इयत्ता ११ वी - (इतिहास) - प्रकरण ५

                                     प्रकरण ५ वे    

 जनपदे आणि गणराज्य


  प्रास्ताविक-

  •  उत्तर वैदिक कालखंडात ‘जन’ किंवा ‘जनपद’ ही राजकीय संकल्पना रूढ झालेली होती. 

  • ही जन  किंवा जनपद लोकसंख्येने व विस्ताराने खूप छोटी असत. 

  •   या जनपदांमधूनच पुढे लोकसंख्येने व प्रादेशिक विस्ताराने मोठी असलेली महाजनपदे विकसित झाली.

जन व जनपदे - ( संकल्पना स्पष्ट करा.)

  •  ‘जन’ म्हणजे समान संस्कृतीचे किंवा एकाच जमातीचे लोक. 

  • त्यांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद म्हणत किंवा ते ज्या ठिकाणी वस्ती करून राहत त्या ठिकाणांना ‘जनपद’ ही संज्ञा लावण्यात  येत असे.

  • आपण सर्व एक आहोत, या भावनेने बांधल्या गेलेल्या नातेसमूहांच्या समूहाला वैदिक लोक ‘जन असे म्हणत. 

  • त्यांच्या गाव-वसाहतीला ‘ग्राम’ असे म्हटले जाई. या संकल्पनेत  कुल, ग्राम, विश,गोष्ठ (गोत्र) या गोष्टींचा समावेश होतो.

  •   कुल म्हणजे कुटुंब, अनेक कुटुंबांचे ग्राम होय,अनेक ग्रामचे मिळून विश आणि या सर्वांचे मिळून जन होई.

  •  भौगोलिक सीमांचा संदर्भ ‘जन’ या संज्ञेत नव्हता. 

  • सप्तसिंधूच्या प्रदेशात पूर्वेकडे गंगा नदीच्या प्रदेशात वैदिक जन (लोक) स्थिरावू  लागल्यानंतर   सीमांविषयीच्या जाणिवा निर्माण होऊ लागल्या.

  •  या जाणिवांमधूनच स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असलेली ‘जनपदे’ अस्तित्वात आली. 

  • सीमांनी बांधलेल्या  जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजेच ‘जनपद’ होय.

  •  वैदिक  साहित्यातील उल्लेखावरून जनपदे इसवी सन पूर्व  १००० पासून अस्तित्वात होती आणि इसवीसन पूर्व ४ थ्या  शतकापर्यंत त्यांची भरभराट झाली.

  • जनपदे -

  • सप्तसिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशातून स्थलांतर करत वैदिक लोक गंगेच्या मुखाच्या  प्रदेशापर्यंत पोहोचले.

  •  या नवीन प्रदेशात वैदिक ‘जन’ स्थिरावू लागले.

  •   जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे जनपद  होय.

  • भौगोलिक सीमांसंबंधीच्या  जाणिवांच्या आधारे स्वतःची प्रशासन यंत्रणा असलेली जनपदे अस्तित्वात आली.

  •  जनपदामध्ये हळूहळू अधिक औपचारीक स्वरूपाची प्रशासन यंत्रणा विकसित झाली.

  •  अशा रीतीने औपचारीक प्रशासन यंत्रणा असणारी स्वतंत्र जनपदे ही प्राचीन भारतातील पहिली प्रस्तावित राज्य होय.

  •   जनपद या संज्ञेचा उल्लेख प्रथम ब्राम्हणग्रंथांमध्ये आढळतो.

  • जनपद या संज्ञेचा उल्लेख असणारे प्राचीन साहित्य-- 

 उत्तर वैदिक साहित्य, महाभारत, रामायण, जैन ग्रंथ,बौद्ध ग्रंथ, ब्राह्मणग्रंथ.

  •  या ग्रंथांमध्ये जनपदांचा उल्लेख वारंवार येतो.

  •   जनपदांच्या संदर्भात भौगोलिकतेचा विचार करताना या साहित्यामध्ये भारतीय उपखंडाची विभागणी पुढीलप्रमाणे केलेली आढळते - 

१.   प्राच्य -  पूर्व दिशेचा प्रदेश.

२.  प्रातिच्य -  पश्चिम दिशेचा प्रदेश

३.   उदिच्य -  उत्तर दिशेचा प्रदेश

४.    दक्षिण -  दक्षिण दिशेचा प्रदेश

५.    मध्यदेश .

  • अशा पाच प्रदेशांमध्ये भारतीय उपखंडाची विभागणी केलेली दिसते. 

  • परंतु ही विभागणी प्रामुख्याने  विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशासंबंधी आहे.

  •  पुराण ग्रंथांमधील उल्लेखांमध्ये मात्र भौगोलिक जाणिवेचा विस्तार होऊन विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील ‘दक्षिणापथ’ आणि अपरांत म्हणजे कोकण या प्रदेशांचा समावेश झालेला दिसतो.

  • चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

१.  प्राच्य -  पूर्व दिशेचा प्रदेश.

२.  प्रातिच्य -  पश्चिम दिशेचा प्रदेश

३.   उदिच्य -  उत्तर दिशेचा प्रदेश

४.   अपरांत -  विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेश. 

 (उत्तर-- दुरुस्त जोडी- अपरांत-- कोकण प्रदेश.)

  • प्राचीन जनपदांमधील काही जनपदांची नावे आणि त्यांचा उल्लेख करणारे प्रमुख ग्रंथ-

  • प्राच्य -   अंग, मगध (अथर्ववेद), किकट (ऋग्वेद आणि अथर्ववेद), पुंड्र (महाभारत).

  • प्रातिच्य - अनु,अलिन, भलाण, द्रुह्यु, परशु,पख्त, पुरू,तूर्वश, यदु (ऋग्वेद),

  •   गांधार (ऋग्वेद आणि अथर्ववेद), शाल्व  (महाभारत).

  • उदिच्य -   क्रिवि,  वैकर्ण (ऋग्वेद), बाल्हिक (अथर्ववेद). 

  •  दक्षिण -  आंध्र (महाभारत), पुलिंद (सम्राट अशोकाचे लेख).

  • मध्यदेश - अज, चेदी, भरत, मत्स्य,शिग्रू , तृत्सू,उशीनर,यक्षू (ऋग्वेद),कुरु,श्रुन्जय (ऋग्वेद आणि अथर्ववेद). 

  • भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव -

प्रश्न -  जनपदांमध्ये सुरुवातीच्या काळात प्रशासन व्यवस्था कशी होती?

  • जनपदांच्या उदयाचे प्रमुख कारण हे भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव  होती.

  •   जनपदांच्या सुरुवातीच्या काळात प्रशासनाच्या या संदर्भातील निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार ‘सभा’ आणि समिती या दोन संस्थांना होते.

  •  या सभा आणि समितीमध्ये समाजातील अनुभवी आणि ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींचा समावेश होता.

  •  जनपदाच्या  प्रमुखाला ‘राजन’ असे म्हटले जात असे.

  •  परंतु त्याला निवडण्याचे किंवा पदावरून हटवण्याचे अधिकार सभा आणि समितीला असत.

  • मात्र प्रशासनाची ध्येयधोरणे आणि समाजाच्या संघटनांसंबंधीचे संकेत यामध्ये स्थलकालानुसार परिस्थितीप्रमाणे बदल होत असे.

प्रश्न -  स्थिर होत गेलेल्या जनपदांमध्ये कोणते बदल होत गेले?

  •  सप्तसिंधूच्या प्रदेशांतून स्थलांतरित झालेले वैदिक समूह गंगा-यमुनेच्या दुआबात स्थिर झाले, त्यांचीच पुढे जनपदे बनली.

  •  कालांतराने या जनपदामध्ये बदल होत गेले.

  •  नातेसंबंधाने बांधलेला जनसमूह एवढ्यापुरते जनपदाचे स्वरूप न राहता बाहेरील लोकही त्यात समाविष्ट होत गेले.

  •  सामूहिकतेला समाजात महत्त्व येत गेले. पुढे त्यात परिवर्तन होऊन कुटुंबप्रमुख आणि कुळधर्म यांचे लोकव्यवहारात महत्त्व  वाढले.

  •  व्यक्ती-व्यक्तीमधील आणि वेगवेगळ्या कुटुंबांमधील परस्पर सहकार्यावर आधारलेले साहचर्य हा समाज व्यवस्थेचा कणा बनला.

  •  याच काळात जनपदांच्या संरक्षणासाठी अस्त्रशस्त्रविद्येत निपूण असणारा एक स्वतंत्र वर्ग जनपदांमध्ये उदयाला आला.

  •  जनपदाचे रूपांतर राज्यसंस्थेत होण्यामध्ये या वर्गाचा मोठा वाटा आहे.

  •  पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये आणि त्यानंतरच्या व्याकरण ग्रंथांमध्ये ‘जनपदिन’ या शब्दाचा उल्लेख आहे.

  •  ‘ जनपदिन’ हा शब्द अस्त्रशस्त्रविद्येत निपुण असणाऱ्या  वर्गाचा निर्देश करणारा आहे. ( (‘जनपदिन’ या शब्दाचा उल्लेख असणाऱ्या अष्टाध्यायी या ग्रंथाचा कर्ता पाणिनी आहे.)

  •  जनपदांचा विस्तार आणि विकास -

प्रश्न - जनपदाचा विस्तार आणि विकास कोणत्या तीन पद्धतींनी झाला?

  • एका विशिष्ट परिसरात पदांच्या अनेक पिढ्या स्थिर झाल्यावर या जनपदाचा विस्तार आणि विकास पुढील तीन पद्धतींनी झाला -

        १.  एकाच कुलाचे वंशज असलेले जन’ विकसित होऊन जनपदाचा उदय होणे.

               उदाहरणार्थ -  मस्य, मस्त्य, चेदी, गांधार, काशी, कोसल  हि जनपदे या पद्धतीने विकसित  झाली.

        २.  अनेक कुलांचे वंशज एकत्रित येऊन जनपदाचा उदय  होणे.  उदाहरणार्थ  -  पांचाल जनपद. या  जनपदात पाच ‘जन’ समाविष्ट झाले होते.  मात्र पांचाल जनपदामध्ये समाविष्ट झालेले पाच जन कोणते हे निश्चित सांगता येत नाही. हेमचंद्र रायचौधरी यांच्या मते, क्रिवि, तूर्वश,  केशी, श्रुन्जय  आणि सोमक हे जन पांचाल या जनपदात  समाविष्ट झाले होते. 

३.  मोठ्या बलशाली जनपदांनी छोट्या जनपदाना जिंकून  घेणे.  ‘मगध’ या जनपदाचा विस्तार या मार्गाने झाला.

गणराज्य -  

 प्रश्न -  गणराज्य आणि संघराज्य.  ( संकल्पना स्पष्ट करा).

  • उत्तर वैदिक काळात अस्तित्वात असलेल्या जनपदापैकी काही जनपदे गणराज्य पद्धतीची होती.

  •  गण म्हणजे समान सामाजिक दर्जा असलेला सत्ताधारी वर्ग.

  •  समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक निर्णय घेतले जात असत. गणराज्याची कार्यपद्धती या प्रकारची होती.

  •  अनेक कुळे किंवा अनेक जनपदे एकत्र येऊन निर्माण झालेल्या राज्यास  संघराज्य असे म्हणत.

  •  इसवी सनापूर्वी ६ व्या शतकापर्यंत अनेक  संघराज्य अस्तित्वात आली होती.

  •  संघराज्याचे तीन प्रकार होते -

  • १.एकाच कुळातील सदस्यांचे गणराज्य.

  • २. एकाहून अधिक कुळे एकत्र येऊन निर्माण झालेले गणराज्य.३.  एकाहून अधिक स्वतंत्र गणराज्य एकत्र येऊन निर्माण झालेले संघ   सं.घराज्य.

 प्रश्न -  ‘वैराज्य’ गणराज्य म्हणजे काय? 

  • राज्यांचे वेगवेगळे प्रकार उत्तर वैदिक काळातील साहित्य, जैन आणि बौद्ध साहित्य यामध्ये सांगितलेले आहेत.

  •  त्यासंदर्भात राज्य,  स्वाराज्य, भौज्य,  वैराज्य, महाराज्य, साम्राज्य आणि  पारमेष्ठ्य इ.  

  • वैराज्य  पद्धतीच्या राज्यात कोणी एक व्यक्ती राज्यकर्ता नसून, पदाचे सदस्य एकत्र येऊन राज्यकारभार चालवत असत.

  •  अशा प्रकारच्या राज्यकारभाराच्या  पद्धतीला अनुसरून प्राचीन साहित्यात या राज्यांचा उल्लेख गणसंघ असा केला  आहे.

  •  उत्तर कुरु आणि उत्तर  मद्र ही  ‘वैराज्य’ स्वरूपाची गणराज्य होती.

  •   वज्जी,  शाक्य, लिच्छवी, मल्ल हे गण संघ गौतम  बुद्धांच्या चरित्र कथेशी निगडीत आहेत.

  •  गौतम बुद्धांचा जन्म शाक्य कुळात झाला होता.  त्यांचे पिता  शुद्धोदन  यांची शाक्य गणपरिषदेचे राजा

 ( अध्यक्ष) म्हणून लोकांनी निवड केली होती.

  •  प्राचीन भारतीय संघराज्याचे किंवा गणराज्याचे तीन मुख्य प्रकार होते--

       १.  एकाच कुळातील सदस्यांचे गणराज्य. उदा.   मालव आणि शिबी.

       २.  एकाहून अधिक कुळे एकत्र येऊन निर्माण झालेले गणराज्य.  उदा.  वज्जी गणसंघ. 

            त्यामध्ये आठ कुळांचा समावेश होता. 

            त्यातील लिच्छवी  गण सर्वाधिक प्रभावशाली  होता.

       ३.   एकाहून अधिक स्वतंत्र गणराज्य एकत्र येऊन निर्माण झालेले गणराज्य किंवा संघराज्य.

              उदा.युधेय-क्षूद्रक गणसंघ. 

  •  गणसंघांच्या संदर्भात आणखी दोन प्रकारांचा उल्लेख प्राचीन साहित्यात आढळतो. 

१. आयुधजीवी संघ      २. वार्ताशश्रोपजीवीसंघ. (संकल्पना स्पष्ट करा.)

१. आयुधजीवीसंघ- 

  • या गणसंघातील लोक अस्रशस्त्रविद्येत तरबेज असून, त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून असे.

  •  त्रिगर्त, यौधेय, मालव, शूद्रक हे आयुधजीविगणसंघ होते.

२. वार्ताशश्रोपजीवीसंघ

  •  वार्ता म्हणजे व्यापार. या गणसंघातील लोक उपजीविकेसाठी  व्यापार, शेती आणि पशुपालन, तसेच युद्धकला यावर अवलंबून होते. 

  • कांबोज, सुराष्ट्र या गण संघातील लोक व्यापार आणि युद्धकला यावर उपजीविका करत असत.

  •  भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात या दोन्ही प्रकारचे व्यसन होते.

  • निर्णय आणि अंमलबजावणी यासंदर्भात गणसंघांतील फरक - 

प्रश्न -  लोकसत्ताक आणि अल्पलोकसत्ताक पद्धतीचे वर्णन करा.   (सविस्तर उत्तर लिहा.)

  • उत्तर वैदिक काळात अनेक प्रकारची गणराज्य अस्तित्वात आली.

  •  गणराज्याचे निर्णय घेण्याचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार याबाबत प्रत्येक गणराज्याची पद्धती वेगळी होती. 

  • ह्यापैकी लोकसत्ताकपद्धती आणि अल्पलोकसत्ताकपद्धती यांची माहिती पुढीलप्रमाणे -

१. लोकसत्ताकपद्धती -

  • गणराज्यामध्ये असणाऱ्या प्रादेशिक विभागांना ‘खंड’ म्हटले जाई. 

  • या सर्व खंडांमधून सक्षम व्यक्तींची निवड करून त्यांच्या हाती राज्यव्यवस्था सोपवली जाई. या पद्धतीला ‘लोकसत्ताकपद्धती’ असे म्हणतात. 

  • या पद्धतीत प्रादेशिक स्तरावर म्हणजे खंडांमधून निवड झालेल्या व्यक्तींना ‘गणमुख्य’ असे म्हटले जाई.  

  • गणमुख्य हे गणपरिषदेचे सदस्य असत. गणपरिषदेला गणसंघाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार होते.

  •  या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी गणप्रमुख म्हणजेच राजा, उपराजा (उपाध्यक्ष), सेनापती व भांडागारीक (कोषाध्यक्ष) हे  मुख्य पदाधिकारी असत.

२. अल्पलोकसत्ताक पद्धती

  •  या प्रकारात प्रशासनाचे सर्व अधिकार समाजातील अभिजनांच्या सभेकडे असत. 

  • अभिजन म्हणजे समाजातील ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती होय. 

  • या पद्धतीचा पाणिनी आणि कौटिल्य यांनी ‘राजशब्दोपजीवी’ या शब्दाने उल्लेख केला आहे.

  • वृज्जी, मद्रक, कुरु, पांचाल ही गणराज्य या पद्धतीची होती.

  •  उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील प्रदेशात आणि बिहार येथे हे अल्प लोकसत्ताक पद्धतीचे अनेक गण संघ होते.

  •  जनपदांच्या उदयाचे प्रमुख कारण  भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव होती, हे आपण बघितले.

  •  या जनपदांमधील काही बलशाली जनपदांचा विकास होत होत त्यातूनच इसवी सनापूर्वी ८ व्या शतकापर्यंत सोळा महाजनपदांचा उदय झाला. पुढील पाठात आपण  या १६  महाजनपदांचा आढावा घेणार आहोत.

           --------- समाप्त------------

                श्रीमती संगमनेरे ए.एम. 

 के.जे. मेहता हाय.व ज्यु. कॉलेज, नासिकरोड.


टिप्पण्या