इयत्ता ११ वी - इतिहास - प्रकरण ६

      प्रकरण - ६  

भारतातील  दुसरे नागरीकरण



प्रास्ताविक - 

महाजनपदांचा उदय -

  प्रश्न-  सोळा महाजनपदांचा उदय झाला. (सकारण स्पष्ट करा) 

  •  महानिर्वाणसूत्रया  बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा, ९ गणराज्यांचा व काही टोळी राज्यांचा उल्लेख आलेला आहे. 

  • तसेच जैन ग्रंथ आणि पुराणांमध्येही सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो.

  • सप्तसिंधूच्या प्रदेशातून स्थलांतर केलेले वैदिक जन गंगा-यमुनेच्या दुआबात स्थिरावले. 

  • कालांतराने भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची प्रशासन यंत्रणा असलेली ‘जनपदे’ अस्तित्वात आले. 

  • याच जनपदांमध्ये पुढे भौगोलिक विस्ताराची महत्वाकांक्षा निर्माण होऊन संघर्ष झाले.

  •  या सत्तासंघर्षात  विजयी ठरलेल्या जनपदांनी जिंकून घेतलेल्या  जनपदांचा भूप्रदेश आपल्या जनपदात सामावून घेऊन आपल्या सीमा विस्तारल्या. 

  • त्यातूनच इ.स.पू. ६०० च्या दरम्यान  भारतीय उपखंडात सोळा महाजनपदांचा  उदय झाला.

  •    सोळा महाजनपदे -

  • बौद्ध ग्रंथांचा काळ महाजनपदांच्या अधिक निकटचा असल्यामुळे त्यात उल्लेख असणारी महाजनपदांची नावे अधिक ग्राह्य मानली जातात. 

  • काशी, कोसल,  मगध, अंग, चेदी, अवंती,  मल्ल, वृज्जी, कुरु, पांचाल, मत्स्य, वत्स, शूरसेन, अश्मक/ अस्सक, गांधारकंबोज इ. 

  • या सोळा महापदांपैकी अश्मक किंवा अस्सक महाजनपद हे नाव आजच्या महाराष्ट्राशी  निगडित आहे.

  • अश्मक महाजनपद -  (टिपा लिहा)

  • अश्मक हे महाजनपद ‘दक्षिणापथ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात म्हणजेच आजच्या महाराष्ट्रात होते. त्याची राजधानी पोटली (पोतन) ही होती.

  • अश्मक हा शब्द संस्कृत भाषेतील  आहे. अस्सक हे पाली भाषेतील नाव आहे. 

  • १६ महाजनपदांपैकी अश्मक हे एकच महाजनपद दक्षिणेकडे होते. इतर १५ महाजनपदे उत्तर भारतात होती. 

  • गौतम बुद्धांच्या काळात अस्सक राजाला ‘अंधकराजा’  म्हणून ओळखले जात होते.

  •  ‘सुत्तनिपात’  या ग्रंथांमध्ये दक्षिणपथाचे सविस्तर वर्णन आलेले आहे. 

  • त्यानुसार ‘दक्षिणापथ’ हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.

  • महागोविंद सूत्तांत या बौद्ध ग्रंथात अस्सक राज्याचा राजा ‘ब्रह्मदत्त’ हा होता आणि त्याच्या राजधानीचे नाव पोतन असे होते, असा उल्लेख आहे.

  •  पोतन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा होय, असे मानले जाते. पोतन या नगराची पोटली’,पौन्डेय ही नावे आढळतात.

  • अश्मक जनपदाला समकालीन असलेली विदर्भ, भोज, दंडक आणि कलिंग ही जनपदे दक्षिण पथकामध्ये समाविष्ट होती. 

  • विदर्भ, भोज आणि दंडक ही जनपदे प्राचीन महाराष्ट्राचा भाग होते.

  • जैन ग्रंथानुसार, पहिले तीर्थंकर ऋषभनाथ त्यांचा पुत्र ‘बाहुबली’ यांना अश्मक राज्य दिले होते आणि पोदनपूर ही त्याची राजधानी होती, असा उल्लेख आहे. 

  • बाहुबली यांना केवलज्ञान प्राप्त झाली होती.

  • पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’ या व्याकरण ग्रंथात ‘अवन्त्याश्मक’ असा उल्लेख आहे.याचा अर्थ अवंती आणि अश्मक राज्य एकमेकांलगत होते असा होतो.

  • अश्मक महाजनपद काहीकाळ काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावे,असे बौद्ध जातक-    कथांमधील उल्लेखांवरून अनुमान काढता येते.

  •  भारतातील दुसरे नागरीकरण -

 प्रश्न- भारतात दुसऱ्या नागरीकरणाची सुरुवात झाली. (सकारण स्पष्ट करा)

  • भारतात स्वतःची स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असणारी जनपदे निर्माण झाली. 

  • कालांतराने त्यांच्यात भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षा निर्माण होऊन  सत्तासंघर्ष सुरू झाला.

  •  या संघर्षातून भारतीय उपखंडात  १६ महाजनपदे अस्तित्वात आली. त्यांच्या राजधान्या आकाराला आल्या. अनेक नगरे विकसित झाले.

  •  या जनपदांच्या काळातील मातीची भांडी, अवजारे, नाणी सापडली आहेत. 

  • या महाजनपदांचा व्यापार वाढला. नगरांचे सांस्कृतिक संबंध वाढले. त्यातून  पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला. 

  • प्राचीन नागरी  हडप्पा  संस्कृतीप्रमाणे दुसऱ्या नागरीकरणाची सुरुवात  झाली. याला भारतातील दुसरे नागरीकरण असे म्हटले जाते.

  • नागरी संस्कृतीच्या निर्देशक मानल्या जाणाऱ्या बाबी : -

  1. मध्यवर्ती प्रशासनव्यवस्था राबवण्यासाठी नागरी केंद्रांचा विकास.

  2. नागरी केंद्रांच्या गरजा  पुरवणाऱ्या ग्राम वसाहतींचे जाळे (प्रभावक्षेत्र).

  3. ग्राम वसाहतींचे प्रशासन केंद्रवर्ती सत्तेशी संलग्न असणे.

  4. सुविहित कर प्रणाली.

  5. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांची असणारा व्यापार.

  6. व्यापारासाठी भूमार्ग आणि जलमार्ग यांचे सुव्यवस्थित जाळे.

  7. वस्तुविनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारी क्रय-विक्रय पद्धती.

  8. प्रस्थापित कायदे आणि न्यायव्यवस्था.  

             नागरीकरणाची ही सर्व वैशिष्ट्ये महाजनपदांच्या काळात अस्तित्वात होती.

  • महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे -

  • महाजनपद या संकल्पनेत फक्त विस्ताराने आणि लोकसंख्येने मोठी राज्य एवढाच अर्थ अभिप्रेत नसून,अशी राज्य प्रबळ करणारी समृद्ध नगरे व त्या नगरांचे प्रशासन चालविणारे महाजन यांचाही समावेश करावा लागतो. 

  • अशा राज्यकर्त्यांकडून व महाजनांकडून जैन व बौद्ध धर्माला या काळात प्रोत्साहन मिळाले. 

  • रामायण, महाभारतात काही महाजनपदांचा उल्लेख आलेला असला तरी, खऱ्या अर्थाने महाजनपदे बौद्ध काळातच पूर्णत्वास पोहोचली.

१. काशी  महाजनपद  --

प्रश्न -  काशी या महाजनपदाची वैशिष्ट्ये लिहा.

  • सुरवातीच्या काळात अधिक बलशाली असलेल्या या महाजनपदाची राजधानी वाराणसी होती.

  •  काशी महाजनपदाचे राजे महत्त्वाकांक्षी होते. त्यांना सर्व राज्यांमध्ये प्रमुख बनण्याची इच्छा होती, असे उल्लेख जातककथांमध्ये येतात.

  •  ‘महावग्ग’ या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलचा पराभव करून काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे. 

  • मात्र अखेरीस मगधचा राजा अजातशत्रु याने काशी राज्याचा पराभव करून काशी  मगधामध्ये विलीन केले. 

  • अजातशत्रू हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.

२. कोसल  महाजनपद --

प्रश्न -  कोसल या महाजनपदाची माहिती लिहा. 

  • भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशांमध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता.

  •  श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती. कोसल या महाजनपदाचा राजा प्रसेनजित (पसेनदी)  हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता.

  • मगधचा राजा अजातशत्रु याने कोसलचा पराभव करुन हे राज्य मगध महाजनपदात विलिन केले.

३. अंग  महाजनपद --

  • या महाजनपदाची राजधानी चंपा होती. 

  • ते सागरी व्यापाराचे केंद्र होते. 

  • बिंबिसारने अंग हे महाजनपद जिंकून मगध साम्राज्यात विलीन केले.

४. मगध  महाजनपद --

  •  बिहारच्या परिसरात गंगा व शोण नदीच्या खोऱ्यात मगध हे राज्य पसरले होते.  

  • मगध या महाजनपदाची सुरुवातीची राजधानी  गिरिव्रज किंवा राजगृह येथे होती.

  •  पाच टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरिव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते.

  • बिंबीसार या राजाच्या काळात मगधाचा राज्यविस्तार होण्यास सुरुवात झाली.

  • बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. 

  • बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता.

  •  बिंबिसरचा मुलगा अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली.

५. वृज्जी (वज्जी)महाजनपद - 

 प्रश्न-वृज्जी महाजनपदाविषयी माहिती लिहा. 

  •  वृज्जी हा ‘महाअठ्ठकुल’ म्हणजे  विदेह, लिच्छवी,  शाक्य, वज्जी, ज्ञात्रूक  अशा आठ कुळांचा समावेश होता. 

  • ‘वृज्जी’ या महाजनपदाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधलेले होते.

  •  या नगराला तीन प्रवेशद्वार व बुरुज होते. अजातशत्रूने  हे महाजनपद जिंकून मगधमध्ये विलीन केले.

६.  मल्ल महाजनपद - 

 प्रश्न - मल्ल महाजनपदाची थोडक्यात माहिती लिहा.

  • मल्ल या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कृषीनार/ कुशिनगर (कासिया) येथे होती. 

  • गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण  कुशिनार येथे झाले.

  •  उत्तर वैदिक काळात राजसत्ताक असलेले हे जनपद नंतर गणराज्य  झाले.

  •  या महाजनपदात ‘पावा’आणि ‘भोगनगर’ ही महत्वाची नगरे होती. 

  • जैन ग्रंथानुसार, अजातशत्रूशी लढण्यासाठी मल्ल, लिच्छवी,आणि काशी-कोसल या प्रदेशातील १८ गणराज्यांचा एकत्रित संघ तयार झाला होता.

  • इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात मल्ल महाजनपद  मौर्य साम्राज्यात विलीन झाले. 

 ७. चेदी महाजनपद - 

  •  चेदी महाजन पदांची माहिती लिहा.

  • आत्ताच्या बुंदेलखंड प्रदेशात चेदी  महाजनपदाचा विस्तार झालेला होता.  

  • शुक्तीमती / सोठ्ठीवती ही चेदी महाजनपदाची राजधानी  होती. 

  • उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात प्राचीन शुक्तीमती नगर वसलेले होते, असे मानले जाते.

 ८. वंश / वत्स महाजनपद -

  •  या महाजनपदाची राजस्थानी  कौशंबी (अलाहाबादजवळील कोसम) इथे होती.

  • पुराणांमधील उल्लेखानुसार, गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापुर उध्वस्त झाले.

  • यामुळे पांडवांचा वंशज निचक्षु याने त्याची राजधानी कौशांबी येथे हलवली.

  • कवी भास यांनी लिहिलेल्या ‘स्वप्नवासवदत्त’ या नाटकाचा नायक व सहा जनपदाचा राजा उदयन हा होता. उदयन बिंबीसार चा समकालीन होता.

९.  कुरु महाजनपद -

  • कुरु महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टन येथे होती.

  •  दिल्ली जवळचे इंद्रपत  येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते. 

  • जातक कथांमधील उल्लेखाच्या आधारे, इंद्रप्रस्थाचे राजे ‘युधीठ्ठील’ गोत्राचे होते.

 १०.  पांचाल महाजनपद - (टिपा लिहा)

  • या महाजन पदाचे उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल असे दोन भाग होते.

  •  भागीरथी नदी ही उत्तर व दक्षिण पांचाल यांची सीमारेषा होती.

  •  उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील अहिच्च्छत्र( रामनगर जवळ) उत्तर पांचाळची राजधानी होती.

  •  फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल्य (कंपिल) येथे दक्षिण पांचाल यांची राजधानी होती.

  • उत्तर पांचालच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनपदांमध्ये सतत लढाया होत असे.

  •  सुरुवातीला राजसत्ता असलेल्या पांचाल महाजनपदाचे रूपांतर संघराज्यमध्ये झाले. 

११.  मत्स्य महाजनपद -

  • या महाजनपदाची राजधानी विराटनगर होती. 

  • आजच्या राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे विराटनगर वसलेले होते.

  •  मत्स्य महाजनपद पुढे मगध साम्राज्यात विलीन झाले.

  •  बैराट येथे  सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत.

१२.  शूरसेन महाजनपद - 

  • हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेले होते. मथुरा हे त्याची राजधानी होती.

  • ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख शूरशेनाय’ आणि मथुरेचा उल्लेख  मेथोरा’असा केलेला आढळतो. 

  • कालांतराने हे महाजनपद  मगधमध्ये विलीन झाले.

१३.  अश्मक/ अस्सक 

  • या महाजनपदाची राजधानी  पोटली  होती. 

  • हे महाजनपद आत्ताच्या महाराष्ट्राशी निगडित आहे. 

  • हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे  मांडलिक राज्य असावे, असे दिसते.

  • १४ . अवंती महाजनपद - ( टिपा लिहा)

  • या महाजनपदाचा विस्तार मध्यप्रदेशातील माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश यामध्ये झालेला होता. 

  • अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे दोन भाग होते. 

  • उत्तर अवंतीची राजधानी  उज्जयनी (उज्जैन)आणि दक्षिण अवंतीची राजधानी महिष्मती (मांधाता,जिल्हा खंडवा) येथे होती. 

  • अवंतीचा राजा प्रद्योत गौतम बुद्धांचा समकालीन होता.

  •  इसवीसन पूर्व ४ थ्या शतकात अवंती महाजनपद मगध साम्राज्यमध्ये समाविष्ट झाले. 

१५.  गांधार  महाजनपद -

  • या महाजनपदाचा  विस्तार  काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशांमध्ये झालेला होता.

  •  तक्षशिला ही त्याची राजधानी होती.पुक्कुसाती/पुष्करसरीन हा गांधारचा राजा होता. त्यांनी बिम्बिसारशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. 

  • इसवी सनापूर्वी ६ व्या शतकाच्या उत्तरार्धात पर्शियन सम्राट दार्युश पहिल्याने गांधार महाजनपद जिंकून घेतले.

  •  इराणमध्ये बेहीस्तून येथील शिलालेखात गांधारीचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केला आहे.

१६.  कंबोज  महाजनपद-

प्रश्न - कंबोज महाजनपदाची वैशिष्टे सांगा.

  •  महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्यात गांधारीच्या जोडीने येतो. 

  • राजपुर (राजौरी) ही त्याची राजधानी होती. 

  • उत्तम घोडे आणि अश्वारुढ युद्धकौशल्य यासाठी कंबोजचे योद्धे प्रसिद्ध होते.

  • सिकंदराच्या आक्रमणाला त्यांनी प्रतिकार केला होता. सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये गंगोजी उल्लेख ‘अराज’ म्हणजे राजा नसलेले राज्य, असा केला आहे. याचा अर्थ कंबोज गणराज्य होते.

  • महाजनपदांमधील राज्यव्यवस्था,श्रेणीव्यवस्था : -

  • राज्यव्यवस्था -

प्रश्न - महाजनपदांमधील राज्यव्यवस्था पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

१. राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा  २. राज्याची निवड  ३. राज्याचे अधिकार ४.निर्णयप्रक्रिया.     

  • महाजनपदांमधील राज्यव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण  होती.

अ.  राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा

  • उत्तर वैदिक काळातील साहित्यात म्हणजेच जनपदांच्या काळातील राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या ‘राज्य, स्वाराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य,  पारमेष्ठ्य अशा संज्ञा वापरलेल्या आहेत. 

  • मात्र या संज्ञांचे अर्थ व राज्याचे स्वरूप निश्चितपणे सांगता येत नाही.

ब. राजाची निवड -

  • राज्याचा अधिपती हा राजा असतो व तो क्षत्रिय असावा असा संकेत होता. 

  • राजपद हे बहुदा वंशपरंपरेने मिळत असे. 

  • काही महाजनपदांमध्ये राजाची निवडणूक लोकांकडून केली जात असे.

क. राजाचे अधिकार

  •  राजाचा त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असे. 

  • प्रजेकडून किती कर वसूल करायचा, हे ठरवण्याचा अधिकार राजाला असे. 

  • राजा स्वतःच्या इच्छेने राज्याचा कोणताही भूभाग दान करू शकत असे.

ड. निर्णयप्रक्रिया -

  •  राज्यकारभार करताना पुरोहित, सेनानी, अमात्य आणि ग्रामणी (गावाचा प्रमुख अधिकारी) इत्यादींच्या सल्ल्याने राजा निर्णय घेत असे.

  •  याशिवाय जनांची समिती किंवा परिषद भरत असे. 

  • समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची उदाहरणेही आढळतात.

  • श्रेणीव्यवस्था -

  प्रश्न- महाजनपदांमधील श्रेणीव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिहा.

  •  महाजनपदांमध्ये व्यापारी, कारागीर, शेतकरी अशा विविध श्रेणी असून, त्यांची विशिष्ट पद्धतीची रचना आणि कार्यपद्धती असे.या श्रेणीव्यवस्थेची वैशिष्ट्ये -

  •  श्रेणींचे स्वतःचे नियम असत. त्यामुळे त्यांची रचना बंदिस्त स्वरूपाची असे. 

  • श्रेणींचे बंदिस्त स्वरूप हे जातीव्यवस्था उदय पावण्याच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

  • विविध व्यवसायांचे स्थानविशिष्ट संघटन असे. व्यावसायिक कौशल्यांचे वंशपरंपरेने हस्तांतरण होत असे. 

  • अनुभवी ज्येष्ठांकडे व्यवसायाचे नेतृत्व असणे आणि ते इतरांनी स्वेच्छेने स्वीकारणे, ही श्रेणींची वैशिष्ट्ये होती.

  •  श्रेणींच्या कार्यपद्धतीवर राजसत्तेचे नियंत्रण असे.श्रेणींमार्फत केले जाणारे उत्पादन, आर्थिक व्यवहार यांची तपशीलवार नोंद केली जात असे.

  • श्रेणींतील सदस्य आणि कर्मकार यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादित मालाची किंमत ठरवणे या गोष्टींसाठी प्रत्येक श्रेणींच्या  स्वतंत्र परंपरा व त्यावर आधारित नियम असत.

  • श्रेणींच्यासंदर्भात एखादा निर्णय घेताना राजा श्रेणींच्या प्रतिनिधींचा असा सल्ला घेत असे.

  • विनावेतन काम करणाऱ्यांना ‘दास’ म्हणत.श्रेणींच्या निधीतून गरजूंना दानधर्म करत, तसेच माफक दराने कर्ज ही देत असत.

  • मौर्यकाळापर्यंत श्रेणीव्यवस्थेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्व प्राप्त झाले होते. 

  • तत्त्वज्ञान आणि विविध संप्रदाय -

  •  निसर्गाची कितीतरी अद्भुत रूपे आर्यांनी पाहिली.निसर्गाच्या विविध रुपांविषयी आर्याना माहिती आणि आदर निर्माण झाला. 

  • तसेच त्यांना त्यांची उपयुक्तता ही पटली. निसर्गाविषयीच्या श्रद्धेतून त्यांनी निसर्गाच्या विविध रूपांना देव-देवतांचे स्वरूप दिले.

  •  यातूनच आर्यांच्या देव-देवता उदयास आल्या.आर्यांनी देव देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञविधी निर्माण केले.

  •  ऋग्वेदकाळात यज्ञाचे स्वरूप साधे होते. कर्मकांड नव्हते. देवदेवतांच्याकडे त्यांनी केलेल्या मागण्या भौतिक सुखाच्या होत्या. 

  • ऋग्वेदकाळात इंद्र आर्यांची प्रधान देवता होती. इंद्रानंतर अग्नि प्रमुख देवता होती. वरूण आर्यांची तिसरी महत्त्वाची देवता होती. निसर्गाचे संतुलन देवतेवर अवलंबून आहे असे ते मानत.

  •  उत्तर वैदिक काळात इंद्र आणि वरुण या देवतांचे महत्त्व मागे पडले. प्रजापती, रुद्र आणि विष्णू या नव्या देवता उदयाला आल्या. 

  • प्रजापती हा सर्व विद्यांचा निर्माता मानला जाऊ लागला. पुढे रुद्र हाच प्रजापती  मानला गेला. 

  • पशुपती ही अनार्यांची देवता होती. या काळात पशुपती हाच शिव मानला जाऊ लागला.

  • सूर्य देवाचे एक रूप म्हणून विष्णू ही देवता उदयाला आली. पुढे विष्णू हा वासुदेव या नावाने प्रसिद्ध  आला.

  •  पुढे महाकाव्य काळात कृष्ण हे विष्णूचे एक रूप मानले गेले. 

  • ऋग्वेद काळातील आर्यांच्या धर्माचे स्वरूप ऋग्वेद या एकाच ग्रंथातून समजते.

  •  उत्तर वैदिक काळातील धर्म यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणके,आरण्यके, उपनिषदे, वेदांगे आणि  षड्दर्शने  यामधून स्पष्ट होतो. 

प्रश्न -  प्राचीन भारतीय दर्शन यांच्या दृष्टीने इसवी सन पूर्व सहावे शतक हे महत्त्वाचे का मानले जाते?

  • लोकायत यासारखी तात्विक प्रणालीही होती.  वैदिक काळाच्या शेवटी मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ, मानवाचे वैश्विक पसाऱ्यातील स्थान, मृत्यूचे रहस्य आणि मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास या सारख्या अमूर्त गोष्टींचा विचार प्रकर्षाने सुरू झाला. 

  • उपनिषदांच्या निर्मितीची सुरुवात झाली. वैदिक परंपरांवर आधारलेल्या धारणांमध्ये गृहस्थ जीवन, यज्ञसंस्था आणि लौकिक समृद्धी यासंबंधीचे विचार मध्यवर्ती होते. 

  • यांच्या काळात बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनासंबंधीच्या धारणांच्या क्षेत्रात उमटले.  

  • आत्म्याचे अस्तित्व चिरंतन असते, या धारणेवर आधारलेले तत्त्वज्ञान ते, त्याचे अस्तित्व नाकारणारे तत्वज्ञान अशा विविध प्रणाली उदयाला आल्या.

  •  त्यामध्ये जे अनुभवसिद्ध असते, त्यालाच सत्य मानणाऱ्या आणि वैदिक धारणांवर आधारलेली समाजव्यवस्था आणि कर्मकांड यांना मुळापासून नाकारणारे चार्वाक किंवा 

  • चार्वाक हे अग्रगण्य नास्तिक दर्शन असून त्याने वेदप्रामाण्य, ईश्वर आणि पारलोक यांचे अस्तित्व आणि त्यातून उद्भवणारे कर्मकांड यांना विरोध केला.

  • भारतीय विचारधारेतील ते एकमेव जडवादी (भौतिकतावादी) दर्शन आहे. 

  • प्राचीन भारतीय दर्शनांची तांत्रिक बीजे याकाळात रोवली गेली. त्यादृष्टीने इसवी सनापूर्वीचे ६ वे शतक महत्त्वाचे आहे. 

  • गृहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी, एका ठिकाणी न राहता सतत भटकंती करणारे ‘परिव्राजक’ किंवा ‘श्रमण’ आणि त्यांचा शिष्य संप्रदाय याची सुरुवात हे या काळाचे वैशिष्ट्य आहे.

  •  या काळांचे तत्त्वज्ञान समाजातील विविध स्तरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आपलेसे वाटले. 

  • त्यामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केलेला उपदेश आणि त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान अग्रक्रमावर होते. 

  • त्यांच्या शिकवणुकीमध्ये समाजातील वर्ण आणि जातीवर आधारलेल्या समाजव्यवस्थेतील विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग होता.

  • जैन आणि बौद्ध या दोन्ही दर्शनांचा अंतर्भाव नास्तिक दर्शनामध्ये केला जातो.

  •  वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी वेदांचे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या गोष्टी नाकारल्या. 

  • त्यामुळे त्यांना समाजाच्या सर्व स्तरांतून मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले. थोडक्यात ऋग्वेदकाळात आर्यांचा धर्म उदयास आला. 

  • उत्तर वैदिक काळात त्याचा विकास घडून आला. नवे धर्म, तत्त्वज्ञान उदयास आले.

  •  मानवी जीवनातील आणि विश्वाच्या निर्मिती गुढमागील गूढ शोधण्याचा प्रयत्न झाला. 

  • मात्र धर्मामधील काही तत्वांची गुंतागुंत आणि क्लिष्टता वाढली. प्रसंगी अतिरेक झाला. सामान्य माणसापासून धर्म दूर जाऊ लागला.

  • पुढे सामान्य माणूस वैदिक धर्मापासून हळूहळू दूर गेल्यानेच, भारताच्या भूमीत जैन आणि बौद्ध या धर्मांचा उदय  घडून आला.

  • नवीन धर्म प्रवाह

  • जैन धर्म -

  •  जैन धर्माने साधेसोपे तत्वज्ञान मांडले. स्त्री-पुरुष समतेचे तत्त्वज्ञान सांगितले, स्त्रियांना मुक्ती मिळू शकते हा विचार मांडून तिला धर्मस्वातंत्र्य दिले.

  •  जातीव्यवस्था अमान्य करून सामाजिक समतेचा विचार मांडला.

  •  हे सर्व विचार, ज्ञान सर्वसामान्य माणसाच्या बोलीभाषेत, प्राकृत भाषेत मांडल्याने सामान्य माणूस या धर्माच्या तत्त्वज्ञानाकडे आकर्षित झाला, त्यातूनच जैन धर्माचा उदय घडून आला.

  • जैन तत्वज्ञानानुसार, ऋषभदेव हे पहिले तीर्थकर असून, पार्श्वनाथ हे तेविसावे तीर्थंकर आहेत. 

  • तीर्थंकर म्हणजे धर्म प्रकट करणारा. पार्श्वनाथ यानंतर सुमारे २५० वर्षांनंतर महावीर जैन हे २४ वे तीर्थंकर झाले. 

  • जैन धर्माच्या परंपरेनुसार महावीर जैन हे शेवटचे तीर्थंकर मानले जातात.

  •  पहिले तीर्थंकर ऋषभदेव हे एक राजपुत्र होते. असे सांगितले जाते की, दरबारात नाचणार्‍या एका सुंदर  नृत्यांगणेच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांना वैराग्य आले. त्यांनी ऐश्वर्याचा त्याग करून अरण्यात चिंतन केले, तेथेच त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. याच ज्ञानाचा त्यांनी प्रचार सुरू केला आणि त्यातूनच जैनधर्म उदयाला आला.

  •  तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ हे देखील  बनारसच्या राजाचे राजपुत्र होते. तपश्चर्या केल्याने त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.

  •  जैन धर्माच्या तत्वज्ञानानुसार आज  ‘पंचमहाव्रते’ सांगितली जातात, त्यातील चार प्रमुख तत्त्वे पार्श्वनाथ यांनी सांगितली असून, त्यानंतर महावीरांनी त्यांच्या जोडीला ‘ब्रह्मचर्य’ तत्त्वज्ञान सांगितले. 

  •  पंचमहाव्रते -

          १.  अहिंसा - हिंसा करू नये. 

          २.  सत्य- नेहमी खरे बोलावे.

          ३. अस्तेय - चोरी करू नये. 

          ४. अपरिग्रह - संपत्ती साठवू नये.  

          ५.  ब्रह्मचर्य - ब्रह्मचर्य पालन करावे.

  • वर्धमान महावीर - ( टीप लिहा)

  •  इसवी सन पूर्व ५९९  मध्ये वैशाली नगरजवळील कुंडग्राम येथे (आजच्या बिहारमधील मुजफ्फर जिल्ह्यात)  पिता सिद्धार्थ आणि माता त्रिशलादेवी या राजघराण्यातील मातापित्यांच्या पोटी वर्धमान महावीर यांचा जन्म  झाला.

  • यशोमती नावाची सुंदर पत्नी आणि अनुजा नावाची सुंदर मुलगी (कन्या) त्याग करून विरक्तावस्थेतील वर्धमान यांनी वयाच्या 30 व्या वर्षी गृहस्थी जीवनाचा त्याग करून खऱ्या सुखाचे मूळ शोधण्यासाठी सुमारे तेरा वर्ष तपश्चर्या केली.

  •  वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.या काळात त्यांनी स्वतःला क्लेश करून घेतले, प्रसंगी अन्नाचा त्यागही केला.

  • वर्धमान यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला. एक वेळ शत्रूवर  विजय मिळविणे सोपे, परंतु इंद्रियांवर विजय मिळवणे फार कठीण.

  • युद्धभूमीवरील शत्रुवर शस्त्रांच्या शक्तीने विजय मिळविणारा वीर असतो, मात्र इंद्रियांवर विजय मिळविणारा महावीर ठरतो. याअर्थाने वर्धमान हे महावीर जैन या नावाने प्रसिद्ध  पावले. 

  • इंद्रिय म्हणजे जिन. जिन या शब्दावरून या धर्माला जैन या नावाने ओळखले जाऊ लागले.

  •  लोक त्यांना केवली’, जिन’, महावीर या नावांनी संबोधू लागले व त्यांच्या अनुयायांना ‘जैन’ म्हटले जाऊ लागले. प्राप्तीनंतर तीस वर्ष वर्धमान महावीर आणि लोकांना उपदेश करण्यासाठी सतत भ्रमण केले. 

  • वर्धमान महावीर यांनी अर्धमागधी या लोकभाषेत उपदेश केला. त्यांनी सदाचरण आणि व्रतस्थ आयुष्याचा पुरस्कार केला.

  •  त्रिरत्ने -  महावीरांनी तीन मूलभूत तत्त्व सांगितले आहेत.

            १.  सम्यक दर्शन -  

            वर्धमान महावीर सर्वज्ञ असून त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान सत्य आहे असे मानणे म्हणजे          सम्यक दर्शन होय.

             २.  सम्यक ज्ञान -  वर्धमान महावीर यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान समजावून घेणे म्हणजे    सम्यक ज्ञान होय.

              ३.  सम्यक चरित्र -  वर्धमान महावीर यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार आचरण    करणे म्हणजे सम्यक चरित्र  होय.

         जैन धर्माने सांगितलेल्या या तीन मूलतत्त्वांनाच त्रिरत्ने असे म्हणतात.

  • ‘अनेकांतवाद’ वर्धमान महावीर यांच्या तत्वज्ञानाचे  गाभासूत्र होते. त्यानुसार सत्य हे एकांगी नसून त्याचे अनेक पैलू असतात.

  •  महावीरांनी स्वतः जैन संघाची स्थापना केली. महावीरांच्या नंतर सुमारे दोनशे वर्षांनी मगध देशात भयंकर दुष्काळ पडला होता.

  •  त्यामुळे जैनमुनी भद्रबाहू हा आपल्या शिष्यांसह कर्नाटकात गेला व तेथे त्याने जैन धर्माचा प्रसार केला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचा शिष्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा होता.

  • चंद्रगुप्ताने आपल्या सम्राट पदाचा त्याग करून जैन धर्म स्वीकारला आणि कर्नाटकात धर्मप्रसार केला. 

  • ज्या डोंगरावर चंद्रगुप्ताचे वास्तव्य होते ते ठिकाण आजही चंद्रगिरी या नावाने ओळखले जाते. याच काळात श्रवणबेळगोळ हे जैन धर्माचे दक्षिणेतील प्रमुख केंद्र बनले होते.

  •  बौद्ध धर्म -

  • वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध हे समकालीन होते. 

  •  बौद्ध धर्माचे संस्थापक सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये तराई भागातील लुंबिनी (रुम्मिनदेई) इ.स.पू. ५६३ मध्ये झाला.गौतम बुद्धांचे पिता शुद्धोदन हे शाक्य कुळातील होते, तर आई मायादेवी कोलीय कुळातील होत्या. गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव यशोधरा होते. 

  • शुद्धोदन हे मूळचे अयोध्येतील शाक्य क्षत्रिय राजवंशातील होते. त्यांचे पूर्वज नेपाळमधील तराई येथे स्थायिक झाले होते. 

  • .कपिलावस्तू येथे त्यांचे गणतंत्र पद्धतीचे राज्य होते. सिद्धार्थने सांसारिक जीवनात रमावे यासाठी, त्यांच्या पित्याने सर्व प्रकारची काळजी घेतली होती. परंतु सिद्धार्थ सांसारिक जीवनात रममाण झाले नाहीत. 

  • वार्धक्य, आजारपण, मृत्यू आणि शोक दुःखाची प्रतीके त्यांच्या पाहण्यात आली आणि त्यांच्या मनात विरक्तीची भावना निर्माण झाली. 

  • पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल यांचा त्याग करून दुःखाचे मूळ शोधून जीवनाचे खरे सत्य जाणून घ्यावे, भगवी वस्त्रे धारण करून संन्यासी  बनले. या घटनेलाच ‘महाभिनिष्क्रमण’ असे म्हणतात.

  • संन्यासी झालेल्या सिद्धार्थ यांनी अनेक ज्ञानी व्यक्तींकडून ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. 

  • अत्यंत क्लेश सही करून घेतले अन्न पाणी वस्त्र निवारा या सर्वांचा त्याग करुनही त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नाही.

  •  शेवटी आत्मक्लेशाचा मार्ग त्यांनी सोडून दिला. भटकंती, चिंतन आणि तपस्या चालूच ठेवली. सहा वर्षांच्या कालखंडानंतर निरंजन (लीलाजन) नदीच्या काठावर, गया येथील एका पिंपळाच्या वृक्षाखाली  ध्यानस्थ बसले.चिंतन करीत असतानाच त्यांना वयाच्या ३५ व्या वर्षी दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली.

  •  दिव्य ज्ञान प्राप्त झालेला म्हणजे बुद्ध होय. या अर्थाने सिद्धार्थ आता बुद्ध या नावानेच ओळखले जाऊ लागले. कसे तथागत’, शाक्यमुनी म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

  • ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सारणाथजवळील  ‘इशीपट्टन’ येथे  मृगवनामध्ये पहिला उपदेश केला. या प्रसंगाला धुमस बत्तन ‘धम्मचक्कपबत्तन’ असे म्हटले जाते. .

  • पुढे ४५  वर्ष लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी सतत भ्रमंती केली. त्यांनी पाली या लोकभाषेमध्ये उपदेश केला.

  • पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाल्याने तो पिंपळवृक्ष बोधीवृक्ष या नावाने संबोधला गेला.

  •  सिद्धार्थची माता मायादेवी हिचे निधन झाल्याने सिद्धार्थचा सांभाळ मावशी गौतमीने केला. म्हणून सिद्धार्थ गौतम या नावाने ओळखला  जात असे. 

  • अशा अर्थाने सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. बुद्धांना प्राप्त झालेले ज्ञान, त्यांनी दिलेली शिकवण व आचरण, यास बौद्ध धर्म म्हटले जाऊ लागले.

  •  गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशात दुःख’ या मनुष्य जीवनाच्या मूलभूत प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधले.

  • मुळात दुख का होते आणि दुःख उत्पन्न होऊ न देण्याचा उपाय काय, या दोन गोष्टींना अनुलक्षून त्यांनी लोकांना उपदेश केला. त्यांच्या उपदेशात त्यांनी चार आर्यसत्य(श्रेष्ठ सत्य) सांगितले. ती म्हणजे----

  • आर्यसत्ये -

      १.  जगात सर्वत्र दुःख आहे.जन्म हा दुःखमय आहे. वार्धक्य,आजारपण, मृत्यू, शोक  या   गोष्टी दुःखमय आहेत.

      २. सर्व दुःखाचे मूळ कारण तृष्णा (वासना) आहे. यामुळेच मनुष्य भोगविलासाकडे   आकर्षित होत असतो.

       ३.  वासना किंवा तृष्णा यांचा त्याग केल्याने दुःखाचा नाश होईल.म्हणजेच तृष्णेवर विजय    मिळवला की दुःखनिरोध होतो.

        ४.  अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधचा मार्ग आहे. वासनेचा त्याग करण्यासाठी अष्टांग   मार्गाचा स्वीकार केला पाहिजे.

  • अष्टांगमार्ग-

              अष्टांगिक मार्गामध्ये गौतम बुद्धांनी पुढील आठ गोष्टी सांगितल्या.

         १.  सम्यक दृष्टी - निसर्ग नियमाविरुद्ध काहीही घडत नाही, हे  स्वीकारणे.

         २.  सम्यक संकल्प -  योग्य निर्धार

         ३. सम्यक वाचा -  योग्य बोलणे.

         ४. सम्यक कर्मांत -  योग्य वर्तणूक

         ५.  सम्यक आजीव -  योग्य मार्गाने उपजीविका

         ६.  सम्यक व्यायाम -  अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे

         ७.   सम्यक स्मृती -  आत्ताची अखंड सावधानता आणि त्यायोगे योग्य गोष्टींची स्मृती

         ८.  सम्यक समाधी -  सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणे.

              अष्टांगिक मार्ग ‘मध्यम प्रतिपद’ असे म्हटलेले आहे. 

  • पंचशील तत्वे - 

  • खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी गौतम बुद्धांनी पाच नीतीतत्त्वांचे (पंचशील)  आचरण सांगितलेले आहे.

       १.  अहिंसा-- कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये.

       २.  सत्य - नेहमी सत्य बोलावे.

       ३.  अस्तेय -  स्वतःला चे दिलेले नाही ते घेऊ नये, म्हणजेच चोरी करू नये.

       ४.  अपेयपान -  मादक पदार्थांचे सेवन करू नये.

       ५.   ब्रम्हचर्य -  ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे.

  •  गौतम बुद्धांनी भिक्खुंचा संघ प्रस्थापित केला. बौद्ध धर्मामध्ये बुद्ध,धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिषरण असे म्हणतात. 

             ‘बुद्धं सरणं  गच्छामी, धम्मं  सरणं गच्छामि आणि संघं  सरणं  गच्छामि’ या तीन        प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानलेल्या आहेत.

  • इसवी सनापूर्वी ६ व्या शतकात प्राचीन भारतात जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडून आले.

  •  महाजनपदांमधील सत्तासंघर्षाला या शतकात सुरुवात झाली. काशी, कोसल, अवंती आणि  मगध या चार महाजनपदांमध्ये सत्तासंघर्ष सुरू राहिला. 

  • इसवी सनापूर्वी ४ थ्या शतकापर्यंत मगधाचे राजसत्ता प्रबळ होत गेली आणि इतर महाजनपदांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येत गेलेआणि मगध साम्राज्याचा उदय  झाला.

  • प्राचीन भारतात प्रामुख्याने वैदिक, जैन आणि बौद्ध धर्माचा उदय आणि विकास  घडून आला.  

  • याशिवाय भारताच्या भूमीत नास्तिकवादी तत्त्वज्ञानही उदयास आले. चार्वाक हा नास्तिकवादी पंथाचा एक मोठा आचार्य होऊन गेला. 

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा