इयत्ता ११ वी - प्रकरण ८ - मौर्यकालीन भारत

  प्रकरण- ८        मौर्यकालीन भारत

 प्रस्तावना- 

  • भारतात अस्तित्वात असलेल्या सोळा महाजनपदांचा इतिहास आपण बघितला. 

  • या महाजनपदांपैकी काशी, कोसल,अवंती आणि मगध यांच्यात महाजनपदांमधील संघर्षांमध्ये मगधची राजसत्ता प्रबळ होत गेली आणि मगधाचे साम्राज्य उदयाला आले.

  • पर्शियन आणि ग्रीकांच्या आक्रमणाचा परिणाम म्हणून भारतात प्रबळ साम्राज्याची आवश्यकता भासू लागली. 

  • तसे पाहिले तर इसवी सन पूर्व ६ व्या शतकापासूनच मगध साम्राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. 

  • या प्रक्रियेतूनच नंद साम्राज्य आकाराला आले. हेच भारतातील पहिले प्रबळ साम्राज्य होय.

  •   मगध साम्राज्याचा उदय-

प्रश्न- मगध हे बलवान महाजनपद होते.       (सकारण स्पष्ट करा)

  • प्राचीन भारताची महाजनपदे होती, त्यामध्ये मगत हे एक महत्त्वाचे राज्य होते. कारण-

             1.  मगध महाजनपदातील  जमीन सुपीक व समृद्ध होती. 

             2. बाराही महिने वाहणाऱ्या नद्यामुळे नौकानयनाची उत्कृष्ट सोय होती.

             ३. आर्थिक उत्कर्षासाठी व्यापारी बाजारपेठांची उपलब्धता होती.

                          इत्यादी कारणांमुळे मगध राज्य  बलवान होत  गेले.

  •   हर्यंक घराणे-

  • इसवी सन पूर्व ६ व्या शतकात  मगधावर हर्यंक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. महाभारतात हर्यंक  घराण्याचा उल्लेख येतो.

  •  हर्यंक  घराण्यातील बिंबीसार हा पहिला प्रसिद्ध राजा होता.

  • त्याचे वडील 'महापद्म' यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधची पहिली राजधानी स्थापन केली.

 प्रश्न- बिंबिसाराने मगध साम्राज्याचा पाया कसा रचला?      (थोडक्यात उत्तरे लिहा)

  •  स्वराज्याचा पाया बिंबिसाराने रचला.बिंबिसाराने शेजारचे अंग राज्य जिंकून घेतले. तसेच बिंबिसाराने  कोसल, लिच्छवी, विदेह आणि मद्र अशा अनेक राजघराण्यांशी वैवाहिक संबंध सोडून त्याच जोरावर आपले विस्तारवादी धोरण पुढे नेले.

  •  गिरीदुर्गच्या पायथ्याशी त्याने राजगृह ही नवी राजधानी स्थापन केली.

 प्रश्न- अजातशत्रूचा कारकिर्दीचे वर्णन करा.   ( थोडक्यात उत्तर लिहा)

  •  बिंबिसार या आपल्या पित्याची हत्या करून अजातशत्रू राज्यपदावर (गादीवर) आला.  त्याने आपल्या पित्याच्या विस्तारवादी धोरणाचा अवलंब करून मगधाचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारले. 

  • अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटलीग्राम छोटा दुर्ग बांधला.तो स्थानिक उत्पादनाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र बनले. 

  • पुढील काळात हेच पाटलीग्राम 'पाटलीपुत्र' या नावाने ओळखले जाऊ लागले. ते मौर्य साम्राज्याची राजधानी बनले. 

  • जनतेने अजातशत्रूला पदच्युत करून, त्याचा मंत्री असलेल्या  शिशुनागाची राजा म्हणून निवड केली.

  •  शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व ४३० ते ३६४ या काळात राज्य केले.

  • त्यानंतर महापद्मनंद यांनी मगधाची  गादी बळकावली आणि नंद वंशाची स्थापना केली.(नंद वंशाची स्थापना महापद्मनंद यांनी केली.)

  प्रश्न- महापद्मनंद यांची कामगिरी लिहा.

  •  महापद्मनंद ह्याने इसवी सन पूर्व ३६४ मध्ये मगधाची गादी बळकावली व नंद वंशाची स्थापना केली. 

  • त्याने मगध साम्राज्याचा विस्तार केला. त्याचे साम्राज्य दक्षिणेत म्हैसुरपर्यंत विस्तारित झाले. 

  • महापद्मनंद हा एक महान सम्राट होता. 

 प्रश्न-  नंद घराण्याने कोणती लोकोपयोगी कामे केली?

  •  इसवीसन पूर्व ३२१ मध्ये नंद घराण्याचा पाडाव  होण्याआधी कर पद्धतीला महत्त्व देऊन राज्याची आर्थिक दृष्ट्या भरभराट केली.

  •  साम्राज्य विस्ताराबरोबर राज्याची आर्थिक भरभराट होऊ लागली.

  •  या पैशांचा विनियोग नंद राज्यकर्त्यांनी कालवे बांधण्यासाठी व जलसिंचनासाठी केला. 

  • त्यामुळे शेतीच्या विकासाला सहाय्य झाले. जलमार्गाच्या विकासामुळे व्यापारवृद्धि झाली.

प्रश्न- मगध साम्राज्याचा उदय झाला.   (सकारण स्पष्ट करा)

  •  मगध राज्याचे राज्यकर्ते कर्तबगार असल्याने राज्यात राजकीय स्थैर्य होतं.

  • मगधाचा विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर बाबी देखील कारणीभूत होत्या.

  •  गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधाचे नियंत्रण होते. 

  • ‘अंग’ हे राज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आला आणि दूरवरच्या प्रदेशांशी  व्यापार वाढवण्यात मगधाला यश मिळाले.

  • मगधाला नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभले होते. विशेषत: भातशेतीसाठी उपयुक्त सुपीक जमिन लाभली होती. 

  • साम्राज्यविस्तारामुळे महसुलातदेखील भर पडली.

  •  राजकीय महत्त्वाकांक्षेच्या बरोबरीने धनधान्याची व व्यापाराची सुबत्ता ही मगध राज्यसत्तेच्या विकासासाठी आणि सत्तास्थापनेसाठी पोषक ठरली.

  •  अशाप्रकारे अनुकूल परिस्थितीमुळे मगध साम्राज्याचा उदय झाला.


  •  नंद आणि मौर्य साम्राज्य-

  •  पर्शियन आणि ग्रीकांच्या आक्रमणाचा परिणाम म्हणून भारतात प्रबळ साम्राज्याची आवश्यकता भासू लागली. 

  • इसवीसन पूर्व ६ व्या शतकापासूनच मगध साम्राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. 

  • या प्रक्रियेतूनच नंद साम्राज्य साकारले. हेच भारतातील पहिले साम्राज्य होय.

  • परिशिष्ट पर्व,महावंशवाटिका,पुराण ग्रंथ इत्यादींमधून तसेच  ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून नंद साम्राज्याविषयी माहिती मिळते.

  • ’क्युरीटस’ ग्रीक इतिहासकार म्हणतो, त्याप्रमाणे नंद साम्राज्याची स्थापना महापद्मनंद यांनी  केली.

  • ग्रीक इतिहासकार महापद्मनंद या राजाचा उल्लेख उग्रसेन म्हणून करतात. उग्रसेन म्हणजेच महापद्मनंद होय.

  •  या राजघराण्यात एकूण ९ राजे होऊन गेले. 

  • महापद्मनंद (उग्रसेन)  पांडूक, पांडूगती, भूतपाल, राष्ट्रपाल, गौवीशौनक, दशसिद्ध, कैवर्त आणि धनानंद. 

  • यापैकी महापदमानंद आणि धनानंद हे दोन सम्राट अधिक  ख्यातनाम होते. ‘महाबोधीवंश’ या ग्रंथातून या सम्राटांविषयी माहिती येते.नंदांचे साम्राज्य गोदावरी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले होते.

  • ‘नवनंदडेरा’  ही त्यांची दक्षिणेतील राजधानी. ‘नवनंदडेरा’  म्हणजेच  आजचे नांदेड असावे.

  • नंदांच्या रूपाने भारतातील पहिले साम्राज्य अस्तित्वात आले आणि भारताच्या राजकीय इतिहासाचा प्रारंभ झाला. 

  •  मौर्य साम्राज्य 

  • मौर्य साम्राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातील  पहिले सुसंघटित आणि सुनियंत्रित असे पहिलेच साम्राज्य होय.

  • या सत्तेकडून राजकीय व्यवस्थेमध्ये एकसुसूत्रता आणली गेली. 

  • चंद्रगुप्त मौर्याने मौर्य घराण्याची स्थापना केली. 

  • धार्मिक ग्रंथ व इतर साहित्य, कोरीव लेख, नाणी,शिल्पे इत्यादी साधनांच्या सहाय्याने या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थितीचा अभ्यास करता येतो.

  •   चंद्रगुप्त मौर्य-

 प्रश्न-  चंद्रगुप्त मौर्य हा भारताच्या इतिहासातील पहिला चक्रवर्ती सम्राट होय.

  • चंद्रगुप्त मौर्य याने नंदांचा पराभव केला व  मौर्य घराण्याची स्थापना केली.

  • चंद्रगुप्त मौर्य याला ‘महावंश’  या ग्रंथात  ‘तो जंबुद्वीपाचा म्हणजे भारत वर्षाचा सम्राट होता’ असे म्हटले आहे.  

  • इसवीसन पूर्व ३२१ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने मगध साम्राज्याची सूत्रे हाती घेतली.

  • त्याआधी मगधावर हर्यंक,नाग आणि नंद या घराण्यांनी मगधाचा साम्राज्य विस्तार केला असला तरी, कोणत्याही राज्यकर्त्याला चक्रवर्ती सम्राटाचा दर्जा लाभला नव्हता.

  • ज्या सार्वभौम राजाचा रथ चारी दिशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतो, तो सार्वभौम राजा चक्रवर्ती सम्राट समजला जातो.

  • ग्रीक राजा सेल्युकसचा पराभव केल्यानंतर त्याच्या सामर्थ्याला आव्हान देणारा कोणताही राजा भारतात शिल्लक राहिला नाही.

  • अन्य राजांनी त्याचे मांडलिकत्व पत्करले. त्याची अधिसत्ता संपूर्ण भारतावर होती.

  • चंद्रगुप्ताच्या सत्तेला नैतिक अधिष्ठान होते. तो प्रजाहितैषी राजा होता. 

     म्हणून  माझ्या मते, चंद्रगुप्त हा भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट होता.

 प्रश्न-  मौर्य  प्रशासनाला  सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते.   (सकारण स्पष्ट करा)

  •  चंद्रगुप्त मौर्य पराक्रमी राजा आणि अत्यंत कुशल शासनकर्ता होता.

  • कौटिल्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यकारभाराची सुनियंत्रित यंत्रणा उभी केली.

  • तत्कालीन आर्थिक स्थिती व मौर्य काळाच्या गरजा यातून मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते.

  •   चंद्रगुप्त मौर्याची कामगिरी  :  ( टीप लिहा)

 प्रश्न-चंद्रगुप्ताचे  ग्रीक राजा सेल्यूकसशी झालेले युद्ध अत्यंत महत्त्वाचे होते .  (सकारण स्पष्ट करा)

  • चंद्रगुप्ताने  ग्रीक राजा सेल्यूकस निकेटर याचा युद्धात पराभव केल्याने मौर्य साम्राज्याची सीमा वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचली. 

  • या युद्धानंतर झालेल्या समझोत्यामुळे चंद्रगुप्त मौर्याचे ग्रीकांशी संबंध मैत्रीपूर्ण झाले.

  • सेल्यूकसचा प्रतिनिधी म्हणून मेगॅस्थेनीस चंद्रगुप्ताच्या दरबारात राहिला होता.

  •  त्यामुळे वायव्येकडून परकीय आक्रमणाची शक्यता लोप पावली. 

  • परिणामी मौर्यांचे साम्राज्य वायव्येकडे हिंदुकुश, पूर्वेकडे बंगालचा उपसागर, पश्चिमेकडे गुजरात आणि उत्तरेला हिमालय ते दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत विस्तारले होते.

  • अशाप्रकारे चंद्रगुप्ताचे  ग्रीक राजा सेल्युकसशी झालेले युद्ध आणि त्यातील विचार अत्यंत महत्वाचा होता.

  •  मौर्य सम्राट बिंदुसार- 

  • इसवीसन पूर्व २९८ च्या सुमारास चंद्रगुप्ताचे निधन झाले. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार गादीवर आला.

  •  बिंदुसाराच्या कारकीर्दीत तक्षशीलेच्या  प्रजाजनांनी केलेले  बंड त्याने आपला पुत्र अशोक यास पाठवून शमवले. 

  • बिंदुसाराच्या कारकीर्दीत चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राहिले.

  •  इसवीसन पूर्व २७३ साली बिंदुसाराचा मृत्यू झाला.

  •  सम्राट अशोक-

प्रश्न- सम्राट अशोक यांच्या कारकीर्दीची माहिती लिहा.   ( सविस्तर उत्तर लिहा)

  • बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला.

  • सम्राट पदावर येण्याआधी अशोकाने तक्षशीलेच्या प्रजेचे बंड शमवले होते.

  • इसवीसन पूर्व २६८ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. 

  • त्यानी ‘देवानं  पियो पियदसी’  म्हणजे ‘देवांचा प्रिय प्रियदर्शी’ असा स्वतःचा उल्लेख त्याच्या अनेक शिलालेख आणि स्तंभलेखांतुन केलेला  आहे.

  • सुरूवातीला सम्राट अशोकाचे धोरण आपल्या पूर्वजांप्रमाणे दिग्विजयाचे आणि राज्यविस्ताराचे होते.

  • अशोकाने कलिंगवर आक्रमण करून ते जिंकून घेतले. अशोकाचा कलिंगवरील विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरला.

  •  या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली. अशोकाचा विजय झाला मात्र युद्धातील विनाश आणि मनुष्यहानीमुळे त्याचे हृदय परिवर्तन घडून आले.

  •  त्यांनी विस्तारवादी धोरणाचा त्याग केला. अहिंसाप्रधान, शांतीवादी बौद्ध धर्माकडे त्याचे मन वेधले गेले. 

  • विजयाची जागा (धम्मविजय) धर्मविजयाने घेतली. धर्माचा स्वीकार केला आणि धर्मप्रसारासाठी धर्ममात्रांची नेमणूक केली. 

  • मद्यपान बंदी तसेच नैतिक आचरणासंबंधीचे आदेश त्यांनी शिलालेख आणि  स्तंभलेखांच्या माध्यमातून  दिले. 

  • नैतिक तत्त्वांचे अधिष्ठान प्राप्त झालेला सदाचारसंपन्न व्यवहार म्हणजेच अशोकाचा धर्म होय.

  • धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी संघ बनवले आणि ते देशोदेशी रवाना केले. त्यामध्ये त्याचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांचाही समावेश होता.

  • पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद अशोकाने भरवली.

  • आपल्या कारकिर्दीत  त्यांनी ८४००० स्तूप बांधले. 

  • ‘सारनाथ’ येथील जगप्रसिद्ध स्तंभ त्यांनी बांधला. या स्तंभाच्या स्तंभशीर्षावर चार सिंहाची शिल्पाकृती आहे.

 प्रश्न- सम्राट अशोकाचे शिलालेख हे महत्त्वाचे  ऐतिहासिक साधन आहे.        (तुमचे मत नोंदवा.)


  •  सम्राट अशोकाच्या शिलालेखांमधून त्यांनी उल्लेख केलेल्या पश्चिमेकडील देशातील त्यांच्या समकालीन चार राज्यकर्त्यांची ओळख पटली आहे.

  • ब्राम्ही  लिपीतील त्यांच्या शिलालेखांचे वाचन जेम्स प्रिन्सेस या इतिहासकाराने १८३७ साली केले.

  • या शिलालेखांच्या वाचनातून मौर्य साम्राज्याची सीमा निश्चित करणे शक्य झाले.

  • बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते.

  • अशोकाने बौद्ध धर्म आपल्या राज्याच्या प्रजेवर लादण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. त्यातून त्यांची धर्मसहिष्णूता दिसून येते.

  • सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले  मौर्य राजे सक्षम नव्हते. त्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला.

 प्रश्न-सम्राट अशोकाच्या साम्राज्य समाविष्ट असलेले प्रदेश कोणते?

  •  वायव्येकडे हिंदुकुश पर्वतरांगांपर्यंत, पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत, पश्चिमेकडे गुजरातपर्यंत, उत्तरेला हिमालय पर्वतापर्यंत, दक्षिणेला कृष्ण नदीपर्यंत चा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट होता.

  • प्रश्न-  सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभालेख कोठे कोठे आहेत?

  •  शिलालेख डोंगरावर कोरलेले आदेशपत्र, तर आदेश लेखनाचा उद्देशाने उभारलेल्या स्तंभांना स्तंभलेख असे म्हणतात.

  • शिलालेख -वायव्य भारतात- शहाबाद गडी मनसरा व तक्षशिला.

  •  उत्तर भारतात- कोसली, बैराट, काशी.

  •  मध्यप्रदेशात- रुपनाथ.

  •  उडीसात- जौगड.

  •  गुजरात ( सौराष्ट्रात)- गिरनार.

  •   महाराष्ट्रात-  सोपारा.

  •  कर्नाटकात-  मस्की, कुपगल, सिद्धापूर, ब्रह्मगिरी.

  •  स्तंभालेख उत्तर भारतात-  तोप्रा, मिरत.

  •  नेपाळमध्ये-  निगलिवा, कपिलवस्तु.

  •  बिहारमध्ये-  रामपूर्वा, लौरिया नंदनगड, पाटलीपुत्र.

  •  मध्य प्रदेशामध्ये-  सांची.

  •  कर्नाटकामध्ये-  सन्नती. 

  •  मौर्य सम्राट बृहद्रथ-

  •  पुराणानुसार, सम्राट अशोकानंतर ६ राजे होऊन गेले, तर वायूपुराणानुसार ८ ते १० राजे होऊन गेले.

  • बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता.

  • इसवीसन पूर्व १८७ साली पुष्यमित्र शुंग या त्याच्या सेनापतीने त्याची हत्या केली आणि  मौर्य साम्राज्य संपुष्टात आले. त्यानंतर पुष्यमित्र सत्तेवर आला.

  •   राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि    समाजजीवन-

  •  राज्यव्यवस्था-

  •  मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचे स्वरूप कौटिल्याचे अर्थशास्त्र, मेगॅस्थेनीसचे इंडिका या दोन ग्रंथांमधून आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांवरून स्पष्ट होते.


 प्रश्न- मौर्य साम्राज्याचे पुढील मुद्द्यांच्या आधारे विवरण करा. (सविस्तर उत्तर लिहा)

 अ. राज्यव्यवस्था      ब. समाजव्यवस्था    क.आर्थिक जीवन   ड. साहित्य. 

अ.राज्यव्यवस्था-

  • मौर्य राज्यकर्त्यांनी त्यांच्या खंडप्राय साम्राज्याच्या प्रशासनासाठी सुनियंत्रित प्रशासन यंत्रणा स्थापन केली होती.

  • साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरणही करण्यात आले होते.

  • साम्राज्याच्या प्रशासनात राजाला सल्ला देण्यासाठी बुद्धिमान, अनुभवी, चारित्र्यवान आणि निस्वार्थी मंत्र्यांची परिषद स्थापन केलेली होती.

  • दैनंदिन राज्यकारभारासाठी त्यातील काही मंत्र्यांची समिती असे, त्या समितीस ‘मंत्रणा’ असे नाव होते.

  • प्रशासनाची विविध खाती निर्माण करून त्यावर अनुभवी व तज्ञ अधिकारी  नेमून स्थिर प्रशासन व्यवस्था निर्माण केली होती. 

  • प्रशासनाच्या १८ खात्यात विभागणी करून त्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

  •  मौर्य साम्राज्यातील अधिकारांच्या उतरंडीची रचना ‘सम्राट’ या पदापासून सुरू होऊन शेवटचा अधिकारी गाव पातळीवरील ‘ग्रामणी’ होता.

  • स्थानिक पातळीवरच्या राज्यकारभारात  स्वायत्तता देण्यात आली होती. मुलकी आणि लष्करी क्षेत्रे एकमेकांपासून स्वतंत्र होते. न्यायव्यवस्था स्वतंत्र होती.

  • राज्यातील व्यापारावर शासनकर्त्यांचे नियंत्रण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रजेच्या भौतिक आणि नैतिक प्रगतीसाठी शासन करते वचनबद्ध होते.

  •  समाजव्यवस्था -

  •  मौर्य काळात भारतात चातुर्वर्ण पद्धत दृढ झाली होती. 

  • व्यवसायावर आधारलेल्या भारतीय समाजाच्या सात वर्गांचे वर्णन मेगॅस्थेनीस करतो. त्यामध्ये पुरोहित शेतकरी, धनगर व शिकारी, व्यापारी व मजूर, सैनिक, हेर आणि सरकारी अधिकारी हे सात वर्ग होते.

  • मौर्यकालीन समाजाची नीतिमत्ता उच्च दर्जाची होती. लोकजीवन संपन्न व सुखी होते.

  • नट, नर्तक, गायक, वादक मनोरंजन करणारा वर्ग होता. रथांच्या, घोड्यांच्या शर्यती, मल्लयुद्ध तसेच नृत्य-गायन स्पर्धा हे करमणुकीचे लोकप्रिय प्रकार होते. द्यूत खेळणे प्रचलित होते, पण त्यावर सरकारी नियंत्रण होते. 

  • मौर्यकाळात तक्षशिला, काशी, अयोध्या ही उच्च विद्या व कला शिक्षणाची केंद्रे होती.

  • मात्र या काळात स्त्रियांच्या शिक्षणाची उपेक्षा सुरूच  राहिली. त्यांचे समाजात दुय्यम स्थान असले तरीदेखील, स्त्रियांचा  स्त्री-धनावर पूर्ण अधिकार होता.

  • अनाथ व दिव्यांग स्त्रियांची काळजी शासन घेत असे. अनेक स्त्रिया गुप्तचर यंत्रणेत काम करत. 

  •  आर्थिक जीवन / व्यापार

  •  आर्थिक जीवन सुख, शांती व समृद्धीचे होते. सुव्यवस्थित कर प्रणालीमुळे राज्याच्या महसुलात वाढ झाली होती.

  •  शेतजमीन व शेती उत्पादन यापासून मिळणारे उत्पन्न राज्य व्यवस्थेचा पाया होते.

  • या काळात व्यापार व उद्योगांनाही चालना मिळाली. कापड निर्मिती हा सर्वात महत्त्वाचा उद्योग होता. याशिवाय धातुकाम, लाकूडकाम, हस्तीदंत त्यावरील कलाकुसर, लोखंडी अवजार, मातीची रंगवलेली भांडी असे अन्य उद्योग होते.

  • भूमार्ग व जलमार्गाने देशांतर्गत व्यापार चाले.अनेक राजमार्ग आणि व्यापारी मार्ग या काळात निर्माण केले गेले.

  • किनारपट्टीवरील अनेक बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती.

  • भारताच्या किनारपट्टीवरील भरूच, रोरूक ( रोडी), सोपारा व ताम्रलिप्ति बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. 

  •  ग्रीस, रोम,इजिप्त,सीरिया, बॅक्टेरिया, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये भारतातून सुती व रेशमी कापड,क्षौम (लिनन), जरीची वस्त्रे, मसाले, हिरे, हस्तिदंत, सुगंधी द्रव्य,इत्यादीं निर्यात केले जात.

  • काच सामान, कापड रंगवण्याचे विविध रंग इत्यादींची आयात केली जाई. मालाच्या उत्पादनावर तसेच त्याच्या आयात-निर्यातीवर सरकार कर वसूल करत असे. 

  • साहित्य -
  • साहित्यामधून लोकांच्या विचारसरणीची आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीची माहिती मिळते.

  •  मौर्यकाळात संस्कृत भाषेबरोबरच पाली,अर्धमागधी या भाषांमध्ये ग्रंथनिर्मिती झाली. 

  • जैन व बौद्ध धर्म प्रसारासाठी प्राकृत भाषेत साहित्यनिर्मिती झाली. यामध्ये प्रामुख्याने पाली, अर्धमागधी, मागधी, शूरसेनी, महाराष्ट्री इत्यादी प्राकृत भाषांचा वापर केला गेला. 

  • पाणिनीचा ‘अष्टाध्यायी’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ मौर्यकाळात रचला गेला. 

  • संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार भास याने ‘स्वप्नवासवदत्त्तम’  यासह १३  नाटके लिहिली. 

  • या काळातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ होय.

  • कौटिल्याने अर्थशास्त्र हा ग्रंथ १५ विभागात लिहिला. 

  • कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात एकूण १८० प्रकरणे आहेत.

  • अर्थशास्त्रात राजापासून गणिकांपर्यंत आणि राजनीतिपासून युद्धनीतीपर्यंत अनेक विषयांची चर्चा केलेली आढळते.

  • मौर्यकाळात संस्कृतबरोबर प्राकृत भाषेत विपुल ग्रंथसंपदा निर्माण  झाली.

  • शिलालेख व स्तंभालेख  ब्राम्ही लिपीत कोरले गेले. बौद्ध साहित्यातील ‘तिपिटक’ या ग्रंथाचे संपादन या काळात झाले.

  • जैन साहित्यातील दशवैकालीक, उपासकदशांग, आचाररंगसूत्र, भगवतीसूत्र या ग्रंथांची निर्मिती  मौर्य कालखंडात झाली.  

  • हा काळ जैन साहित्याच्या दृष्टीने समृद्ध होता.

  •  कला आणि स्थापत्य -

  • मौर्य राज्याच्या स्थापनेनंतर देशात सुख,शांती,समृद्धी आणि सुव्यवस्था नांदू लागली होती.

  •  मौर्यकालीन कला म्हणजे प्राचीन ऐतिहासिक काळातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा प्रारंभ होय. 

  • मौर्यकालीन शिल्पकला आणि स्थापत्य.   (टिप लिहा)
  • प्राचीन भारतातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा प्रारंभ मौर्यकाळात झाला. 

  • दगड घडवणे आणि कोरणे यामध्ये मौर्यकालीन कारागिरांनी लक्षणीय नैपुण्य संपादन केले होते. 

  • दगड घडवल्यानंतर त्याला आरसी गुळगुळीतपणा आणण्याचे  ‘घोटाई’ हे तंत्र त्यांनी आत्मसात केले होते.

  •  या काळातील यक्ष व  यक्षिणी यांच्या मूर्ती सापडल्या आहेत.यक्षिणीच्या मूर्ती सुंदर आणि सुबक आहे.

  • दीदारगंज येथील प्रसिद्ध चौरीधारिणी मूर्तीचा समावेश त्यामध्ये केला जातो.

  • याकाळात घडवलेल्या पारखम येथील यक्षमूर्ती व बेस्टनगर आणि पाटणा येथे मिळालेल्या स्त्री प्रतिमा मथुरा वस्तूसंग्रहालयात प्रदर्शित केलेल्या आहेत.

  •  सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावर शिल्पाकृती मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे नमुने आहेत. 

  • रामपुर्वा आणि लौरिया नंदनगड  येथील स्तंभशीर्षावर सिंहाच्या शिल्पाकृती आहेत. 

  • सांकिशा येथील स्तंभशीर्षावर हत्तीची शिल्पाकृती आहे.

  • सारनाथ येथील  स्तंभशीर्षावर  चार  सिहांच्या शिल्पाकृती आहेत. 

  • चार सिंहांचे हे शिल्प भारताचे ‘राष्ट्रीय बोधचिन्ह’ आहे. 

  • मौर्यकाळाला बहुविध पैलु आहेत. त्यामुळे या काळाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

  •  सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर प्रशासनयंत्रणा कमकुवत होत गेली.त्यामुळे साम्राज्याचे तुकडे पडू लागले. 

  • मौर्योत्तरकाळात विघटित झालेल्या साम्राज्याचे पुन्हा संघटन करण्याचे काम शुंग आणि सातवाहन सत्तेखाली झाले. 

  • वैदिक धर्म, वर्णाश्रमव्यवस्था, व वैदिक  धर्मपरंपरेनुसार असलेली जीवन प्रणाली या सर्वांना पुन्हा महत्त्व आले.  

   

                          -------------------समाप्त------------------


टिप्पण्या