स्वातंत्र्यदिन : (१५ ऑगस्ट १९४७)
भगवान श्रीरामांचे रामराज्य, पूर्णपुरुष भगवान श्रीकृष्णाचे श्रीगीतामृत,
महाभारतातील पांडवांचे बंधुप्रेम व श्रीशिवाजी महाराजांचे आदर्श सुराज्यसुख अनुभवलेल्या भारतात सुखसमृद्धीचा स्वर्ग नांदत होता.
परंतु इ.स. १३१३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला आणि त्याने हिंदुस्थान बेचिराख केला.
त्यानंतर अनेक सुलतानांनी भारतात सत्ता गाजवली.
खैबरखिंडीतून तैमूरलंग आणि चंगीझखानाचा वंशज जहिरूद्दीन मोहम्मद बाबर आला आणि त्याने दिल्लीचा ताबा घेतला व पुढे त्याच्या मुलां- नातवंडानी भारतात राज्य केले.
त्यानंतर या समृद्ध देशात 3000 कोसांवरून पोर्तुगालमधून वास्को-द- गामा रेस्तेल बंदरातून निघाला व भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरात १४९८ रोजी आला.
त्यानंतर व्यापाराच्या निमित्ताने इंग्रज आले. त्यांनी इ.स. १७५७ च्या प्लासीच्या लढाईत बंगालच्या नबाबाचा पराभव केला.
इंग्रजांनी भारतात व्यापार करतानाच सत्ता बळकावली व ती सत्ता त्यांनी प्रखर लढ्यानंतर इसवीसन १५ ऑगस्ट १९४७ ला अखंड भारताचे भारत व पाकिस्तान हे दोन तुकडे करून दिली.
त्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी हौतात्म्य पत्करले, तुरुंगवास भोगला, बलिदान दिले, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अपार कष्ट घेतले आणि आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळवून दिले.
स्वतंत्र भारत मातेचा राष्ट्रध्वज तिरंगी व अशोकचक्रांकित आहे.
आपल्या राष्ट्रध्वजात सर्वात वर केशरी (धैर्य व त्याग), मध्यावर पांढरा (सत्य व शांती),व सर्वात खाली हिरवा (शौर्य व श्रद्धा) हे तीन रंग असून पांढऱ्या रंगाच्या मधोमध २४ आऱ्यांचे निळ्या रंगाचे अशोकचक्र (अहिंसा) आहे.
सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश यासंदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपाणी स्तंभावर कोरून ठेवलेल्या आहेत, त्यांना अशोकस्तंभ असे म्हणतात.
भारतमातेच्या राष्ट्रध्वजाची परंपरा इ.स. १९०६ पासून आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आपल्या राष्ट्राचा एखादा स्वतंत्र ध्वज असावा, असे वाटू लागले.
श्रीमती मादाम कामा यांनी फ्रान्समध्ये असताना स्वातंत्र्याचा पहिला ध्वज निर्माण केला.
त्या ध्वजात सर्वात वरच्या हिरव्या रंगाच्या पट्टीवर 'अष्टकमळे', मध्यावरच्या पिवळ्या पट्ट्यावर 'वंदे मातरम्' ही निळी अक्षरे व सर्वात खालच्या केशरी पट्ट्यावर 'चंद्र व सूर्य' यांची चित्रे होती.
हा ध्वज त्यांनी जर्मनीत बर्लिन येथे झालेल्या समाजवादी काँग्रेस परिषदेत (इ.स.१९०७) भारतमातेचे मानचिन्ह म्हणून सर्वप्रथम फडकविला.
१९२१ पूर्वी राष्ट्रीय अधिवेशन 'युनियन जॅक' खालीच होत असे.
त्यानंतर काँग्रेससाठी पांढरा, हिरवा, तांबडा अशा पट्ट्यांचा व मध्ये चरखा असलेला दुसरा राष्ट्रीय ध्वज निर्माण करण्यात आला.
राष्ट्रीय सभेने इ. स. १९३१ साली तिसरा एक प्रमाणबद्ध ध्वज तयार केला.
तो २ फूट रुंद व ३ फूट लांब असा होता. त्यात केशरी, पांढरा, पांढऱ्या रंगाच्या मधोमध स्वदेशी व उद्योग यांचे प्रतीक असलेला निळ्या रंगात चरखा काढलेला होता व सर्वात खाली हिरवा रंग होता.
सन १९४७ साली 'तिरंगा ध्वज' राष्ट्रध्वज झाला.
या ध्वजात तिसऱ्या ध्वजातील चरखा काढून त्या जागेवर अहिंसा व शांती यांचे प्रतीक म्हणून २४ आऱ्यांचे निळ्या रंगाचे अशोकचक्र ठेवण्यात आले.
राष्ट्रध्वजाचे माप-
१) २१×१४फूट (६,४०० मी. ×४२००मी.)
२) १२×८फूट (३,६६०मी.×२,४४० मी.)
३) ६×४ फूट (१८३०मी.×१२२०मी.),
४) ३×२ फूट (०,९१५मी.×०,६१०मी.),
५) ९×६ इंच (०,२२८ मी.×०,१५२ मी.)
५ व्या क्रमांकाचा ध्वज मोटार गाड्यांवर लावतात.
काँग्रेसच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव लाहोर येथे ३१ डिसेंबर १९२९ मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित नेहरू यांनी मांडला आणि तो प्रचंड उत्साहात व एकमताने २६ जानेवारी १९३० ला मंजूर झाला व पहिला स्वातंत्र्यदिन संपन्न करण्यात आला.
अर्थात नंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.
त्या मंगलदिनाची स्मृती म्हणून स्वातंत्र्यदिन संपन्न केला जातो.
या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभा करून देशाचे पंतप्रधान ध्वजवंदन करून राष्ट्राला संबोधित करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा