अभ्यासक्रमाची रूपरेषा
विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता ११ वीपासून इतिहास विषय तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यासणार आहात. इसवी सनपूर्व काळापासून ते मध्ययुगीन इतिहासापर्यंतची भारताच्या संदर्भातील, तसेच महाराष्ट्रातील मानवी, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाची वाटचाल सुसूत्रपणे या पाठ्यपुस्तकातून उलगडणार आहे.
इयत्ता ११ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये-
कुशल मानवाने घडवलेली पहिली दगडी हत्यारे ते आजच्या युगातील यंत्रमानव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा सखोल इतिहास आलेला आहे.
त्यामुळे इतिहास हा विषय अधिक रंजक, ज्ञानदायी आणि ज्ञानरचनेला पूरक होतो.
इयत्ता ११ वीच्या इतिहास विषयाच्या अध्ययनाने विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यातील ध्येय साकारण्याच्या मार्गावरील वाटचालीला निश्चितच दिशा मिळेल.
संपूर्ण जगात विखुरलेल्या मानवी समाजाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करत, अश्मयुगापासून ते आधुनिक युगापर्यंतची वाटचाल तसेच विविध कालखंडातील विविध घटनांचा इतिहास आपण आत्तापर्यंत शिकलो.
या घटना मानवी इतिहासाच्या विविध टप्प्यांवरील परिवर्तनाच्या निर्देशक असतात.
मात्र परिवर्तनासाठी कारणीभूत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, तंत्रज्ञान अशा विविध स्तरावरील प्रक्रिया इतिहासाच्या घडणीत महत्त्वाच्या असतात.
विद्यार्थ्यांमध्ये प्रक्रिया विकसित होण्याची क्षमता वाढीस लागली तर ज्ञाननिर्मितीच्या क्षमतेचेही विद्यार्थ्यांमध्ये पोषण होईल,हा विचार या पुस्तकाच्या मांडणीचा मूलभूत आधार आहे.
पाठ्यपुस्तकांमध्ये 10,000 वर्षांहूनही अधिक प्रदीर्घ कालखंडाचा इतिहास सामावलेला आहे.
इसवी सनपूर्व 8000 ते 7000 च्या सुमारास भारतीय उपखंडामध्ये विविध ठिकाणी प्राथमिक अवस्थेतील शेतीची सुरुवात झाली.
या काळापासून सुरुवात करून मध्ययुगीन इतिहासापर्यंतची सुसूत्र मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे.
पहिल्या चार प्रकरणांमध्ये -- इसवी सन पूर्व 10,000 ते 700 या कालखंडातील म्हणजे जवळपास 9000 वर्षांहूनही अधिक कालखंडातील इतिहासपूर्व काळ उलगडलेला आहे.
प्रकरण पाच ते नऊ यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाची मांडणी केलेली आहे.
प्रकरण-10 आणि 11 मध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील संक्रमण काळाचा विचार केलेला आहे.
प्रकरण 12 आणि 13 मध्ये जवळ जवळ ४५०० वर्षांच्या काळात प्राचीन भारतीयांच्या साहसपूर्ण इतिहासाचा आढावा घेतलेला आहे.
त्या अनुषंगाने दूरवरच्या प्रदेशातपर्यंत भारतीय संस्कृतीच्या झालेल्या प्रसाराचा देखील आढावा घेतलेला आहे.
प्रकरण- 14, 15 आणि16 या शेवटच्या तीन प्रकरणांमध्ये भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा आढावा घेण्यात आलेला आहे.
हे पाठ्यपुस्तक भारताच्या इतिहासाविषयीचे असले तरी महाराष्ट्र हा एक वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश आहे हे लक्षात घेऊन, महाराष्ट्राचे ऐतिहासिक संदर्भ ठळकपणे स्पष्ट व्हावेत, याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवासा संबंधीचा दृष्टिकोन विचारात घेऊन अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची रचना तयार केलेली आहे. त्यानुसार विद्यार्थी इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत जो इतिहास शिकला, त्या इतिहासाचा एकत्रित आढावा या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना घेता येईल.
राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची तयारी अकरावीच्या पाठ्यपुस्तकातून होणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे.
तसेच जिज्ञासूंसाठी देखील अकरावीचे पाठ्यपुस्तक महत्त्वाचे आहे. यामध्ये कालक्रमानुसार उत्कंठावर्धक इतिहास आलेला आहे.
याशिवाय पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठात माहितीपर रंजक, कृतीयुक्त विविध चौकटी, रंगीत चित्रे, नकाशे तसेच विविध उपक्रम यांची माहिती दिलेली आहे. इयत्ता अकरावीतील इतिहास विषयाच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यातील ध्येय साकारण्यासाठी निश्चितच दिशा मिळेल, त्या माणसाकडे यात शंका नाही.
YouTube Video Link - इयत्ता १२ वी | इतिहास | अभ्यासक्रमाची तोंडओळख
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा