प्रकरण ८ वे जागतिक महायुद्ध आणि भारत
प्रस्तावना -
२० व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या.
त्याचा भारतावर काय परिणाम झाला, याची माहिती आपण घेणार आहोत.
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८ )
प्रश्न - पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा. (सविस्तर उत्तर लिहा.) ५ गुण किंवा
प्रश्न - दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.
पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा.
मुद्दे- अ. गटबाजीचे धोरण. ब. तात्कालिक कारण. ५ गुण.
१९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. साम्राज्य वाढवू इच्छिणाऱ्या युरोपीय राष्ट्रांमधील स्पर्धा, हे या युद्धाचे मुख्य कारण होते.
साम्राज्यवादी धोरण ---
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्षेत्रात नवनवे शोध लागत होते.
उत्पादनासाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. त्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा आवश्यक होता.
कारखान्यात तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठा मिळवणे क्रमप्राप्त होते.
म्हणूनच या युरोपियन राष्ट्रांना १९ व्या शतकात कच्चा माल व हक्काच्या बाजारपेठा या दोन्ही गरजा भागवण्यासाठी नवनवे प्रदेश काबीज करण्याची गरज वाटू लागली.
त्यामुळे या गरजा भागवण्यासाठी युरोपीय राष्ट्र साम्राज्यविस्ताराकडे वळली.
शस्त्रास्त्रवाढ स्पर्धा व गटबाजीचे धोरण---
साम्राज्यविस्तारासाठी सैन्यबळ वाढवत राहणे आवश्यक ठरले.
युद्धसामग्री वाढवण्याच्या प्रयत्नात ही राष्ट्रीय युद्धाच्या दिशेने जाऊ लागली.
इंग्लंड, फ्रान्स, रशिया, स्पेन, पोर्तुगाल या राष्ट्रांचा आशिया, आफ्रिका खंडात साम्राज्य विस्तार झालेला होता.
जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया ही राष्ट्रे साम्राज्यविस्तार करू पाहत होती.
प्रथम महायुद्धपूर्व युरोपमध्ये इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, रशिया, फ्रान्स आणि इटली ही राष्ट्रे प्रमुख होती.
परस्परविरोधी हित असणाऱ्या या राष्ट्रांमध्ये दोन गट निर्माण झाले.
पहिला गट इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि उशिरा दाखल झालेली इटली, अमेरिका असा दोस्त राष्ट्रांचा गट होता.
दुसरा गट जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा अक्ष राष्ट्र गट असे दोन गट निर्माण झाले.
प्रत्येक राष्ट्रगट आपले सैन्यबळ, नाविक तळ वाढवू लागले. संहारक शस्त्रास्त्रे बनवण्यावर भर देऊ लागले. यामुळे युरोपात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली.
तात्कालिक कारण व युद्धाचे महायुद्धात रूपांतर -
प्रश्न- ऑस्ट्रीया-सर्बिया यांच्यातील युद्धाला जागतिक युद्धाचे स्वरूप कसे प्राप्त झाले? ( सविस्तर उत्तर लिहा) ५ गुण
ऑस्ट्रीयन राजपुत्र आर्च ड्युक फ्रान्सिस फार्दीनंड आणि त्याची पत्नी यांचा सर्बियन माथेफिरूने खून केला.
या प्रकरणात सर्बियाचा हात असावा, अशी ऑस्ट्रीयाची खात्री होती.
त्यामुळे ऑस्ट्रीयाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. तेव्हा सर्बियाच्या मदतीला रशिया धावून गेला.
या दोन लढाऊ राष्ट्राची बाजु युरोपातील अनेक बड्या राष्ट्रांनी घेतले.
ऑस्ट्रिया -हंगेरी यांनी सर्बियाविरुद्ध दडपशाही आरंभली. जर्मनीने ऑस्ट्रियाची बाजू घेतली.
बेल्जियम हा देश तटस्थ होता, तरीही जर्मनीने बेल्जियमवर हल्ला करून तो देश आपल्या वर्चस्वाखाली आणला.
इंग्लंडने बेल्जियमला पाठिंबा दिला व जर्मनीविरुध्द युद्ध पुकारले.
जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया ही अक्ष राष्ट्रे एका बाजूला आणि इंग्लंड, फ्रान्स, रशिया हे दोस्त राष्ट्रे दुसऱ्या बाजूला असे दोन गट पडले.
पुढे इटली मित्र राष्ट्रांच्या गटात उशिराने सामील झाला.
पहिल्या महायुध्दाच्या अखेरच्या काळात अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात सहभागी झाली.
१९१६ मध्ये उत्तर समुद्रातील जेटलंड येथे इंग्लंडने जर्मन आरमाराचा पराभव केला.
१९१८ मध्ये व्हर्सायच्या तहाने हे पहिले महायुद्ध समाप्त झाले.
राष्ट्रसंघाची स्थापना - (टिपा लिहा) २ गुण.
प्रश्न- राष्ट्रसंघ आपल्या कार्यात अपयशी ठरला. (सकारण स्पष्ट करा) ३ गुण.
पहिल्या महायुद्धासारखे युद्ध पुन्हा होऊ नये, त्यासाठी उपाययोजना करायला हवी, असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले.
शांतताप्रिय आणि ध्येयवादी असणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनाही सर्व राष्ट्रांची मिळून एक संघटना असावी, असे वाटत होते.
राष्ट्र-राष्ट्रांतील कलह व वाद सामोपचाराने मिटविले जावेत, जगात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी त्यांची भूमिका होती.
या हेतूने ‘राष्ट्रसंघ’ ही संस्था स्थापन करण्यात आली.महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मनी, ऑस्ट्रिया इत्यादी राष्ट्रांना संघटनेचे सभासद होण्यास मज्जाव करण्यात आला.
अमेरिकेने राष्ट्रसंघ ही संकल्पना मांडली. मात्र राष्ट्रसंघाचे सदस्यत्व घेतले नाही.
इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचे वर्चस्व राहिले.
दुसरे महायुद्ध ( इ.स. १९३९ ते १९४५)
प्रश्न- दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. ( सविस्तर उत्तर लिहा) ५ गुण.
१९३९ ते १९४५ या काळात दुसरे महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरले.
पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक व्यापक तर होतेच, त्याबरोबरच या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता.
या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे -
पहिल्या महायुध्दानंतर विजेत्या राष्ट्रांनी व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर अपमानास्पद अटी लागल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्र राष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला.
राष्ट्रसंघाला राष्ट्र-राष्ट्रातील हक्क व वाद मिटवण्यात यश मिळाले नाही.
हिटलरच्या नाझी पक्षाने जर्मनीमध्ये सत्ता हस्तगत केली.
हिटलरने व्हर्सायचा तह मान्य करून या तहात जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटी झुगारुन जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली करण्यासाठी जोरदार लष्करी तयारी सुरू केली.
मोठ्या प्रमाणावर सैन्यबळ, आरमार आणि वायुदल वाढवण्यावर भर दिला.
सोविएत रशिया हे नवे साम्यवादी राष्ट्र बलिष्ठ होत होते. त्यामुळे भांडवलशाही इंग्लंड,अमेरिका व फ्रान्स इत्यादी देश अस्वस्थ झाले होते.
सोव्हिएत रशिया साम्राज्यवादी जर्मनीचा मोठा शत्रू होता. सोवियत रशिया याबलिष्ठ होऊ नये म्हणून जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांनी दुर्लक्ष केले.
१९३८ मध्ये हिटलरने चेकोस्लोव्हाकियाकडून बहुसंख्यांक जर्मन वस्ती असलेला सुटडेन प्रांत व इतर मुलुख मिळवला.
हिटलरने १९३९ मध्ये पोलंडवर हल्ला केला. वास्तविक पोलंड हे सर्व राष्ट्रांनी मान्य केलेले एक तटस्थ राष्ट्र होते.
हिटलरने पोलंड या तटस्थ राष्ट्रावर आक्रमण केल्याने शांतता टिकविण्याच्या उद्देशाने इंग्लंड जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात -
प्रश्न - दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात घडलेल्या जागतिक घटनांचा आढावा घ्या. (सविस्तर उत्तर लिहा) ५ गुण.
१९३९ ते १९४५ या काळात दुसरे महायुद्ध झाले. या महायुद्धाच्या कालखंडात घडलेल्या जागतिक महत्त्वपूर्ण घटना पुढीलप्रमाणे नमूद करता येतील.
१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने तटस्थ असलेल्या पोलंडवर आक्रमण केले. या घटनेने दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली.
पोलंडवरील आक्रमणामुळे इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले.
१९४० पर्यंत जर्मनीने डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, हॉलंड जिंकून घेतले.
१९४० मध्ये फ्रान्सचे अभेद्य तटबंदी फोडून जर्मनीने पॅरिसवर हल्ला केला व फ्रान्स जिंकून घेतले.
जर्मनीने १९४० मध्ये इंग्लंडवर हल्ला केला व डंकर्क येथे असलेल्या ब्रिटिश फौजांवर जोरदार हल्ला चढवला.
इंग्लंडने मोठ्या कुशलतेने १९४० च्या मे महिन्यात डंकर्क या बंदरातून च लाख सैनिक हलवले.
जगाच्या इतिहासातील ही फार मोठी लष्करी हालचाल होते.
या काळात इंग्लंडचे प्रधानमंत्री नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल यांनी प्रधानमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.
स्टॅलिनग्राडचा लढा. (टिपा लिहा) २ गुण.
१९३९ मध्ये हिटलरने स्टॅलिनबरोबर केलेला अनाक्रमणाचा करार मोडून सोविएत रशियावर हल्ला चढवला.
नाझी सैन्य मुसंडी मारत स्टालिनग्राडच्या दिशेने आगेकूच करत होते, तर रशियन फौजा माघार घेत होत्या.
नोव्हेंबर १९४३ मध्ये स्टलिनग्राड येथे तीन लाख जर्मन नाझी फौज सोव्हिएत रशियाच्या कोंडीत सापडली.
मार्शल जॉर्जी यांच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत रशियाने जर्मन सैनिकांना पराभुत केले. ही घटना युद्धाला कलाटणी देणारी ठरली.
मित्र राष्ट्रांनी बर्लिनचा पाडाव केला. याच सुमारास हिटलरने भूमिगत होऊन आत्महत्या केली.
प्रश्न - १५ ऑगस्ट १९४५ रोजी जागरूक जपानने शरणागती पत्करली. ( सकारण स्पष्ट करा) ३ गुण.
मित्रराष्ट्रांनी बर्लिनचा पाडाव केला. याच सुमारास हिटलरने भूमिगत होऊन आत्महत्या केली.
जर्मनीची पीछेहाट होताच इटलीच्या मुसोलिनीचा पाडाव होऊन त्याचा अंत झाला होता.
उत्तर आफ्रिकेतही जर्मनीचा पराभव होऊन जर्मन सैनिक शरण आले होते.
जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली होती.
१९४१ मध्ये जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेचा नाविक तळ निकामी केला.
यामुळे अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. पुढे फिलीपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जपानने जिंकले. तसेच आसाम, आराकान, इंफाळ या भागापर्यंत जपानने धडक मारली.
तेव्हा इंग्लंडने जपानचा प्रतिकार केला. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स परत घेतले.
जपान शरण येत नाही असे पाहून अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि त्यानंतर पुढे नागासाकी या शहरावरदेखील दुसरा अणुबॉम्ब टाकला.
अखेरीस १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपान शरण आला आणि हे दुसरे महायुद्ध संपले.
फॅसिस्टवाद ---- (टिपा लिहा) २ गुण.
लोकशाही, उदारमतवाद, व्यक्ती स्वातंत्र्य व समता यांच्याविरुद्ध असलेली एक विचारसरणी.
फॅसिझम हा शब्द ‘फॅसिस’ या मूळ शब्दापासून आलेला आहे.
पहिल्या महायुद्धानंतर बेनिटो मुसोलिनी या इटलीमधील नेत्याने १९२२ साली जी चळवळ उभारली, तिला त्याने ‘फॅसिझम’ असे नाव दिले.
लोकशाही संस्था आणि प्रक्रियांना विरोध, कृतीप्रधानता, सर्वंकष साम्राज्यवाद, सत्तेचे केंद्रीकरण, आक्रमक राष्ट्रवाद, युद्ध आणि हिंसाचाराचे समर्थन अशी फॅसीझमची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.
नाझीवाद -
फॅसीझमचे दुसरे रूप म्हणजे नाझीवाद.
नाझीवादात वंशश्रेष्ठत्वाला महत्त्व दिलेले होते.
हिटलरने जर्मनीत ज्यु वंशीयांची हत्या याच भूमिकेतून केली होती.
नाझीवाद हा एक अतिरेकी व विकृत प्रकार मानावा लागेल.
महायुद्धे आणि भारत---
प्रश्न- भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये सहभागी व्हावे लागले. (सकारण स्पष्ट करा) ३ गुण.
भारत दोनही महायुद्धांच्या काळात इंग्रजांची वसाहत होता. त्यामुळे भारताला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता.
आपली वसाहत असणाऱ्या भारताला त्याची इच्छा असो वा नसो, दोन्ही महायुद्धात सहभागी करून घेतले.
भारताने इंग्लंडला युद्धासाठी लागणारे पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री तसेच मनुष्यबळ या रूपात मदत केली.
या दोन्ही महायुद्धाच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणावर सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, जूट, तंबू, छोट्या नौका, इमारती लाकूड, रेल्वे आणि वाहतूक साधने इत्यादी साधन सामग्री भारतातून युरोपात पाठवले.
भारताचा या युद्धांशी काहीही संबंध नसताना त्याला या युद्धात ओढले गेले.
भारतीय भूमीचा वापर इंग्रजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला.
पहिले महायुद्ध आणि भारत / भारताची मदत (टिपा लिहा)
पहिल्या महायुद्धकाळात भारताने इंग्लंडला केलेली मदत----
पहिल्या महायुद्धात इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला त्याची इच्छा असो वा नसो युद्धात सहभागी करून घेतले.
भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री तसेच मनुष्यबळ या रूपात मदत केली.
१९१९-२० अखेरपर्यंत हिंदुस्तानमधील ब्रिटिश सरकारने सुमारे १९ अब्ज रुपये युद्धासाठी मदत केली.
पहिल्या महायुद्धात भारतातील ब्रिटिश सरकारने फ्रान्स, पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया आणि हेरांच्या अपघात अशा विविध ठिकाणी सुमारे ११ लाख (१०,९६,०१३) भारतीय सैनिक युद्ध आघाडीवर लढण्यासाठी पाठवले.
पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या १७ भारतीय सैनिकांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हे पदक देण्यात आले.
या युद्धात भारताने इंग्लंडला भरीव मदत केली. दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, तंबू, इमारती लाकूड, रेल्वे आणि वाहतूक साधने इत्यादी साधनसामग्री भारतातून युरोपात पाठवली.
१९१८ च्या अखेरपर्यंत १ अब्ज ४० लाख रुपयांची युद्धसामग्री भारतातून ब्रिटिशांनी नेली.
पहिल्या महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम -----
प्रश्न - पहिल्या महायुद्धाचा भारतावर झालेला परिणाम---- ५ गुण.
प्रश्न - पहिल्या महायुद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. ( तुमचे मत नोंदवा) ३ गुण.
पहिल्या महायुद्धाचे पडसाद विविध क्षेत्रांवर उमटले.
यात लष्कर युद्धसामग्रीचे उत्पादन, नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती व अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.
पहिल्या महायुद्धाचे विपरीत परिणाम भारतावर झाले. शेतीमालाला मंदी आली, परंतु औद्योगिकरणाला या काळात चालना मिळाली.
लोखंड, पोलाद, कोळसा व खाण हे उद्योग भरभराटीला आले.
पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक व मोटारगाड्या यांच्या संख्येत वाढ झाली.
युध्दकाळात आणि युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यात घट झाली.
शेतीमालाला मंदी आली, तर औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या.
अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागविणे अवघड झाले.
भारतात अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या.
पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतावरील परिणाम----
पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतात संमिश्र परिणाम झाले.
संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या.
युरोपात लढताना आपली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची आहे, हे लक्षात आले.
विमाने, अप्रगत यांत्रिक साधने व तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष, सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष, उपयोगी साधन सामग्रीचे राखीव साठे नसणे यामुळे आपण किती मागे आहोत, हे त्यांच्या लक्षात आले.
या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती स्थापन केली.
या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात सूचना केल्या.
माँटेग्यू-चेम्सफर्ड समिती -----
प्रश्न- माँटेग्यू चेम्सफर्ड यांनी भारतीयांना कोणते आश्वासने दिली? (सविस्तर उत्तरे लिहा) ५ गुण.
भारतीय सैन्य व युद्धसामग्रीतील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने समिती नेमली.
व्हाईसराय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड सम्यूअल माँटेग्यू (सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया) या समितीत होते.
या समितीने भारतातील ब्रिटीश प्रशासनात तसेच लष्करी व्यवस्थेत कोणत्या सुधारणा करता येतील, याबाबत अहवाल तयार केला.
व्हाईसराय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड सम्यूअल माँटेग्यू यांनी भारतीयांना दिलेली आश्वासने पुढील प्रमाणे ---
सैन्यात जात व धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे मिळतील.
सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिकांची भरती करण्यात येईल.
इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकादमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन केली जाईल. या अकादमीतील जागा हिंदी तरुणांसाठी असतील.
इंदूर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना ‘किंग्ज कमिशन’ देण्यात येईल.
घोडदळात कपात करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आले.
१९२१ मध्ये हिंदुस्थानातील युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले.
भारतीय वायुसेनेच्या पाया विस्तृत करण्यास त्याचा उपयोग झाला.
हिंदी नौदलाने इराणच्या आखातात स्वतःचे कर्तृत्व दाखवले.
यासंदर्भात लोकमान्य टिळकांनी महायुद्धकाळात ‘केसरी’ या वृत्तपत्रात लेख लिहून व भाषणांमधून वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या, हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका. अशी आग्रही मागणी केली. पहिल्या महायुध्दाच्या काळात ब्रिटिश सत्ताधिशांना युद्ध कार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजीनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा भविष्यात भारताताला फायदा मिळेल, यावर त्यांचा विश्वास होता. यात त्यांची दूरदृष्टी लक्षात येते.
काँग्रेस आणि संरक्षण धोरण-
प्रश्न - राष्ट्रीय सभेने स्थापनेपासून संरक्षकविषयक संमत केलेले ठराव कोणते ते लिहा. ५ गुण.
अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव केले होते. यात पुढील ठरावांचा समावेश होता.
हिंदी नागरिकांना आत्मरक्षणासाठी, देशरक्षणासाठी, शिक्षण व उत्तेजन द्यावे.
संरक्षण खर्च कमी करावा. पण ते अशक्य असल्यास इतर बाबींवरील खर्चात कपात करावी.
हिंदी तरुणाना प्रादेशिक सैन्यदलात प्रवेश द्यावा.
राणीचा जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्यांच्या जागा हिंदी लोकांना द्याव्यात.
संरक्षण विद्यालय स्थापन करावे.
लोकसेना व सेवाभावी दले स्थापन करावेत.
ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलावा.
असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षणविषयक मागण्यांची देशाला दिशा दाखवून दिली. परंतु ब्रिटिश सरकारने वरील ठरावांच्या संदर्भात स्वहितकारी धोरण ठेवले.
महायुद्धांबाबत पंडित नेहरूंचे मत -- ( टिपा लिहा) २ गुण.
पंडित नेहरूंनी इंदिरा गांधी यांना पाठवलेल्या पत्रातून भारताच्या मदतीबाबतची मते कळतात.
इंग्रज साम्राज्यशाहीने भारताला युद्धात ओढले. मुळातच हे युद्ध हिंदुस्थानचे नव्हते.
भारताचे भांडण जर्मनी, तुर्कस्थान कोणाचीही नव्हते.
युद्धाच्याबाबत भारताला मतच नव्हते, कारण हिंदुस्तान गुलाम होता.
पहिले महायुद्ध आणि टिस्को ----
प्रश्न - व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी अफ्रिकेतील दोस्त राष्ट्रांच्या विजयाचे श्रेय भारताने पुरविलेल्या रेल्वे रुळाना दिले. (सकारण स्पष्ट करा) ३ गुण.
पहिल्या महायुद्धाचा आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा (म्हणजेच टिस्को) जवळचा संबंध आहे.
पहिल्या महायुद्धात जमिनीवरच्या युद्धात सैनिकांच्या वेगवान हालचाली, युद्धसामग्रीची हलवाहलव, यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
युरोपात इंग्लंडला उत्तम रेल्वे रुळांची गरज होती आणि इराकच्या प्रदेशातील लष्करी हालचालींसाठी इंग्रजांना रेल्वे रूळ आवश्यक होते.
कंपनीने अहोरात्र कष्ट करून सुमारे १५०० मैल लांबी भरेल एवढे रूळ पुरवले.
भारतीय कंपनीत पोलादीरूळ तयार करता येणार नाही, असेच इंग्लंडमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होते, परंतु भारतीयांनी यावर मात केली.
पहिले महायुद्ध संपल्यावर जानेवारी १९१९ मध्ये व्हाईसराय लॉर्ड चेम्सफोर्ड टिस्कोच्या कारखान्यावर आले.
चेम्सफर्ड यांनी भाषणात इजिप्त , पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेत दोस्त राष्ट्रांना जे यश मिळाले. त्यात भारताने पुरवलेल्या रेल्वे रुळांना विजयाचे श्रेय दिले.
भारतीय लोकांनी मनात आणले तर ते काय करू शकतात, याचीच साक्ष व्हाईसरॉयने दिली.
कामा गाटा मारू प्रकरण == (टिपा लिहा) २ गुण.
पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय लोक अमेरिका, कॅनडा इत्यादी राष्ट्रांमध्ये स्थलांतर करू लागले.
कॅनडातील ब्रिटिश सरकारने भारतीयांना कॅनडात प्रवेशबंदी केली.
बाबा गुरुदत सिंग यांच्या नेतृत्वाखाली कामा गाटा मारू नावाच्या जहाजातून गेलेल्या भारतीय गटाला कॅनडाने आपल्या बंदरात उतरू दिले नाही.
कामा गाटा मारू जहाज कॅनडाहून परतून कोलकत्ता बंदराजवळील बजबज बंदरात पोहोचले.
जहाजातील उतारुंनी ताबडतोब आपल्या गावी जावे, असे त्यांना एका अधिकाऱ्याने सांगितले.
लोकांनी तो हुकुम मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यात ३० लोक ठार झाले.
इंग्रजांच्या या निर्दयीपणामुळे देशात प्रचंड प्रक्षोभ माजला.
जर्मन आणि भारतीय राष्ट्रवादीतील फरक -----
प्रश्न - जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलभूत फरक होता. (तुमचे मत नोंदवा) ३ गुण.
दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीत निर्माण झालेला राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात आपल्याला मुलभूत फरक जाणवतो, तो पुढीलप्रमाणे ---------
जर्मनी हा देश राष्ट्रवादी होता, भारतावरही राष्ट्रवादाचा विलक्षण प्रभाव होता, पण जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलत: फरक लक्षात घेतला पाहिजे.
जर्मन राष्ट्रवाद साम्राज्यवादी होता. जर्मनी इतरांचे प्रदेश आपल्या घशाखाली घालून आपले राष्ट्र बलिष्ठ व मोठे करण्यासाठी आक्रमण करत होता. तर भारताचा राष्ट्रवाद भारताच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी झटत होता.
आपल्याच देशात नव्हे, तर जगभर लोकशाहीचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे अशा व्यापक ध्येयावर भारतीय राष्ट्रवाद आधारलेला होता.
म्हणून अबिसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीने शुश्रूषापथके, स्वयंसेवक, अन्नधान्य इत्यादी मदत पाठवली गेली.
तर जर्मनीचा साम्राज्यवाद इतर राष्ट्रांवर हुकूमशाही लादण्यासाठी होता. जर्मनीतील राष्ट्रवाद वंशभेदावर आधारलेला होता.
जर्मनीत वंशभेद प्रबळ होता. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल केली. पण भारतात मात्र प्रथमपासून निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे आणि जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. हे भारतीय राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य दिसून येत आहे.
दुसरे महायुद्ध आणि भारत----- (टिपा लिहा) २ गुण.
दुसऱ्या महायुद्धकाळात भारताने इंग्लंडला केलेली मदत. किंवा
भारताचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग.
१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध घडून आले. भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नसताना त्याला या युद्धात ओढले गेले.
भूतकाळात भारताने उत्तर आफ्रिका, इराक,इराण,ग्रीस, ब्रह्मदेश, मलाया येथील युद्धात सहभाग घेतला.
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मलाया, इंडोनेशिया आणि चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यात भारतीय सैन्याने आपले योगदान दिले.
भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेश येथील लढायांमध्ये भाग घेतला.
भारतीय सेनेने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील लढाईत सक्रिय सहभाग नोंदवला.
या युद्धात इंग्लंडने विजय मिळवण्यासाठी भारताचे शोषण केले.
भारतीय भूमीचा वापर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला.
युरोपातील दोस्त राष्ट्रांसाठी औद्योगिक उत्पादने, कपडे, जीवनोपयोगी सामग्री पुरवणाऱ्या हक्काची वसाहत म्हणून ब्रिटन भारताकडे बघत होता.
युद्धसामग्रीच्या संदर्भात सुरुंग, रणगाडे, जहाज दूरूस्ती, पोलादी नळ, रेल्वेचे रूळ व बांधणी साहित्य, रेल्वेचे डबे, लाकूड, तारायंत्रांचे खांब, छोट्या युद्धनौका व बोटी, अन्नधान्य, कापड, तंबू, बूट, औषधे, स्फोटके, दारुगोळा इत्यादी माल पाठवण्यात येत होता.
यासाठी ब्रिटिशांनी अनेक कारखाने भारतात उभारले.
दुसऱ्या महायुद्धात ज्या हिंदी सैनिक आणि अधिकाऱ्यानी विलक्षण शौर्य गाजवले, त्यांना त्या काळातील शौर्याचे सर्वोच्च पदक म्हणजेच ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देण्यात आले होते.
अशा ३१ सैनिक आणि अधिकाऱ्यांना 'व्हिक्टोरिया क्रॉस' हे पदक देण्यात आले होते.
यात महाराष्ट्रातील नाईक यशवंत घाडगे व सैनिक नामदेवराव जाधव या दोघांचा समावेश होता.
महायुद्धांचे भारतावरील परिणाम --
प्रश्न - भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले. (सविस्तर उत्तर लिहा) ५ गुण.
पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा आपल्याला फायदा होईल, ही राष्ट्रसभेची आशा फोल ठरली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची मागणी केली.
युद्धकाळात इंग्लंडला मनुष्यबळाची व पैशांची गरज निर्माण झाली. त्यासाठी सरकारने भारतातही लष्कर भरती सुरू केली. प्रसंगी सैन्यभरतीची सक्ती केली.
पैसा उभा करता यावा म्हणून भारतीय जनतेवर जाचक कर लादले.
व्यापार व उद्योगधंद्यांवरील करात मोठ्या प्रमाणात वाढ केली.
युध्दकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या. वाढलेल्या महागाई बरोबरच या काळात औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे संकटही भारतीयांपुढे उभे राहिले.
या परिस्थितीला ब्रिटिशांची शोषक सत्ता कारणीभूत आहे, याची त्यांना जाणीव झाली.
कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय सगळेच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सामील झाले.
राष्ट्रसभेचा युद्ध सहकार्याला विरोध ---
प्रश्न- इंग्लंडच्या युद्धकार्यात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय राष्ट्रीय सभेने घेतला. (सकारण स्पष्ट करा) ३ गुण.
सप्टेंबर १९३९ मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले.
इंग्लंड व फ्रान्स यांच्याविरुद्ध जर्मनी आणि इटली असे युद्धाचे प्रारंभीचे स्वरूप होते.
इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारताच भारतीय इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली.
व्हाइसरॉयच्या या एकतर्फी घोषणेचा राष्ट्रीयसभेने निषेध केला.
जर्मनीतील व इटलीतील आक्रमक हुकूमशाही विचारप्रणालीना जसा राष्ट्रीय सभेचा प्रखर विरोध होता. तसा तो इंग्लंडच्या साम्राज्यवादी वसाहतवादालाही होता.
युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही जर्मनी व इतलीविरुद्ध लढत आहोत, असा इंग्लंडचा दावा होता, तो खरा असेल तर इंग्लंडने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली.
स्वतंत्र भारत विरुद्ध इंग्लंड युद्धात मदत करेल असे आश्वासन राष्ट्रीय सभेने दिले भारतातील लोणचे साम्राज्यवादी शासन कायम राहणार असेल तर या कार्याला भारत मदत करणार नाही असा निर्णय राष्ट्रीय सभेने घेतला.
आजाद हिंद सेनेचे योगदान ------
स्वातंत्र्य लढ्यातील आजाद हिंद सेनेचे योगदान. (टिप लिहा) २ गुण.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद सेनेचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहेत, ते पुढीलप्रमाणे -----
नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे नेते होते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे हे आझाद हिंद सेनेचे ध्येय होते.
इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले असताना भारतात प्रखर जनआंदोलन सुरू कर करावे व स्वतंत्र करण्यासाठी गरज भासली तर इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी, असे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे मत होते.
याच सुमारास भारताच्या पूर्व सीमेवरील हजारो भारतीय सैनिक ब्रिटीशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे ठाकले होते. हे आझाद हिंद सेनेचे सैनिक होते.
आझाद हिंद सेना आपल्या ध्येयप्राप्तीसाठी अविरत झुंजली.आझाद हिंद सेनेने आराकान,कोहीमा जिंकून आसामात प्रवेश केला होता.
अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान दिले.
सत्ता सोडण्याचा इंग्रजांचा विचार --
प्रश्न- इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. (सकारण स्पष्ट करा) ३ गुण.
१९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुद्ध थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा, परंतु यामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठ्या प्रमाणावर झाली.
त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली. तशातच भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र केला होता. नाविक दल आणि हे उठाव केला होता. हे सर्व दडपून टाकणे, इंग्रज सरकारला कठीण जात होते.
या सर्व कारणांमुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
संयुक्त राष्ट्राची स्थापना -----
प्रश्न- संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. (सकारण स्पष्ट करा) ३ गुण.
दुसऱ्या मार्गाने जगाची प्रचंड प्रमाणात आर्थिक व जीवित हानी झाली.
यामुळे धोक्यात आलेले जागतिक शांतता व सुरक्षितता पुन्हा निर्माण व्हावी, असे जागतिक नेत्यांना वाटू लागले.
या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या राष्ट्रसंघाप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना १९४५ स्थापन झाली.
द्वारकादास कोटणीस ----- (टिपा लिहा) २ गुण.
द्वारकादास कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा करण्याचे काम त्यांनी केले.
१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले, तेव्हा चिनी सरकारच्या मागणीप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जखमी चिनी सैनिकांची सेवा करण्यासाठी पाच डॉक्टर चीनला पाठवले.
त्यात डॉ. द्वारकादास कोटनीस मुख्य होते. पाच वर्षे चिनी सैनिकांची देखभाल केली. ९ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.
डॉ. कोटणीस यांचा त्याग व समर्पण वृत्तीने भारत व चीन या देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्हि. शांताराम यांनी ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ हा चित्रपट निर्माण करून कोटणीसांची स्मृति चिरस्थायी केली आहे.
डॉ. कोटणीस यांचे सोलापूर येथील घर स्मारक म्हणून घोषित केले आहे.
तेथे डॉ. कोटणीस यांच्याशी संबंधित गोष्टींचे संग्रहालय आहे.
सॅम हॉर्मुस्जी फ्रामजी जमसेदजी मानेकशाॅ -- (टिपा लिहा) २ गुण.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १७ इंफ्रटी डिव्हिजन अंतर्गत सॅम हरमुसजी फ्रामजी जमशेटजी यांना ब्रह्मदेशात जपानी सैन्याचे हल्ले रोखण्यासाठी पाठवण्यात आले होते.
सॅम मानकेशा हे प्रभारी कमांडर होते. त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने सितांग ब्रिजवर हल्ला केला. हे महत्त्वाचे ठाणे जिंकणे गरजेचे होते.
मानेकशा यांच्यावर शत्रू तुटून पडला. जपान्यांच्या मशीनगनमधून झालेल्या गोळीबारात यांच्या अंगात ९ गोळ्या घुसल्या.
यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल डी.टी. कोवान हे स्वतः आले होते.
त्यांनी स्वतःच्या छातीवरील ‘मिलिटरी क्रॉस’ हे पदक मानकेशा यांच्या छातीवर लावले.
हे पदक फक्त जिवंत सैनिकांना दिले जाते. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. पुढे मानेकशा स्वतंत्र भारतातील पहिले फील्ड मार्शल झाले.
------समाप्त _-----------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा