वैदिक काळ
वैदिक संस्कृती -
ज्या कालखंडात वैदिक साहित्याची निर्मिती झाली त्या कालखंडाला वैदिक कालखंड असे म्हणतात.
तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटलेले दिसून येते. इतिहासाच्या तुलनेत वैदिक इतिहास समजून घेण्यासाठी विपुल असे लिखित साहित्य उपलब्ध आहे.
संशोधनानंतर हडप्पा संस्कृतीच्या नाशाला कोणी बाहेरून आलेले लोक कारणीभूत नसून नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास या गोष्टी आहेत.
अलीकडे शेकडो ठिकाणी उत्खनन होऊन तत्कालीन पुरातत्वीय साधनात दिवसेंदिवस भर पडत आहेत.
त्यामुळे वैदिक इतिहास आणखी स्पष्ट मांडण्यास मदत होते.
आर्यांनी वैदिक संस्कृती निर्माण केली, म्हणून तिला ‘आर्य संस्कृती’ असेही म्हणतात.
‘आर्य’ या शब्दाचा अर्थ भारतीय जीवन पद्धतीमध्ये सभ्य, सुसंस्कृत आणि उच्चकुलीन घेतला जातो.
यावरून असे म्हणता येईल की, कृषिवल जीवन पद्धतीतून जो समाज सभ्य, सुसंस्कृत आणि उच्चकुलीन बनला, तो समाज म्हणजे आर्य होय.
प्रश्न- आर्यांच्या मूळस्थानाविषयी विविध मते आहेत. ( तुमचे मत नोंदवा.)
‘आर्य’ लोकांचे मूळ वस्तीस्थान. ( संकल्पना स्पष्ट करा.)
आर्यांनी वैदिक संस्कृती निर्माण केली, याबाबत विद्वानांमध्ये एकवाक्यता आढळते,परंतु हे आर्य नेमके कुठले? या प्रश्नाबाबत मात्र त्यांच्यात मतभिन्नता दिसून येते.
काहींच्या मते, आर्य भारतात बाहेरून आलेले आहेत, तर काहींच्या मते,आर्य मुळचे भारतातीलच आहेत.
प्राचीन भाषा साधर्म्याचा अभ्यास करून सर विल्यम जोन्स या विद्वानाने असे मत प्रकट केले आहे की,
‘संस्कृत, ग्रीक, लॅटिन आणि पर्शियन भाषा बोलणारे लोक पूर्वी कधीकाळी एकत्र नांदत असावेत. त्यांची मूळची भाषा एकच असावी.’ हे सूत्र लक्षात घेऊन आर्यांच्या मूळ भूमीचा शोध घेण्यास सुरुवात झाली.
काही युरोपियन व जर्मन पंडितांनी आर्यांची मूळ भूमी युरोपच असावी, असे मत प्रकट केले. तर काहींच्या मते, जर्मनी हे आर्यांचे मूळ स्थान असावे.
मॉर्गनसारखे विचारवंत म्हणू लागले की,आर्यांची मूळ भूमी पश्चिम सैबेरिया असावी.
जर्मन पंडित आणि संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित मॅक्समुल्लर यांनी आर्यांची मूळ भूमी मध्य आशिया असावी,असे प्रतिपादन केले.
‘आर्य बाहेरून आले,’ या सिद्धांताचा पुरस्कार काही भारतीय इतिहासकारांनी केलेला आढळतो.त्यामध्ये--
आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती, लोकमान्य टिळक, दा.ध.कोसंबी, रोमिला थापर यांची नावे घ्यावे लागतील.
स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मते, आर्यांचे मूळ वसतीस्थान तिबेट असावे. तर लोकमान्य टिळकांनी आपल्या ‘The Arctic Home in the Vedas’ (आर्क्टिक होम इन द वेदाज) या जगप्रसिद्ध ग्रंथात, खगोलशास्त्रीय विश्लेषणानुसार, आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात असावे, असे मत मांडले.
दा.ध. कोसंबी यांच्या मते, यूरेशियाचा उत्तर भाग आर्यांचा असावा.
रोमिला थापर यांच्या मते, कास्पियन समुद्राचा परिसर किंवा दक्षिण रशियाचे विस्तीर्ण माळरान हेच आर्यांचे मूळ वसतीस्थान असावे.
काही देशी इतिहासकारांच्या मते ,आर्यांची मूळ भूमी भारतच असावी. या देशी विद्वानांमध्ये-
डॉ. ए.सी दास, गंगानाथ झा, अविनाश चंद्रदास/ वि.श्री.वाकणकर इ.
आर्य हे भारतातील की भारताबाहेरील हा वाद न मिटणारा आहे. वाद- विवादांच्या वाटेवरचा प्रवास इ.स.१६ व्या शतकात सुरू झाला.
तोपर्यंत ‘आर्य’ या संकल्पनेचा उगम झालेला नव्हता. बऱ्याच इतिहासकारांच्या मते, इंडो- युरोपियनांचा मूळ प्रदेश कास्पियन समुद्र, दक्षिण रशियातील विस्तीर्ण माळराने, किंवा मध्य आशिया हाच असावा आणि हे लोक कुरणांचा शोध घेत ग्रीस, आशिया मायनर, इराण, अफगाणिस्तान आणि भारतात विखुरले.
या टोळ्या भारतात येऊन पोहोचल्या, तेव्हा त्यांना ‘आर्य’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
अशाप्रकारे आर्यांच्या मूळस्थानाविषयी तसेच वैदिक संस्कृतीच्या कालखंडाबद्दल विद्वानांमध्ये एकमत नसले तरी इसवीसन पूर्व १५०० च्या सुमारास आर्यांनी ऋग्वेदाची रचना केली. याबद्दल सर्वसाधारणपणे एकमत आढळते.
ऋग्वेदामध्ये आर्यांच्या भौतिक जीवनाबद्दल उल्लेख आलेले आहेत.
१६ व्या शतकात पाश्चात्त्य अभ्यासकांचे लक्ष संस्कृत आणि लॅटिन, ग्रीक या भाषांमध्ये असलेल्या अनेक साम्यस्थळंकडे वेधले गेले.
त्यातूनच इंडो- युरोपीय भाषा गट ही संकल्पना उदयाला आली आणि त्या भाषांची जननी म्हणता येईल,अशा एका भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली.
इंडो-युरोपीय भाषा गट - (संकल्पना स्पष्ट करा.)
इंडो-युरोपीय भाषा कुल सिद्धांत -
या संकल्पनेचा उगम १६ व्या शतकात झाला. इसवी सन १५८३ मध्ये फिलिपो सासेटी नावाचा इटालियन व्यापारी केरळमधील कोची (कोचीन) येथे आला.
भारतातील वास्तव्यात त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला.
यामध्ये संस्कृत आणि लॅटिन शब्दांमधील साम्य त्याच्या लक्षात आले. या साम्याची नोंद करणारा तो पहिला युरोपियन होता.
उदा. संस्कृत - मातृ -पितृ, अवेस्ता - मातर - पितर, लॅटिन - मेटर - पेटर, ग्रीक - मेटर-पेटर.
पुढे इंडो- युरोपीय भाषांचे मूळ एक असावे, या कल्पनेला चालना मिळाली.
त्यातूनच अशा एका भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली.
शब्दांचा उगम आणि अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी ‘ फिलॉलॉजी’ (Philology) ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित झाली.
प्राचीन भारतीय वाड.मयात आणि साहित्यात युरोपियन विद्वानांमध्ये रुची निर्माण झाली.
त्यातूनच इसवी सन १७८४ विल्यम जोन्स यांनी ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाॅल’ या संस्थेची स्थापना केली.
त्यानंतर प्राचीन भारतीय संस्कृती व ग्रंथांचे संकलन,अनुवादन तसेच वैदिक वाड.मयाच्या आणि पुरातत्वीय संस्कृतींच्या संशोधनाला चालना मिळाली.
( निर्माते मूळ ठिकाणाहून आग्नेयेस हिंदुकुश पर्वतापर्यंत आले. ते पारशी आणि वैदिक आर्यांची पूर्वज होत. पारसी व भारतीय संस्कृतीत विलक्षण साम्य आढळते. यावरून ते पूर्वेकडे भारतात शिरले.)
या दोन क्षेत्रांमधील संशोधनाच्या आधारे वैदिक वाड.मयाचे निर्माते पश्चिमेकडून आले आणि येताना अश्वविद्या,आऱ्यांची चाके असलेले वेगवान रथ, तसेच रथावर आरूढ होऊन अस्त्रे चालविण्याची विद्या या गोष्टी बरोबर घेऊन आले.
आर्यांची युद्धविद्या अधिक प्रभावी होती. हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक वाड.मयामध्ये शत्रु म्हणून उल्लेख असलेले ‘दस्यू’ किंवा ‘दास’ उल्लेख आहे. दस्यू कृष्ण वर्णाचे, बसक्या नाकाचे, आणि विलक्षण भाषा बोलणारे होते.
आर्य संस्कृतीचा विस्तार प्रारंभी - अफगाणिस्थान, बलुचिस्तान आणि इराणच्या काही भागात तर पंजाब,हरियाणा, राजस्थान व गुजरात या भागात घडला.
याच प्रदेशात हडप्पा संस्कृतीचा उगम, विकास आणि ऱ्हास घडला.
त्यामुळे उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे वैदिक लोकांची संस्कृती असे मत अनेक तज्ञ मांडतात. कारण वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एकवाक्यता नाही.
सप्तसिंधूचा प्रदेश - म्हणजे सात नद्यांचा प्रदेश होय.
१. पूर्वेला सरस्वती (घग्गार-हाक्रा),
२.पश्चिमेला सिंधू,
३.पंजाबमधील शतद्रू (सतलज),
४. विपाश (बियास),
५. असिक्नी (चिनाब),
६. परुशनी ( रावी),
७.वितस्ता ( झेलम) इ. नद्यांची खोरी म्हणजेच सप्तसिंधूचा प्रदेश होय.
याशिवाय अफगाणिस्तानमधील कुभा (काबुल), गोमती (गोमाल), सुवास्तु ( स्वात) इत्यादी नद्यांचा प्रदेश होय.
त्यांच्या प्रदेशाला वैदिक लोकांनी ‘देवनिर्मित देश’ असे म्हटले आहे.
पण ते या प्रदेशात केव्हा आले, कुठून आले, यासंबंधीचे उल्लेख मात्र आढळत नाही.
आर्य लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात संशोधक आता गुंतलेले आहेत.
अर्थातच त्यांना अद्याप निश्चित उत्तर मिळालेले नाही. जर हडप्पा लिपी वाचण्यात यश मिळाले,तर कदाचित या प्रश्नाचे उत्तर मिळेल,असे संशोधकांना वाटते.
वैदिक वाड.मय आणि समाजरचना -
वैदिक वाड.मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. त्यांची भाषा संस्कृत आहे.
आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती वैदिक संस्कृती या नावाने ओळखली जाते.
आर्यांनी निर्माण केलेली पहिली ग्रंथरचना म्हणजे वेद होय.
वेद चार प्रकारचे आहेत -
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद होय. त्यांना ‘संहिता’ असेही म्हणतात.
वेद म्हणजे ज्ञान. विद म्हणजे जाणणे. वेद मौखिक परंपरेने जतन केले गेले.
१. ऋग्वेद -
हा आर्यांचा पहिला ग्रंथ असून यामध्ये देवतांना प्रसन्न करण्याकरिता रचलेली पदे आहेत. त्या पदांना ‘ऋचा’ असे म्हटले जाते.
एक छंदोबद्ध काव्य म्हणजे ऋचा होय.
अनेक ऋचा एकत्र गुंफून सुक्त तयार होते.
अनेक सूक्तांचे मिळून एक मंडल तयार होते.
ऋग्वेदात एकूण १०५५२ ऋचा आहेत तर, १०२८ सुक्त आहेत. संहितेत १० मंडलात विभागली आहेत.
२. यजुर्वेद -
हा ग्रंथ यज्ञाविषयी माहिती देणारा आहे.
यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण यात केलेले आहे.
त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा, याचेही मार्गदर्शन केलेले आहे.
हे मंत्र ऋग्वेदातील ऋच्याच असतात.
३. सामवेद -
यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्र स्वरूपात तसेच तालासुरात गायन कसे करावे, याचे मार्गदर्शन केलेले आहे.
भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहेत.
सामवेदाचे आर्चीस व उत्तर आर्चिस असे दोन भाग आहेत.
आर्चीस म्हणजे ४८५ रागांचा संग्रह आहे. तर उत्तर अर्चिस मध्ये ४०० गाणे आहेत.
त्यातील ७५ वगळता बाकीच्या सर्व ऋच्या ऋग्वेदातील जशाच्या तशा घेतलेल्या आहेत.
४. अथर्ववेद -
या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनातील संकटे निवारण करण्याकरिता आणि उत्तम आरोग्याकरिता कराव्या लागणाऱ्या उपायांची माहिती आहे.
यामध्ये काही मंत्र मानवाला सुख देणारे तर काही मंत्र पिडा देणारे आहेत.
यामध्ये मंत्रतंत्र जादूटोणा यासारखे विषय आलेले आहेत.
याशिवाय काही सूक्ते रोगनिवारणार्थ लिहिलेले आहेत.
भारतीय वैद्यकशास्त्राचा (आयुर्वेदाचा) उगम मानला जातो.
याशिवाय यामध्ये राजनीति संबंधित माहिती आढळते.
याशिवाय कालांतराने -
१. ब्राह्मणग्रंथ -
यामध्ये वेदांचा वापर कसा करावा याबाबतची माहिती आहे.
२. आरण्यके -
विविध ऋषी-मुनींनी अरण्यात एकांतवासात राहून सृष्टीची निर्मिती, आत्मा, परमात्मा आणि मानवी जीवन या विषयावरील ग्रंथ अरण्यात तयार झाले, म्हणून त्याला आरण्यके असे म्हणतात.
वानप्रस्थाश्रम घेतल्यानंतर अरण्यात जाऊन रचलेल्या ग्रंथांचा समावेश यात होतो.
३. उपनिषदे -
उपनिषदे यांचा अर्थ गुरुजवळ बसून मिळविलेले ज्ञान होय.
यामध्ये जीवनातील अनेक प्रश्नांवर सखोल चिंतन करण्यात आलेले आहे.
हे ब्राह्मणग्रंथाच्या शेवटी येत असल्याने त्यांना वेदांत असेही म्हणतात.
वेद वाङमयाची निर्मिती दीर्घकाळ सुरू होती.ती पूर्ण होण्यास सुमारे १५०० वर्षांचा काळ लागला असावा.
वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेद-वाङमय हे महत्त्वाचे साधन आहे.
वेदकाळातील समाजरचना, कुटुंबव्यवस्था, आणि दैनंदिन जीवन यांची माहिती मिळते.
वर्णव्यवस्था -
वर्णव्यवस्था ही भारतीय जातिव्यवस्थेचे उगमस्थान आहे.
सुरुवातीच्या काळात व्यवसायावरून ब्राह्मण, क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र असे वर्ण निर्माण झाले.
वर्णावर आधारित व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील दहाव्या मंडलात प्रथम येतो.
वेदकाळाच्या उत्तरार्धामध्ये वर्णव्यवस्थेतील सुरुवातीची लवचिकता नष्ट झाली.
जातीव्यवस्था आणि समाजात विषमता निर्माण झाली.
वर्ण आणि जात हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत.
नंतर जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे त्यात बदल करता येणे अशक्य झाले.
आश्रम व्यवस्था -
मृत्यूपर्यंतच्या काळात मानवाला जीवनाचे शंभर वर्ष आयुष्य कल्पून त्याचे चार भागात विभाजन करण्यात आले.
व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिला होता.
प्रत्येक भागाला कर्तव्य सोपविण्यात आले होते. त्यानुसार पहिला टप्पा--
१. ब्रह्मचर्याश्रम -
आयुष्याच्या व्यक्तीने गुरूच्या सानिध्यात अभ्यास करून ज्ञान ग्रहण करावे, विद्या संपादन करण्याचे कर्तव्य त्याच्यावर सोपवण्यात आले.
२. गृहस्थाश्रम -
याकाळात व्यक्तींनी विवाह करून कुटुंबाचे पालन पोषण करावे, संसारिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.
३. वानप्रस्थाश्रम -
या काळात व्यक्तीने आपल्या मुलांकडे जबाबदारी सोपवून संसाराच्या सर्व कर्तव्यातून मुक्त होणे.
आवश्यकता भासल्यास मुलांना मार्गदर्शन करावे.
ईश्वर चिंतनात वेळ घालवावा.
वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्यवस्तीपासून दूर राहावे, असेही सांगितलेले होते.
४. संन्यासाश्रम -
जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात मात्र व्यक्तीने ईश्वर चिंतनात आपला उर्वरित काळ घालवावा.
सर्व मायापाषांचा त्याग करून दूर निघून जावे.
दीर्घकाळ एका ठिकाणी वस्ती करू नये, असे निर्बंध घातलेले होते.
वैदिक वाङमयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती -
इतिहासकारांनी वैदिक संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी दोन ठळक टप्पे गृहीत धरलेले आहेत, ते म्हणजे--
१. पूर्व वैदिक काळ (ऋग्वेद कालखंड) -( इसवी सन पूर्व सुमारे १५०० ते इसवी सन पूर्व १०००)
२. उत्तर वैदिक काळ ( ब्राह्मणकाळ) -( इसवी सन पूर्व सुमारे १००० ते इसवी सन पूर्व ६००)
ऋग्वेदात आर्यांच्या प्रारंभीच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाबद्दल जे उल्लेख आलेले आहेत , त्यावरून प्रारंभी तरी निरनिराळ्या जमातींमध्ये (टोळ्या) जमातकेंद्रीय राज्य पद्धतीचा उदय झालेला दिसून येतो.
जमातींमध्ये अनेक कुले (एकत्र कुटुंब) असत. कुल हा जमातीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असे. अशा कुलांमधून जमातीचा नायक म्हणजेच राजन निवडला जाई.
बहुतेक लष्करी कूल आणि संघटन चातुर्य यांच्या जोरावरच हे राजपद प्राप्त होत असे.
थोडक्यात असे सांगता येईल की, एकत्र कुटुंब पद्धतीतूनच राजपदाची संकल्पना प्रस्थापित झाली.
सप्तसिंधूप्रदेशात राहणाऱ्या वैदिक लोकांच्या पुरु, अनु, यदु, द्रुह्यु,तुर्वश यासारख्या जनसमूहांच्या नावांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो. हे जनसमूह शेती करणारे होते.
ऋग्वेदामध्ये परुष्णी म्हणजे रावी नदीच्या तीरावर वैदिक समूहांमध्ये झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे.
दहा जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेले युद्ध म्हणून त्याला ‘दाशराज्ञ युद्ध’ असे म्हटले जाते.
प्रादेशिक वर्चस्वासाठी पहिला मोठा संघर्ष झाला तो दाशराज्ञ युद्धात.
भारतीय इतिहासात घडून आलेले हेच पहिले महायुद्ध होय.
भरत टोळीचा प्रमुख सुदास याने दहाही आर्य- अनार्य टोळ्यांचा पराभव केला.
त्यामुळे भरत वंशाच्या राज्य विस्ताराचा मार्ग मोकळा होऊन संपूर्ण सप्तसिंधूच्या प्रदेशात आणि गंगा-यमुनेच्या प्रदेशापर्यंत भरत यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
याच पराक्रमी भरत वंशावरून संपूर्ण आर्यावर्ताला भारत वर्ष हे नाव प्राप्त झाले.
पुढील काळात आर्य पंचजणांपैकी पूरु व भरत वंशशाखा एकत्र येऊन कुरुवंशाची निर्मिती झाली.
याच कुरुवंशांत पुढे महाभारत घडून आले.
वैदिक लोकांच्या जनसमूहाबरोबर काही स्थानिक जनसमूह यांचे वास्तव्य होते.
त्यांचा उल्लेख ‘दास’ किंवा ‘दस्यू’ आणि ‘पणी’ असा केलेला आहे.
पणि हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत असत. ते वैदिक लोकांच्या गाई पळवून नेत असत.
प्रश्न - ऋग्वेदकालीन जनसंघ शेती करणारे होते.( तुमचे मत नोंदवा)
पूर्व वैदिक काळात सप्तसिंधूच्या प्रदेशात ऋग्वेदकालीन संस्कृती अस्तित्वात होती.
या संस्कृतीतील जनसमुह शेती करणारे होते. याचे अनेक उल्लेख ऋग्वेदात येतात.
अश्विन व इंद्र या देवतांचा शेतीशी संबंध आहे.
अश्विन व इंद्र नांगर धरतात व भरपूर अन्न मिळवून देतात, असा वैदिक वाङमयात उल्लेख आहे.
‘कृष’ म्हणजे नांगरट आणि नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या गाव वसाहती म्हणजे ‘कृष्ट्य’ अशी संज्ञा वाङमयात आढळते.
ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात शेतीचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट सांगितले आहे.
उर्वरा म्हणजे नांगरट केलेल्या उपजाऊ जमिनीत वैदिक लोक सातू हे मुख्य पीक घेत असत.
सिंचनासाठी विहिरीतील पाण्याचा उपयोग करत असत.
विहिरीतील पाणी काढण्यासाठी गाडगी बांधलेल्या दगडी ‘चक्राचा’ ( रहाट गाडगे) उपयोग करत होते.
ऋग्वेदातील या साऱ्या लेखांमुळे हे जनसमूह शेती करणारे होते, हे सिद्ध होते.
वैदिक लोक शेतीबरोबर पशुपालनही करत असत. पशुपालनामध्ये प्रामुख्याने गाई- गुरे, म्हशी, घोडे यांचा समावेश होता.
पशुधनाचे रक्षण करणारा पूषण देव होता.
ऋग्वेदकाळात ‘रथकार’ म्हणजे रथ बनवणारा.
तक्षण म्हणजे सुतार. हे महत्त्वाचे कारागीर होते.
सुतार लाकडी पात्रे, यज्ञातील विधींसाठी लागणारी उपकरणे, स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे, इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू बनवत असत.
ऋग्वेदामध्ये १०० वल्ही म्हणजे अरित्रम असलेल्या शिडाच्या नावांचा (नौका) उल्लेख आहे.
या सर्व गोष्टींवरून वेदकाळातील सुतारांच्या कौशल्याची कल्पना येते.
‘ उखा’ म्हणजे स्वयंपाकासाठी वापरायची भांडे तसेच ‘पात्र’, ‘कुंभ’, आणि कलश यासारखे शब्द वापरलेले दिसतात.
कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख प्रथम यजुर्वेदामध्ये येतो. त्यासाठी कुलाल ही संज्ञा वापरलेली आहे.
‘वय्य’ म्हणजे विणकर. वय्या’ स्त्रीलिंगी रूप ऋग्वेदामध्ये आढळते.
त्याखेरीज वस्त्रोद्योगाचा निर्देश करणारे तंतुम ( ताना), ओतुम (बाणा) विणकरांची कांडी (तसर) असे इतर काही शब्दही ऋग्वेदात येतात.
ऋग्वेदामध्ये लोकरी वस्त्रांचा ( उर्णा म्हणजे लोकर) उल्लेख आहे. मात्र सुती किंवा रेशमी वस्त्रांचा नाही.
‘चर्मन्मा’ हा चामड्याचे काम करणारा कारागीर होय .
चामड्याच्या अनेक वस्तूंचा उल्लेख ऋग्वेदात आहे.
हिरण्य म्हणजे सोने आणि यस म्हणजे तांबे-कास्य, लोखंड. या धातूंच्या वस्तू बनवल्या जात.
धातूच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिराला ‘कार्मार’ असा शब्द होता. नद्यांमधून होणाऱ्या वाहतुकीला ‘नाव्य’ असे म्हटले जाई.
पूषण हा देव भूमार्गाचा, वरूण आणि अश्विन हे देव जलमार्गाचे अधिपती होते.
ऋग्वेदात विनिमयाचे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारात केल्या जाणाऱ्या घासाघाशीचे, नफा कमावण्यासाठी दूरवर जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे उल्लेख आहेत.
‘निष्क’ या सोन्याच्या अलंकाराचा उपयोग क्वचितप्रसंगी चलनासारखा केला जात होता.
उत्तर वैदिक संस्कृती -
हा कालखंड साधारणपणे इसवी सनापूर्वी १००० ते ६०० असा मानला जातो.
या काळातील इतिहास आणि संस्कृतीची कल्पना प्रामुख्याने त्या काळातील साहित्य ग्रंथांमधून मिळते.
पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे या काळातील विशेषतः महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या संस्कृतीचा अभ्यासही केला गेला.
ऋग्वेदकालीन जुन्या जमाती नष्ट होऊन नव्या प्रबळ जमातींची स्थापना झाली.
अशा जमातींमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो, कुरु व पांचाल जमातींचा.
ऋग्वेदकाळात पुरु आणि भरत या टोळ्या एकत्र येऊन त्यातून कुरु वंशाची स्थापना झाली.
या घराण्याचा मूळ पुरुष ‘कुरुश्रवण’ हा असून हस्तीनापुर हीच कुरूची राजधानी बनली.
या घराण्यात पुढील काळात कौरव- पांडव निर्माण झाले.
या कालखंडात उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, दक्षिणेला विंध्यपर्वत यांच्यामधील प्रदेशात झाला.
यासंदर्भात ‘शतपथ’ ब्राह्मण या ग्रंथातील विदेघ माथव( विदेह माधव) याची कथा महत्त्वाची आहे, यानुसार उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली आणि वसाहतीखाली आणला.
उत्तर वैदिक काळात हळूहळू उत्तर भारतामध्ये वैदिक समूहांच्या गाव-वसाहतींची संकुल तयार झाली, त्यांना ‘जनपद’ म्हणत असत.
बहुतेक जनपदांमध्ये समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक निर्णय घेत असत.
त्यांची कार्यपद्धती गणराज्याच्या स्वरूपाची होती.
या जनपदांमधील जी जनपदे प्रभावशाली ठरली, त्यांच्या सत्तेचा विस्तार होऊन ‘महाजनपदे’ अस्तित्वात आली.
इसवी सनापूर्वी सुमारे १००० - ६०० वर्ष या साधरणपणे ४०० वर्षांच्या कालावधीत घडलेल्या इतिहासाचा आढावा आपण घेणार आहोत. - समाप्त
छान
उत्तर द्याहटवा