इयत्ता १२ वी - (इतिहास) - प्रकरण ६

 प्र. ६ वे  वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष 


१८५७ पूर्वीचे लढे - 

प्रश्न - १८५७ पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या उठावांची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे लिहा. 

मुद्दे - अ. भिल्ल्लांचा उठाव         ब. पाईकांचा उठाव       क. हंसाजी नाईकांचा उठाव.      ड.  सावंतवाडीतील उठाव          इ. सातारा जिल्ह्यातील रामोश्यांचा उठाव.  फ.कोल्हापूरच्या गडकर्यांचा उठाव.         (यापैकी कोणतेही तीन मुद्दे)       ५ गुण.      अ. भिल्ल्लांचा उठाव - 

प्रश्न -  भिल्ल्लांच्या  उठावाची माहिती लिहा.   ५ गुण.     किंवा 

प्रश्न - १८२२ च्या अखेरीस लेफ्टनंड औट्रम भिल्ल्लांचा उठाव मोडून काढण्यात  यशस्वी झाला.           (सकारण स्पष्ट करा.) 

अ.  गोदाजी व  महिपा यांचा उठाव-

  • १८१८ साली  खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्ल  एकत्र आले.

  •  दुसऱ्या बाजीरावाची विश्वासू सहकारी त्रिंबकजी  डेंगळे इंग्रजांच्या कैदेतून निसटले आणि त्यांनी भील्लांना उठावाची प्रेरणा दिली.

  • त्रिंबकजींचे पुतणे गोदाजी व महिपा  यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी  उठाव केला.

  • कॅप्टन ब्रिग्ज याने भिल्लांची रसद बंद करून त्यांची कोंडी केली.

  • माउंट स्टूअर्ट एल्फीस्टन-

  • इंग्रजी सत्तेचा प्रमुख माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने  सामोपचाराचे धोरण स्वीकारत काहीं भिल्लांनाच वाटसरूचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले.

  • काही भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन देण्यास सुरुवात केली. 

  • मेजर मोरीन  याने भिल्लांची गळचेपी करीत त्यांना शरण येण्यास भाग पाडले.

  •  हरियाचा उठाव-

  • १८२२  या दरम्यान हरिया या भिल्लांच्या मोरक्याने उठाव केला. 

  • कॅप्टन रॉबिन्सन यांनी हा उठाव मोडून काढला. 

  • लेफ्टनन औट्रम --   

  •  कॅप्टन औट्रम यांनी भिल्लांचा उठाव मोडून काढला.

  • त्याचबरोबर त्याने भिल्लांमध्ये राहून त्यांच्यात विश्वास निर्माण केला. 

  • भिल्लांना शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. 

  •   भिल्लावरील पूर्वीचे गुन्हे माफ केले.

  •  त्यांना जमिनी देणे,तगाई, सैन्यात भरती अशा कामांमुळे भिल्लांच्या उठावाचे प्रमाण कमी होत गेले.

  •  पाईकांचा उठाव -     टिपा लिहा.     २ गुण.      किंवा

  •  प्रश्न - १८१७ मध्ये पाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला.       ३  गुण.

  • ओडिशा प्रांतात मध्ययुगीन काळापासून पाईकपद्धती अस्तित्वात होती.

  • निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते, त्यांना पाईक असे म्हणत. 

  • राजांनी या पाइकांना जमिनी मोफत कसण्यासाठी दिल्या होत्या. त्यात ते आपला उदरनिर्वाह करत असत.

  •  त्याबदल्यात युद्धाचा प्रसंग उद्भवला तर त्यांनी आपल्या राजांच्या बाजूने लढायला उभे राहायचे, अशी अट होत होती.

  • इ,स. १८०३  मध्ये इंग्रजांनी नागपूरकर भोसल्याकडून ओडीसा जिंकून घेतले. पाइकांच्या वंशपरंपरागत जमीनी काढून घेतल्या.त्यामुळे पाईक संतापले.

  •  तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे  मिठाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले.

  • याचा परिणाम इ.स. १८१७ मध्ये बक्षी जगबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली पाइकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला.

  • प्रश्न-१८५७  पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या  माहितीपुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा.सविस्तर उत्तर लिहा.       अ.हंसाची नाईकांचा उठाव.  ब. सातारा जिल्ह्यातील रामोशांचा उठाव.  क. सावंतवाडीतील उठाव.  ड. कोल्हापूरच्या गडकर्यांचा  उठाव. 

  • अ. हंसाची नाईकांचा उठाव-

  •  हंसाजी नाईक यांचे नांदेड जिल्ह्यात राज्य होते. त्यांनी निजामाच्या राज्यात सामील होण्यास नकार दिला.

  • उलट निजामाचे काही किल्ले त्यांनी जिंकून घेतले. त्यामुळे युद्ध सुरू होणे अपरिहार्य होते.

  •  मेजर पिटमन, कॅप्टन इव्हान्झ, कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली ४०० सैनिकांची फौज  निजामाच्या रक्षणासाठी चालून आली.

  •  २५  दिवसांच्या  युद्धानंतर हंसाजीचा  पराभव  झाला.

  • सातारा जिल्ह्यातील रामोश्यांचा उठाव-

  •  प्रश्न उमाजी नाईक यांच्या उठावाचे वर्णन करा.    सविस्तर उत्तर लिहा. ५ गुण.

  •  सातारा जिल्ह्यात चितूरसिंग यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाजाने केलेल्या उठावात उमाजी नाईक आणि संतू नाईक हे आघाडीवर होते.

  • त्यांनी पुण्याहून मुंबईला जाणारा सावकारी ऐवज लुटला.

  • १८२४  मध्ये पुण्याजवळील भांबुर्डे येथे सरकारी तिजोरी उमाजी नाईक यांनी लुटली.

  • उठाव मोडून काढण्यासाठी सरकारने उमाजीला जंग जंग पछाडले. 

  • उमाजी इंग्रजांच्या हाती लागत नव्हता. शेवटी इंग्रजांनी या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमाजी आणि त्यांचे सहकारी भुजबा,पांड्या व येसाजी यांना पकडण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे इनाम घोषित केले. 

  • गावकऱ्यांनी त्यांना अन्न-वस्त्र-निवारा पैसा देऊ नये, असा आदेश काढून हा उठाव  मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी प्रयत्न केले.

  • उमाजीच्या सहकाऱ्यांना कोणतीही मदत न देण्याचे आणि दिल्यास दंड करण्याचे घोषित केले.

  • तसेच वतने जप्त करण्याची धमकी दिली. कॅप्टन डेव्हीसच्या  घोडदळाने  आणि कॅप्टन मॅकिंटोश यांनी पाठलाग करूनही यश मिळाले नाही.

  • उमाजी नाईकने इंग्रजांना ठार मारण्यासाठी आदेश दिले. 

  • सातारा, वाई, भोर, कोल्हापूर या प्रदेशात हा संघर्ष चालू होता. 

  • अखेरीस इंग्रजांनी भोरजवळ उमाजीला पकडले. 

  • त्यानंतर उमाजी नाईकांवर खटला भरून त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आले.

  • उमाजी नाईकांचा जाहीरनामा-

  •  उमाजीने ब्रिटिशांच्या विरोधात जाहीरनामा काढला होता. उठावाच्या काळात प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात जनतेला आवाहन केले की, आपल्या प्रदेशातील युरोपीयन लोक जेथे सापडतील तेथे पकडून ठार मारावेत. 

  • अधिकारी असो की, लष्करी शिपाई असो, युरोपियनास मारण्याचे काम कोणी उत्कृष्टपणे बजावले, तर त्यांना रोख बक्षिसे, इनामे,जहागिरी वगैरे नव्या सरकारकडून देण्यात येतील. 

  • इंग्रजी राज्यात ज्यांची वतने, हक्क व मिळकती बुडाल्या असतील, त्यांना आपले गेलेले हक्क परत मिळविण्याची संधी आली आहे.

  •  कंपनी सरकारमधील हिंदी सैनिकांनी नोकऱ्या सोडाव्यात. साहेबांचे आदेश पाळू नयेत. ही आज्ञा न पाळल्यास नवीन सरकार करून त्यांना सजा होईल.

  •  युरोपियनांचे बंगले जाळावे, सरकारी तिजोरीच्या लुटीचा पैसा त्यांना माफ केला जाईल.

  • सरकारास वसूल करू नये.

  •  हिंदू व मुसलमान कोणीही असो, त्यांनी हा आमचा हुकुम मानावा.

  •  इंग्रजी राज्य बुडणार, हे  भाकीत खरे होण्याची वेळ आली आहे.

  • सावंतवाडीतील उठाव-

  • १८२८ साली महादेवगडचा किल्लेदार फोंडसावंत तांदुळवाडीकर यांनी उठाव केला. मात्र विरोधकांनी हा उठाव मोडून काढला. 

  • सावंतवाडीतील सरकारांनी केलेला उठाव स्पूनर या पोलिटिकल एजंटने  मोडून काढला.    ( पोलिटिकल एजंट म्हणजे इंग्रज सरकारचा भारतीय संस्थानिकांचा दरबारातील प्रतिनिधी होय.) 

  • त्यानंतर या उठावात सामील असलेल्या सरदारांपैकी काहींनी ब्रिटिशांविरुद्ध एक होऊन लढण्याचा प्रयत्न केला.

  • मात्र १८४५  मध्ये या परिसरात लष्करी कायदा पुकारला गेला.

  • औट्रम यांनी हा उठाव पूर्णतः मोडून काढला.

  • कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव--

  • कोल्हापूर संस्थानातील गडकर्‍यांनी उठाव केला. कारण किल्ल्याचे संरक्षण करणाऱ्या गडकऱ्यांचे वेतन कंपनी सरकारने बंद केले होते. 

  • गडकऱ्यांनी सामानगडावर पहिला संघर्ष सुरू केला. 

  • त्यात त्यांनी प्रामुख्याने १८४४  मध्ये पन्हाळा, पावनखिंड, विशाळगड  गडकऱ्याकडून करून ताब्यात घेतले. 

  • मद्रासहुन बोलावलेल्या इंग्रज फौजानी गडकर्यांना शरण यायला भाग पाडले.

  •  १८५७ चा स्वातंत्र्यलढा--

  • प्रश्न - १८५७ च्या  स्वातंत्र्यलढयाची कारणे लिहा.

मुद्दे-   अ.ब्रिटिश सैन्यातील असंतोष.    ब. संस्थानिकांमध्ये असतोष.   क.आर्थिक कारणे    ड. धार्मिक कारणे      इ. तात्कालिक कारण / काडतूस प्रकरण.

अ. ब्रिटिश सैन्यातील असंतोष- 

  • भारतीय सैनिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, त्यांच्यावर असणारी बंधने, यामुळे सैनिकांमध्ये असंतोष वाढत होता.

  • सैनिकांवर अनेक प्रकारची बंधने लादली गेली होती. 

  • भारतीय सैनिकांच्या भत्यात कपात केली होती.

  • भारतीय सैनिकांना समुद्र पर्यटनाची सक्ती केली होती. 

  • बदल्यांमध्ये पक्षपात केला जात असे.

  • भारतीय सैनिकांचा कवायतीच्या वेळी अपमान केला जात असे. 

  • भारतीय सैनिकांना वरिष्ठ पदावर बढती मिळत नसे. 

  • यासारख्या अनेक कारणांमुळे भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता.

  • संस्थानिकामध्ये असंतोष-  

  • गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्यामुळे  संस्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. 

  • सातारा, जेतपुर, संबलपूर, उदयपूर, नागपूर, झाशी इ. संस्थाने डलहौसीने खालसा केली होती.

  • संस्थाने खालसा केल्यामुळे संस्थानांमधील  सैनिक बेकार झाले आणि शेतीवर  सैनिकांचा अतिरिक्त भार वाढला. 

  • संस्थाने खालसा करण्याबरोबरच ब्रिटिशांनी वतने जप्त केली होती.

  • त्यामुळे नाराज असणारा स्थानिक वर्ग मोठा होता.

  • आर्थिक कारणे-

  • भारतीय परंपरेचा, येथील पीक पद्धती व हवामानाचा विचार न करता भारतात इंग्रजांनी महसूल गोळा करण्याच्या कायमधारा, रयतवारी, महालवारी  अशा विविध पद्धती राबवल्या. 

  • त्यामुळे शेतकरी दरिद्री होत गेले. पूर्वी शेतसारा वस्तूरुपात भरता येत होता. तो आता रोख स्वरूपात द्यावा लागे. 

  • दुष्काळ, साथीचे रोग, आपत्ती अशा प्रसंगीही महसूल माफ केला जात नव्हता. उलट महसूल वेळेवर भरावा लागत असे. 

  • त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी  होत गेला. शेतसारा भरण्यासाठी शेतकरी सावकार आणि सरकारच्या कचाट्यात सापडला. 

  • आर्थिक अडचणीमुळे शेतकरी जमीन विकू लागला. 

  • जमीन ही  विक्रय वस्तू बनली.त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले. 

  • इंग्रज मळेवाल्यांनी येथे नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. बिहारमधील ब्रिटिश मळे मालक शेतकऱ्यांवर नीळ लागवडीची सक्ती करत.

  •  नगदी पिकांच्या लागवडीचा फायदा ब्रिटीशांना होत असे. निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था भीषण होती.

  • सार्वत्रिक बेकारी, असंतोष अविश्वास यांनी भारतभर सामान्य जनतेचे जगणे अवघड केले होते. 

  • या कारणामुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता.

ड.  धार्मिक कारणे-

  • कंपनी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात धर्मांतरे  केली जात. 

  • राज्यकारभाराच्या  माध्यमातून कंपनी सरकार धर्मबुडवेपणा करीत आहे, अशी समजूत लोकांच्या मनात मूळ धरू लागली होती. 

  • सतीबंदीसारख्या प्रथा सरकारने कायद्याने बंद केल्या. त्यामुळे भारतीय समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या.

  •  इंग्रज भारतीयांच्या रूढी-परंपरांवर आघात करत आहे, अशी भारतीयांची भावना निर्माण झाली.

  • परंपरेनुसार  हिंदू धर्मात निषिद्ध मानले जात असले, तरीही भारतीय सैनिकांना समुद्र पर्यटनाची सक्ती केली गेली.

  • काडतूसाना गाय व डुकराची चरबी लावलेली असत. काडतूस वापरण्यापूर्वी ते दाताने तोडावे लागे.

  • भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसाना व्हावा, ही कल्पनाच धर्म संकटात टाकणारी वाटली. त्यामुळे या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.

  • काडतूस प्रकरण  / तात्कालिक कारण-

  • १८५६ साली कंपनी सरकारने सैनिकांना लांब पल्ल्याच्या बंदुका व काडतुसेही दिली. काडतूसांची आवरणे दाताने तोडावी लागत असे.

  • यास  डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी सैनिकांमध्ये पसरली.

  • धर्मसंकटात टाकणाऱ्या काडतुसांचा वापर करायला सैनिकांनी नकार दिला.

  • मार्च १८५७  बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले.

  • इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिल्यामुळे असंतोष वाढला होता आणि उठावाला सुरुवात झाली.

 प्रश्न- बराकपूर येथे झालेल्या उठावाचे १८५७  च्या स्वातंत्र्यलढ्यात कसे रूपांतर झाले, ते सविस्तर लिहा.

 अ.   बराकपूर छावणीतून उठावाला सुरुवात - 

  • मार्च १८५७  मध्ये मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले.

  •  इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिली.

  •  यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढला होता. या घटनेच्या पाठोपाठ लखनौचा शिपायाने उठाव केला.

  •  या सगळ्या धामधुमीत इंग्रजांना ठार मारणे, त्यांच्या कुटुंबीयांना धडा शिकवणे,प्रसंगी कत्तल करणे असे प्रकार सुरू झाले.

  •  शिपाई दिल्लीच्या दिशेने चालुन गेले.

  • उठावाचे नेतृत्व---

  •  उठावातील सहभाग-

प्रश्न- १८५७ चे स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्यांचे योगदान स्पष्ट करा.

  • १८५७  चा स्वातंत्र्यलढ्यातील अनेक संस्थानिक आणि सेनानीनी  उठावाचे नेतृत्व केले. त्यांचे योगदान पुढीलप्रमाणे-

  • मुगल बादशहा बहादूरशहा-

  • इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिली. यामुळे सैनिकांमध्ये असंतोष वाढला होता.

  • या घटनेच्या पाठोपाठ लखनऊच्या शिपायांनी उठाव केला. 

  • मेरठ येथे घोडदळाच्या कंपन्यांनी उठाव केला. 

  • लखनऊ-मेरठहुन आलेल्या उठावातील सैनिकांनी १२ मे १८५७  रोजी दिल्ली जिंकून घेतली.

  •  उठावाचे नेतृत्व बहादुरशहाकडे सोपवून त्याला शहनशहा-इ- हिंदुस्तान बनवले.

  • १८५७ च्या उठावाचे  नेतृत्व मोगल बादशहाच्या हाती असले तरी, प्रत्यक्षात मात्र ते नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमद कोंडला कुंवरसिंह व सेनानी बक्त खान यांनी केले. 

  • दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्तखानाने घेतली. 

  • दिल्ली,कानपूर, लखनौ, झाशी येथील व पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते.

  • २७ मे १८५७ रोजी  दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीला आले.

  •  दिल्ली हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून या युद्धात ब्रिगेडियर  जॉन निकोलस मारला गेला.

  • सर जॉन लॉरेन्स व शिख  पलटणीमुळे ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली.

  •  ब्रिटिश जनरल हडसनने  बहादूरशहला  अटक केली व रंगूनला ब्रम्हदेश पाठवले. बहादुरशहा यांचे  १८६२ मध्ये तिकडेच निधन झाले.

ब. कुंवरसिंह--

  • पश्चिम बिहारमधील जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी  उठाव केला. 

  • झारखंडमधील हजारीबाग, ओडिसातील देवगड, संबलपुर येथे चांगला प्रतिसाद मिळाला.

क. नानासाहेब पेशवे-

  • नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथे उठावाचे नेतृत्व केले. 

  • इंग्रजांचा सेनापती हॅवलॉक कानपुरात दाखल झाला.

  •  नानासाहेब व तात्या टोपे यांनी कानपुर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला.परंतु तो अयशस्वी झाला.

  • ब्रिटीश सैन्याचा मुख्य कमांडर सर कॉलिंग कॅम्पबेल यांनी तात्या टोपे यांचा पराभव केला आणि कानपूर परत मिळवले. अखेरीस नानासाहेब पेशवे यांनी नेपाळमध्ये वास्तव्य केले.

  •  तात्या टोपे-

  • तात्या टोपे  यांना कानपुर ताब्यात ठेवण्यात अपयश आले. 

  • त्यांचा सर कॉलिंग कॅम्पबेलने पराभव केला.

  •  पुढे ते झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या मदतीला गेले.

  •  पण सर ह्यूरोजने त्यांचा पराभव केला.

  • ग्वालियरचा सरदार मानसिह याने विश्वासघाताने तात्या टोपे यांना इंग्रजांच्या हवाली केले.

  • त्यांना १८५९  मध्ये फाशी देण्यात आले.

  •  राणी लक्ष्मीबाई-

  • तात्या टोपे व नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले.

  • सर ह्यूरोज यांनी झाशीला वेढा घालून राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव केला.

  • ब्रिटिशांनी काल्पी जिंकले. काल्पीच्या लढाईत राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले.

  • अन्य नेतृत्व---

  • अवधच्या बेगम हजरत महल यांनी अवध परिसरात उठाव केला. 

  • मौलवी अहमदमुल्ला यांनी हिंदी फौजेचे नेतृत्व केले.

  • नेपाळचा राजा जंगबहादुर  गुरखा फलटण घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला आला.

  •  कॉलिंग कॅम्पबेलने  लखनऊ जिंकले.

  •  वाराणसी अलाहाबाद उठाव-     टिपा लिहा.   २ गुण.

  • गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांच्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील वाराणसीवर चालून आला.

  • येथील उठावात  सैनिकांना जनतेचा पाठिंबा होता.

  •  कर्नल नीलने तोफांचा मारा केला, कत्तली केल्या, लोकांना फासावर लटकवले.

  • वाराणसीची बातमी कळताच अलाहाबादच्या शिपायांनी उठाव केला.

  •  युरोपियनांना सूड म्हणून ठार केले. तेव्हा नीलने अलाहाबादला कूच करून भारतीयांची सरसकट कत्तल केली.

  •  इंग्रजांनी अत्याचाराचा कळस गाठला.नीलने येथेही सरसकट कत्तल करून उठाव मोडून काढले.

  • महाराष्ट्रातील उठाव-

 प्रश्न-  १८५७ च्या  स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्रातील उठाव याविषयी माहिती लिहा.  ५  गुण. 

  • महाराष्ट्रात सातारा येथे रंगो बापूजी गुप्ते यांनी इतिहास घडवून आणण्याचा प्रयत्न केला.पण तो अयशस्वी झाला.

  •  गुप्ते यांच्या सहकाऱ्यांना शिक्षा देण्यात आली.

  •  नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी १८५८ मध्ये उठाव केला. 

  • मुंबईतील कटाची कल्पना इंग्रजांना  येताच  त्यांनी कटवाल्यांना तोफेच्या तोंडी दिले.

  • खानदेशात  भीमा नाईक,कजारसिंग यांनी ७  लाखांचा सरकारी खजिना लुटला.

  • जळगावजवळ अंबापाणी येथे भिल्ल व इंग्रज यांच्यात लढाई होऊन त्यांचा पराभव झाला.

  • कित्येक भिल्लांना अटक झाली. कितीतरी जणांवर लष्करी कोर्टात खटले चालवून त्यांना फाशी देण्यात आले.

  • कोल्हापूर येथे उठावाची बातमी पोहोचताच अगोदरच तयारीत असलेल्या रामजी शिरसाट यांनी सरकारी खजिना लुटला.

  • कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमासाहेब  यांनी उठावाचे  नेतृत्व करण्यास सुरुवात केली.

  • त्यांना धारवाड, बेळगाव, कोल्हापूर येथे प्रतिसाद मिळाला. 

  • १८५७ चे स्वातंत्रयुद्ध जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष चालू होते.

  • दिल्ली, मीरत, कानपूर, लखनऊ इत्यादी ठिकाणी लढलेल्या हिंदी शिपायांची संख्या सुमारे एक लाखाच्या आसपास होती.

  • शस्त्रबळ,शौर्य, धैर्य यातही ते कमी नव्हते, तरीही या लढ्यात त्यांना अपयश आले.

  • या उठावात संस्थानिकांपासून ते सामान्य जनतेने आणि समाजातील सर्व वर्गानी भाग घेतला होता,यावरून या उठावाची व्यापकता लक्षात येते.


  • पुढील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.


प्रश्न- नकाशात महाराष्ट्रातील उठावाची कोणती शिकणे दाखवली आहे. 

  • कोल्हापूर, सातारा, नरगुंद, नागपूर.

प्रश्न- नकाशात भारताच्या वायव्य भागात वर्तमान सीमांच्या बाहेरची उठावाची ठिकाणे सांगा. 

  • लाहोर, पेशावर, कराची, शिकारपूर.

प्रश्न- नकाशात भारताच्या कोणत्या भागात उठावाची केंद्रे एकवटलेली दिसतात. 

  • उत्तर भारतात.

 प्रश्न- ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या कोणत्या भागात उठावं झालेला नव्हता ते नकाशात शोधा. 

  • दक्षिण भारत, पूर्व पश्चिम किनारपट्टी, ईशान्य भारत.

प्रश्न - नकाशात दाखवलेली उत्तर भारतातील उठावाची कोणतेही दोन ठिकाणे लिहा.

  • लखनऊ, कानपुर, झाशी.

प्रश्न- नकाशातील  दिल्लीच्या शेजारची उठावाचे ठिकाणे कोणती होती?

  • मुजफ्फरनगर, मेरठ, मथुरा.

प्रश्न- नकाशातील आत्ताच्या बांगलादेशातील उठावाची ठिकाणे कोणती होती?

  • चितगाव, ढाका.

  • उठावाचे परिणाम- 

  • १८५७ च्या लढ्याचा  परिणाम म्हणजे भारतीयांमध्ये प्रादेशिक व राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला.

  • भारतीयांमधील असंतोष दूर करण्यासाठी इंग्लंडच्या राणीला जाहीरनामा काढून काही आश्वासने द्यावी लागली. 

  •  ब्रिटिशांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेले सशस्त्र मार्ग निरूपयोगी ठरल्याने भारतीयांना नवे मार्ग शोधण्याची गरज वाटू लागली.

राणीचा जाहीरनामा.     (टिपा लिहा.)    २  गुण.

  • १८५७ चे स्वातंत्र युद्ध थंड झाल्यावर भारतीयांच्या मनातील असंतोष दूर करण्यासाठी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने १८५८ मध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध करून भारतीयांना काही आश्वासने दिली,ती आश्वासने  पुढीलप्रमाणे-

  • सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत वंश,धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून त्यांच्यात भेदभाव केला जाणार नाही.

  • संस्थानिकांशी  केलेल्या करारांचे पालन केले जाईल.

  •  कोणत्याही कारणाने संस्थाने खालसा केली जाणार नाही.  इत्यादी आश्वासनांचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये  होता.

  • कलम १२४ अ आणि महाराष्ट्र-

 प्रश्न-  बंगवासी साप्ताहिकाला राजद्रोहाच्या आरोपावरून सामोरे जावे लागले.     (सकारण स्पष्ट करा)          ३  गुण.

  • २५  नोव्हेंबर १८७० रोजी जेम्स फिटझ  स्टीफन यांनी कलम १२४  भारतीय दंडविधान समाविष्ट केले.

  •  या कलमान्वये हिंदुस्थानातील सरकारविषयी शब्द, लेखन, चिन्ह किंवा यासारख्या कोणत्याही घटकाने अप्रीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास दंडाची, तुरुंगवासाची किंवा फाशीची शिक्षा देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. 

  • या कायद्यानुसार शिक्षा झालेले पहिले साप्ताहिक म्हणजे बंगवासी  होय.

  • आमच्या धार्मिक प्रथा-परंपरामध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहे, असा आक्षेप बंगालमधील बंगवासी या साप्ताहिकाने घेतला.

  •  यामुळे बंगवासी साप्ताहिकाला भारतात सर्वप्रथम राजद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावे लागले.

 प्रश्न- लोकमान्य टिळकांना राजद्रोहाची शिक्षा झाली.    (सकारण स्पष्ट करा)    ३ गुण.

  • १५ जून १८९७  रोजी पुण्यातून प्रसिद्ध झालेल्या केसरीच्या अंकात ‘शिवाजीचे उदगार’ ही कविता प्रसिद्ध झाली.

  • या कवितेच्या अनुषंगाने लोकमान्य टिळकांनी काही अग्रलेख लिहिले.

  • यात ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’, ‘राजद्रोह कशाला म्हणतात’? या अग्रलेखांचा समावेश होता.

  •  सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करण्याच्या आरोपाखाली १२४ कलमान्वये राजद्रोही ठरवून शिक्षा झालेले लोकमान्य टिळक हे हिंदुस्थानातील पहिले संपादक होते. 

  • देशी भाषा वृत्तपत्र कायदा -        (टिपा लिहा)     २  गुण.

  • १४ मार्च १८७८  रोजी देशी भाषा वृत्तपत्र कायदा लागू झाला. या कायद्यान्वये हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारविषयी लेखनाद्वारे अप्रीती निर्माण करणारा तसेच लोकांमध्ये जात, वंश, धर्म यांच्या नावाखाली परस्परांविषयी द्वेष  पसरवणारे लेखन करणे आणि छापणे अशा असा गुन्हा याविरोधात उपाययोजना केली.

  •  या कायद्याच्या विरोधात कोलकाता येथे देशभक्त पत्रकारांची एक परिषद भरवण्यात आली.

  •  देशी संपादकांची अशी परिषद घेऊन सरकारच्या जुलमी कायद्याला विरोध करण्याची कल्पना दोन मराठी माणसांची होती.

  • गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ही परिषद आयोजित करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. 

  • वरील कायद्याच्या अंतर्गत इंग्रज सरकारने मराठी भाषेतील २१० पुस्तके जप्त केली होती.

  •  महाराष्ट्रात लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, गणेश दामोदर सावरकर यांच्याविरुद्ध खटले चालवण्यात आले. 

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांचे १८५७  चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक आक्षिप्त  (जप्त झालेल्या) साहित्यात होते.

  •  भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी--

  •  प्रश्न- भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतात स्थापन झालेल्या संघटना व त्यांचे उद्देश याविषयी आढावा घ्या.       (सविस्तर उत्तर लिहा.)    ५ गुण.

  • भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील १८५७ नंतरची निर्णायक घटना होती. व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय संघटना होती.

  •  राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतात विविध उद्देशांनी अनेक संघटनांची स्थापना करण्यात आली होती या संघटना पुढीलप्रमाणे----

  • १८८५ पूर्वी स्थापन झालेल्या संस्था  ---

  • १८३७  मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी ‘लँड होल्डर असोसिएशन’ ही संस्था जमीनदार वर्गाचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापन केली होती.

  •  इसवी सन १८३९  मध्ये विल्यम अडम यांनी भारतातील घटनांची माहिती इंग्लंडमधील लोकांना कळावी, म्हणून इंग्लंड येथे ब्रिटीश  इंडिया सोसायटीची स्थापना केली होती.

  • द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही जॉर्ज थोमप्सन  यांनी ‘बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी’ बंगाल प्रांतात स्थापन केली होती.

  • १८५१  मध्ये ‘लँड  फोल्डर्स असोसिएशन’ आणि ‘बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी’ या दोन्ही संस्था एकत्र करून ब्रिटीश इंडियन असोसिएशनची स्थापना करण्यात आली. 

  • या संस्थेने हरिश्‍चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवल्या.

  •  इंग्रजांच्या अन्याय धोरणाला विरोध करण्यासाठी ‘मद्रास नेटिव्ह असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली.

  • १८६६  दादाभाई नौरोजी यांनी उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ ही संस्था लंडन येथे सुरू करुन जागृतीचे प्रयत्न केले. 

  • बंगालमधील ‘इंडिया लीग’ या संस्थेचे काम १८७५ सालापासून सुरू होते. 

  • पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी १८७३ मध्ये ‘इंडियन असोसिएशन’ ही  संस्था स्थापन केली.

  • सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी समान राजकीय हितसंबंधाच्या व आशाआकांक्षांच्या जाणिवाद्वारे भारतातील भिन्नवंशीय व भिन्न जातीच्या लोकांची एकी घडवून आणण्यासाठी ही संस्था प्रयत्न करेल, असे सांगितले.

  •  याच संस्थेने १८८३  मध्ये कोलकाता येथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली.

  • १८८४  मध्ये स्थापन झालेली ‘मद्रास महाजन सभा’ ही एक महत्त्वाची संघटना होती.

  •  या सुमारास मुंबईत इंग्रजी विद्येचे आणि नवसुधारणांचे वारे वाहू लागले. 

  • जानेवारी १८८५ मध्ये न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग, फिरोजशहा मेहता इत्यादींनी ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली.

  • भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना-------------

प्रश्न - भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाची माहिती लिहा.    (सविस्तर उत्तरे लिहा.)

मुद्दे-   अ. स्थापना व पहिले अधिवेशन       ब. हजर प्रतिनिधी    क.पहिल्या अधिवेशनात संमत झालेले ठराव.   ५  गुण.

अ. स्थापना व पहिले अधिवेशन----

  •  २८ डिसेंबर १८८५  रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (राष्ट्रीय सभा) स्थापना झाली.

  • मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले. 

  • व्योमेशचंद्र बॅनर्जी’ हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 

  • ऑक्टोव्हियन क्युम या ब्रिटिश अधिकाऱ्याने राष्ट्रसभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता.

ब. हजार प्रतिनिधी----

  • राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात देशभरातून ७२ प्रतिनिधी उपस्थित होते. 

  • व्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशहा मेहता,दादाभाई नौरोजी, रहिमतुल्ला सयानी, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळ कृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी या अधिवेशनामध्ये सहभागी झाली होती.

क. पहिल्या अधिवेशनात संमत झालेले ठराव----

  • राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात एकूण नऊ ठराव संमत करण्यात आले.

  • इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमावा. 

  • मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात  लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या वाढवावी.

  • प्रशासकीय सेवांमध्ये भारतीयांना संधी द्यावी.

  •  सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात. 

  • लष्करी खर्च वाढवू नये. 

  • उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा. 

  • तांत्रिक शिक्षणाची सोय करावी. इत्यादी मागण्या करण्यात आल्या होत्या.

  •  मवाळ - जहाल विचारसरणी----------

 प्रश्न - मवाळवादी व जहालवादी विचारसरणीतील फरक स्पष्ट करा.       (सविस्तर उत्तर लिहा).     ५  गुण.    किंवा

  •  जहाल विचारसरणी.       टिपा लिहा.     २ गुण. 

  • मवाळ विचारसरणी.        टिपा लिहा.    २  गुण.

  • राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर थोड्याच काळात राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांमध्ये जहाल व मवाळ असे दोन गट पडले. या दोन गटांच्या विचारसरणीत फरक होता. तो पुढीलप्रमाणे---

 जहाल विचारसरणी -

  • स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहाल गटाचे विचारसरणी होती.

  • जहालांचे नेते लोकमान्य टिळक म्हणत,हे  घरच माझे नाही, अगोदर ते ताब्यात घेऊ या, मग आपण  हव्या त्या सुधारणा करू या.

  •  अर्ज, विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बदलणार नाही, असे लोकमान्य टिळकांच्या गटाचे ठाम मत होते.

  • त्यासाठी स्वदेशी, बहिष्कार अशी आंदोलने केली पाहिजेत,असे जहाल गटाचे मत होते.

मवाळ विचारसरणी--

  • थोर समाजसुधारक याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे,अशी मवाळ गटाची विचारसरणी होती. 

  • समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यास हरकत नाही,असे मवाळ यांना वाटत होते.

  •  गोपाळ गणेश आगरकर हे मवाळवादी सुधारकांचे अग्रणी होते. 

  •  सरकारकडे आपली गाऱ्हाणी साधार पटवून दिल्यास सरकार आपल्याला निराश करणार नाही, असे मवाळ गटाला प्रामाणिकपणे वाटत होते. 

  • राष्ट्रीय सभेत फूट--- 

प्रश्न- राष्ट्रीय सभेत फूट पडली.      (सकारण स्पष्ट करा)       ३गुण.

  • राष्ट्रीय सभेतील जहाल  व मवाळ यांच्यातील मतभेद १९०७  सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात विकोपाला गेले.

  •  स्वदेशी व बहिष्कार  हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता.

  •  तो यशस्वी  होऊ नये,अशी जहाल गटाची खटपट होती.

  • अर्ज, विनंत्या, भाषणे या मार्गाने भारत सरकार ऐकणार नाही, त्यासाठी स्वदेशी, बहिष्कार अशी जनआंदोलन उभे केले पाहिजेत, असे  मत जहाल गटाचे होते. 

  • यामुळे अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला. तडजोड अशक्य झाली, अखेरीस राष्ट्रीय सभेत फुट पडली.

  •  सरकारची दडपशाही---

  • राष्ट्रीय सभा दुभंगल्याचा  फायदा घेऊन लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या  फाळणीची योजना तयार केली.

  •  बंगालच्या फाळणीनंतर सरकारने  जहाल  नेत्यांविरुद्ध कडक  कारवाई केली.

  • टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना ६  वर्ष मंडालेच्या तुरुंगात पाठवले.

  • बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली.

  • लाला लजपतराय यांना हद्दपार करण्यात आले.

  • १९१६ मध्ये लखनऊ अधिवेशनात जहाल व मवाळ पुन्हा एकत्र आले.

  • प्रतियोगी सहकारिता -        (टिपा लिहा)     २ गुण.

  • पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात ठेवून सुटून आले होते.

  • ब्रिटिश साम्राज्य युद्धाच्या अडचणीत सापडले आहे, तेव्हा आपण स्वराज्याच्या दृष्टीने फायदा उठवला पाहिजे, असा काहीसा विचार  लोकमान्य टिळकांनी मांडला होता.

  • मुंबईचा गव्हर्नर विलिंग्डन याने वित्त सहाय्य मिळविण्यासाठी नेत्यांची  सहभाग बोलावली.

  • तेव्हा स्वराज्य द्यायचे कबूल करत असाल,तर  युद्धात सैनिक पुरवू, असे लोकमान्य टिळकांनी स्पष्ट सांगितले. 

  • गव्हर्नरने विरोध करताच लोकमान्य टिळक कोणाचीही पर्वा न करता तेथून तडक निघून गेले.

  • हेच धोरण  प्रतियोगी सहकारिता म्हणून ओळखले जाते.

  •  सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे----

 प्रश्न- सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे याविषयी माहिती माहिती लिहा.    ५ गुण.

       मुद्दे-      अ.  क्रांतीकारकांचे उद्दिष्ट          ब.  प्रारंभीच्या घटना.                क. क्रांतिकारी संघटना, क्रांतिकारक व त्यांचे कार्य.

अ.  क्रांतिकारकांचे उद्दिष्ट---

  1. शासनयंत्रणा खिळखिळी करणे.

  2. सरकारचा लोकांना  वाटणारा दरारा नाहीसा करणे. 

  3. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने उद्दिष्ट साध्य करणे.

ब.  प्रारंभीच्या घटना-------

  1. पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले.

  2. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केला.

  3. पुण्यात प्लेगचा बंदोबस्त करतांना कमिशनर रँड यांनी जुलुम जबरदस्ती केली. 

  4. त्याची चीड येऊन दामोदर आणि बाळकृष्ण या चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली.

क.  क्रांतिकारी संघटना, संस्थापक, सहभागी क्रांतिकारक व त्यांचे कार्य-------------  

  • अभिनव भारत --

प्रश्न-  स्वातंत्र्यवीर सावरकरांना सश्रम पन्नास वर्षांची कारावासाची शिक्षा झाली.  (सकारण स्पष्ट करा.)     ३ गुण.

  • १८९९  मध्ये गणेश दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने नासिक येथे ‘मित्रमेळा’ या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना केली.

  • १९०४  मध्ये मित्रमेळा संघटनेला ‘अभिनव भारत’ असे नाव देण्यात आले.

  • १८९९  मध्ये राष्ट्रभक्तसमूह या गुप्त मंडळाची स्थापना झाली.  (पुढे १/१/१९००  या   ‘मित्रमेळा’ नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन झाली.)

  • दामोदर सावरकर हे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी अभिनव भारत संघटनेसाठी इंग्लंडहून क्रांतिकारी वान्ग्द्मय , पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवले.

  • स्वातंत्र्यवीर  वि.दा. सावरकर यांनी  जोसेफ मॅझिनी या इटालियन  क्रांतीकारकाचे चरित्र लिहिले.

  • ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’  हा ग्रंथ लिहिला. 

  • अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा सरकारला लागला. सरकारने गणेश दामोदर सावरकर यांना अटक केली.

  • जॅक्सन  या इंग्रज न्यायाधिशाने गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा  लावली सुनावली.

  •  या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे  या युवकाने नासिक येथे न्याय दंडाधिकारी जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या केली.

  •  जॅक्सनच्या हत्त्येचा संबंध सरकारने  विनायक दामोदर सावरकर  यांच्याशी जोडला.

  • सावरकरांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. 

  • न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

  • अंदमान येथे रवाना केले.

  • अनुशीलन समिती-----------

 प्रश्न-   खुदीराम बॉस यांना फाशी देण्यात आले.     (सकारण स्पष्ट करा.)   ३ गुण.

  • बंगालमध्ये ‘अनुशीलन समिती’ ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती.

  • अरविंद घोष व त्यांचे बंधू बारीन्द्रकुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते.

  • कोलकत्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.

  •  ते १९०८  खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्याने किंग्जफोर्ड या जुलमी न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. 

  • त्यांनी ज्या गाडीवर बॉम्ब टाकला, ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील  दोन इंग्लिश  स्रीया मृत्युमुखी पडल्या. 

  • प्रफ़ुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. तर खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी  देण्यात आले.

  • इंडिया हाऊस------

प्रश्न-   भारताबाहेरील भारतीय क्रांतीकारकांची माहिती लिहा.   (सविस्तर उत्तरे लिहा)      ५ गुण.

मुद्दे--   अ. श्यामजी  कृष्ण वर्मा       ब. मादाम कामा.     क. मदनलाल धिंग्रा.

  • शामजी कृष्ण वर्मा---

  •  श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ची स्थापना केली.

  • या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती  दिली जात.

  •  स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अनेक क्रांतिकारकांनी इंडिया हाऊसचाच आश्रय घेतला. भारतातील क्रांतिकार्याला साहाय्य करणारे इंडिया  हाऊस केंद्र बनले.

  • मादाम कामा-- 

  • मादम कामा या  इंडिया हाऊस या गटातील एक समाजवादी क्रांतिकारक होत्या. 

  • जर्मन स्टूटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. 

  • याच परिषदेत मादाम कामा यांनी क्रांतिकारकांच्या कल्पनेचे भारताचा ध्वज फडकावला होता.

  • मदनलाल धिंग्रा-------

  • पंजाबमधील मदनलाल धिंग्रा हे  इंग्लंड येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले होते. 

  • तेथे ते  क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आले आणि ते आधुनिक भारताचे सदस्य झाले. 

  • मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. 

  • कारण हा अधिकारी सावरकर यांच्या मागावर होता. त्याबद्दल  मदनलाल धिंग्रा यांना फाशी  देण्यात आले.

  • गदर----

  •  गदर चळवळ---     (टीप लिहा)      २ गुण.

  • अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केलेली  होती.

  •  लाला हरदयाळ,  भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते.

  •  गदर म्हणजे विद्रोह.

  •  ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा या संघटनेचा उद्देश होता. 

  • गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. 

  • राष्ट्रप्रेम व क्रांती यांचा संदेश या मुखपत्राने  भारतीयांना दिला. 

  • या कार्यात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा गदर या संघटनेच्या राष्ट्रप्रेम व क्रांतीचा संदेश देण्याच्या कार्यात विशेष सहभाग होता.

  • काकोरी कट-----      (टिपा लिहा)       २   गुण.

  • अश्फाक उल्लाखान, रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग, राजेंद्र लाहिरी या क्रांतिकारकांनी क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना, काकोरी या उत्तर प्रदेशातील स्टेशनजवळ लुटला. ‘काकोरी कट’ असे म्हटले जाते.

  • काकोरी कटात अश्फाक उल्लाखान, रामप्रसाद बिस्मिल,रोशनसिंग, राजेंद्र लाहिरी हे क्रांतिकारक सहभागी होते.

  • सरकारने तात्काळ कारवाई करून क्रांतीकारकांना अटकेत टाकले.त्यांच्यावर खटले चालवण्यात आले व त्यांना फाशी देण्यात आले.

  • मीरत खटला व कानपूर खटला -      (टिप लिहा)       २ गुण.

  • भारतात कार्ल मार्क्सचे विचार अनुसरणारा तरूणांचा साम्यवादी पक्ष स्थापन करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते.

  • या विचारसरणीच्या तरुणांवर सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नावरून खटले चालवण्यात आले.

  • यासंदर्भात मीरत खटला आणि कानपूर खटला खटला दाखल विशेष म्हणजे गाजले.

  • या खटल्यांमध्ये काॅंग्रेस श्रीपाद. अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीळकंठ. जोगळेकर यांचा समावेश होता.

  • हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन -    (टिपा लिहा)   २ गुण.

  • १९२८ मध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी विचारसरणीच्या क्रांतीकारकांनी दिल्ली येथे ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना केली.

  • क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इ.तरुण क्रांतिकारकांचा या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार होता.

  • भारताला ब्रिटीशांच्या शोषणातून मुक्त करणे,हे त्या संघटनेचे उद्दिष्ट होते.

  • शेतकरी, कामगारांचे शोषण करणारी अन्याय्यव्यवस्था त्यांना उलथून टाकायची होती.

  • शस्त्र गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे याकामांसाठी या संघटनेचा हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र विभाग होता.त्याचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे होते.

  • या संघटनेच्या सदस्यांनी अनेक धाडसी कृत्ये केली.

  • भगतसिंग राजगुरू यांनी साॅंडर्स या अधिकाऱ्यांला धडा शिकवला.कारण लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता.

  • नागरी हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली.

  • त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळात बाॅम्बस्फोट केला व ते पोलिसांच्या स्वाधीन झाले.

  • राजद्रोहाच्या आरोपाखाली भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना १९३१ मध्ये लाहोर येथे फाशी देण्यात आले.

  • चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी संघर्ष केला.या संघर्षात त्यांनी हौतात्म्य पत्करले.

  • चितगाव उठाव/ कट----

  •  प्रश्न- चितगाव (उठाव) कटाची सविस्तर माहिती लिहा.        ३ गुण.

प्रश्न - सूर्यसेन व त्यांच्या १२  सहकार्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.                                     (सकारण स्पष्ट करा)      ३ गुण.

  • सुर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतीगटाचे प्रमुख होते.

  • चितगाव येथील शस्त्रागार हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली. येथील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली.

  •  चळवळ भरात असतांनाच सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले.

  • सूर्यसेन  व त्यांच्या १२ सहकाऱ्याना फाशीची शिक्षा देण्यात आली.

  • चितगाव कटातील कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली.

  • चितगाव कटातील प्रीतीलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली.

  • शांती घोष व सूनिती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीश चार्लस् बकलड यांना ठार केले.या दोघींनाही पकडण्यात आले.

  • बिना दास यांनी  (भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सभासद) कोलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात स्टॅनले जक्सन या गव्हर्नरवर गोळ्या झाडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या अपयशी ठरल्या.त्यांना ९ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागला.

  • अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये क्रांतिकारक चळवळीने  महत्त्वाचे योगदान दिले आहे.

  •  क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले. त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती, त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तिदायी ठरते आहे.

  • महात्मा गांधीजींची नि:शस्त्र प्रतिकार चळवळ -

  • दक्षिण आफ्रिकेतील कार्य - 

  • लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर १९२०  मध्ये राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींच्या नेतृत्वशैली व लढ्याच्या अभिनव तंत्राने राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली.

  •  गांधीजींच्या कार्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवात झाली. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सरकारविरुद्ध संघर्ष केला.

  • कारण दक्षिण आफ्रिकेत सरकारने कृष्णवर्णीयांना व तेथील भारतीयांना ब्रिटिश सरकार तुच्छ समजत असे.

  •  त्यांच्यावर जाचक निर्बंध लादले होते.दक्षिण आफ्रिकेतून  गांधीजी भारतात परत आले.

चंपारण्य सत्याग्रह-- टिपा लिहा.२  गुण.

  • बिहारमधील चंपारण्य भागात  ब्रिटिश मळेवाले शेतकऱ्यावर निळीच्या लागवडीची सक्ती करीत असत.

  • ब्रिटिश  मळेवाले शेतकऱ्यांनी तयार  केलेली निळ कमी किमतीत विकत घेत.

  •  या शोषणाविरुद्ध गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य येथे १९१७ मध्ये सत्याग्रह केला.

  • तेव्हा सरकारने नीळ  लागवडीची सक्ती बंद केली.

  • मळेवाल्यांच्या जुलूमातून शेतकऱ्यांची मुक्तता झाली.

  • रौलेट कायदा - 

प्रश्न-  रौलेट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला.   (सकारण स्पष्ट करा)     ३ गुण.

  • देशामध्ये वाढत चाललेल्या राष्ट्रीय आंदोलनाला आळा घालण्यासाठी सरकारने न्यायाधीश सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.

  • या समितीच्या शिफारशीनुसार  १९१९ रौलेट कायदा अंमलात आला.

  • या कायद्यानुसार कोणाही भारतीयाला विनावॉरंट तुरुंगात पाठवणे, विनाचौकशी खटला दाखल करणे, इत्यादी अधिकार सरकारला  मिळाले. 

  • म्हणून  रोलेट कायद्याला  भारतीय जनतेने विरोध केला. 

  • शेवटी या कायद्याच्या निषेधार्थ ६ एप्रिल १९१९  रोजी देशभर  हरताळ पाळला  गेला. 

  • जालियनवाला बाग हत्याकांड-----     (टिपा लिहा)    २  गुण.     किंवा

प्रश्न - रवींद्रनाथ टागोरांनी ‘सर’ या पदवीचा त्याग केला.  (सकारण स्पष्ट करा)  ३ गुण.

  • रौलेट कायद्याविरोधी सत्याग्रह  लढ्याने  पंजाबमध्ये प्रखर स्वरूप धारण केले.

  • १३ एप्रिल १९१९  रोजी बैसाखी निमित्त अमृतसरमधील जालियनवाला बाग मैदानात सभेचे आयोजन केले होते.

  • सभाबंदीच्या आदेशाची कल्पना नसणारे हजारो लोक सभेसाठी जमले होते.

  • जनरल डायरने लोकांना पूर्वसूचना न देता जमावावर भीषण गोळीबार केला. 

  • शेकडो लोक मारले गेले. हजारो जखमी झाले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे सार्‍या देशभर संतापाची लाट उसळली. 

  • रवींद्रनाथ टागोर यांनी हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या ‘सर’ या  पदवीचा त्याग केला. 

  • जालियनवाला बाग हत्याकांडाने  उभा देश हादरून गेला.

  • त्या भयकारी दृश्याचे वर्णन कुसुमाग्रजांनी आपल्या ‘जालियनवाला बाग’ या कवितेत केले आहे.

  • नागपूर अधिवेशन -

प्रश्न - असहकार चळवळीविषयी माहिती लिहा.       (सविस्तर उत्तर लिहा)      ५ गुण.

 मुद्दे -      अ. कार्यक्रम          ब.  सहभागी नेते          क. आंदोलनातील घटना. 

  • १९२० नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला. 

  • असहकार आंदोलनाची सर्व सूत्रे महात्मा गांधींकडे सोपवली. गांधीजींनी असहकाराचा कार्यक्रम जाहीर केला.

  • कार्यक्रम -

 असहकार  कार्य शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार.

 सरकारी विधिमंडळे न्यायालय सरकारी कर्मचाऱ्यांवर बहिष्कार.परकीय मालावर बहिष्कार घालणे.

  • सहभागी नेते -

  • असहकार आंदोलनाला  देशभरातून प्रचंड प्रतिसाद  मिळाला. विद्यार्थी मोठ्या संख्येने  सहकार चळवळीत सामील झाले. 

  • चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, एम.आर.जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल, राजगोपाल अशा अनेक प्रथितयश वकिलांनी वकिली  व्यवसायाचा त्याग करून चळवळीत सहभाग घेतला.

  •  आंदोलनातील घटना /  असहकार चळवळ: 

  • चळवळीत विद्यार्थी, शेतकरी, कामगार,वकील समाजातील सर्व घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

  • देशभरात परदेशी मालाच्या होळ्या केल्या. १९२१  साली देशभरात ३९६ संप झाले.

  • स्वराज्य आणि स्वदेशी यांचे प्रतीक बनलेला चरखा घरोघरी पोहोचवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

  • कायदेभंग सत्याग्रह -

  • प्रश्न -   ६  एप्रिल १९३० गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह केला.         (सकारण स्पष्ट करा)       ३ गुण.

  • ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादला.

  •  हा अन्यायकारक कर बंद करावा व मीठ  बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी, अशी मागणी गांधीजीने सरकारकडे केली.

  •  मिठासारख्या  जीवनावश्यक वस्तूवर लावलेला कर बंद व्हावा, म्हणून गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. 

  • गांधीजींनी १२  मार्च  १९३० रोजी साबरमती आश्रमातून गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी याठिकाणी पदयात्रा नेली.

  •  ६  एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचले आणि सर्व जनतेच्या साक्षीने समुद्रकिनाऱ्यावर  मीठ उचलून मिठाच्या कायद्याचा भंग केला.

  • आझाद हिंद सेना -      (टिपा लिहा)      २ गुण.

  • दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटीशांच्या पाड्यातील प्रदेश भारत गॅस सैनिक पकडले होते त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.

  • इंग्लंडने दुसऱ्या  महायुद्धात जर्मनीच्याविरुद्ध भाग घेतला  आणि युद्धात उतरल्याचे परस्पर जाहीर केले.

  • गांधीजी व काँग्रेस (राष्ट्रीय सभा) यांच्या या निर्णयाला विरोध होता.

  •  या युद्धात जपान जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरला.

  •  जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले.  

  • हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. सुभाषचंद्र बोस  यांनी १९४३ मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची  स्थापना केली. 

  • १९४३  च्या अखेरीस आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ताब्यात  घेतली. 

  • “तुम मुझे खून दो‌‍‍ | मैं तुम्हे आजादी दूंगा || ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी लोकप्रिय केली. 

  • आराकानचा प्रदेश तसेच त्यांच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकून घेतली. परंतु त्यांची इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली.

  • अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले.

  • १९४२  चे भारत छोडो आंदोलन------

 प्रश्न--  चले जाव आंदोलनाची माहिती लिहा.    (सविस्तर उत्तर लिहा)    ५  गुण.

 मुद्दे-    अ. मुंबई अधिवेशन     ब. गांधीजींचे आवाहन    क. चळवळ व परिणाम.

  • ८ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रीय सभेने ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’ चा आदेश दिल्यावर भारतभर जी चळवळ सुरू झाली, तिला ‘चलेजाव’ चळवळ असे म्हणतात.

अ. मुंबई अधिवेशन - 

  •  राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे ‘ब्रिटिशांनी भारत सोडून जावे’ हा ठराव मंजूर केला.

  •  त्या ठरावावर ७ ऑगस्ट १९४२  रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले.

  •  राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने संमत केलेला ‘ब्रिटिशांनो भारत सोडून जा’ हा ठराव मुंबई अधिवेशनात मांडला गेला.

  • ८  ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला ‘छोडो भारत’ ठराव एकमताने मंजूर झाला.

  • गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी हिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ब. गांधीजींचे आवाहन--_

  • महात्मा गांधीजींनी जनतेला आवाहन केले की, हे आंदोलन राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे.

  •  प्रत्येक स्त्री-पुरुषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत,असे समजावे आणि लढ्यासाठी सिद्ध व्हावे.

  •  हा निकराचा लढा आहे हे सांगताना ८ ऑगस्ट १९४२ च्या  अधिवेशनात महात्मा गांधीजीनी जनतेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र दिला आणि ही आपली प्रतिज्ञा असली पाहिजे, असे आवाहनही केले.या प्रतिज्ञेसाठी बलिदानाची तयारी ठेवा, असेही सांगितले.

क. चळवळ व परिणाम आंदोलनातील घटना_------

  • म. गांधीजींनी केलेल्या आवाहनाने देशात नवे चैतन्य निर्माण झाले.

  • आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने ९  ऑगस्ट हा दिवस उजाडण्यापूर्वी गांधीजी,मौलाना आजाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख नेत्यांना अटक केली.

  • सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शने यावर बंदी घातली. महाराष्ट्रातील चिमूर, आष्टी,यावली, महाड, गारगोटी अशा अनेक गावातून जनतेने लढे दिले.

ड. भूमिगत चळवळ---

प्रश्न--1942 ला  सुरू झालेल्या भूमिका चळवळीची माहिती लिहा.   (सविस्तर उत्तर लिहा.)      ५ गुण.

  • ऑगस्ट १९४२  रोजी राष्ट्रीय सभेने मंजूर केलेल्या ‘छोडो भारत’  (चले जाव) ठरावामुळे आणि गांधीजींनी केलेल्या ‘करेंगे या मरेंगे’ आवाहनामुळे देशात नवे चैतन्य निर्माण झाले.

  •   १९४२  च्या अखेरीस या आंदोलनाला नवे वळण लागले. या काळातच भूमिगत चळवळीला सुरुवात झाली.

  •  आंदोलनाचे नेतृत्व भूमीगत झालेल्या तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले.

  •  या भूमिगत आंदोलनाच्या कार्यात जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, एस. एम.जोशी, ना.ग.गोरे इत्यादीबरोबरच अरुणा असफअली,उषा मेहता या महिलांचाही समावेश होता.

  • या काळात देशात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट स्थापन झाले.

  • कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांचा ‘आझाद दस्ता’  तर नागपूरच्या जनरल आवारी यांची लालसेना यांनी सरकारला सळो की पळो केले.

  •  मुंबईत विठ्ठल जव्हेरी व उषा मेहता यांनी आझाद रेडिओ प्रक्षेपण केंद्र स्थापन केले.

  • १९४२  मध्ये देशाच्या काही भागात ब्रिटिश शासनयंत्रणा उलथून पाडण्यात लोकांना यश आले.

  • बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात, उत्तर प्रदेशातील बलिया व आजमगडच्या भागात, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया जिल्ह्यात लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि तेथील राज्यकारभार आपल्या हाती घेऊन प्रतिसरकारची स्थापना केली.

  •  या भूमिगत चळवळीमुळे ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला.

  • प्रतिसरकारची स्थापना -        (टिपा लिहा)      २  गुण.

  • १९४२ साली सुरू झालेल्या ‘चलेजाव’ च्या काळात देशात विविध भागात भूमिगत चळवळ सुरू होऊन प्रतिसरकारे स्थापन झाली.

  •  बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यात, उत्तर प्रदेशातील बलिया वआजमगडच्या भागात, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया जिल्ह्यात लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि तेथील राज्यकारभार आपल्या हाती घेऊन प्रतिसरकारची स्थापना केली.

  • क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन केले.

  • आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी येथील ब्रिटिश शासन संपुष्टात आणले आणि जनतेचे सरकार स्थापन केले.

  • कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे इत्यादी कामे या सरकारतर्फे केले जातात.

  •  या सर्व चळवळीचा परिणाम भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला.

  • भारतीय स्वातंत्र्यलढ्याची अमेरिका सिंगापूर येथे दखल---

  • दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि तेथील ‘लाईफ’ या साप्ताहिकाने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी केली.

  •  भारतीय स्वातंत्र्य हा केवळ भारताचा प्रश्न नाही, तर तो मानवी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, असे निवेदन अल्बर्ट आईन्स्टाईन, लुई फिशर, विक्की, जॉन गुंटूर,पर्ल बक,एडगर स्नो  इत्यादींनी स्वतःच्या स्वाक्षरीनिशी काढले.

  •  सिंगापूर -

  •  “भारतीय स्वातंत्र्य आत्ताच, आता नाही तर कधीच नाही”, “भारत भारतवासियांचा” अशा घोषणांचे फलक घेऊन शोनान (म्हणजेच सिंगापूरमध्ये) हजारो भारतीयांनी एक विशाल मिरवणूक काढली.

  •  इंडियन इंडिपेन्डन्स लीगच्या नेतृत्वाखाली  मलायातील सर्व मोठ्या शहरात ब्रिटिशविरोधी निदर्शने झाली. 

  • मेदान व सुमात्रामध्ये म्हणजेच  (इंडोनेशिया) भव्य निदर्शने झाली.

  • इतिहासाचे साधन - मौखिक साधने :

  • १९४२  नंतरच्या काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता.

  • या काळात बंगालमध्ये क्रांतिकारकांनी राष्ट्रीय सरकार उभारले.

  • या सरकारच्या नेत्यांनी आपल्या अनुयायांसमोर एक आदर्श घालून दिला.

  •  अजय मुखर्जी जे स्वातंत्र्योत्तर काळात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले,त्यांनी ‘छोडो भारत’ या ग्रंथाचे कर्ते श्रीपाद केळकर यांना एक मुलाखत दिली.

  •  या मुलाखतीमधून आपणास राष्ट्रीय नेत्यांचे धीरोदात्त वर्तन, दुष्काळाची तीव्रता आणि त्यासंबंधीचे मौखिक पुरावे इतिहास समजून घेण्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे समजते.

  • मुलाखतीतील  त्यांचे पुढील वाक्य महत्त्वाचे आहे, ते म्हणजे दुष्काळाच्या काळात सतत नऊ महिने आम्ही सबंध दिवसात फक्त तीन छटाक भात  आणि थोडीशी डाळ खाऊन काढले.

  •  १ शेर म्हणजे. -०.९३३१०५

  • १६ छटाक--१ शेर

  • ४ छटाक-- पावशेर.

      याप्रमाणे तीन छटाक म्हणजे पावशेराहूनही  कमी.

  • स्वातंत्र्यप्राप्ती व संविधान निर्मिती--

  • छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर विरोध व्यक्त झाला.

  •  या सर्व घटनांमुळे यापुढे फार काळ भारतात आपली सत्ता टिकवता येणार नाही, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली.

  •  फेब्रुवारी १९४६ मध्ये मुंबई येथे नाविक  दलाने उठाव केला.

  •  भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असताना बॅरिस्टर महंमद अली जिना यांच्या मुस्लिम लीगने  स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला.

  •  याचा परिणाम देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या. त्याचे पर्यावसान भारताच्या फाळणीने होऊन ऑगस्ट १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली.

  •  स्वतंत्र भारताचे संविधान २६  जानेवारी  १९५० रोजी अमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

  • स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही ही मूल्य हा भारतीय संविधानाचा पाया आहे.

        -------------समाप्त --------




टिप्पण्या