युरोपियन कंपन्यांमधील स्पर्धा -
युरोप आणि भारत यांचा प्रत्यक्ष व्यापारी संबंध येत नव्हता, तरीसुद्धा दोघांमध्ये प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. भारताची श्रीमंती या व्यापारावर होती. तर युरोपियन लोकांचे सुखी, समृद्ध जीवन भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरच अवलंबून होते.
भारतातून युरोपियन देशांचा होणारा व्यापार हा जल आणि स्थल असा दोन्ही मार्गाने चालत असे. या व्यापारात अरबी व्यापारी मध्यस्थ म्हणून महत्त्वाची कामगिरी पार पाडत होते.
परंतु इ.स.७ व्या शतकात अरबस्थानात इस्लाम धर्माची स्थापना झाल्याने अरबांनी अरबस्थान व आसपासची राज्य आपल्या ताब्यात घेतले .
कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) हे शहर जिंकून घेतले. त्यामुळे स्थल मार्गाने म्हणजेच खुष्कीच्या मार्गाने युरोपचा चालणारा व्यापार बंद पडला.
व्यापारावर अरबांची मक्तेदारी निर्माण झाली आणि युरोपियन लोकांचे व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले.
याच काळात युरोपात प्रबोधन होऊन धर्मसुधारणेची चळवळ झाली .वैज्ञानिक, बुद्धीवादी दृष्टीला चालना मिळाली.
भारताकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गाचा शोध घेण्याची स्पर्धा युरोपियन देशांमध्ये सुरू झाली. यातूनच इ.स. १४९२ मध्ये स्पेनचा कोलंबस भारताचा शोध घेत अमेरिकेला पोहोचला. त्याला जरी भारताचा शोध लागला नसला तरी अमेरिकाखंडाचा शोध लागला.
पुढे पोर्तुगालचा दर्यावर्दी वास्को-द-गामा याने भारताकडे जाणाऱ्या नव्या जलमार्गाचा शोध लावला.
वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनार्यावरील कालिकत (कोझिकोडे) येथे पोहोचला. तेथील राजा झामोरीन याने त्याचे भव्य स्वागत केले.
(प्रश्न-- वास्को-द-गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता.)
या दोन घटनांनी औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली आणि युरोपातील देशांनी व्यापारासाठी भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या.
युरोपीय देशांनी अवलंबिलेल्या साम्राज्यवादी धोरणामुळे आशियाखंडातही अनेक संघर्ष झाले. याच साम्राज्यवादाचे भारतावरही दूरगामी परिणाम झाले.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी युरोपियनांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. याच युरोपियन वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि भारतावरील परिणाम यांचा अभ्यास या पाठात करणार आहोत.
भारतातील युरोपियन वसाहती-----
पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या युरोपातील देशांनी भारतात व्यापाराच्या निमित्ताने येऊन व्यापारी वखारी कशाप्रकारे स्थापन केल्या, त्याची माहिती पुढीलप्रमाणे ----
पोर्तुगीजांचे भारतात आगमन----
इ.स.1498 मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगालचा दर्यावर्दी कालिकत (कोझिकोडे) येथे पोहोचला.
कालिकत , कन्नूर व कोचीन याठिकाणी व्यापारी केंद्रे स्थापन केली. यावेळी त्यांना विरोध करणाऱ्या सर्वांना पोर्तुगीजांनी चौख उत्तर दिले.
पोर्तुगीजांनी येथे आपला पहिला गव्हर्नर अल्मिडा याला इ.स.१५०९ मध्ये पाठवले. त्याने हिंदी महासागरावर पोर्तुगीजांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
त्याच्यानंतर अल्फान्सो डी अल्बुकर्क या गव्हर्नरने १५०९ ते १५१५ या काळात पोर्तुगीज साम्राज्य स्थापण्याचे काम केले. तो उत्तम प्रशासक व राज्यकर्ता होता.
पोर्तुगीजांनी सक्तीने ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला.
पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामाने दुसऱ्यांदा भारतात व्यापारी उद्देशाने आगमन केले.
अल्बुकर्क नंतर त्याच्यासारखा कार्यक्षम, शूर, धडाडीचा व दूरदृष्टीचा गव्हर्नर भारतात पाठवला गेला नाही.
पोर्तुगीजांनीआपल्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्म सोडून इतर धर्माचे प्रार्थना स्थळे बांधण्यास बंदी घातली. धार्मिक उत्सव ,लग्न समारंभ करण्यास बंदी घातली. स्थानिक भाषांची गळचेपी केली. ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्यांना नोकऱ्या दिल्या.
पोर्तुगीजांची युद्धनीती----
पोर्तुगिजांनी प्रबळ आरमाराच्या जोरावर भारतात वसाहती स्थापन केल्या. त्यासाठी त्यांना त्यांची युद्धनीती फायदेशीर ठरली.
प्रश्न- पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते.
पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर आपले वर्चस्व निर्माण केले होते.
दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपआपसातील भांडणाचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला.
पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या.
वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले उभारले.
किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यांपासून आपल्या वसाहतींचे रक्षण करायचे आणि समुद्रामार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती.
त्यांचे आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर छापा घालून शत्रूचा मुलुख ते उध्वस्त करत असत.
इ.स.१७ व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी पाच जहाजे भारतात येत होती. जहाजांवर तोफा असत.
गोवा, दमण ,वसई येथे पोर्तुगीज जहाजे बांधत. कारण जहाज बांधणीसाठी लागणारे सागाचे उत्तम व टिकाऊ लाकूड तेथे उपलब्ध होते.
पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात असत.
या काळात छत्रपती शिवाजी महाराज वगळता इतर भारतीय सत्ताधीशांकडे स्वतःचे आरमार नव्हते.
यामुळे पोर्तुगीज आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्ताधीशाना देखील शक्य झाले नाही.
प्रश्न-पुढील विधान सकारण स्पष्ट करा.-
प्रश्न- भारतीय सत्ताधीशांना कार्ताझ घेणे गरजेचे होते.
उत्तर - भारतीय सत्ताधीशांना कार्ताझ घेणे गरजेचे होते कारण--
हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते.
परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्तकरत किंवा ते बुडवत असत.
त्यामुळे भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर त्यांना पोर्तुगीजांचे कार्ताझ (परवाने) घेणे आवश्यक झाले.
कार्ताझ म्हणजे वाहतुकीचा परवाना होय.
कार्ताझच्या दस्तऐवजामध्ये सामान्यतः जहाजाचे नाव, तांडलाचे नाव, जहाज कोठून कोठे जाणार, त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ असलेली शस्त्रास्त्रे, इत्यादी माहिती असे.
पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल,आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांना सुद्धा कार्ताझ घेणे गरजेचे झाले.
थोडक्यात पोर्तुगीजाच्या आरमाराचा मुकाबला कोणत्याही भारतीय सत्ताधीशांना करणे शक्य नसल्याने भारतीय सत्ताधीशांना कार्ताझ (परवाना) घेणे गरजेचे होते.
पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती----
प्रश्न-- भारतात पोर्तुगिजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या?
भारतात प्रथम येणाऱ्या पोर्तुगीजांची सत्ता मात्र फारशी विस्तारित झाली नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अल्बुकर्क नंतर त्याच्यासारखा कार्यक्षम, शूर, धडाडीचा व दूरदृष्टीचा गव्हर्नर भारतात पाठवला गेला नाही.
पोर्तुगीजांनी इ.स.१६०८ पर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच महाराष्ट्राच्या जवळ गोवा (साष्टी व बारदेशसह), दीव, दमण, चोल इत्यादी ठिकाणी वसाहती स्थापन केल्या.
कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवर , गंगोळी, बसरुर, बंगलोर आणि मंगलोर, कन्नूर, कोडूंगल्लुर, होनावर, कोची आणि कोल्लम येथे वसाहती उभारल्या.
पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मयीलापूर (सांव होम ) आणि बंगालमध्ये हुबळी येथे पोर्तुगीज
व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या.
पोर्तुगीजांच्या पुर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा येथे होती.
केप ऑफ गुड होपपासून पूर्वेला चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या.
वसाहतींची प्रशासनव्यवस्था----
केप ऑफ गुड होपपासून पूर्वेला चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या.
त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे त्यांच्या भारतीय साम्राज्यात ( एस्तोडा दा इंडिया) होत असे.
पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये विजरई-इ -कापितव-जराल (राज प्रतिनिधी व सेनापती ) असत. ही नेमणूक तीन वर्षांसाठी असे.
मुख्य अधिकार्याला सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळ असे.
या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष वीरजई असे.
या सल्लागार मंडळात अधिकाऱ्यांचा समावेश असे---
(प्रश्न-चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा)
गोव्याचा अर्सबिश्पु -- मुख्य धर्मगुरु
शान्सेलर-- न्यायाधीश
वेदोर द फर्जंद -------- मालमत्तेवरील अधिकारी
गोव्याचा कपितांव - कॅप्टन
यांच्या बरोबरीने काही परंपरागत उमराव या मंडळात असत.
विजरई मंडळाच्या अध्यक्षस्थानी असे.
(प्रश्न-- कपितांव म्हणजे कॅप्टन होय.)
पोर्तुगीजांची धोरण--
पोर्तुगीजांनी धार्मिक धोरण असहिष्णुतेचे स्वीकारले होते.
ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्माची प्रार्थनास्थळे बांधण्यास दुरुस्त करण्यास बंदी घातली होती.
इतर धर्मीयांना त्यांच्या पद्धतीने सण समारंभ उत्सव तसेच लग्न साजरे करण्यास बंदी घातली होती.
तत्कालीन गव्हर्नर अल्बुकर्क याने पोर्तुगीजांचा प्रभाव वाढावा यासाठी पोर्तुगीज व हिंदू त्यांच्यात मिश्र विवाहाला उत्तेजन दिले.
स्थानिक भाषांची गळचेपी केली. धर्मांतर करणाऱ्यांना नोकऱ्या दिल्या.
गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले.
त्यामुळे आशियातील वेगवेगळ्या देशांतील व्यापारी व्यापारासाठी गोव्यात येत असत.
यावरून पोर्तुगीजांचे धार्मिक धोरण इतर धर्मियांसाठी सहिष्णुतेचे नव्हते हे दिसून येते.
ब्रिटिशांचे वसाहतीकरण-----
भारतात वसाहती स्थापन करण्याच्या स्पर्धेत इंग्लंडने मोठी बाजी मारली.
इंग्रजांचे वसाहतीकरण सुदृढ पायावर घातले गेले.पुढे त्यांनी राजकारणात आपला प्रभाव निर्माण केला.
भारताला राजकीय, आर्थिकदृष्ट्या आपले गुलाम केले.
या दीर्घ मूलगामी व दूरगामी इतिहासाची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे -----
कंपनीची स्थापना ---
लंडनमधील ८० ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या मंडळाने राणी एलिझाबेथ हिच्याकडे पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी कंपनी स्थापन करण्याची मान्यता मिळावी म्हणून विनंती केली.
ही विनंती इंग्लंडच्या राणीने इसवीसन १६०० मध्ये बादशाही सनद देऊन मान्य केली.
सुरुवातीला ही परवानगी १५ वर्षांसाठी होती.
त्यातूनच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० मध्ये झाली.
कंपनीच्या कामाचे स्वरूप ( कंपनीच्या स्थापनेमागील हेतू)-----
सुरुवातीला जहाजे पूर्वेकडील देशात पाठवणे.
पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे. व्यापारात नफा मिळवणे.
मिळालेल्या नफ्यातून मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे.
हा खरेदी केलेला माल किंवा मसाल्याचे पदार्थ इंग्लंडमध्ये विकणे.
त्यातून पुन्हा नफा मिळवणे.
हे कंपनीच्या कामाचे स्वरूप होते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रश्न- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात वखारी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या काळातील जहाजे शिडावर चालणारी होती.
त्यामुळे प्रवासाचा वेग कमी होता.
वर्षातील ठराविक काळातच म्हणजेच इंग्लंडहून डिसेंबर ते एप्रिलमध्ये निघायचे आणि भारतातील व्यापार आटोपून पुढील वर्षी जानेवारीत परत जायचे.
असा कमाल १३ आणि किमान ९ महिन्यांचा क्रम ठरलेला होता.
त्यामुळे ठराविक काळात माल घेऊन निघणे आणि परत येणे अपरिहार्य होते.
त्यामुळे माल खरेदी करणे आणि विकणे अवघड होऊ लागले.
भाव कमी असताना खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी जागेची गरज भासू लागल्याने कंपनीने भारतात वखारी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
अशा वखारीना फॅक्टरी असे म्हणत असत, तर फॅक्टरीत काम करणाऱ्या नोकरांना फॅक्टर्स म्हणत असत.
वखार--- (टिप लिहा)
मालाची खरेदी-विक्री करण्याचे आणि साठवणुकीचे ठिकाण म्हणजे ‘वखार’ होय.
वखारीसाठी मोठी जागा असे.
वखारीच्या आत मालाचे कोठार, कार्यालय, निवासस्थान याची सोय केलेली असे.
वखारीतील पाव, मास, भात, डाळ तांदळाची खिचडी, लोणचे यांचा समावेश असे.
वखारीवर इंग्रजांचा झेंडा असे.
व्यापारासाठी आलेल्या सर्व युरोपियन व्यापाऱ्यांना भारतात वखारीसाठी जागा मिळवणे गरजेचे वाटल्याने युरोपियनांनी भारतात वखारी स्थापन केल्या.
कंपनीच्या नोकर वर्गाचा अपवाद वगळता खासगी व्यापाराला परवानगी होती.
नोकरदारांच्या मनोरंजनासाठी आणि श्रमपरिहारासाठी बागा असत.
कंपनीला दिलेले अधिकार---
प्रश्न- ब्रिटिश सरकारने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले होते?
इंग्लंडचा तत्कालीन राजा दुसरा चार्लसने ईस्ट इंडिया कंपनीला एकाधिकाराची सनद दिली.
याबरोबरच पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करणे.
किल्ले बांधण्याचा अधिकार दिला.
सैन्य उभारणे आणि अन्य धर्मियांशी युद्ध करणे करणे.
तसेच कंपनीतील नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार दिला .
वसाहतींची व्यवस्था---
इसवी सन १६१५ मध्ये सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी जहांगीर बादशहाकडून मिळवली.
त्यामुळे कंपनीने भारतात वखारी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
या वखारीचा कारभार १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरत, मद्रास चेन्नई येथून चालत असे.
मद्रासच्या कार्यकक्षेत भारताचा पूर्व किनारा, ओडिसा बंगाल व पूर्वेकडील देश येत असत.
सुरतच्या कार्यकक्षेत महाराष्ट्रातील राजापूर, तांबडा समुद्रातील मोखा पर्शियन आखातातील बसरा येथील वखारी येत असत.
सुरतच्या वखारीत हिशोबनीस, कोठारप्रमुख, खजिनदार, काही वखारदार आणि कारकून असत.
यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन व मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर आणि एक तुतारीवाला असे.
प्रत्यक्ष वखारीमध्ये काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) असे.
याबरोबरच कारकून आणि फॅक्टर असे हुद्देही होते. शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट असे सर्वजण वखारीच्या आवारातच राहात असत.
या सर्वांच्या भोजनाची सोय तेथेच केलेली होती.
संरक्षणासाठी कंपनीने किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले होते.
इंडिया कंपनीने मद्रासजवळ अर्मगाव येथे किल्ला बांधला.
कंपनीने मद्रास (चेन्नई) येथे वखार आणि किल्ला बांधला.
मद्रासच्या या किल्ल्याला ‘फोर्ट सेंट जॉर्ज’ हे नाव देण्यात आले.
कंपनीने मद्रास येथील वखारीत टाकसाळ सुरू केली.
येथे सोने, चांदी, तांबे आणि मिश्रधातू यांची नाणी पाडण्यास सुरुवात केली.
मुंबई बेटाची माहिती-----
इ.स. १६६१ पर्यंत मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती.
इ.स. १६६१ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याचे पोर्तुगीज राजकन्या ब्रॅगांझा हिच्याशी लग्न ठरले.
पोर्तुगालच्या राजाने आपला जावई इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याला १६६१ मध्ये लग्नात मुंबई बेट आंदण दिले.
दुसऱ्या चार्लसने मुंबईचा कारभार पाहण्यासाठी इ.स.१६६५ मध्ये अब्राहम शिपमन याची गव्हर्नर म्हणून नेमणूक केली.
मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा, त्या खर्चाच्या मानाने उत्पन्न कमी असल्यामुळे दुसऱ्या चार्लसने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले.
मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात-----
ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेट भाड्याने घेतल्यावर इ.स. १६६९ मध्ये कंपनीने सुरतचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑ्क्झीन्डेन मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ म्हणून नेमले.
मुंबईच्या रक्षणासाठी कंपनीकडे ५-६ लहान जहाजे आणि सुमारे ३०० च्या आसपास सैनिक होते. या सैन्याकडे बंदुका आणि तलवारी असत.इंग्रजांनी बेटावर राहण्यासाठी व्यापारी आणि कामगारांना प्रोत्साहन दिले.
डचांचे वसाहतीकरण---
हॉलंडमधील व्यापारीही व्यापारी फायद्यासाठी भारताकडे आले.
व्यापारवाढीसाठी डचांनी इ.स १६०२ मध्ये ईस्ट इंडिया (युनायटेड ईस्ट इंडिया ) कंपनी स्थापन केली.
डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले अधिकार -------
प्रश्न- डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले?
इ.स. १६०२ मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. या कंपनीला डच सरकारने दिलेले अधिकार पुढीलप्रमाणे--
या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला.
कंपनीसाठी नोकर ठेवणे.
वखारी स्थापन करणे.
वसाहतींच्या संरक्षणासाठी किल्ले बांधणे.
वसाहतीमध्ये नाणी पाडणे.
तसेच पौर्वात्य देशांशी युद्ध अथवा तह करणे, असे अधिकार कंपनीला मिळाले.
ही कामे पाहण्यासाठी कंपनीने गव्हर्नर जनरल हा अधिकारी नेमला.
डच वसाहती---
१७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत डच कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत वसाहती आणि वखारी उभारल्या.
आफ्रिका खंडात- सध्याचे मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराक, इराण येथे वसाहती स्थापन केल्या.
आशिया खंडात- भारतीय उपखंडात भारत, पाकिस्तान,बांगलादेश, म्यानमार इत्यादी ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या.
पूर्वेकडील देशांमध्ये-- सयाम, व्हिएतनाम, लाओस,कांपुचीया,चीन,ताईवान ,जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया या भारताच्या पूर्वेकडील देशांतदेखील डचानी आपल्या वसाहती स्थापन केल्या.
डचांच्या भारतातील वसाहती-------
ईस्ट इंडीज मसाल्याची बेटे हे त्यांचे मुख्य लक्ष होते. तेथून त्यानी पोर्तुगीज व इंग्रजांना हुसकावून लावले.
त्यानंतर डचांनी दक्षिण भारतात मच्छलीपटन येथे पहिली वसाहत स्थापन केली.
कालांतराने दक्षिण भारतात आपला प्रभाव निर्माण केला.
दक्षिण भारतात पेतापुली, पुलिकत, तिरुपापुलीयार, पुर्त नोव्हू , कारिकल, चिनसुरा, ठठ्ठा, आग्रा,नागपट्टनम इत्यादी ठिकाणी डचांनी वखारी स्थापन केल्या होत्या.
पश्चिम किनारपट्टीवर अहमदाबाद, भडोच,खंबायत, सुरत इ. ठिकाणी वखारी स्थापन केल्या.
उत्तर भारतात आग्रा येथे वखारी स्थापन केल्या.
भारतातील डचांच्या वसाहतींचा विस्तार----
पोर्तुगिजांचा पराभव करून कोची, कोडूंगल्लुर, कन्नूर, कोल्लम येथील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले होते.
कोचीच्या राजाशी तह करून डचांनी काळ्या मिरीची निर्यात करण्याचा एकाधिकार मिळवला.
१७ व्या शतकात सुरुवातीला डच यांचे आरमार प्रबळ होते.
कोणत्याही बिकट प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावर वीस हजारांच्या आरमार आणि तीन ते चार हजार सैनिक उतरविरण्याची त्यांची क्षमता होती.
मुघल,आदिलशाही, कुतुबशाही जहाजांना डचाकडून परवाना घ्यावा लागे.परवाना न घेता प्रवास केल्यास जहाज जप्त केले जाई.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंगालमधील चिनसुरा व मद्रास किनाऱ्यावरील नागापटकन ही दोन मोक्याची ठिकाणे त्यांच्या ताब्यात होती.
अशा रीतीने डचांनी भारतात आपला प्रभाव वाढवला.
पण पुढे ब्रिटिशांनी त्यांना एका मागोमाग एक पराभवाचे धक्के दिले. इ.स. १७८१ मध्ये यांचा पुरता पराभव झाला. त्यांचे भारतात उच्चाटन झाले.
फ्रेंचांचे भारतातील वसाहतीकरण ---
इंग्लंड व फ्रान्स युरोपच्या इतिहासातील परस्परांचे जुनाट वैरी म्हणून ओळखले जात होते.
युरोपात या दोन देशात जर काही कुरबूर झाली तर त्याचे पडसाद भारतातील इंग्रज व फ्रेंच या व्यापारी कंपन्यांमध्ये देखील दिसून येत होते.
इ.स.१६६४ मध्ये १४ व्या लुईचा अर्थमंत्री (पंतप्रधान) कोलबर्ट (कोलबेर) याने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
फ्रान्सचा राजाने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले अधिकार--
प्रश्न- फ्रान्सच्या राजाने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले?
पूर्वेकडील देशात व्यापार करणे.
सैन्य व आरमार बाळगणे.
करमाफीचा अधिकार मिळाला.
तसेच पौर्वात्य राजांशी तह अथवा युद्ध करणे. इत्यादी अधिकार कंपनीला मिळाले.
फ्रान्सच्या भारतातील वसाहती---
इ.स. १६६६ मध्ये मोगल बादशहा औरंगजेबाच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली.
त्यानुसार फ्रेंचांनी इ.स. १६६८ मध्ये सुरत येथे पहिली वखार स्थापन केली.
त्यानंतर पांडेचेरी,चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर,बालासोर, कासिमबझार, मच्छलीपटन येथे वखारी स्थापन केल्या.
पांँडेचेरी हे फ्रेंचांचे भारतातील मुख्य ठाणे होते.
इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील संघर्षाला कर्नाटकातील राजकीय अस्थिरता, अंतर्गत कलह या बाबी पोषक ठरल्या.
आपला आर्थिक स्वार्थ साधणे आणि परस्परांना नेस्तनाबूत करणे.
यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये कर्नाटकात तीन युद्ध झाली, त्यांना कर्नाटक युद्ध असे म्हणतात.
कर्नाटक युद्ध --(टीप लिहा)
कर्नाटकच्या नवाबाच्या घराण्यात सत्तेसाठी वाद सुरू झाले होते.
इंग्रज आणि फ्रेंच या दोघांनीही या वादामध्ये हस्तक्षेप केला.
यातूनच इ.स. १७४४ ते १७६३ या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध झाली. त्यालाच ‘कर्नाटक युद्ध’ असे म्हणतात.
तिसऱ्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांचा पराभव झाला.
त्यामुळे फ्रेंचांची भारतातील सत्ता कमकुवत होत गेली.
परिणामी फ्रेंचाचे भारतातील वर्चस्व संपुष्टात आले.
भारतात व्यापारासाठी आलेल्या युरोपियनांनी अल्पकाळ वा दीर्घकाळ इथे जी पावले रोवली, त्यातून ऐतद्देशीय सत्तांचा दुबळेपणा, स्वार्थीपणा, राष्ट्रीय भावनेचा अभाव, तांत्रिकदृष्ट्या व लष्करीदृष्ट्या मागासलेपणा इ. दोष दिसून आले.
त्यातून इतर युरोपियन सत्तावर मात करणाऱ्या इंग्रजांचे भारतात मजबूत वसाहतीकरण झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा