग्रज अधिकाऱ्यांना अटक -
सकारण स्पष्ट करा.
प्रश्न - गिफर्ड आणि त्याच्या सहकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी अटक केली. (३ गुण)
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून पडलेले असताना रेव्हीन्ग्टन,गिफर्ड, वेलजी यांनी आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरवला.
पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका झाल्यावर महाराजांनी राजापूरच्या स्वारीत इंग्रजांचा पराभव केला.
रिचर्ड टेलर,फिलिप गीफर्ड, रिचर्ड टेलर या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून त्यांना दोन वर्षे तुरुंगात टाकले.
त्यापूर्वी इंग्रजांच्या वतीने स्टिफन उष्टीक हा अधिकारी शिवाजी महाराजांकडे वखारींच्च्या संदर्भात बोलणी करण्यासाठी रायगडावर आला होता.
शिवाजी महाराजांचे वकील सुंदरजी आणि पिलाजी हेसुद्धा इंग्रजांना भेटले होते, पण ही भेट यशस्वी झाली नाही.
मराठा- इंग्रज तह- (टीप लिहा. २ गुण)
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर हेन्री ऑक्झिंडेन हा इंग्रज वकील हजर होता. त्याने १२ जुन १६७४ रोजी शिवरायांशी तह केला.
या तहानुसार ---
स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी मिळावी.
राजापूर, दाभोळ,चौल,कल्याण येथे वखारी उघडण्यास परवानगी मिळावी.
इंग्रजांच्या मालावर अडीच टक्के जकात घेण्यात यावी. इत्यादी अटी मान्य करण्यात आल्या. या तहामध्ये हेन्री ऑक्झिंडेन याने राजापूरला इंग्रजांची वखार काढण्यासाठी शिवाजी महाराजांची परवानगी मिळवली.
सार्वभौमत्व राखले ---
प्रश्न- छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. ५ गुण
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीयांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्यांचा सुरुवातीपासूनच प्रतिकार केला.
समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील म्हणून या परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणी इत्यादी उपाय करून स्वराज्याचे सार्वभौमत्व टिकवले.
इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी जगात बसवली आणि स्वराज्यातील व्यापाराला संरक्षण दिले.
त्यांना स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी दिली,मात्र त्यावर अडीच टक्के जकात बसवली.
राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर हेन्रीओक्झीन्देन हा इंग्रज वकील हजर होता.
त्याने १२ जून १६७४ रोजी शिवरायांशी तह केला.या तहात शिवरायांनी इंग्रजांना राजापूर येथे वखार काढण्यास परवानगी दिली, परंतु इंग्रजांच्या सर्वच गोष्टींना मान्यता न देता मराठ्यांचे सार्वभौमत्व कायम राखल्याचे दिसून येते.
या तहात इंग्रजांनी घातलेल्या अटी शिवरायांनी फेटाळल्या.
त्या पुढीलप्रमाणे----
इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठी राज्यात वापरू द्यावीत.
जहाजे फुटून किनाऱ्याला लागलेला इंग्रजांचा माल त्यांना परत द्यावा.
सिद्धी बरोबर तह करावा.
या सर्व अटी शिवरायांनी फेटाळल्या.
या सर्व धोरणावरून छत्रपती शिवरायांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट होते.
इंग्रजांचा शिरकाव -
सविस्तर उत्तर लिहा.
प्रश्न - भारतातील सर्वांत प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली. ५गुण.
भारतात सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता संपुष्टात येण्याची कारणे पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील--
छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतरच्या काळात नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतल्याने मराठ्यांच्या राज्यकारभारात इंग्रजांचा शिरकाव झाला.
नानासाहेबांच्यानंतर त्यांचे चिरंजीव माधवराव पेशवे झाले.
परंतु पेशवेपदापाई त्यांचे चुलते रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेले.
कारण रघुनाथराव यांना पेशवेपद हवे होते.
इ.स.१७६५मध्ये इंग्रजांनी मालवणचा किल्ला जिंकला.
नारायणराव पेशव्यांच्या काळात इंग्रजांनी ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी काबीज करण्याचा प्रयत्न केला.
उत्तरेत मोगल बादशहा शिंदे-होळकरांच्या प्रभावाखाली होता.
त्याला आपल्या प्रभावाखाली घेणे आणि नागपुरकर भोसल्यांचा बंगालमध्ये असलेला प्रभाव कमी करणे, यासाठी इंग्रज सक्रिय झाले होते.
वडगावचा तह -
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा--
प्रश्न- इंग्रज-मराठा यांच्यात झालेल्या युद्धांची माहिती---
अ- पहिले इंग्रज-मराठा युद्ध ब- दुसरे इंग्रज-मराठा युद्ध क-- तिसरे इंग्रज-मराठा युद्ध.
इंग्रज-मराठा यांच्यात झालेल्या तीन युद्धांची माहिती पुढीलप्रमाणे---
अ. पहिले इंग्रज-मराठा युद्ध -
इंग्रजांना व्यापाराच्या दृष्टीने साष्टी-वसई ते कोकणपर्यंतचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात असणे आवश्यक वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या.
पेशवेपदासाठी आश्रयास आलेल्या रघुनाथरावाला घेऊन इंग्रजांची फौज मुंबईहून पुण्याला निघाली.
त्यावेळी त्यांची गाठ मराठ्यांची वडगाव येथे पडली आणि इंग्रज मराठे यांच्यात पहिले युद्ध घडून आले. या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला.
युद्धानंतर जो तह झाला त्याला ‘वडगावचा तह’ असे म्हणतात.
ब. दुसरे इंग्रज-मराठा युद्ध -
पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी पेशवे, नागपूरकर भोसले, निजाम व हैदर यांचा चतु:संघ इंग्रजांविरुद्ध उभा केला.
परंतु इंग्रजांनी या संघातून निजामाला फोडले.
हिंदुस्तानमध्ये इंग्रजांची कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभुत करणे आवश्यक आहे, हे इंग्रज गव्हर्नर वॉरन हेस्टींग त्याच्या लक्षात आले.
इ.स.१७९५ मध्ये खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला.
दरम्यान मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा तपशीलवार अभ्यास केला.
त्याच्या आधारे लॉर्ड वेलस्लीने मराठ्यांचा पराभव करण्यात यश मिळवले.
नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव पेशवा व यशवंतराव होळकर यांच्यामध्ये वितुष्ट आले.
त्यामुळे यशवंतराव होळकर यांनी दुसरा बाजीराव पेशवा यावर आक्रमण केले.
त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला आणि इंग्रजांशी वसईचा तह केला.
होळकर - शिंदे या सरदारांना हा तह मान्य नव्हता.
त्यामुळे १८०३ मध्ये इंग्रज- मराठे यांच्यात दुसरे युद्ध झाले. परंतु यात मराठ्यांचा पराभव झाला.
ड. तिसरे इंग्रज-मराठा युद्ध -
इ.स.१८१७ मध्ये इंग्रज-मराठा यांच्यात झालेल्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला.
त्यानंतर१८१८ झाली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. म्हणजे पेशवाईचा अस्त झाला.
इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाला वार्षिक तनखा देऊन कानपूर जवळील विठूर येथे ठेवले.
भारतात सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता इ.स.१८१८ मध्ये संपुष्टात आली.
नकाशा वाचन -
प्रश्न- नकाशाचे निरीक्षण करुन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील डचाच्या वसाहती कोठे होत्या.
कर्नाटकात पोर्टो नोव्हो किंवा परंगीपेत्ताई, तेगणापट्टम उर्फ देवनापट्टीनम येथील त्यांच्या वखारी.
२. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या.
पॉंडेचेरी/ पुदुचेरी.
३. अलाहाबाद येथे कोणाची वखार होती.
४. मध्य भारतातील मराठी घराणे व त्यांची सत्ता कोठे होती.
धार-पवार, इंदोर- होळकर, ग्वालियर- शिंदे.
५. मराठी सत्तेचा विस्तार उत्तर व दक्षिण दिशेला कुठपर्यंत झाला होता.
उत्तरेला अटकपर्यंत (आजच्या पाकिस्तान) तुंगभद्रा नदीपर्यंत.
६. पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज वसाहती कोठे होत्या.
गोवा, ठाणे, वसई.
७. इंग्रजांच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरील वसाहती कोठे होत्या.
पूर्व किनारपट्टीवर चेन्नई (मद्रास) आणि पश्चिम किनारपट्टीवर मुंबई.
८. सिद्दीने आपली सत्ता पश्चिम किनारपट्टीवर कोठे स्थापन केली होती.
जंजिरा.
सिद्धी- मराठे -
जंजिऱ्याची नाकेबंदी -
१५ व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिका खंडातील अबिसिनियातून भारतात येऊन स्थायिक झालेल्या लोकांना सिद्दी असे म्हणतात.
महाराष्ट्रातील जंजिरा येथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले.
इ.स. १६४८ मध्ये शिवरायांनी कल्याण प्रांत विशेषतः तळे, घोसाळे व रायरीचा किल्ला ताब्यात घेतले.
तेव्हा सिद्दीला धोक्याची जाणीव झाली.
मार्च१७६१ मध्ये मराठ्यांनी जंजिऱ्याची नाकेबंदी केली. तेव्हा सिद्दीने किल्ला देण्याचे मान्य केले.
दरम्यान सिद्दीने मुघलांचे मांडलिकत्व पत्करले. यामुळे सिद्धी सुखरूप राहिला आणि किल्ला घेण्यात मराठी अपयशी ठरले.
खांदेरी बेटावर किल्ल्याचे बांधकाम -
प्रश्न- सकारण स्पष्ट करा.
१. सन १६८० मध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागली. ३ गुण.
सिद्दी व इंग्रज एकमेकांना मराठ्यांच्या विरोधात नेहमी मदत करत.
म्हणून १६७९ मध्ये शिवरायांनी सिद्धी व इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरू केले.
मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखालील हे बांधकाम बंद पाडण्यास इंग्रज अधिकारी आला.
मराठ्यांची रसद बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे इंग्रजांना मायनाक भंडारी व आरमार प्रमुख दौलतखान यांनी तीव्र प्रतिकार केला.
इंग्रजांची गलबते जप्त करून अधिकारी यांना कैद केले.
अखेरीस१६८० मध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागली.
छत्रपती संभाजी महाराजांची मोहीम -
प्रश्न- सकारण स्पष्ट करा.
१. संभाजी महाराजांनी सिद्धीविरोधातील मोहीम अर्धवट सोडली.
इ.स. १६७९ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी स्वराज्याला त्रास देऊ लागला.
म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीला धडा शिकविण्यासाठी मोहीम हाती घेतली.
छत्रपती संभाजी महाराजांनी उंदेरी,आपटे,नागोठणे व जंजिरा या परिसरात सिद्धीला सळो की पळो करून सोडले.
सिद्धीचे पराभव होत आला असतानाच मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले.
दोन शत्रूंना एकाच वेळी सामोरे जाण्यात शहाणपण नसल्याने संभाजी महाराजांनी सिद्दीवरील मोहीम अर्धवट सोडून दिली.
चिमाजी आप्पांचे आक्रमण -
छत्रपती संभाजी महाराजानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना आपली सर्व शक्ती औरंगजेबाच्या विरोधात लागली.
त्यामुळे पाश्चात्त्य शत्रुकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.
थोरले बाजीराव पेशवे यांनी १७३३ च्या सुमारास धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांना सिद्धिविरुद्ध लढण्यासाठी पाठवले.
या लढाईत चिमाजीअप्पांनी सिद्धींचा पराभव करून त्याला मराठ्यांचा मांडलिक बनवले.
अफगाण - मराठे -
प्रश्न - अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली यांच्या भारतावरील स्वाऱ्याविषयी माहिती लिहा.
१. पहिली स्वारी २.तिसरी स्वारी ३. चौथी स्वारी
अ ) अब्दालीची पहिली स्वारी -
१८ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्ली -आग्रा -पंजाब या प्रदेशांवर मुघल सत्ता होती.
इ.स. १७४८ मध्ये अफगाणिस्थानचा बादशहा अब्दाली याने भारतावर पहिली स्वारी केली.
अयोध्या-दिल्ली-आग्रा परिसरातील अफगानांनी अहमदखान बंगश याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला मदत केली.
मात्र दिल्लीच्या बादशाही फौजेने अब्दालीचा या युद्धात पराभव केला.
यावेळी दिल्लीच्या गादीवर अहमदशहा होता.
मराठा-मुघल करार -
अब्दाली परत गेल्यानंतर मुघलांनी शिंदे-होळकर यांच्या मदतीने अहमदशहा बंगशाचा पराभव केला.
इ.स.१७५२ मध्ये मराठा-मुघल करार झाला. करारानुसार -----
उत्तर भारताचे विशेषत: मुघलांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली.
त्या बदल्यात रोहिले खंडाची चौथाई वसूल करण्याचा अधिकार मुघलांनी मराठ्यांना दिला.
मुघल साम्राज्यातील काही प्रदेशही मराठ्यांना मिळाला.
ब. अब्दालीची तिसरी स्वारी--
इ.स.१७५७ मध्ये अब्दालीने भारतावर तिसर्यांदा आक्रमण केले.
या स्वारीत दिल्ली आणि मथुरा लुटून परत अफगानिस्थानला गेला
राघोबादादांची अटकपर्यंत धडक --
अब्दालीने तिसऱ्यांदा स्वारी केली, तेव्हा राघोबादादांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची फौज पुण्याहून निघाली.
ही फौज दिल्लीपर्यंत पोहोचण्याआधीच अब्दाली परत निघून गेला होता.
मात्र मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेऊन तेथील परिस्थिती पूर्ववत केली.
मराठी आणि शीख यांनी पंजाब मोहीम आखून सरहिंद प्रांताचा पाडाव केला.
लाहोर ताब्यात घेऊन मराठा फौजा अटक शहरापर्यंत धडकल्या.
क. अब्दालीची चौथी स्वारी --
इ.स. १७५९ मध्ये अब्दालीने भारतावर चौथी स्वारी केली.
अब्दालीला प्रतिकार करण्यासाठी जनकोजी आणि दत्ताजी शिंदे पंजाबकडे गेले.
अब्दालीचा वेग आणि आक्रमण एवढे तीव्र होते की,पहिल्याच धडाक्यात त्याने पंजाब जिंकला.
या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले.
पानिपतची तिसरी लढाई: (इ.स.१७६१)
अब्दालीशी लढण्यासाठी सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली मोठी फौज उत्तरेकडे निघाले.
१४ जानेवारी १७६१ रोजी यमुना नदीच्या तीरावर पानिपत येथे अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये मोठा रणसंग्राम झाला.
हे युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध म्हणुन ओळखले जाते.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, अनेक मराठा सरदार आणि एक लाख़ांपर्यंत सैनिक मारले गेले.
त्यानंतर पुण्याला सांकेतिक निरोप पोहोचला. तो म्हणजे-- दोन मोत्ये गळाली, २७ मोहरा गमावल्या व चांदी आणि तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही.’’
१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात लढाई होऊन मराठ्यांचा पराभव झाला.
मात्र भारतीयांसाठी भारत अशी व्यापक भूमिका घेऊन मराठे पानिपतावर लढले.
या युद्धामध्ये अब्दालीची ही मोठी हानी झाली.
त्यानंतर दोन महिन्यातच अब्दाली अफगाणिस्तानला परत गेला.
मराठ्यांकडून कडव्या प्रतिकाराची जाणीव झाल्यामुळे त्याची किंवा त्याच्या वारसदारांची भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत झाली नाही. पुढे१९ व्या शतकापर्यंत इंग्रजांचे भारतावर अनिर्बंध वर्चस्व प्रस्थापित झाले.या वर्चस्वाविरुद्ध भारतीयांनी लढा दिला. याशिवाय भारतीयांना भारतामध्ये असणाऱ्या अनिष्ट चालीरीती, परंपरा आणि रुढी-रिवाज या विरुद्धही लढा द्यावा लागला. याच रीति-रिवाज, परंपरांच्या संदर्भात पुढील पाठात आपण भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची माहिती घेणार आहोत.
---------समाप्त-----------
श्रीमती- संगमनेरे ए. एम.
के जे मेहता हायस्कूल व इ.वाय. फडोळ जुनिअर कॉलेज, नासिकरोड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा